Monday, December 09, 2019

.....तो जिन्दा हो तुम

     दोन आठवड्यांपूर्वी एका ट्रिपला जाऊन आलो. ५-६ दिवसांची ट्रिप होती. खरंतर मी आणि नवऱ्याने ठरवूनच कधी नव्हे ते आधी बुकिंग करुन वगैरे सर्व नीट केलं होतं, तेही दोनेक महिने आधी. ट्रीपला जायचे दिवस जवळ आले तसे उत्साहाने खरेदीही केली. ती जागाच तशी होती, कॅंकून, मेक्सिको. इथल्या थंडीतून मस्त गरम वातावरणात ५-६ दिवस मिळणार होते. स्विमिंग पूल, तिथलं जेवण, ऊन आणि बाकीही पोरांच्या साठी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. आणि इतकं सगळं असूनही मला मनात एकच भीती होती. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात अशाच उत्साहाने डिस्नीला ट्रिपला गेलो होतो. आणि परत येताना पाठदुखीचा जो त्रास सुरु झाला तो सर्जरीवरच थांबला. आजवर कधी कुठे जाताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायची सवय नव्हती. मनात आलं की निघालं. कितीही लांबचा प्रवास, ड्राइव्ह असू दे. पण दोन वर्षांनी बाहेर पडताना मला भीती वाटत होती. 
       जातानाही सर्व गोळ्या, औषधं सोबत घेऊनच निघाले. तिथे पोचण्याचा प्रवास तरी नीट पार पडला होता.पहिला दिवसही वॉटर पार्क मध्ये छान गेला. पण दुसऱ्या दिवसाची मात्र मला जास्तच  काळजी होती. त्यादिवशी आम्ही झिप-लायनिंग, ऍडव्हेंचर कोर्स, स्पीड बोटिंग आणि स्नॉर्कलिंग हे सर्व करणार होतो. तिथे वेळेत पोहोचून झिपलायनिंगसाठी अंगावर साहित्य चढवलं आणि मला जबरदस्त भीती वाटू लागली. पोरं उत्साही असल्याने त्यांनाच पुढं केलं. मग हिंमत करुन दोर पकडला आणि तिथल्या लोकांनी ढकलल्यावर जे सुटले दोरावरून....... फक्त एक क्षणभर काय ती भीती वाटली पण पाण्यावर उंचावरुन जाताना एकदम भारी वाटत होतं. पहिल्या झिपलाईन वरुन नीट पोचल्यावर जरा बरं वाटलं. 
       पुढे ऍडव्हेंचर कोर्स होता. दोऱ्यांच्या जाळीला पकडून खालच्या लाकडी किंवा दोरीच्या गाठींवरुन पाय ठेवत पुढे जायचं होतं. ५ अडथळे पार करायचे होते. पोरं पटापट सरकुन पुढे जात होती आणि मी मात्र जपून पाय टाकत चालत होते. हो कुठे काय पाय मुरगळला वगैरे तर? गंमत म्हणजे माझ्या मागे दोन इथल्याच बायका ग्रुपमध्ये होत्या. त्यांचं वय निदान ५५ च्या पुढचं तरी होतं. आणि त्या निवांतपणे हे सर्व  सर्व अडथळे पार करुन जात होत्या. त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज वाटली. आम्ही शेवटचा अडथळा पार करुन स्पीड बोटच्या टप्प्यावर आलो. तिथे चार ग्रुप होते. आम्ही चौघे एका बोटमध्ये. तिथल्या माणसाने त्याच्या मेक्सिकन इंग्लिशमध्ये आम्हाला सर्व सूचना सांगितल्या. तो पुढे जाणार, आम्ही चार ग्रुप त्याच्या मागेआपापल्या बोटीत. बोटीचा वेग कमी जास्त करणे, ती चालवणे या सूचना मी जमेल तशा ऐकल्या. कारण चालवणार संदीप होता. त्या गाईडच्या मागे बोट घेऊन आम्हाला समुद्रात जायचं होतं. 
        संदीप आणि सानू बोटीत पुढे बसले आणि मी, स्वनिक मागे. आणि ज्या वेगाने बोट सुसाट निघाली, मला वाटलं संपलं !  पाठीला प्रचंड दणके बसत बोट वेगाने गाईडच्या मागे जात होती. मला त्रास होतोय म्हणून संदीपने थोडा वेग कमी करायचा प्रयत्न केला. पण आम्ही ग्रुपच्या मागे पडत होतो. म्हणून नाईलाजाने परत वेगानं जावं लागलं. लाटांवरुन, लाटांचा बोटीला बसणारा धक्का चुकवत आम्ही २५ मिनिटं बोट चालवून पाण्यात पोहोचलो जिथे स्नॉर्कलिंग करायचं होतं. मी तर पोहचेपर्यंत इतकी घाबरुन गेलेले की घरी तरी नीट पोहोचू दे असं वाटून गेलं. 
         पाण्यात एका जागी बोटी लावून गाईडने आम्हांला तोंडाला लावायचे मास्क दिले. त्याने तोंडाने श्वास कसा घ्यायचा हेही सांगितलं. पायांत बदकासारखे चप्पल घातले. सानूला नेहमीप्रमाणे घाई. ती पाण्यात उतरली, पण श्वास घ्यायचं नीट जमेना म्हणून परत वर आली. म्हटलं आपण बघावं जमतंय का म्हणून मी पाण्यात उतरले आणि एकदम समुद्रांत उतरलोय हे जाणवलं. आजवर फक्त पूलमध्ये उतरलेली मी. दोन सेकंदांतच परत बोटीवर आले. पण त्या बोटीला धरुन वर चढताही येईना. त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या वयस्कर बाईंनीच मला हातांना धरुन वर ओढलं. समोर दिसणारा किनारा, डोक्यावरचं ऊन आणि इतक्या जवळ येऊनही कोरल्स बघायला पाण्यांत उतरता येत नाही याची खंत जाणवत होती. 
        पुढच्या पाच मिनिटांत आमचा गाईड तिथे आला आणि म्हणाला, Do you need help?. म्हटलं हो हो. त्याने पाण्यात खाली घेतलं मला तरीही काही नीट जमेना. शेवटी उजव्या हाताला त्याने धरलं आणि कुठल्यातरी एका क्षणी मला ते तोंडाने श्वास घेणं जमायला लागलं. पण हात काही सोडायला जमेना. शेवटी त्या गाईडनेच मला हात धरुन पुढे नेलं, पाण्यांत. श्वास घेता येऊ लागला तशी मी पाण्याखाली डोळे घातले. दोनेक मिनिटांतच आम्ही कोरल्स बघू लागलो. आजूबाजूचे सर्व आवाज बंद झाले. फक्त माझा श्वास आणि पाण्याखाली दिसणारे कोरल्स आणि त्या गाईडचा हातातला हात. इतकंच जाणवत होतं. पुढे जाऊ तसे त्यानं मला बोट दाखवून माशांचा एक जत्था दाखवला. अगदी हात लागेल इतक्या जवळून कोरल्स पाहिले. ती शांतता, ते दृश्य अनुभवतांना मला एकदम जिंदगी ना मिलेगी दोबारा मधले ह्रितिक आणि कतरीना आठवले. घाबरलेल्या त्याला हात धरुन नेणारी ती आणि पुढे गेल्यावर अवाक नजरेने ते सुंदर दृश्य बघणारा तो. आपण हे अनुभवतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता. लवकरच मी बोटीवर परत आले. संदीप आणि पोरांचं बघून होईपर्यंत थांबलो आणि परत धक्के खात बोटीने मूळच्या जागेवर आलो. 
      पण खरं सांगू का? परत येणं ही केवळ फॉर्मॅलिटी होती. त्या अख्ख्या दिवसांत अनेक वेळा मला वाटलं होतं की 'आपण हे केलं नाहीतरी चालेल ना. काय बिघडतंय?'.  पण भीती वाटत का होईना मी त्यादिवशी तिथल्या सर्व ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्या शेवटच्या टप्प्याला हवं ते अनुभवता आलं याचं समाधान आयुष्यभर राहील. अर्थात हॉटेलवर येऊन खाऊन, पिऊन मस्त झोप काढली ही गोष्ट निराळी. पण एका दिवसाकरता का होईना मी माझा 'जिंदगी ना मिलेगी ना दोबारा' चा  क्षण जागून घेतला होता. दोन वर्षं मनात असलेली भीती थोडी का होईना कमी झाली होती. 

"दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम

हवा के झोकों के जैसे आजाद रहना सीखो 
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो 
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें 
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें 

जो अपनी आँखोमें हैरानियाँ लेके चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम 
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम. "

विद्या भुतकर. 

No comments: