Monday, January 22, 2018

मेरी मॅगी

       आज घरी एकटीने राहण्याचा पहिला दिवस. सकाळपासून नेटवर टाईमपास करुन झाला, थोडं लिहून झालं. हात पाय चालवून झाले. आता जेवायची वेळ झाली. मुलं-नवरा नसल्याने एकटीला जेवायला काय करायचं हा प्रश्न पडला होता. अर्थातच मग सर्वात सोप्पा उपाय होता तो म्हणजे 'मॅगी'. आता 'मॅगी' बद्दल हजारो लोकांनी लिहिलं असेल आजवर, खासकरून सध्याच्या त्यांच्यावरील आरोपांमुळे बातम्या तरी प्रत्येक ठिकाणी असतील. तरीही माझ्या आयुष्यात मॅगी वेगवेगळ्या काळात आली आणि त्या त्या दिवसांच्या आठवणींमध्ये तिने स्वतःचं वेगळं स्थानही बनवलं. तसं पाहिलं तर एरवी उगाच घरात 'हेल्दी' जेवण बनवण्याचा हट्ट करणारी मी, मॅगीबाबत मात्र त्या सर्व विचारांना पूर्ण कल्टी देते आणि गरम गरम खाऊन घेते. 
        मी शाळेत असताना कधीतरी पुण्याहून आलेल्या आत्याने आम्हाला मॅगी करुन खायला दिली होती. अर्थातच त्यावेळी त्या 'बेचव' मॅगीमध्ये आवडण्यासारखं काय आहे असं वाटून पुन्हा त्याच्या वाटेला मी कित्येक वर्ष गेले नाही. कॉलेजमध्येही कधी मॅगी खाल्ली नाही. खरी सुरुवात किंवा ओळख झाली ती पहिल्या नोकरीत असताना मैत्रिणीच्या रुमवर GRE चा अभ्यास करताना केलेली आणि खाल्लेली मॅगी. तेव्हा पहिल्यांदा मला कळलं की त्यात हवं ते घालून, मला हव्या त्या चवीची मॅगी मी बनवून खाऊ शकते. अभ्यास आणि मॅगीचं गणित तेव्हा पहिल्यांदा जमलं. 
      पुण्यात ते जितकं सोईस्कर होतं तितकंच अवघड गेलं केरळमध्ये गेल्यावर. केरळमधल्या जेवणाची चव तर आवडायची नाहीच. त्यात हॉटेलमध्येही खोबरेल तेलातील डोसा, इडली आणि सांबारही. मग ट्रेनिंग सेंटरच्या शेजारीच टपरी असलेल्या माणसाकडे तो बनवेल तशी मॅगी खाल्ली. तिथल्या त्या बेचव जेवणात साधी मॅगीची चविष्ट वाटायची. नवीन मित्र-मैत्रीण, केरळचं सौंदर्य, तिथे केलेली मजा आणि त्यासोबत चवीला मॅगी. हे समीकरण आजही लक्षात आहे. 
       केरळमधून मी आले मुंबईला, जिथे जेवण बरंच चांगलं असायचं. ऑफिसच्या जवळच राहायची रुम असल्याने शनिवार-रविवारीही तिथे ऑफिसच्या कँटीनलाच जेवायचे. नंतर बोरिवली ते अंधेरी प्रवास सुरु झाला, बसने. तोही दुपारी ३ ते रात्री १२ च्या शिफ्टचा. रात्री बारा वाजता रुमवर जायच्या आधी अनेकदा कँटीनला जाऊन मॅगी खाऊन यायचे आणि झोपायचे. जेवण असं काही नाहीच. एकदा तर माझ्या वाढदिवशीही रात्री बारा वाजता ऑफिस कँटीनमध्ये मॅगी खाल्ल्याचं आठवतंय. तिथला माणूस सुरुवातीला फक्त पाणी , मसाला आणि नूडल्स इतकंच टाकून आणून द्यायचा. मी हळूहळू ओळख वाढली तशी, त्यात टोमॅटो-हिरवी मिरची घालून द्यायला सांगायचे. तेव्हा त्या टोमॅटो-मिरचीची सवय लागली ती आजही आहे. कधी स्वतः रुमवर मॅगी करायची असेल तर आम्ही बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरुन तळमजल्याला असलेल्या दुकानात दोन करुन मॅगी मागवून घायची होम डिलिव्हरी. आजही त्या अळशीपणाचं हसू येतं. आजही मुंबईच्या दमट हवेत, कंटाळून कॅंटीनमध्ये जाऊन खाल्लेल्या मॅगीची, त्या दिवसांची एक ठराविक आठवण मनात आहे. 
       पुढचा प्रवास झाला तो मुंबई ते अमेरीका आणि अमेरीका ते कॅनडा. कँटीनचं जेवण्याचे दिवस संपले होते.  जिथे स्वतः करुन खायची सवय लागली. पण झालं काय की इथे मी रुमवर एकटीच राहायचे, तेही एका घराच्या बेसमेंट मध्ये. कॅनडाच्या थंडीत तळघरात एका हीटरवर दिवस काढायचे. शुक्रवार आला की मग रात्री मॅगी करायची, गरम-तिखट, लॅपटॉप वर एखादा पिक्चर लावायचा, अंगावर पांघरून घेऊन उबीत, मॅगी खात पिक्चर बघायचे, एकटीच. थंडीतील ती गरम मॅगी आणि तेव्हा पाहिलेले चित्रपट अजूनही डोक्यात येतात कधी कधी. तिथल्या थंडीत निभाव लागला तो मॅगीमुळेच. एकटीच असल्याने पिक्चर संपला की तसेच वाटी बाजूला ठेवून, लॅपटॉप बंद करुन, गुरफटून तशीच झोपी जायचे. :) 
     लवकरच एकटे राहण्याचे दिवस संपले. लग्नानंतर एक महत्वाचा शोध लागला तो म्हणजे मला माझ्यापेक्षा नवऱ्याच्या हातची मॅगी जास्त आवडते. अर्थात ती आवड होती की आळस माहित नाही, पण शुक्रवारी घरी आलं की आयती हातात गरम -तिखट मॅगी आणि पुन्हा एखादा पिक्चर, हे नवीन सुरु झालं. एकदम विकेंडचा फील यायचा. आजही कधी बरं नसलं, विशेष करुन सर्दी वगैरे झाली असेल तर हमखास तिखट-गरम मॅगी खायची इच्छा होतेच. एकदा तर त्याच्या हातची मॅगी सासू-सासऱ्यानाही खाऊ घातली. (किती कौतुक झालं लेकाचं तेव्हा !! असो. ) 
       मध्ये जेव्हा मॅगीच्या मसाल्याबाबत बातम्या येऊ लागल्या आणि घरात ते आणणं बंदच झालं, जवळ-जवळ दोनेक वर्ष. असेही मुलांना ते द्यायला नको म्हणून करायचं बंदच केलं होतं. पण त्यांनी भारतात असताना कधीतरी खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. तेव्हापासून महिन्यातून एखादे वेळी त्यांचीही होऊन जाते एखादी मॅगी. कधी वाटतं, योग्य करतो की नाही. पण तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत शंका येते मला, अगदी ढीगभर औषध फवारलेल्या गहू-तांदळाचीही. शेवटी एक उपाय सुरु केला. नूडल्स पूर्वी एकदम पाण्यात टाकायचो, आता उकळून त्यातील पहिलं पाणी काढून टाकून मग शिजवतो. निदान वरचं वॅक्स की काय ते तरी जाईल निघून म्हणून. बाकी अजूनही बातम्या येतच राहतात, योग्य अयोग्य कळत नाही, पण जोवर त्याचं प्रमाण मर्यादित आहे तोवर योग्य असावं असं मला तरी वाटतं. 
        प्रत्येकाची मॅगी खाण्याची, बनवण्याची पद्धत निराळी आणि एकाची दुसरयाला अजिबात न आवडणारी. हे फक्त मॅगीबद्दलच होऊ शकतं. कुणाची खरंच दोन मिनिटांत बनणारी तर कुणाची साग्रसंगीत. कुणाला त्यात पाणी असलेलं आवडतं, कुणाला एकदम कोरडी, कुणाला भाजी घातलेली तर कुणाला काहीच नसलेली. जितक्या करू तितक्या तऱ्हा. शिवाय, काहीही स्वयंपाक येत नसला तरी 'मॅगी बनवता येते' असं क्वालिफिकेशन अनेकांचं असतंच. माझा एकटी-दुकटी ते चौकटी असा प्रवास निरनिराळया देशातून झाला. त्यात कुठे ना कुठे मॅगी होतीच त्या त्या ठिकाणी. आणि त्याच्याशी निगडित आठवणी. त्यामुळे आज घरी एकटीसाठी  बरेच दिवसांनी करताना त्या सर्वांची पुन्हा आठवण झाली आणि म्हटलं लिहावंच. कारण मला ठाऊक आहे, प्रत्येकाच्या त्याच्याशी वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असणार. होय ना? 

विद्या भुतकर. 

No comments: