Friday, October 19, 2012

पाच किलोमीटर आणि बरेच काही...3

भाग : 1          
भाग:  2
          पळणं म्हणजे नक्की कसं?  तुम्ही जर कुत्रं मागे लागल्यासारखं किंवा आपल्या दोन वर्षाच्या मुलामागे लाडाने किंवा  दोस्ताना मधल्या अभिषेक बच्चन सारखं पळत असाल तर... चूक!!! माझा गुढगा दुखायला लागला आणि मग मी अनेक गोष्टी वाचल्या कि कसं पळलं पाहिजे.  खांदे ताठ, मान आणि नजर समोर, कंबर पाण्याची घागर घेऊन जाताना असते  तशी स्थिर, पाठ सरळ, हनुवटी बाहेर नको, हाताच्या मुठीत अंड घेउन जात आहे असे अलगद वळलेल्या,  पाय जमिनीवर पडतानाही  पंजे आधी आणि टाच नंतर पडली पाहिजे. श्वास इतकाच जोरात असावा कि शेजारी कुणी असेल तर त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. सुरु करताना वॉर्म अप,  शेवटी कूल डाऊन आणि स्त्रेचिग हे सर्व काही वाचलं आणि प्रयत्न सुरु केला तसं पळायचा.  बरोबर पळते की नाही ते माहित नाही पण वाचलं ना? हे महत्वाचं. 
       याच दरम्यान लंडन ऑलंपिक्स सुरु झाले होते. आयुष्यात खेलाडूबद्दल  कधी इतका आदर वाटला नव्हता तेव्हढा वाटत होता या वेळी.  हुसैन बोल्ट का ग्रेट आहे हे आता कळत होतं. एका स्पर्धेत एक खेळाडू मध्ये पाय अडकून पडली आणि तिचे ते दु:खं बघून खूप वाईट वाटलं. ऑफिसमध्ये एक बाई आहे आमच्या, ४५ वर्षाची  तरी असेल. ३ वर्षापूर्वीच तिने कर्करोगावर मात केली आहे. ती पळते नेहमी असं मी ऐकलं होतं.  पण एक दिवस तिने सांगितलं की तिला बरं नव्हतं म्हणून ती कमीच पळणार होती म्हणून तिने १० मैल केले होते. म्हणले वेडे आहेत का हे लोक? पण इथे नेहमी बघते लोक सकाळी, दुपारी, उन्हात, बर्फातही पळताना. आता त्यांचं कौतुक वाटतं होतं.  
       माझा उत्साह मावळत असतानाच माझ्या एका मैत्रिणीने तिच्या पहिल्या हाफ मॅरेथॉन बद्दल लिहिलं होतं. तिचा हा Experience  वाचून मी इतकी प्रेरित झाले  की  पुढच्या २-३ दिवसात  मी माझं रजिस्ट्रेशन करून टाकलं होतं. मी मग तिलाही थोडं विचारलं गुढग्यांवर, मग ते व्यायाम करायला सुरुवात केली. तिने सांगितलं कि पळून झाल्यावर पाय बर्फात/ थंड पाण्यात ठेव. आता हे सर्व झाल्यावर माझा जोर जरा वाढला होता आणि १०० डॉलर भरल्यावर जर नाही पळाले तर संदीप ने घरातही घेतलं नसतं. 
        मी ३ आठवड्याच्या ब्रेक नंतर ६मैलने सुरुवात केली. आणि वाटलं सुरुवातीचे जे ३ मैल पळून मी थांबत होते ते संपले कि खरं तर पाय दुखतच नाहीत. आधीचा रेसिस्टन्सच गेला की मग सर्व ठीकच होतं. मी एकदा नवीन शूज बघायला एका दुकानात गेले होते. तिथे शूज नाही घेतले पण ते लोक शनिवारी ग्रुप रन ला जातात म्हणे म्हणून माझे नाव देऊन आले होते तिथे. मी परत सुरु केल्यावर त्यांचा एक मेल आला होता तो वाचून वाटले बघावे तर जाऊन लोकांबरोबर कसे वाटते पळायला? सकाळी ७ वाजता तिथे पोचले. लोक हळूहळू जमा झाले. कुणी ९ मैल पळणार होते तर कुणी ४ च. आणि दुकानाची मालकीण फक्त कंपनी देणार होती. तिथे गेल्यावर मला पुन्हा एकदा तेच फिलिंग आलं कि लोक किती तयार होऊन येतात? शूज, टोपी, ग्लासेस, पाण्याची बाटली कमरेला लावलेली, अंतर मोजायला घड्याळ आणि एक जण तर त्याचा कुत्राही घेऊन आला होता.   
        मी आपली शांतपणे पाळायला सुरुवात केली. आम्ही २ मैल गेलो आणि मला जोरदार धाप लागली होती. सर्वात मागे राहिलेल्या ३ लोकांच्या ग्रुप बरोबरही  मला  राहणं जमत नव्हतं. त्या दिवशी मला ९ मैल जायचं होतं आणि २ नंतर वाटलं परत जावं, म्हणजे अजून दोन मैल झाले तर एकूण ४ तरी होतील. पण मी त्या लोकांना पुढे जाऊ दिलं आणि हळहळू चालत राहिले. तो रस्ता मस्त होता. छोटी पायवाट होती ती. मेन रोडला समांतर जाणारी तरी आडोश्याला आहे अशी वाटणारी. मी माझा वेग वाढवला आणि मला माझा पेस मिळाला होता. ज्या वेगाने पळताना धाप लागणार नाही आणि जास्त वेळ पळता येईल असा पेस. तेव्हा मला वाटलं लोकांबरोबर जाणं काही जमल नाही आपल्याला, एकटेच बरे आपण. आणि कधी ४.५ मैल गेले कळलेच नाही. आता ४.५ झाले म्हणजे परत येताना अजून तेव्हढेच करून यायलाच लागले असते. त्यामुळे परत फिरले. त्यादिवशी आयुष्यातले सर्वात जास्त अंतर मी पळाले होते. :) 
        घरी येऊन मस्त थंड पाण्यात पाय ठेऊन बसले, ब्रंच करून ३ तास झोपून गेले. आता या सगळ्यात संदीप कुठे होता? तर माझ्या सोबत. एकच मुल असेल तर बरं असतं बाहेर घेऊन जायला, पण दोघांना घेऊन घरीच राहणं  बरं असतं. शनिवारी सकाळी स्वनिक उठला तर मी  जागी असुन्ही पळायला जायचं म्हणून संदीपही उठायचा.  मी आले कि मस्त चहा, नास्ता, इ काही तरी असायचच. माझे सर्व नाद त्याने पूर्ण केले बहुतेक आजपर्यंत. आधी चित्रांचा नाद, मग ब्लॉगचा ,मग सानू व्हायच्या  आधी पूर्व तयारीचा, सर्वच. यावेळीही काही वेगळी गोष्टं नव्हती. तो जिमला यायचाच  पण माझ्या ५ किमी नंतर मी त्यालाही एका ५K  ला भाग घ्यायला लावलं आणि त्याने ती मस्त २७ मिनिटात संपवली होती. :) घरातली  बाई शिकली की कुटुंब शिकतं म्हणतात ना तसंच. :)  
      त्या दिवशी लोकांकडे बघून मलाही वाटले आपण ही टोपी, ग्लासेस, बघावे म्हणून. मग अजून पुढचा नाद. नादच ते सर्व...पुढच्या शनिवारी मी मग त्या ग्रुप रनच्या लोकांच्या दुकानातून एक बाटली घेतली पाण्याची. बस. त्यादिवशी त्या दुकानाची मालकीण म्झायासोबत पाळायला आली. तीही असेल ४५-४७ वर्षाची. आरामात पळत होती.म्हणाली मला ५ मुले आहेत. २ मुली ३ मुले. वयाच्या ३० नंतर तिने असे पळायला सुरुवात केली होती आणि ती नियमित पळते म्हणे. त्या दिवशी तिच्यासोबत बोलत माझे १० मैल पूर्ण झाले होते. आणि परत येऊन ती मुलीच्या शाळेत soccer प्रक्टिस साठी  गेली होती. काय एकेक लोक असतात ना? तसे सामान्यच, पण किती प्रेरणा मिळते.
       शेवटचा आठवडा राहिला आणि मी खूप नर्व्हस झाले होते. उगाच  काही व्हायला नको. पडायला, हात पायाला, इ. इ. त्यात घरात एक ग्लास फुटला. :) मनात आले विचार की घडतातच.  मला काही झालं नाही. :) पण तरी फुटला ना? आता रेसबद्दल मेल यायला लागल्या होत्या. कधी पोचायचे, कसे जायचे, किती वेळ आहे,इ. ते वेळाच एक नाटक होतं. म्हणे १३ मिनिटात एक मैल पूर्ण करायचा होता. आणि जास्त वेळ लागणार असेल तर एक गाडी येऊन घेऊन जाईल तुम्हाला. म्हणले आता बहुतेक गाडी  आली पळा पळा असे होणार आहे माझे. रेसच्या दोन दिवस आधी रेसचे पाकीट घ्यायचे होते. त्यात माझा 'बिब नंबर', टी-शर्ट इ मिलणार होतं. बेसिकली जर ते पाकीट घेतले नाही तर रेस नाही. रविवारी रेस होती. आणि शनिवार ५ पर्यंत शेवट ची वेळ होती पाकीट घ्यायची. 
    शनिवारी म्हटले जरा घरातले काम करून जाऊ म्हणून करत करत आम्ही घरातून ३.१५ ला निघालो. उशीर झाला होता. ५ ला स्टोंल बंद होणार होता. मला रडायलाच यायला लागले. सानू म्हणे आई 'we will get there, dont cry'. शिकागो च्या गर्दीतून रस्ता मिळत नव्हता. एकदा तर  गाडी थांबलीच. सर्व वाहतूक बंद होती. हळूहळू आम्ही नेव्ही पियरला ४.५० ला पोचलो. मला तिथे उतरवून संदीप पार्किंगला गेला.  नेव्ही पियर म्हणजे जत्राच शिकागोची. २ मैलाचा मोठा रस्ता आजू, बाजूला छोटी दुकानं आणि थिएटर. उतरले गाडीतून तर कुठे जायचे कळेना. भरकटल्यासारखी फिरत होते.   मग दोन लोकांच्या हातात फॉर्म दिसले. त्यांना विचारले तर ते पण तिकडेच चालले होते. मग जरा हायसे वाटले. आत जाऊन माझे पाकीट घेतले तेव्हा ४.५६ झाले होते. माझ्यासामोरच त्यांनी लाईट बंद केले.  मी  परत गाडीकडे जाताना ४-५ लोक  तरी पळत जाताना दिसले. त्यांचं काय झालं माहित नाही. 
        पाकीट घेऊन आम्ही आमच्या मित्राकडे रहायला गेलो. तिथून रेसचे ठिकाण जरा जवळ होते. आणि  सकाळी १५ मिनिटही जास्त झोपायला मिळाल्यावर कसलं बरं वाटतं. त्याच्याकडे जाऊन  जेवण करून झोपायचा प्रयत्न केला. १२ पर्यंत तरी झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी आवरून लवकरच निघालो. आधीचा अनुभव ना? तो दिवसच एकूण चांगला होता पण. सकाळी ६.५० ला पोचले जागेवर, 'जाऊन'ही  आले आणि ७ वाजता बिगुल वाजले. माझा नंबर P ग्रुपमध्ये होता. तरी मी जरा पुढे जाऊनच उभी होते. ७.१५ पर्यंत मी पळायला सुरुवात  केली होती.  २२ हजार लोक होते तिथे त्या दिवशी. मस्त  वातावरण होतं. तिथे वेगवेगळे पेस ग्रुप होते. म्हणजे २ तासात पूर्ण करणारे, २.१० मध्ये, तर शेवटचा २.४५ चा होता. माझे टार्गेट ३ तासांचे होते. तीन तासात २१ किलोमीटर ! सुरुवात केली तेव्हा मला एक २ तासांचा पेस ग्रुप दिसला. मी त्याच्याबरोबर पळत राहिले. मग मागे पडले ती २.१० ग्रुपमध्ये. असे करत ९ मैल होऊन गेले होते. तोपर्यंत मला कळले होते  की माझा स्पीड अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. मग १० नंतर जरा हळू झाले.करत करत १३ आला पण !!!! रस्त्याच्या कडेने ओरडणारे उत्साही लोक, त्यांच्या हातातील बोर्ड,  पळणारे शेजारी सर्वच  सही  होतं.
        एकदातरी हा अनुभव घेतला हा विचार करून मस्त वाटत होतं. १३ वा मैल मग मी चालतच गेले. :) रेस संपून पण गेली एकदाची. बाहेर आले आणि एका मुलीने माझं मेडल दिलं मला. खेळातलं एकमेव पदक. ते घालून मी संदीप आणि पोरांना शोधत होते. त्यांना बघून अगदी भेटायची घाई झाली असं वाटलं. लगेच त्याला स्पीड दाखवला. :) २ तास २७ मिनिट. माझी रेस संपून गेली, आमचा मित्र आणि आम्ही फोटो काढून गाडीत बसलो. मागे बसून पाय बर्फात टाकून मी निवांत झाले होते. :) सगळा शीण गेला होता. तो अख्खा  दिवस तरी मी मेडल काढणार नव्हते गळ्यातून. अगदी बाहेर जेवायला गेलो तेव्हाही. इतक्या दिवसंची धावपळ  संपली होती. आज महिना होऊन गेला या गोष्टीला  पण कळंत नाही की मी १३ मैल कशी पळले असेन. शनिवार आला की वाटते परत पळायला जावे. माहित नाही परत कधी असं धाडस करेन की नाही,  पण हे तरी एक पूर्ण झालं होतं !!

-विद्या.



7 comments:

Sneha Kulkarni said...

Vidya, mastch! congrats!!

Meghana Bhuskute said...

भारी आहेस बाबा तू! अभिनंदन. :)

Sneha Kulkarni said...

tujhya maitrinichi link aata pahili.. tu Rrichachi maitrin aahes? sahich! same college ka?

Unknown said...

Abhinandan...I like your live experience it was great and very interesting...

Vidya Bhutkar said...

Thank you. :) It feels good to be determined about something and make it happen. :)

Abhijit Bathe said...

पाच किलोमिटर बद्दल - आणि त्या बद्दल लिहितोच आहे तर त्यानंतरच्या तुझ्या गोष्टीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल:

मी सलग १२ वर्ष कबड्डी खेळलो.
आणि बारा वर्षांत चार मॅचेस हरल्याचं मला आठवतंय.
थोडक्यात - लई तीर मारले.
पण तरी - मी हाफ मॅरॅथॉन पळालो असतो तर लईच गमज्या मारत लिहिलं असतं.
तु टिपिकल ’दो बच्चोंकी मॉं’ टाईप matter of factly लिहिलंयस. :))
जे ’सिर्फ चार मॅचेस हारे हुए दो बच्चोंके बाप’ ला कधीच जमणार नाही.
पण कदाचित त्यामुळेच - ते जास्त insirational वाटतंय.
म्हणजे वाचताना वाटतं कि - च्यायला ही एवढ्या सहजपणे लिहितिए कि पाय दुखले आणि गुडघा दुखला आणि पाच किलोमिटरला तब्बल ४१ मिनिटं लागली - पण प्रत्येक वेळी किती हाल झाले असणार याबद्दल
कल्पनाच केलेली बरी.
But then again - its not about that. Is it?
तुझी धपाककन आलेली ७-८ पोस्ट्स पाहिली आणि का कुणास ठाऊक तुझ्या त्या आधीच्या (आणि शेवटच्या) पोस्टवर जाऊन पोचलो.
गृहिणी न होण्यासाठी मारलेली फाइट ते हाफ मॅरॅथॉन.
दोन्ही लढाया तु स्वत:शी लढलीस.
नसती लढलीस तर जगाला फारसा फरक पडला नसता.
तुला पडला असता.
I would rather have an approximate answer to the right problem than an exact answer for a wrong one असं माझा बॉस म्हणायचा.
माझ्या मते हाफ मॅरॅथॉन ही - तु काय करु शकतेस - या right problem चं approximate answer होतं. तु लिहितिएस त्या गोष्टीतली कॅरॅक्टर्स exact answer च्या मागं का लागलिएत हे त्यामुळेच कळत नाही.

आपणच नसत्या लढाया शोधायच्या, त्यासाठी शारिरिक आणि मानसीक फाईट मारायची - या उद्योगाला जनरली वेडेपणा म्हणतात.
तो न करणारे लोक नॉर्मल असतात.
करणाऱ्यांना नेहमीच पदकं मिळतात असं नाही.
अथवा प्रतिक्रियाही!

लढ.

Vidya Bhutkar said...

@अभिजीत, Thanks. 'दो बच्चोंकी मा' हा त्यातला अविभाज्य घटक होता, कदाचित एकटीच असते तर ही अचीव्हमेंट तितकी ग्रेट वाटलीही नसती. पण जरा 'भारी' लिहिता आलं असतं तर लई भारी झालं असतं. :) अगदी रिपोर्ट सारखं सरळसोट लिहित गेले. त्यामुळे वाचताना बोअर होत असेल असं वाटतं.

गोष्टीबद्दल (समांतर) म्हणायचं तर तो एक प्रयोग होता काम करताना सुचलेला. म्हणजे प्लांट, ग्रेग, गाव सगळं रियल. फक्त प्रॉब्लेम ओढून आणलेला. पण त्याला 'वेड' म्हणायचं तर मग त्यानंतर लिहलेल्या १२ भागांच्या गोष्टीला तर मला येरवड्यात भरती झालं पाहिजे. :) पण तू म्हणतोस ते खरं. आयुष्यात आपण सगळे निर्णय approximate घेतो, तरीही गोष्टीत मात्र right उत्तरच हवं असतं. त्याबद्दल, नंतरच्या गोष्टीच्या दहाव्या भागात लिहीलं आहे. असो. या निमित्ताने लिहिण्याची परत सुरुवात झाली याचा आनंद जास्त आहे. :) वाचत राहा.

-विद्या.