Wednesday, November 14, 2012

भाग दुसरा: नेहा

         गाडीवर बसून नेहा निघाली त्यादिवशी सकाळी तेव्हा एकदम हवेतच होती. नेहा, नेहा आताशी कुठे वयात आलेली पोर ती. आयुष्य आपल्या घरी, घरच्यांसोबत, त्यांच्या छायेखाली घालवलेलं. तिची मजा किंवा डेरिंगची कल्पना म्हणजे फारतर कॉलेजमध्ये एखादा तास बुडवून आईस्क्रीम खायला जाणं. सगळं कसं एकदम नाकासमोर चाललेलं आजवर. डिग्री झाली, नोकरी मिळाली, ट्रेनिंगमधे असताना तिला चेन्नईला पोस्टिंग मिळत होते. तिला घराबाहेर राहण्याची इच्छा होती आधीपासून, पण चेन्नई? तेव्हा पहिल्यांदा तिने आपला आवाज थोडा वाढवलेला आणि बाहेर  जिथे मिळेल नोकरी तिथे जायचंच असा हट्ट धरलेला.

मग आई-बाबा पण म्हणाले,' राहू दे नोकरी मग. इथेच बघू दुसरी'.

         त्यांना जास्त विरोध करणं तिला जमणार नव्हतं. शेवटी ट्रेनिंग सुपरवायझरला कसेतरी पटवून पुणे मिळालंच तिला. आज प्रोजेक्टचा पहिला दिवस. ताईला असं सकाळी आवरून जाताना पाहिलं की नेहमी वाटायचं नेहाला की मी कधी जाणार अशी आवरून नोकरीला? आज सकाळी जरा लवकर उठून, छान आवरून निघाली मग ती. मस्त हलका गुलाबी रंगाचा कुर्ता, पायभर घोळणारी पतियाला सलवार आणि गळ्यात गणपतीचं लॉकेट. खांद्यावर लांब रंगीबेरंगी झोळी. केस, डोक्यावर एक क्लिप लावून खांद्यावर मोकळे सोडलेले. अर्थात गाडीवर हे सर्व सांभाळायची कसरत होतीच, पण ती आता रोजच करावी लागणार. सिक्युरिटीमधून सर्व चेक करून ती आत आली. 'वॉव काय कॅंपस आहे. आज ताईला सांगायला खूप काही आहे माझ्याकडे पण' असा विचार करत नेहा एका बिल्डिंगमध्ये शिरली.

          रिसेप्शनिस्टला तिने विचारलं, "मनोज शर्मा? अमुक अमुक प्रोजेक्टवर काम करतात ते?". तिच्या हातातल्या झोळीकडे रिसेप्शनिस्टने थोडं कुतुहलानेच पाहिलं होतं. तिच्या पोस्टिंग नंतर कळलं होतं की पुण्यात तिच्या बाबांच्या ओळखीचे एक प्रोजेक्ट मॅनेजर आहेत कंपनीत, 'मनोज शर्मा' म्हणून. त्यांच्याशी एकदा भेट पण झाली तिची. मनोज खाली आले ते हसतच. त्यांच्या ओळखीची तर होती ती. तिला मग पुढचं सर्व सुरळीतच झालं. मनोज शर्मा खाली येऊन नेहाला घेऊन गेले. तिथल्या कॉन्फरन्स रुममध्ये ती एकटीच काय ते खुलून दिसतेय असं वाटलं तिला. तिचा हसतमुख चेहरा अजूनच खुलला जेव्हा तिला प्रोजेक्ट मध्ये डेव्हलपर म्हणून घेतलं गेलं. काय सही व्ह्यू होता तिच्या खिडकीतून. आठव्या मजल्यावर तेही. सहीच सर्व.
दुपारच्या ब्रेकमध्ये सर्वांसोबत तीही कॅन्टीनला गेली. आज आईने सांगूनही ती डबा घेऊन आली नव्हती.

"शी, मी काही शाळेत आहे का डबा न्यायला? मस्त कंपनीच्या कॅंटीनमध्ये खाईन मी. " नेहा उत्साहाने आणि लटक्या रागाने म्हणाली होती. किती छोटी गोष्ट पण तिला त्याचा कोण आनंद झाला होता. तिने सर्वांसोबत जेवण केले. मस्त पनीर ची भाजी घेतली होती तिने. कुणीतरी बोललं, संध्याकाळी सही नाश्ता पण मिळतो म्हणे इथे, यायलाच पाहिजे चार वाजता खाली.

        राहुल, अजित आणि रोहन तिचे नवीन टीममेट होते आणि सिध्दार्थ टीमलीड. सगळ्यांशी अगदी खेळीमेळीने बोलत होती ती. एक दोनदा वाटलं तिला ते तिची चेष्टा करतायंत म्हणून, पण या असल्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची सवय होती तिला. असंही तिला तिचं काम सोडून बाकी काही देणं घेणं नव्हतं. राहुल आणि बाकीचे एकूणच त्यांना मिळालेल्या रोलवरुन नाराज होते हे तिला दिसत होतं. पण त्यात ती काही करू शकत नव्हती. उगाच त्यांना समजवायला ती काही त्यांची मैत्रीणही नव्हती. राहुलने आणलेले फॉर्म भरून तिचं दिवसभराचं काम झालेलं होतं. काय करायचं म्हणून रेस्टरूममध्ये दुसऱ्या टीममधल्या एका सिनियर मुलीशी ओळख करून घेतली तिने. रश्मी, गेले तीन वर्षं ती टीममध्ये होती आणि या कंपनीत ६ वर्षं. नेहाला सही वाटलं तिला भेटल्यावर एकदम ताईसारखीच. तिने तिथेच बरीच माहिती विचारायला सुरुवात केली.

"रात्री उशिरापर्यंत थांबावं लागतं का?",
"प्रोजेक्टमध्ये तिचा रोल काय आहे?",
"अप्रेजल ची प्रोसेस काय आहे?",
"बस घेतली तर किती वाजतात घरी पोहोचायला?",
"या कंपनीत पुढे स्कोप कसा आहे मुलींना?",
"तुझा ड्रेस छान आहे, कुठून घेतला?",
"एकटीच राहतेस की कुणासोबत?" असे एक ना अनेक प्रश्न नेहाने विचारले.

 रश्मी तिला जमेल तितक्या शांतपणे उत्तरं देत होती. रश्मी हे स्वतःच एक वेगळी वल्ली होती म्हणा न. तिच्याशी बराच वेळ बोलून नेहा जागेवर परतली.

"कोणीतरी बोलायला पण भेटलं ते बरं झालं", या विचारांनी नेहाला छान वाटत होतं.  आजवर ताईच्या सावलीत वाढलेली ती. शाळा कॉलेजमध्येही जीवलग दोनच मैत्रिणी. त्यांच्याशिवाय असं कुठे काम करायची तिची पहिलीच वेळ होती. त्यात टीममध्ये सर्व मुलंच. रश्मी भेटल्यावर तिला कुणीतरी मुलगी सोबतीला असेल याचाही आनंद झाला होता. आपला स्वच्छ असेलला डेस्क तिने पुन्हा एकदा पुसला, उद्या इथे एखादा फोटो घेऊन यावा असं तिने ठरवलंही. 
अजित म्हणालाच,"उद्या देवाचा फोटो, हार दुर्वा पण आण ना?". 
"तुला काय करायचंय?", म्हणत तिने त्याला उलटं उत्तर दिलं. 

       संध्याकाळपर्यंत बाकी विशेष असं काही झालं नाही. दुपारचा नाश्ताच काय तो राहिलेला. तेव्हाही तिने रश्मीला एकदा विचारलंच की 'येणार का सोबत' म्हणून. रश्मी तिच्या ग्रुपसोबत जाणार होती. मग नाईलाजाने नेहा या पोरांसोबत गेली. नाश्ता करून झाला. थोडंफार वाचून रश्मी सहा वाजता निघाली. निघताना कंपनीच्या गेटमध्ये तिला महिला गृहउद्योगाच्या काही भाज्यांचे गाडे दिसले.
"उद्या आईला विचारून इथूनच भाजी घेऊन जायची" असंही नेहानं म्हणून टाकलं.
           गाडीवरून परत जाताना तिला कधी एकदा घरी पोहोचते असं झालं होतं. इतका मोठा दिवस पहिल्यांदाच अनुभवत होती ती. कंपनीतली प्रत्येक गोष्ट तिला पुन्हा पुन्हा आठवत होती. तसा उशीर झाला पोहचायला पण घरी जाऊन प्रत्येक गोष्टं आईला आणि ताईला सांगताना जेवण कसं झालं नेहाला कळलच नाही. रात्री झोपेतही तिला ऑफिसची इमारत दिसत होती.एका नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती.

क्रमश:
-विद्या भुतकर.

No comments: