Monday, April 03, 2017

ओल्या हरभऱ्याची भाजी

         काही दिवसांपूर्वी 'स्वप्नाळू' नावाच्या कथेमध्ये या भाजीचा उल्लेख केला होता आणि काही प्रतिक्रिया आल्या की या भाजीची पाककृती नक्की सांगा. खरंतर मलाच ती भाजी इतकी आवडते आणि गेल्या अनेक वर्षात ती खाल्ली नाहीये त्यामुळे मलाही ती बनवायची संधीच होती. अनेक ठिकाणी ओला हरभरा शोधला पण इथे जे मिळतात ते डहाळे अगदीच दिसायला मोठे असले तरी आत बरेच छोटे दाणे होते. आणि तसे महागही. मागच्या आठवड्यात एक दिवस थोडे ओले हरभरे आणून आज सोलून त्याची भाजी करायचे ठरवले. अगदीच कमीदाणे निघाले. तसे झाले तर पर्याय म्हणून मी फ्रोजन सेक्शनमधून एक पिशवीही घेतली होतीच. नाईलाजाने तीच वापरावी लागली. कारण बरेचसे दाणे मुलीने सोलताना आणि भाजल्यावर खाऊन टाकले. :) असो. तर ही भाजी लहान असताना थंडीत खायचो. खूप म्हणता येणार नाही. कारण बरेचदा आईने हरभरा आणला तरी सोलून भाजी करण्याइतपत दाणे शिल्लक राहायचेच नाहीत. त्यातून ठरवून ठेवून भाजी करण्याचे प्रसंग तसे कमीच आहे. पण माझी ही आवडती भाजी आहे. :)

साहित्य: 
ओले हरभऱ्याचे दाणे साधारण २ वाट्या ,
जिरे, मोहरी, तेल, हळद, हिंग
लसूण पाकळ्या ३-४,
एक कांदा,
कांदा-लसूण मसाला २-३ चमचे( मसाला नसेल तर लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला)
शेंगदाण्याचा भरडलेला कूट(एकदम बारीक पेस्ट नको)
मीठ, साखर चवीनुसार

कृती:
     हरभऱ्याचे दाणे एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घेतले. त्यात थोडा जास्त वेळ गेलामाझ्या इंडक्शन स्टोव्हमुळे. सहसा १०-१५ मिनिट भाजावे. दाण्यांवर काळपट डाग दिसू लागतात. माझे फ्रोजन दाणे मुळातच काळे होते त्यामुळे ते अजून काळपट दिसू लागले. दोन्ही दाण्यांचे फोटो दिले आहेत खाली.
भाजलेले हरभरे थोडे थंड करून खलबत्त्यात ठेचून घ्यावेत. माझ्याकडे खलबत्ता वापरात नसल्याने मी मिक्सरमध्येच २-३ पल्समध्ये फिरवून बंद केले.
पॅनमध्ये तेल तापल्यावर जिरे, मोहरी हिंग घातले. त्यात लसूण खरपूस भाजून घ्यायचा.
मग कांदा परतून तो भाजल्यावर त्यात हळद, धनेजिरे पूड, तिखट किंवा कांदा-लसूण मसाला घालायचा.
तिखट परतल्यावर लगेच त्यात भरडलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. आमच्याकडे कूट जरा सढळ हातानेच पडतो.
कूट परतताना तो जळू नये याची काळजी घ्यावी.
त्यात ४ काप पाणी घालून उकळावे. पाणी उकळत असतानाच त्यात मीठ साखर घालून हलवावे.
भाजीतले पाणी उकळले की शेवटी भरडलेले हरभऱ्याचे दाणे घालावे.
भाजी झाकण बंद करून थोडा वेळ आणि पाणी जास्त झाले असल्यास उघडून शिजू द्यावी. दाणे हिरवे असल्यावर शिवाय आधी भाजून घेतल्याने भाजी लवकर शिजते. फोडणी ते भाजी साधारण २०-२५ मिनिटात होते. भाजीत थोडे पाणी राहू द्यावे, एकदम पातळही नको. रसरशीत भाजी चांगली लागते. थोडे तेल जास्त असेल तर अजून छान कट येतो. पण तो नसला तरी चवीत फरक पडत नाही.

मी भाकरी, पीठ-कूट घातलेली मेथीची भाजी आणि भाकरी केली होती. एकदम मस्त झाली. :) तुम्हीही करून बघा.




विद्या भुतकर.

No comments: