Wednesday, April 12, 2017

बाब्या मी इंजिनियर आहे !

मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.
एकदा संध्याकाळी ऑर्डर केलेले एक खेळणे घरी आले. आता पोरांना ते लगेच सुरु करायचे होते. मी आपली जरा निवांत टीव्ही बघत बसलेले असताना ते सर्व करायची माझी इच्छा नव्हती.
मी म्हटले, "मला नाही माहित त्यात काय घालायचे आहे."
स्वनिकने लगेच खेळणे चेक करून सांगितले, "त्यात बॅटरी लागणार आहेत" आणि स्वतःच स्क्रू-ड्रायव्हर घेऊन आला आणि AA बॅटरीही. आता नाईलाजाने टिव्ही बंद करून मला ते उघडावं लागलंच. त्यात पाहिलं तर AAA बॅटरी लागणार होत्या. त्या कुठे शोधणार, मग आठवले घरात वर लावलेल्या कागदाच्या दिव्यांमध्ये आहेत. म्हटले,"त्या वरच्या दिव्यापर्यंत माझा हात पोचणार नाही, बाबा आले की बघू."
आता माझे प्रयत्न आणि उत्साह पाहून त्याला कळलेच की बाबा आल्याशिवाय हे असलं काम होणार नाही.
शेवटी बाबा आल्यावरच त्यांचं काम झालं. 
      आपापली कामं वाटून घेतल्याने बरेच वेळा मी स्वयंपाक करताना संदीप मुलांचं आवरत असतो. किंवा त्यांना खेळायला बाहेर घेऊन जातो. अशा अनेक वेळा मी जेवण बनवत असताना तोच मुलांची खेळणी जोडणे इत्यादी कामं करतो. परवा मात्र हद्दच झाली. स्वनिकला काहीतरी टिव्हीवर लावायचे होते आणि त्यात काय सूचना लिहिल्या आहेत हे मी वाचेपर्यंत तो ओरडून रिकामा,"आई, प्रेस द स्मार्ट हब बटन, सिलेक्ट वेब ब्राऊझर, सिलेक्ट वेब ब्राऊजर". त्याचं ओरडणं ऐकून शेवटी मी म्हणाले,"बाबू जरा थांब, मी इंजिनियर आहे." 
अर्थात त्याचा माझ्यावर विश्वास नव्हताच. त्यामुळे तो पुढे बोललाच,"बाबा आले की करतील, जाऊ दे". 
       तर या अशा घटनांतून एक गोष्ट मला जाणवते की घराप्रमाणे मोठ्या माणसांची कामं तशी वाटून घेतली जातात आपल्या सोयीप्रमाणे.पण त्यातून मुलांचे आपल्या आई-वडील, आजी आजोबा यांच्याबद्दल किती सहज ग्रह निर्माण होतात? मुलीला लहान असल्यापासून माहितेय की (कुठलीच)आजी दुचाकी गाडी चालवत नाही, फक्त आजोबा चालवतात. तिचा तो ग्रह दूर करण्यासाठी एक आजी दाखवाव्या लागल्या मला पुण्यात. :) एकदा असेही झाले की मुलाना वाटत होते बाबांना जेवण बनवताच येत नाही. खरंतर, आम्ही दोघे असताना अनेकवेळा त्याने बनवलेही आहे पण आता कामाच्या वाटणीत स्वयंपाक करणे(भाजी फोडणी टाकणे आणि पोळ्या) माझ्याकडे असल्याने त्यांचा तसा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तर मग त्यानंतर अनेकवेळा सॅन्डविच, सॅलड किंवा अंडाकरी असे ठराविक पदार्थ असले की संदीप करतो(मला काय तेव्हढेच बरे आहे!) आणि मुलेही त्याला मदत करतात. 
       माझ्यासारख्या अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण त्यातील किती जणींच्या मुलांना माहित असते की आपली आई काय करते? तिचं शिक्षण काय आहे? तिचे कलागुण काय आहेत? आमच्या मुलांना माहित आहे की मी लिहिते, चित्रं काढते, (त्यांच्यादृष्टीने) चांगला स्वयंपाकही करते. पण त्यापलीकडे बाहेरच्या जगात काय काम करते, कुणाशी बोलते, माझ्या कामामुळे लोकांना कसा फायदा होतो किंवा त्यांचे कुठले काम होते, हे सहज समजेल अशा भाषेत का होईना मुलांना सांगितले पाहिजे असं मला वाटत आहे सध्या. तसं मी सुरुही केलं होतं. अशी माहिती असल्याने मुलांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीत नक्की फरक पडेल. 
      बरं, नुसती आपल्या कामाची कल्पना देऊन उपयोग नाही. तर आपल्या घरातील कामांची अदलाबदलही करून पाहिली पाहिजे. म्हणजे, कधी गाडी चालवून कुठे जायचे असताना नवरा शेजारी आहे आणि मी गाडी चालवतेय किंवा तो जेवण बनवत आहे आणि मी त्यांचे ट्रेन ट्रॅक लावत आहे( हे अवघड आहे कारण ट्रेन ट्रॅक नवऱ्यालाच जास्त आवडतात पण आपलं उदाहरण) किंवा एखादी छोटी गोष्ट दुरुस्त करणे इत्यादी.  यामुळे मुलांच्या मनातील आई किंवा बाबा म्हणून एक जी प्रतिमा निर्माण होत असते लहान वयात त्यात आपण त्यांचे सर्व पैलू दाखवणं गरजेचं आहे असं वाटू लागलं आहे. 
      मागच्या आठवड्यात मी जेवण बनवत असताना मुलं आणि नवऱ्याने एक खेळणं जोडलं. माझ्या पोळ्या चालू असल्याने मी काही गेले नाही. थोड्या वेळाने त्या खोलीत गेल्यावर स्वनिकने मला दाखवलं आणि विचारलं,"तुला माहितेय का ही ट्रेन कशी चालते?". म्हटलं,"हो, ते ट्रॅक मॅग्नेटिक आहेत." माझं उत्तर ऐकून बराच वेळ आ वासून उभा राहिला, मग मी मोठ्याने म्हणाले,"बाब्या मी इंजिनियर आहे !". :) प्रत्येक आईने काही इंजिनियर असायची गरज नाही पण आपले सर्व गुण मुलांसमोर नक्की आणले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? :) 

विद्या भुतकर.  
   

No comments: