Thursday, November 22, 2012

भाग सहावा: शोध स्वत:चाच

         आता हे नेहमीचच झालं होतं, संध्याकाळी कॉल संपला की नेहा सिद्धार्थची वाट पाहत थांबत असे. सुरुवातीला  खोटं कारण सांगून थांबायची आता कारणही सांगायचं बंद केलं होतं तिने. ती नसताना, ती दुसऱ्या कोणासोबत आहे म्हणून वाईट वाटतंय की आपली चांगली मैत्रीण सोबत नाही याचं दु:ख होतंय हे राहुलला काळात नव्हतं.  पण एकूणच त्याला सर्व गोष्टींचा कंटाळा आला होता इथे. रोहनही कंपनी सोडून गेला. अजितने रात्रीची शिफ्ट घेऊन दुपारी MBA ला अडमिशन घेतली होती. आपण मात्र इथेच आहोत अडकलेले. इथे येऊन आता त्यांना तीन वर्षं होऊन गेली होती. राहुल २ आठवड्यांची सुट्टी घेऊन घरी जाऊन आला. जरा घरी राहिल्यावर बरं वाटलं पण ऑफिसमध्ये आलं की पुन्हा तेच लोक, तेच काम, तीच ट्राफिकमधली संध्याकाळ आणि त्याच एकट्या रात्री.
          आज कधी नव्हे ती नेहा सकाळी ऑफिसला आली होती. सिद्धार्थ सोबत राहायचे म्हणून तिने तिची शिफ्टही दुपारची घेतली होती. 
ती त्याच्याकडे येऊन म्हणाली, "चल कॅन्टीन मध्ये जाऊ".
राहुल तिचा उत्साह बघून काहीच बोलला नाही. ते दोघे कॅन्टीन मध्ये जाऊन चहाचे कप घेऊन बसले. तिने टेबलावर जरा पुढे वाकून त्याला हळूच आवाजात सांगितले,"माझे ऑन साईट जायचे फायनल होत आहे."
राहुलला हे जरा अनपेक्षित होते. नेहा उत्साहात बोलली,"अरे, सिद्धार्थने सांगितले की साईटवर रिक्वायरमेंट आहे डेव्हलपरची आणि माझ्या कामाने तिकडे सर्व इम्प्रेस पण झालेत. आता पुढच्या दोन महिन्यात विसा झाला तर मग दोन वर्षं तरी तिकडेच असेन. सिद्धार्थला ही मेनेजरच्या रिक्वायरमेंटसाठी बोलावताहेत."
राहुलने काय बोलावं कळेना. तो तिला म्हणाला,"कॉंग्रट्स, कधी आहे विसा इंटरव्ह्यू? गुड, सहीच."
           कसं असतं ना? जवळचे मित्र जे 'अरे नवीन मोबाईला घेतला? सही, मला सांगितलं नाहीस? ' म्हणून रुसणारे, कधी रात्री बारा वाजता मेसेज का होईना  करून, ताई चं लग्न ठरत आहे असं सांगणारे, आज  इतके दूर? इतक्या उलाढाली झाल्या तरी ना आधी सांगण्याचा उत्साह, ना दुसऱ्याच चांगलं झालं याचा दिलखुलास आनंद. आणि सर्वात जवळच्या मित्रांसोबतच असं का होतं काय माहित? बहुदा आपण घेतलेले निर्णय त्याला चुकीचे वाटून, आपलं खरं मत ते स्पष्टपणे सांगतील याची भीती असते? की त्याला ते असं वाटतंय हे माहित असतं म्हणून समोरचाही खऱ्या भावना जवळच ठेवून बोलतो? असो. लवकरच मग नेहाचा विसा झाला. आणि सिद्धार्थचा तर होताच. दोघेही मग खरेदी, तिकडे जायची तयारी यात अडकून गेले. ती जायच्या आदल्या दिवशी राहुलला स्वत:च बोलून जेवायला घेऊन गेली. "अरे रोहन आणि अजित विचारत होते पार्टी कधी देत्येयस म्हणून ऑन साईटची", नेहा बोलली. 
        त्याचदिवशी त्याने तिला एक अलार्म क्लॉक गिफ्ट दिले. तेव्हाच त्याने तिला 'बाय' करून टाकलं. तिला सोडायला मुंबईला काही तो गेला नाही. तो त्याचा विकेंड सुना-सुना गेला एकदम. रोज भेटत नसले तरी ती या देशातच नाही ही कल्पनाच फार एकटी वाटणारी होती. सोमवारी जड मनानेच तो ऑफिसला गेला. तिथे तरी काय आहे आपलं असं त्याला वाटलं? खिडकीतून खाली दिसणारी वर्दळ बघत तो नुसता बसून राहिला. संध्याकाळी परत निघायच्या आत नेहाच, 'सुखरूप पोचले' असा मेल तेव्हढा आला होता. चला आता दोन वर्षं भेट नाही, असा विचार करून तो रूमवर निघून गेला. परत तीच ट्राफिक, गरम होऊन घामेजले करणारी बस, तेच बेचव जेवण. कधी कधी आयुष्य एकदम थिजून जातं, कितीही प्रयत्न करा पुढे ढकलायचा ते हलत नाही. पुढच्या दोन-तीन महिन्यात त्याला नेहाने मेल, फोटो पाठवले होते वेगवेगळ्या ठिकाणी ती  फिरायला गेली तेव्हा. फोटो पाहिल्यावर त्याला तिची आठवण यायची पण कधी तिला उत्तर द्यायची हिम्मत त्याला झाली नाही.
          आज काल लोक जरा मनाविरुद्ध झाले की त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मग ते प्रयत्न सफल नाही झाले की अजून अस्वस्थता. लग्नासाठी घराचे मागे लागतात, मग जा ऑन साईट. काम चांगले नाहीये, प्रोजेक्ट बदला, ते नाही झाले कंपनी बदला. आणि प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या कुणाच्या मेहेरबानी वर हे सर्व अवलंबून म्हणून अजून त्रास. नेहाशी बोलायला लागायला नको म्हणून राहुलने प्रोजेक्ट बदलून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती मनोज शर्माकडे, पण शर्माने प्रोजेक्टमध्ये सध्या नवीन कुणी येईपर्यंत तुला निघता येणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले होते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी या मोठ्या लोकांच्या मागे लागावं लागतं, तेही लोक आपल्या  असहाय पणाचा फायदा घेतात असं राहुलला वाटत होतं.
          खरंतर नेहा हेच काही एक कारण नव्हतं हे असं डिप्रेस व्हायचं. त्यांचं तर प्रेम, प्रेम म्हणताही येणार नाही असं होतं. ना त्याला माहित होतं की हे प्रेमच होतं की आकर्षण. ना त्याने तिला सांगितलं त्याचं प्रेम आहे म्हणून ना तिने त्याला नकार दिला होता. त्याच्या आयुष्यात एक पोकळी मात्र निर्माण झाली होती. आजपर्यंत त्याच्यासमोर नेहमी एका ध्येय असायचं. ते प्राप्त करण्यासाठी मग धडपड करत राहणे आणि ते मिळाल्यावर पुढच्या ध्येयाकडे वळणे, हेच त्याने केलं होतं. गेल्या दोन वर्षांत कंपनीतल्या त्याच्या ग्रुपमुळे त्याला त्या नसलेल्या ध्येयाची कधी आठवणच झाली नव्हती. पण आता त्याची तीव्रता त्याला जाणवत होती. बरं, करायचं पुढे म्हणजे तरी काय? प्रोजेक्ट बदलणे, कंपनी बदलून दुसरीकडे जाणे, किंवा मग पुढच्या शिक्षणासाठी अभ्यास करणे? त्याने मग त्याला जे माहित होते तेच केले. अभ्यास करणे. MBA साठी त्याने मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली.
          एकदा का तो अभ्यासात शिरला तेव्हा त्याला मग स्वत:लाच पुन्हा एकदा गवसल्यासारखं वाटलं. रात्री जागून अभ्यास करणे, एखादी गोष्ट समजत का नाहीये वाटून ती समजेपर्यंत झपाटल्यासारखे उत्तर शोधत राहणे. हे सर्व चालू असताना त्याचा प्रोजेक्ट चालूच होता. पण आता बाकीच्या लोकांमुळे त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला त्याचं ध्येय मिळालं होतं. आपले ध्येय आपणच ठरवले की मग मनोज शर्मा सारख्या  लोकांनी त्याचं काम केलं नाही केलं यानेही त्याला काही फरक पडत नव्हता. मध्ये मध्ये नेहाशी बोलणं व्हायचं, ती नेहमी प्रमाणे मोकळ्या मनाने  बोलायची. तिथे कसं असतं सर्व, तिने गाडी घेतली, रुममेट कशी आहे, जेवण बनवायला कशी शिकली, सर्व काही. एकदा तिने तिच्या पहिल्या 'स्नो फॉल च्या अनुभवाबद्दल त्याला सांगितलं. ते ऐकून त्याला क्षणभर वाटलेही की आपण सुद्धा राहावे का याच प्रोजेक्टमध्ये? आपल्यालाही मिळेल हे सर्व अनुभवायला. पण आता माघार घेऊन चालणार नव्हतं त्याचे ध्येय एकच होते, सर्वात चांगल्या इंस्टीटयूटमध्ये MBA ला अडमिशन मिळवणे.
         त्याच्या प्रयत्नाचं फळ मिळालं. हैदराबादला त्याला अडमिशन मिळाली होती. पुण्यातून निघायच्या आधी त्याने नेहाच्या घरी भेट दिली होती एकदा. त्यांचेही चांगले संबंध जुळलेच होते की. ते का तोडायचे? तिथे गेल्यावर त्याला कळले की सिद्धार्थचे आणि नेहाचे लग्न ठरले आहे. आधी दोघांच्या घरून नकार होताच. पण तिच्या घरच्यांनी सिद्धार्थला पहिले होते. एक आदर्श जावई म्हटला तर त्याच्यात काहीच कमी नव्हते. दोघेही अजून दोन-तीन वर्षं तरी तिकडे राहतील. मग लग्न करून तिकडे राहिलेले बरे ना? तिच्या आईचं म्हणणंही बरोबरच होतं. त्यांचा निरोप घेऊन राहुल निघाला. त्याला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की हे नेहाने स्वत: का ना सांगितलं. असो. पुण्यातलं सर्व मागे टाकून नवीन सुरुवात करायचं ठरवलं होतं त्याने, पुन्हा एकदा.

-क्रमश:
विद्या भुतकर.       

1 comment:

Fox Thinker said...

अभिनंदन आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या.

www.Facebook.com/MarathiWvishv
www.MWvishv.Tk
www.Twitter.com/MarathiWvishv


धन्यवाद..!!
मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!