Thursday, March 02, 2017

आनेवाला पल जानेवाला है.....

        गेल्या वर्षभरापासून रात्री उशिरा घरी परतताना हमखास जुनी गाणी ऑनलाईन रेडिओवर लावून ड्राइव्ह करत घरी येतो. त्यात दोन गोष्टी होतात, मुलं हमखास झोपून जातात आणि आमचे मनोरंजनही होते. रेडिओवरची ही जुनी गाणी म्हणजे वर्तमान कमी आणि भूतकाळात जास्त घेऊन जाणारी. अभ्यास करत, सांगली, पुणे स्टेशन आणि मग विविधभारती ऐकत रात्रीचे ११.२० व्हायचे. लगेचच मग यावरून झोपायचो. असेच लहानपणी एक महत्वाचा शोध मला लहानपणी विविधभारतीवर गाणी ऐकताना झालेला. मी आईला म्हटले,'किती बोअर आहे, सारखे बाईचा नाहीतर माणसाचा आवाज असतो त्या गाण्यांत?'. आई म्हणाली,"मग कुणाचा असणार?".. मग मी मनातल्या मनात सर्व लोकांचे 'बाई' आणि 'माणूस' असे वर्गीकरण करून पहिले आणि ते बरोबर झाले. तेंव्हापासून डोक्यातुन तो शोध गेला नाही. 
      मग पुढे त्याच 'बाई' आणि 'माणूस' आवाजात फरक समजायला लागला. हळूहळू 'मुकेश','हेमंत कुमार','मन्ना डे','रफी' हे आवाज जाणवू लागले. आईचं आवडतं गाणं कुठलं, दादांचं कुठलं हे कळायला लागलं. 'सुहानी शाम ढल चुकी...' आवडायला लागलं. बाईंमध्ये मात्र 'लता' किंवा 'आशा' असे दोनच ऑप्शन असायचे. मग एखाद्याचा आवाज ओळखायची सवय लागली. पुढे शब्द आले. त्यांनी मात्र जे मनाला घेरलं ते अजूनही सुटत नाहीये. विचार केला तर मी एका छोट्या मराठी गावात वाढले. तिथे हिंदी शिकले ते ३ वर्ष फक्त, ८ वी नंतर संस्कृत. चित्रपट दूरदर्शनवर पाहिले आठवड्यातून एक फारतर दीड(लाईट असेल, अभ्यास झाला असेल, शिकवणी नसेल आणि आई-दादा हो म्हणाले तर). अशावेळी त्या हिंदी गाण्यांचे शब्द, अर्थ समजणे हे मोठं आश्चर्यच वाटतं मला. 
       त्याचं श्रेय त्या काळच्या हिंदी गाण्यांतील समजणाऱ्या शब्दांना आहे असं वाटतं. किती साधे शब्द पण अर्थपूर्ण. 'जिंदगी की यही रीत है.... हार के बाद ही जीत है'. परवाच मी संदीपला असेच गाणी ऐकताना म्हटलं, या गाण्यातील जे त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहेत ना ती एकदा लिहून ठेवली पाहिजेत. म्हणजे कितीही काळ बदलला तरी ते सत्य बदलणार नाही. उदा:'आनेवाला पल जानेवाला है....','कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है केहना', 'इक दिन बिक जायेगा माटी के मोल', अशी अनेक वाक्यं. ती गाणी ऐकली की वाटतं हे तर आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे. 
        मग काही गाणी ज्यांनी प्रेमाच्या प्रेमात पाडलं.. जेव्हा आयुष्यात अभ्यास, शाळा, घर इतकेच होते, तेव्हाही प्रेम म्हणजे काय असेल असा विचार करायला लावणारी गाणी. 'जब दीप जले आना...', 'जानेमन, जानेमन तेरे दो नयन..','है अगर दुष्मन..दुष्मन जमाना गम नहीं.. ','कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है..','अखियों के झरोको से मैने देखा जो सावरे..'. अशी अनेक गाणी. रेडिओवर या गाण्यांना ऐकण्याचा जणू छंदच जडला. त्यातले शब्द, प्रेम, गंमत हे अगदी सहजपणे कळत गेलं. त्यात कुठेही धावपळ नाही, घाई नाही आणि बाकी सर्वांसोबत गोड आवाजही. अजून काय हवं होतं? मला वाटतं माझ्या कवितांमध्येही त्यांचाच प्रभाव असणार आहे. कारण काव्य अवघडच असलं पाहिजे असा अट्टाहास या गाण्यांत कुठेही नव्हता. अगदी सहजपणे बोलता यावं, सांगता यावं असं काव्य ऐकलं आणि तसंच लिहिलं गेलं.मग पुढे गुलजार ऐकला, जगजीत अनुभवला आणि त्या गाण्यांवरचं प्रेम अजून गहिरं होत गेलं. तेही कधी कवितेत उतरलं. 
        बरेच दिवस झाले याबद्दल लिहायची इच्छा होती पण राहून जात होते. आजही जी हिंदी गाणी लागतात ती मला आवडतात, काही कानठळ्या बसवणारी असतात काही अगदीच निरर्थक, जसे आजकाल 'तम्मा तम्मा लोगे' चालू आहे. ती ऐकून सोडून दिली जातात . पण एके काळी मला ही जुनी गाणी ऐकायची संधी मिळाली, अनुभवली, आणि आयुष्यभर ती सोबत राहतील हा एक मोठा खजिना आहे माझ्यासाठी. आणि हे मी कधीही विसरणार नाही. 

विद्या भुतकर. 

No comments: