Monday, June 13, 2016

वास की श्वास ?

         श्वास, जगण्यासाठी मागे कुठेतरी एक प्रोसेस चालू राहते. चालू आहे तोवर बाकी गोष्टींवरून किरीकीरी चालू असतात, पण बंद पडला की कुठल्याही गोष्टीला काहीही अर्थ रहात नाही. पण त्या श्वास घेण्याचा त्या प्रोसेसला केवळ श्वास घेणे इतकेच काम असते तर कितीतरी गोष्टी टळल्या असत्या, नाही का? श्वास आला की वास सोबत येतोच. कुणाला कमी येतो कुणाला जरा जास्तच येतो. पण हे वासही नसते तर? 
          सकाळी उठले की ब्रश करताना येणारा टूथपेस्ट चा वास , शी-शू, आंघोळीच्या साबणाचा वास, दाढीच्या क्रीमचा वास, घरातून बाहेर पडताना मारलेल्या पर्फ्युमचा वास. यातले अनेक ओळखीचे असतात त्यामुळे कधी त्यात बदल झाला की जाणवणारेही. उन्हाळ्यात, हिवाळ्यात साबण बदलला की लगेच वासासोबत ऋतूही बदलल्याची आठवण होऊन जाते. किंवा नवीन गिफ्ट देलेला परफ्युम लावला की दिवसभर त्या गिफ्टची आणि देणाऱ्याचीही आठवण होत राहते. डोक्याला लावलेलं तेल, केसाला लावलेली मेहेंदी हे थोडे कमी लक्षात येणारे त्यामुळे कमी त्रासदायक. पण त्याच मेहेंदीमध्ये अंडे टाका आणि मग काय होते हे सांगायला नको. :) मेहेन्दीचा रंग नाही मिळाला तरी चालेल पण तो अंड्याचा वास नको असे होऊन जाते. पण तीच मेहेंदी हातावर आली की त्याचे अर्थ बदलून जातात. हिरवी मेहेंदी, हातावर सुकलेली आणि निलगिरीचे तेल लावलेली मेहेंदी, मग ती काढून टाकल्यानंतरही दिवस भर वास घेतला तरी मन भरणार नाही अशी मेहेंदी. 
          मी पुण्यात असताना सकाळी ऑफिसला निघाले की तिथे पोहोचेपर्यंत या वासांची एकापाठोपाठ रांग लागायची. टपरीच्या शेजारून गेले की सकाळी सकाळी येणारा पोह्यांचा वास, एखाद्या कोपऱ्यावरून जाताना पूजेच्या फुलांचे वास, पुढे कुठे वडे तळण्याचे वास, प्रचंड उकळलेल्या चहाचे वास, एकेक करत मी ऑफिस गाठायचे. कधी कुठेतरी मन रेंगाळायचं, पण पुढे गेलं की दुसरा वास असायचाच मागचं विसरायला लावणारा. ऑफिसचाही कुणी नसतानाचा एक वास नंतर सवय झाली की हरवून जायचा. पण कॉफी ब्रेकरूमचा मात्र तसाच असायचा दिवसभर. कधी तिथे गेलं की कॉफीघेतली नाही तरी केवळ वासाने तरतरीत वाटायचं. अजूनही वाटतं. इथली ऑफिसची काळी कॉफी प्यायली जात नाही पण वास आला की मस्त वाटतं एकदम. 
         बाकी मग खाण्यापिण्याचे तर काय बोलू नका. उतू जाणाऱ्या दुधाचे वास, फोडणीचा वास, चहाचा वास, गरम गरम ताज्या जेवणाचा वास, अगदी भाकरी, चपाती, ताजा भात यांचेही. पावसात येणारा भाजलेल्या कणसाचा, भजीचा वास, थंडीतला गरम पावभाजीचा वास. हे असे इतके तीव्र की माणूस भुकेला असेल तर वासाने वेडाच होईल. अगदी समोर ताट आलं तरी पहिला घास खाईपर्यन्त चैन पडणार नाही. पण काही विशेष असतातच, जसे फक्त आईच्याच हातच्या जेवणाचे, मावशी मामी यांच्या पदार्थांचे किंवा आजीच्या एखाद्या पदार्थाचे, इ. की ते केवळ जेवण म्हणून नसतात तर ते त्या व्यक्तीची आठवण पुन्हा एकदा जागृत करतात.
          काही असेही असतात जे तुम्हाला सांगता येत नाहीत. आई झाल्यावर बाळाला जवळ घेतल्यावर येणारे बाळाचे ते तेल-पाण्याचे, पावरड-क्रिमचे आणि प्रत्यक्ष त्या बाळाचेच. आजीचे-आजोबांचे, आई-बाबांचे आणि नवरा-बायकोचेही. जे केवळ त्या त्या व्यक्तीचे आपण केलेले इन्तर्प्रिटेशन असतं, नाकाने केलेलं. बाकी अगदी ठराविक व्यक्तींचेही असतात, कुणी गुटका खाणारा किंवा डोक्याला वासाचे तेल लावणारा किंवा अत्तर लावणारा असे असतातच. पण ते विरळ. सांगता न येणाऱ्या वासात असणारा म्हणजे पहिल्या पावसाचा मातीचा वास, त्यावर अजून काही लिहायला नकोच. पण थंडीचाही असतो स्वत:चा एक, प्रत्येकाच्या घराच्या दिवाळीच्या स्पेशल साबणाचा, उटण्याचा आणि त्यात सोबत फटाक्यांचा आणि हो फराळाचा असतोच की. नव्या पुस्तकांचे वास, जुन्या पुस्तकांचे वास, नव्या कपड्यांचे वास आणि जुन्यांचेही. 
         काही नको असणारेही असतात. एखाद्या गल्लीतून जाताना नक्की माहित असतं की नाक बंद केलेच पाहिजे. काही पदार्थांचे जे एकेकाळी रोज रोज खाल्ल्याने नको झालेले असतात. त्यांचे वासही मग नको वाटतात. उग्र परफ्युम, अत्तरे, यांचे वास. आणि हो, प्रेग्नंट असताना नको नको करणारे साधे साधे वास. पाऊस पडल्यावर ओल्या कपड्यांचे कुजके वास, खरकट्या भांड्यांचे, नासलेल्या पदार्थांचे आंबूस वास, पावसात रस्त्यावर पडलेल्या पेट्रोलचे वास. तर हे असं नाक, नुसते श्वास देत नाही. सोबत वासही असतातच अनेक. ज्यातून आपण अनेक गोष्टी जगतो, त्यांच्या आठवणी मनात साठवतो आणि तोच वास पुन्हा आला की तेच क्षण पुन्हा जगतोही. 
         आजकाल माझ्या मुलांनाही माझ्या पदार्थांचे वास येतात. डोसा, पास्ता, Sandwich अशा ठराविक पदार्थ बनवायला लागले की ते येऊन विचारतात, 'की हेच करतेयस ना?'.  मला मजा वाटते असे गेसिंग गेम खेळायला. स्वनिक कधी कधी फसतोही. म्हणजे बटाटा उकडला की विचारतो पाणी पुरी करतेय का? अगदी तो बटाटा मी पराठ्यासाठी उकडला असला तरी. मध्ये एकदा मी ओलिव्ह तेल भांड्यात घातले आणि त्याने टोयलेट मधून ओरडून विचारले "तू पास्ता करतेयस का?" म्हणले, "तुझ्या शी च्या वासातून तुला पास्त्याचा वास बरा आला?" :) अशा गमती होत राहतात. खरंच हा श्वास नुसता श्वास असता तर काही मजा राहिली नसती आयुष्यात, नाही का? 

विद्या भुतकर.

1 comment:

Anonymous said...

मस्स्स्त ....लिहिलंय ..आयुष्यातल्या रोजच्या घटना आणि त्याचे सगळे संदर्भ ..खूप छान.!