काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं. एकतर बाकीचे व्याप कमी असतात म्हणून या सर्व गोष्टींचेही लक्षात ठेवायचे?
त्यात कालच आम्ही गावातल्या लायब्ररीची पुस्तके परत करून आलो होतो, तीही २४ होती. अचानक नवऱ्याला आठवलं की परत देताना २५ दिली आहेत. आता तो तरी किती लक्षात ठेवणार? एकूण काय की आम्ही हे अशी पुस्तके सांभाळणे आणि वेळेत परत देणे यात बरेच घोळ करतो त्यामुळे शाळेतून अजून घेऊन न येणे हेच उत्तम असं मुलीला सांगितलं आहे. पण स्वनिकचा शाळेतील पहिलाच महिना आहे त्यामुळे त्याला हे सर्व नवीनच. आता त्याला अजूनच चिंता पडली की ते पुस्तक गावातल्या लायब्ररीत गेलंय. आता तेही नाही मिळालं तर पुढे काय? बिचारा चांगलाच काळजीत होता. शेवटी मी त्याला समजावलं, आपण उद्या जाऊन घेऊन येऊ आणि मग तू शाळेत दे. त्याला हे लगेच पटलं नाहीच. दोन चार वेळा समजावून सांगितल्यावर झोपून गेला.
आज पुस्तक आणून दिलं आणि ते त्यानं लगेच बॅगमध्येही टाकलं. झोपताना त्याला म्हटलंही,"आता नाही वाटत ना काळजी? झोप निवांत.". "हो झोपतो, आता मी काळजी नाही करतेय", असंही म्हणाला.
किस्सा छोटाच आणि त्यात झालेला घोळही लहान. उलट आज गावातल्या लायब्ररीतून ते पुस्तक आणायला गेल्यावर नवऱ्याला कळलं की हे असं नेहमी होतं आणि ते लोक दार महिन्याला अशी जमा झालेली पुस्तकं शाळेला परत नेऊन देतातही. आता हे सर्व पाहिलं तर किती सोप्प वाटतं. पण काळ रात्री स्वनिकच्या जीवाला किती घोर लागला होता. मला अजूनही आठवतं शाळेचं किंवा लायब्ररीचं पुस्तक मिळत नाहीये म्हणून चिंतेत कितीतरी रात्री मी अशा घालवल्या आहेत. एका बाईंचं,'शामची आई' सापडत नव्हतं मला. कितीतरी महिने मला त्याची चिंता पडली होती. आता हे सर्व खूप वेडं वाटतं, पण त्या वयात ती किती मोठी काळजी होती.
चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, केसांना काळ्या रिबिन्स हव्या होत्या-लालच लावल्या आहेत, अशा कितीतरी चिंता घेऊन जगले. निदान त्यांनी तरी तसं राहू नये असं वाटतं. पोरांना या वयात खरंच अशा छोट्या गोष्टींची चिंता करावी लागली की वाईट वाटतं. ते जुने दिवस आठवतात. अशावेळी आपण केवळ त्यांना शांतपणे समजावून तो प्रश्न सोडवून दिला तरी किती दिलासा मिळतो बिचाऱ्यांना, नाही का?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
1 comment:
Agadi kharay
Post a Comment