Wednesday, February 01, 2017

ये बेटीया किस घर की होती है ??

          गेल्या काही दिवसांत एक पोस्ट व्हाट्स अप वर येत होती, हळदी कुंकू बद्दल. आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरही आली होती. फक्त केवळ लग्न झालेल्या स्त्रियांनाच का हळदीकुंकू चे आमंत्रण द्यायचे या विषयावरून. मला ते पटलेही. विधवा स्त्रियांना, अनेक विभक्त स्त्रियांनाही केवळ नवरा नाही किंवा सोबत नाही म्हणून एखाद्या सामाजिक प्रथेतून वर्ज्य का करायचे असा विषय होता. आता त्यात या स्त्रीला स्वतःहून भाग घ्यायचा आहे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमंत्रण द्यायचेही टाळणे वगैरे प्रकार अतिशयच दुखी करत असणार अशा व्यक्तीला. भारतीय स्त्रियांना विधवा असताना कितीतरी कार्यक्रमाला, आनंदाला मुकावे लागते आणि याचा त्यांना किती त्रास होत असेल याची केवळ कल्पनाही करवत नाही. सर्वांना सामावून घेणे किती आवश्यक आहे ते अशा ठिकाणी जाणवते. आणि बिल्डिंगमधील अनेक जणींनी त्यावर होकारही दिला हे पाहून आनंद वाटला.
        आता हा झाला एक पैलू त्या हळदीकुंकू कार्यक्रमाचा. आता त्याच विषयावर अजून एक मत काल पुढे आलं जेव्हा एका अशाच तरुण मुलीने मला तिचा अनुभव सांगितला. एका सोसायटीमध्ये जिथे ती लहानपणासून वाढली, संक्रांतीसाठी आईकडे गेल्यावर तिथे सोसायटीमध्ये कार्यक्रम चालू होता त्यामुळे तीही तिथे गेली. अर्थात अजूनही काही माहेरी आलेल्या मुली होत्याच. आधीच संयोजकांनी जाहीर केलं की वाण म्हणून त्यातले फक्त सुनांना आणि तिथल्या राहणाऱ्या स्त्रियांनाच देण्यात येणार. त्यामुळे नाराज होऊन अनेक जणी तशाच निघून गेल्या. अशा ठिकाणी केवळ सर्वाना भेटणे हे मुख्य कारण असते. अशा छोट्यामोठ्या वस्तू नाही. आणि अपमान होत असेल तर कोण थांबेल. 
       सोसायटीत मनोरंजनाच्या कार्यक्रमात काही छोटंसं बक्षीस ठेवलेलं. जेव्हा कार्यक्रम संपला आणि ती बक्षिसं दिली गेली, त्यातही त्या मुलीला मात्र दिले गेले नाही. का? कारण ती आता लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली, त्यामुळे तिला इथे काही देण्याचे कारण नाही. खरं सांगू तिने हे बोलल्यावर, तिला तिथे काय वाटलं असेल याचा विचार करूनच वाईट वाटलं पण मुलगी जिद्दी होती. तिने त्यांना सर्वाना प्रश्न केला की, कायद्याने मला या घरात येण्याचा हक्क दिला आहे तर मी इथे का भाग घ्यायचा नाही? आणि तो प्रश्न बरोबरही होता. उद्या जर त्याच घरात मुलाची बायको आली तर तिला सून म्हणून त्यांनी बक्षीस दिलंच असतं ना? समजा ती एकटीच मुलगी असेल आईवडिलांची तर तिने काय लग्न झाल्यावर अशा कार्यक्रमात भाग घ्यायचाच नाही? आणि प्रश्न पैशाचा असेल तर तसे स्पष्ट करावे ना आयोजकांनी?
        म्हणले तर हा मुद्दा छोटा आहे, केवळ बक्षिसाचा आहे, ज्याची किंमत अगदी कमी असेल. पण विचार करा की किती महत्वाचा आहे. पुण्य मुंबईसारख्या शहरात सासर-माहेर जिथे एकाच गावात आहे तिथे मुलीचं लग्न झालं म्हणून तिला माहेरच्या सोसायटीत वेगळी वागणूक मिळावी? तिचे आई वडीलही मेन्टेन्सन्स वगैरे भरत असणारच ना? आणि मग नकार द्यायचा तर मुलाच्या बायकोलाही दिला पाहिजे बरोबर ना? मुलगी नवरात्रीला आली, दिवाळीला आली अशा वेळी मग बाहेर पाटीच लावली पाहिजे, कार्यक्रमांना लग्न झालेल्या मुलींना सहभाग घेता येणार नाही म्हणून? कायद्याने मुलीला समान हक्क देऊनही समाजात अजूनही लोक असे विचार करतात आणि तसेच वागतात हे पाहून वाईट वाटतं. मी ज्या ठिकाणी राहते तिथे माझे सासू सासरे असतील तर त्यांना तितक्याच मानाने सर्व गोष्टीत भाग घेता येतो. मग तेच मुलीला आईवडिलांच्या घरी का नको? 

थोड्या दिवसांपूर्वी मला आईने एक पोस्ट पाठवली होती, 

'मायका केहता है ये बेटीया पराये घर की होती है, 
ससुराल केहता है ये पराये घर से आयी है
ए खुदा तूही बता ये लड़कियां किस घर के लिए बनायीं है'

       अगदीच इमोशनल वगैरे पोस्ट होती. म्हणले मला असे काही वाटत नाही. माझ्यासाठी माझं माहेर आणि सासरचं घर तितकंच आपलं आहे, हक्काचं आहे आणि शिवाय मला स्वतःचं म्हणता येईल असं आमचं घरही आहेच. त्यामुळे मला दुःखी वाटत नाही असले पोस्ट वाचून. 
       
        पण कालचा अनुभव ऐकून खरंच असं वाटलं की मुलींना इतक्या पटकन परकं करता येतं? आणि घरचे तर करतही नसतील, पण बाकी लोकांचं काय? अशा या विचारांना मोडीत काढलेच पाहिजे. उद्या आपलीच मुलगी आपल्याकडे आल्यावर तिला लोकांनी अशी वागणूक देऊ नये म्हणून आजच हे बोललं पाहिजे, सर्वाना सांगितलं पाहिजे. आणि मुळात एक स्त्री म्हणून आपण स्वतःच असे नियम बनवून पाळत नाहीये ना? हा विचार केला पाहिजे. आज त्या मुलीने योग्य ठिकाणी बोलण्याची हिम्मत केली तशीच आपणही केली पाहिजे आणि समजूनही सांगितले पाहिजे लोकांना. विचार करा जरूर आणि पटलं तरी दुसऱ्यांनाही सांगा. 

विद्या भुतकर. 

No comments: