Wednesday, March 01, 2017

बटाट्याच्या काचऱ्या

       गेले काही दिवस झाले मुलगी म्हणत होती की मला बटाट्याची सुकी भाजी खायचीय, आजी करते तशी. दोनेक वर्षांपूर्वी कधीतरी खाल्ली असेल तिने आईच्या हातची भाजी तिला त्याची आठवण येत होती. आता मी ती का करत नसेन नियमित याला काही कारण असं नाहीये पण होत नाही. मग आज शेवटी सकाळी डब्याला देण्यासाठी बनवली आणि एकदम बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. सकाळी आवरायची, शाळेची गडबड, त्यात भाजीचा फोडणीचा वास, पोळ्या हे सगळं एकदम ओळखीचं वाटू लागलं. कुणी याला नुसती बटाट्याची भाजी म्हणत असेल, कुणी बटाट्याचे काप, आम्ही याला बटाटयाच्या काचऱ्या म्हणतो. :) 
       तर कोरेगांवमध्ये आठवड्यातून एकदाच बाजार भरायचा पूर्वी, दर सोमवारी. आई, आम्ही शाळेत गेलेले असताना, बाजारात जाऊन वायरच्या बास्केटमधून भाज्या, फळे, पालेभाज्या इ त्या त्या ऋतूप्रमाणे घेऊन यायची. आम्ही शाळेतून येईपर्यंत तिचे बरेचसे निवडून झालेलं असायचं. मग त्यात आम्हाला निवडलेली चवळी, सोललेल्या मटारमध्ये बारीक, गोड लागणारे वेगळे काढलेले मटार, पेरू, देशी केळी, तोतापुरी आंबा अशा अनेक गोष्टी मिळायच्या. मला त्या देशी केळांचं शिकरण मला खूप आवडायचं. आठवड्यातून ३-४ वेळा माझं मी एका पेल्यात बनवून घ्यायचे. असो. 
       तर तेंव्हा आमच्याकडे फ्रिज नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा पालेभाज्या, ओल्या भाज्या इ. पहिल्या ३-४ दिवसांत संपून जायचं. त्यातलं चाकवताचं गरगट बरेचदा सोमवारीच व्हायचं. मेथी, पालक, पोकळा वगैरे कधी डब्याला असायचे. अख्खा आठवडा ७ लोकांचं दोन वेळचं जेवण, डबे करेपर्यंत सर्व भाज्या संपून जायच्या. आणि त्या भाजीच्या टोपल्यात कांदा, थोडा लसूण आणि थोडे बटाटे उरलेले असायचे. बरेचदा रविवारी रात्री ऑम्लेट नसेल तर बटाट्याचा रस्सा नक्कीच असायचा. आणि ते नाही झालं तर सोमवारी सकाळी या बटाट्याच्या काचऱ्या हमखास असणारच. तर अशा अनेक सोमवारी सकाळी डब्यांत या काचऱ्या घेऊन गेल्याच्या आठवणी आज एकदम ताज्या झाल्या. 
       बरेचदा घाई असल्याने कांदा थोडा जास्तच भाजला जायचा. पण डब्यांत त्या एकदम मस्त लागायच्या, त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. माझ्या आईच्या जरा मोठया असतात, फोटोत मी केलेल्या छोट्याच आहेत.  शाळेतच असे नाही कधी एखाद्या प्रवासाला जायचे असेल, सहलीला वगैरे तर खराब न होणारी भाजी म्हणजे हीच.  अनेकदा दादांनाही प्रवासाला जाताना बनवून ठेवलेली असली की आमच्या डब्यातही तीच भाजी असायची. 
      आज सान्वी दोन पैकी दीड पोळी संपवून आली त्यामुळे यापुढे त्या नियमित द्यायला हरकत नाही असे वाटू लागले आहे. कदाचित माझ्यासारख्याच तिलाही त्या नंतर कधी आठवण करून देतील,तिच्या शाळेची, या दिवसांची. :)
आता यात विशेष काही रेसिपी अशी नाहीये पण तरीही इथे देत आहे. मुलांना डब्यात देताना चपातीला थोडे लोणच्याचा खार आणि दुसऱ्याला केचप लावून त्यात भाजी घालून रोल बनवून दिले.
मी वरण, चपाती आणि भाजी घेऊन गेले. :) मस्त जेवण झाले. :)

साहित्य: तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांडा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर. 

कृती: कांदा आणि बटाटा चिरून घ्यावेत. यात बटाटा कापण्याचा पद्धतीने मात्र नक्कीच फरक पडतो. शेवटच्या फोटोत दिसत आहेत तसे पातळ, बारीक काप करून घ्यावेत. 
तेल थोडे नेहमीपेक्षा जास्त. नॉनस्टिक पॅनमध्ये जास्त नीट होतात. 
तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. लगेच कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी. 
एकदा परतून त्यात बटाटा घालावा.
मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे. 
साधारण १५ मिनिटांत भाजी होते. 

या १५ मिनिटांत मी मात्र आमचं आख्खा गाव, घर, बाजार, शाळा सर्व फिरून आले. :) 

विद्या भुतकर.No comments: