Friday, November 23, 2012

भाग सातवा: त्याची बायको

#हॅपीएंडींग? भाग ७ : त्याची बायको
        ऑन साईट, ऑन साईट जे काय लोक म्हणतात ती हौस पूर्ण झाली नेहाची एकदाची. तिच्या काही अपेक्षांना तडा गेला होता तर काही नवीन अनुभवही मिळाले होते. आजपर्यंत कधीच एकटी न राहिलेली नेहा आज परदेशात एकटी राहत होती. अर्थात सिद्धार्थ होताच तिच्या सोबतीला. तिच्या एकेक वेगवेगळ्या रूपांना बघून अजूनच प्रेमात पडला होता तो. तोही मग तिला शक्य होतील ते सर्व दाखवण्याच्या, शिकवण्याचा प्रयत्न करत होता. गाडी घेतली, गाडी चालवायला शिकवली, फॉल कलर्स दाखवले, नायगारा दाखवला. कधी ती हौसेने एखादा पदार्थ करून त्याला खाऊ घालायची तर कधी तो तिला आपली पाककला दाखवून चकित करून टाकायचा. वर्षं होतं आलं त्यांना इकडे आणि सिद्धार्थला घरी लग्नाला नाही म्हणणं अवघड जाऊ लागलं. बर आधीच ते इतके सनातनी, लग्नाला कसे तयार होतील ते, हा एक प्रश्नच होता. त्याला कधी वाटायचं त्यांना इकडे आणून दाखवावं की जग किती पुढे गेलं आहे. जिथे एखादा भारतीय भेटला, एखादी आपली गोष्ट खायला मिळाली, जिथे एखादं मंदिर दिसलं तर हात जोडावे,  अशा देशात आणून दाखवावं त्यांना, असं राहून राहून वाटायचं सिद्धार्थला.
          शेवटी त्याने पुढाकार घेऊन घरच्यांना सांगितलंच की मी नेहाशी लग्न करणार आहे. नेहाने पण घरी सांगून टाकलं. बरेच वाद-विवाद, भांडण, रडगाणं झालं. जेव्हा सिद्धार्थ म्हणाला की तुम्ही नाही म्हणालात तर मी इथेच लग्न करून इथेच राहीन, तेव्हा त्यांनी माघार घेतली. लग्न ठरलं. ३ आठवड्यांची सुट्टी घेऊन दोघे भारत्तात आले. एकमेकांच्या घरी जाऊन ओळखी करून घेतल्या. सर्व काही रीतीनुसार केलं आणि दोघेही लग्न करून अमेरिकेत परत आले. हनिमूनला मायामी ला जायचं ठरवलं  होतं त्यांनी. पण आता सुट्ट्या संपून गेल्यामुळे तो रहितच झाला थोड्या दिवसांसाठी. अर्थात तिथे काय असाही दोघांना हवा तसा एकांत होता. दिवस कसे सोन्यासारखे वाटत होते. सिद्धार्थालाही एखाद्या मुलीवर असं उधळून प्रेम करायला कधी मिळालंच नव्हतं. एकमेकांच्या छोट्या छोट्या  सर्व इच्छा पुरवणं, एकमेकांना न कळवता प्लान बनवून सरप्राईज देणं, भांडण झालं की जगबुडी झाल्यासारखा चेहरा करून दिवस काढणं, सर्वच कसं स्वप्नवत. कधी कधी रात्री भारतातून ऑफिस मधून येणाऱ्या फोनचा, साईट वरच्या तणावाचा त्रास व्हायचा, पण ते शुल्लक होतं. 
          दोन वर्षं कशी गेली कळलंच नाही दोघांना. काही महिन्यात त्यांचे परत जायचे ठरू लागले तेव्हा सिद्धार्थ अस्वस्थ झाला. त्याला अजून राहायचं होतं इथे. आताशी तर कुठे संसार जमतोय. आता अजून थोडे पैसे कमवायचे होते. भारतात एखादं घर घ्यायचं होतं. अजून २-४ तरी वर्षं राहायचं होतं त्याला. त्याने खूप प्रयत्न केले प्रोजेक्ट मध्येच राहायचे. पण वरच्या पोस्ट  साठी एक तर जागा पण कमी असायच्या, आणि काम जास्त. शेवटी त्याने धीर करून कंपनी सोडायचा निर्णय घेतला. इथेच नोकरी शोधायची. इथेच राहायचं. महिन्याभरात त्याला नोकरी मिळालीही. पण ती त्याच गावात नव्हती. ते गाव विमानाने २ तासावर होतं. नेहाला राहायचं होतं इथे पण एकटीला असं वेगळं राहायचं नव्हतं. पण पर्याय नव्हता. दोन महिन्यात नोकरी सोडून सिद्धार्थ दुसऱ्या गावी गेला. सुरवातीला खूप अवघड गेलं त्यांना असं वेगळं राहणं. नंतर त्याचीही सवय होऊन गेली. गुरुवारी सिद्धार्थ परत यायचा, विकेंड दोघे बरोबर असायचे. रविवारी ती त्याच्यासाठी जास्त स्वयंपाक करून ठेवायची. आणि सोमवारी पहाटे तो निघून जायचा. 
         सवय काय सर्वच गोष्टींची होऊन जाते. पण ती करून घेताना आतून आपण कणकण बदलत राहतो हे आपल्याला कळत नाही. दिवसभर सोबत असणारे ते दोघे असे चार चार दिवस न भेटता राहू लागले. अशावेळी आपण काय म्हणून हा निर्णय घेतला होता याची आठवण काढून पहिली पाहिजे. कधी कधी नेहाला खूप एकटं वाटायचं. शेजारच्या एका मराठी बाईकडे जायची ती चक्कर मारायला. पण तेही औपचारिक. मनात आलं म्हणून कुणाचं दार वाजवावं अशी रीत नव्हती इथे. उन्हाळ्यात तरी ठीक, पण थंडीच्या त्या लांब, काळोख्या रात्री कधी संपतात असं होऊन जायचं. मधेच तिला घरच्यांची, राहुल,रोहन सर्वांची आठवण यायची. त्यांच्याशी फोनवर बोलणं व्हायचं पण तेही आपल्या कामात गुंतलेले असायचे. सिद्धार्थ असताना सुरक्षित वाटायचं, तो सोबत असेल तर किती बरं होईल  वाटायचं. 
         अजून एखादं वर्षं असंच गेलं असेल आणि तिलाही मग प्रोजेक्ट संपला म्हणून परत जायला सांगितलं गेलं. आता इतके दिवस तिच्याकडे नोकरी तरी होती. एक रोजचं रुटीन होतं. तिकडे जायचं म्हटलं तर सिद्धार्थला नवीन नोकरी शोधायला लागणार. बरं, मिळेलही, पण त्याने तिकडे यायला तयार झालं पाहिजे ना? तो अजूनही तयार नव्हता परत जायला. नेहा विचार करून करून दमली. इथे राहायचं, इथे नोकरी करायची तरी रिसेशन आलेलं. किती प्रयत्न केले पण काही होईना. सिद्धार्थचा H१-B विसा होता. तिने त्याच्यावर 'dependent' म्हणून राहायचं तर तिला नोकरी करता येणार नव्हती. त्याच्या कंपनीने त्याचे ग्रीन कार्ड प्रोसेसिंग सुरूही केले होते. ते आले की तिलाही नोकरी करता आली असती. पण ग्रीन कार्ड कधी येनार आणि नोकरी कधी करायला मिळेल हे काही सांगता येत नव्हतं. तिला जड मनाने घरी राहायचा निर्णय घ्यावा लागला.  अर्थात घरी राहण्यामध्ये एक गोष्टं तरी चांगली होणार होती. ते दोघेही परत एकदा एका घरात तरी राहणार होते. शेवटी तिने मनातून नोकरीचा विषय काढून टाकला आणि थोडे दिवस गृहिणी व्हायचं ठरवलं. 
           आज पर्यंत नेहाला नाही म्हटलं तरी प्रोजेक्ट मध्ये असणारे ओळखीचे लोक होते. बरेच भारतीय होते. त्यामुळे वेगळा असा ग्रुप काही नव्हताच. ऑफिसमधल्या लोकांसोबतच बोलणं, भेटणं, फिरणं व्हायचं. आता नवीन गावात तिला नवीन ओळखी करून घ्यायला लागणार होत्या, नवीन नाती जोडायला लागणारी होती, आपल्या सवयी थोड्या का होईना बदलाव्या लागणार होत्या. गृहिणी म्हटलं की तिने सकाळी उठून नवऱ्याला चहा बनवून दिला पाहिजेच का? सिद्धार्थचं असं काही म्हणणं नव्हतच. पण तरीही पहिले थोडे दिवस तिने ते सर्व केलंही. उठून चहा करून देणे, त्याची तयारी करायला मदत करणे, दुपारी जेवायला आला की जेवण तयार ठेवणे. रात्रीचा स्वयंपाक दुपारीच करून ठेवणे. हळूहळू त्याचाही कंटाळा आला तिला. रोज आवरून छान तयार होऊन ऑफिसला जाणारी नेहा, घरीच तर आहे म्हणून आळसात राहू लागली. त्याच्या कंपनीच्या लोकांशीही तिच्या आता ओळखी झाल्या होत्या. पण तेही सर्व फॉर्मल. त्यांना भेटताना तिला एकच गोष्ट खुपायची, ती म्हणजे तिची ओळख आता फक्त 'त्याची बायको' इतकीच राहिली होती. आणि पुढची किती वर्षं हीच 'ओळख' राहणार हे तिलाही माहित नव्हतं. 
          
-क्रमश:
विद्या भुतकर.  


No comments: