Tuesday, February 21, 2017

स्वप्नाळू : भाग १

मुक्ताने केदारला फोन केला,"अरे मी काय म्हणत होते? आपण बाहेर जायलाच पाहिजे का?"
केदार वैतागला पण आज तिचा वाढदिवस होता. त्यामुळे तिला जे हवं तेच करणं योग्य होतं.   
खरंतर त्याला माहित होतं तिचं पुढचं वाक्य पण तरीही त्याने शांतपणे विचारलं,""मग काय हवं आहे तुला? ". 
        मुक्ता आणि केदार हे दोघे MBA चे मित्र. पुण्यात त्यांच्या बॅचमधले ते दोघेच होते त्यामुळे नियमित भेटीगाठी वाढल्या आणि मैत्री सवय कधी बनली त्यांना कळलंच नाही. आजही तिच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे ते दोघेच होते. बाहेर जेवायला जाणे हा नेहमी वादाचा मुद्दा असायचा. सगळ्या जगाच्या एकदम उलट यांचा न्याय होता. केदारला बाहेर जाणं आवडायचं तर मुक्ताला त्याच्या उलट. बँकेची नोकरी चालू असली तरी जेवण बनवणे, लोकांना खाऊ घालणे, वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकणे हे तिचे आवडते उद्योग. त्यामुळे आजही तिने बाहेर जाण्यापेक्षा काहीतरी घरीच बनवावं असा विचार केला होता. 
ती बोलली,"अरे मस्त कांद्याची पात मिळाली येताना आणि हिरव्या मिरच्या पण. तू ये ना, भाकरी, कांद्याची पात, ठेचा करू. भारी होईल जेवण ना?"       
आता पुण्यात अशी मुलगी भेटणे हे निव्वळ अशक्य आहे. पण केदार तिला रोज स्वतः भेटत असल्याने अशी व्यक्ती अस्तित्वात आहे हे शेवटी मान्य केलं होतं. त्याने तासाभरात पोचतो म्हणून फोन ठेवला. इकडे मुक्ताने मोठ्या उत्साहात जेवण बनवायला सुरुवात केली. ताजी पात, मिरच्या पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटत होतं. पातीला लसूण आणि काळ्या मसाल्याची फोडणी तिने दिली, वरून भाजलेल्या दाण्याचा भरडलेला कूट पेरला. दुसऱ्या भांड्यात तिने तेलात जिरे, लसूण परतला, वरून हिरव्याकंच मिरच्या टाकल्या आणि परतायला सुरुवात केली. घर हळूहळू मिरचीच्या खाटाने भरून गेलं. पण ती तिच्या नादातच. भाकरी थापता थापता ती विचार करत होती तिच्या सो कॉल्ड हॉटेलचा. मनातल्या मनात तिने अनेकदा मेनूची उजळणी केली असेल. 
मुक्ताला एक शुद्ध मराठी जेवण असलेलं हॉटेल सुरु करायचं होतं. रोजच्या नोकरीतून केवळ चांगले पैसे साठवणे आणि पुढे व्यवसायात जोडणे हा एकच हेतू होता तिचा. जेवण बनवताना तिचा तोही हिशोब लावून झालाच. किती पैसे जमा झाले, अजून किती दिवस नोकरी करायची, हॉटेलला जागा कुठे बघायची सगळे विचार चालूच होते इतक्यात बेल वाजली. केदारच होता. तिने दार उघडलं आणि त्याचा चेहरा थोडा उतरला. जेवण बनवण्यात तिचा पार अवतार झाला होता. 
"निदान आज तरी जरा चांगले कपडे घालायचेस ना?" त्याने वैतागून विचारले. 
"आधी आत तर ये." ती हसून म्हणाली. 
आल्या आल्याच त्याला मिरच्यांच्या वासाने जोरात ठसका लागला. तिने पळत जाऊन पाणी आणलं. 
ती म्हणाली,"बघ कशा तिखट मिरच्या आहेत. छान ठेचा होतो याचा.बैस पाच मिनिटं झालंच आहे जेवण आता." 
 त्याला बाहेर बसवून ती किचनमध्ये आली. मिरच्या भाजल्या होत्या. त्यात कोथिंबीर, लिंबू पिळून तिने सर्व मिश्रण खलबत्त्यात घेतलं. केदार मागून आला आणि हसला. तिने वळून पाहिलं. 
"कुठल्या जमान्यात राहतेस तू ना?" तो हसत बोलला. 
"अरे तुला नाही कळणार, ठेचलेला ठेचाच भारी लागतो. तू गप्प बैस ना? मी करतेय ना?", ती. 
बराच वेळ ठेचा कुटून तिने तो वाटीत काढून घेतला. 
ताटात पातीचा बारीक कांदा, ठेचा, भाकरी आणि पातीची भाजी ठेवली आणि ते पाहून खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतच राहिला होता तो. दोघेही जेवायला बसले तसे तिनं विचारलं,"कसं झालंय?". 
तो,"नेहमीप्रमाणेच, छान झालंय.". 
तिनेही मग जेवायला सुरुवात केली. 
विचार करून तो पुढे बोलला,"पण खरं सांगू का तुला, मला कधी कधी वाटतं तू काहीतरी वेगळं ट्राय कर."
ती,"म्हणजे?"
तो,"म्हणजे तुझं हे मराठी जेवण छानच असतं गं. पण आज काल कॉन्टिनेन्टल लागतं लोकांना इथे. मग हे असं जेवण म्हणजे 'थाळी सिस्टीम' मध्ये अजून एक भर असं होऊन जाईल. तुला काय वाटतं."
तिने असा विचार कधी केलाच नव्हता, तिच्यासाठी तर स्वतः बनवलेली प्रत्येक भाजी आणि भाकरी स्पेशलच होती 
ती गप्प बसली. त्याला मग उगाच आपण बोललो असं वाटलं. 
जेवण झाल्यावर तिने गव्हाची गरम गरम खीर खायला आणली आणि जगात दुसरे काहीही नाहीये असा चेहरा करून मन लावून ती खात बसली. तिच्या या 'फूड कोमाची' त्याला चांगलीच माहिती होती. त्याने बराच वेळाने तिला हाक मारली,"मुक्ता..." तिने दचकून मान वर केली."... तुझ्यासाठी आज २ प्रपोजल आहेत." ती बावरली आणि तिने हातातली वाटी बाजूला ठेवली, तसा तोही पुढे झाला. तिच्यासमोर गुढग्यावर बसला. तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला,"माझ्याशी लग्न करशील?". 
तिला या प्रश्नाची अपेक्षा होतीच पण तो असा अचानक आल्यावर थोडी घाबरली. 
"गेल्या कित्येक वर्षाची आपली मैत्री अशी एकाच टप्प्यावर किती दिवस ठेवणार आहे?", तो. 
"हो रे बरोबर आहे. पण कधीकधी वाटतं आपण पर्याय नाही म्हणून सोबत आहोत की काय?", तिने स्पष्ट विचारलं. 
"असं काय बोलतेस? आपण काही छोटया गावात राहात नाही जिथे पर्याय नसतील. ते शोधायचे असते तर मिळालेही असतेच की.", तो. 
"हां तेही आहेच. तुला खरंच असं वाटतं आपण लग्न करावं?" तिने विचारलं. 
"मला वाटतं, का नाही? आपले घरचे असेही विचारत आहेतच लग्नाचं. आणि मला तरी आपण दोघे एकमेकांना अनुरूप वाटतो सगळ्याच बाबतीत. तुला काय वाटतं?", तो. 
लग्नाबद्दल इतकं प्रॅक्टिकल बोलतोय हे दोघांनाही जाणवत होतं पण 'ते असंही घरच्यांनी केलंच असतं, मग आपण का नाही?' असा विचार करून तीही बोलत राहिली. 
"हो अनुरूप तर आहेच रे. शिवाय इतके वर्षांची ओळख आहे आपली. एकमेकांना सहन करू शकलोय इतके दिवस हे काय कमी आहे?" ती हसून बोलली. 
"बस मग ठरलं तर, आपण घरी बोलू आणि सर्व पक्कं करून टाकू." तो फायनल बोलला आणि तिनेही मान हलवली. 
"बरं अरे ते दुसरं प्रपोजल काय ते सांगितलं नाहीस?" तिने विचारलं. 
"अरे हां विसरलोच. या पहिल्याच्या टेन्शनमध्ये होतो. पण तू एकदम कूल होतीस हा. आवडलं आपल्याला." तो पुढे बोलला,"अगं मी तुझ्यासाठी एक बिझनेस प्रपोजल पण आणलंय."
बिझनेस म्हटल्यावर ती सावरून बसली. 
तो," तू पैसे साठवत आहेस माहितेय मला. पण मीही तुझ्या हॉटेलमध्ये गुंतवणूक करायची म्हणत आहे. आपल्या MBA चा तरी कधी फायदा होणार? मी ५०% तरी पैसे देईन यात."
ती हे ऐकून एकदम खूष झाली. ते बघून तो म्हणाला," अरे हो, इतकी तर तू लग्नाच्या प्रपोजललाही एक्ससाईट नाही झालीस." 
"गप रे तू बोल पुढे." ती रागावली. 
"मी गुंतवणूक करेन आणि बिझनेस म्हणून फायद्यासाठी योग्य ते निर्णय घेतानाही सहभाग घेईन."
ती एकदम घाबरली तसा तो म्हणाला,"डोन्ट वरी, मेनू सोडून बाकी निर्णय. मुक्ता मला माहित आहे, हे तुझं स्वप्न आहे. त्यामुळे तू त्यात रमशील आणि तुझा तो हक्कही आहे. मी फक्त तुझ्या स्वप्नाला माझा हातभार लावतोय इतकंच."
ती हसली, त्याच्यासोबत राहण्याच्या तिच्या निर्णयाचा तिला पुन्हा एकदा आनंद झाला. 
"पण खरं सांगू का? तुम्ही मुली ना फार स्वप्नाळू असता. आता तुला हे लोकांना जेवण करून देण्यात आनंद होतो वगैरे ठीक आहे पण त्यात फायदा तोटा बघावं लागतंच. आणि हॉटेल सुरु झालं की त्यात बरेचदा यांत्रिकपणाही येतो. तेव्हा मात्र माघार घेऊ नकोस हा." त्याने तिला बजावलं. 
पण ती तिच्या स्वप्नांतच रेंगाळत होती. 
"मी बरीच माहिती काढलीय. जागा शोधू आपण, बाकी गोष्टी पण फायनल केल्या पाहिजेत. मी तर भाज्यांसाठी सुध्दा माणूस बघून ठेवलाय." तो तिच्याकडे बघत बोलला. हे ऐकून मात्र मुक्ता जाम खुश झाली होती. पटकन उठून ती त्याच्या शेजारी बसली, त्याच्या हातात हात घेऊन तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्यानेही तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला,"हैप्पी बर्थडे डिअर". 

क्रमशः 

विद्या भुतकर.

No comments: