Sunday, January 07, 2018

कॅलेंडर

         पंधरा दिवसांपूर्वी एक मैत्रीण भारतात चालली होती,म्हणाली काही हवं असेल तर सांग आणते. खरंतर पूर्वी अशी खूप मोठी यादी असे आणायची, पण हळूहळू ती यादी छोटी होत गेली. आता फक्त गरजेची वस्तू असेल तरच आणायला सांगते कुणाला. आधी म्हणाले, नाहीये काही विशेष. दुसऱ्या दिवशी आठवण झाली, म्हटलं, "अगं, कॅलेंडर घेऊन येशील का? तेही कालनिर्णय, मराठीच हां!". ती जाणार होती बँगलोरला, त्यामुळे उगाच हिंदी वगैरे काही नको होतं. नव्या वर्षाच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी ती घेऊन आली होती. 
           मी आजकाल अशा जास्त अपेक्षा ठेवत नाही. उगाच कुणी विसरलं, किंवा नाही मिळालं, नाही वेळ झाला, अशी अनेक कारणं असू शकतात. पण, तिने एका दिवसाच्या मुंबई ट्रीपमध्ये ते आठवणीने घेतलं आणि घेऊनही आली. खूप मस्त वाटलं, तिने आठवणीने आणलं याबद्दल. संध्याकाळी नवऱ्याला सांगितलं,"बरं झालं ना वेळेत मिळालं.". तो म्हणे,"मिळतं इथे पण." म्हटलं,"मला मराठी कालनिर्णयच हवं होतं.". त्यावर त्याने पुढे युक्तिवाद केला, की प्रिंटआउट काढली असती. ऑनलाईन मिळतं सर्व.". 
           या अशा कारणांनी अजिबात काही फरक पडत नव्हता मला. मला, मूळ प्रतीचं छापील कॅलेंडरच हवं होतं. आता याला हट्ट म्हणा किंवा आणि काही. पण त्या कॅलेंडरने घराला एक शोभा येते असं मला वाटतं. किचनच्या त्या कोपऱ्यातल्या भिंतीवर तेव्हढ्याच तुकड्यात ते बरोबर बसतं. ते तिथं असण्याची इतकी सवय झालेली आहे की तिथे दुसरं काही आवडलंही नसतं. घरी ती सुरळी आली की नवऱ्याने आवर्जून लावून त्याला खाली पेपर क्लिप लावल्या, म्हणजे सरळ होईल ना. :) किती बारीक सारीक गोष्टी असतात ना? 
          पूर्वी नवीन कॅलेंडर आलं की त्याचंही अप्रूप असायचं. कॅलेंडरची कुणी जाहिरात करु शकतं? यावर आता विश्वास बसणार नाही, पण दूरदूर्शन वर रेणुका शहाणेची तीन-चार भाषांमध्ये कालनिर्णयची जाहिरात यायची, ती आजही पाठ आहे. :) जाहिरात ती पाहिली तरीही, प्रत्येक घरात वेगळं कॅलेंडर असतं, म्हणजे आईकडे नेहमी भाग्योदय असतं तर सासरी दुसरं.ते त्यांचं पूर्वीपासून चालत आलेलं. आईकडे तर अनेक वर्षांची जुनी कॅलेंडर ठेवलेली आहेत. आता ती पाहायला कसं वाटेल? एकदा बघायला लागतील. मलाही माझ्याकडची सर्व मराठी कॅलेंडर अशीच जपून ठेवायची खूप इच्छा आहे, अशीच, आठवण म्हणून. :) 
        मी लहानपणी अगदी कॉलेजपर्यंत, कॅलेंडर आलं की,आपला वाढदिवस, दिवाळी, सर्व सुट्ट्या कधी येतात ये बघून घ्यायचे. महिना पालटला की त्या महिन्यातल्या शुभ-अशुभ दिवसांची यादीही पाहिली जायची. मागच्या पानावर आपल्या राशीसाठी हा महिना कसा जाणार हे पाहायचे. परीक्षा असेल तर अजूनच काळजी त्या भविष्याची. :) एखादी रेसिपी, एखादा लेख किंवा सणासुदिच्या दिवसांत एखादी पुराणातली कथा असेल तर ती वाचायचे. आई दादा अजूनहीकॅलेंडर घेऊन बसतात एखादं काम पार पाडायचं असेल तर, कुठे जायचं असेल, काही काम असेल तर. दुधाचं बिल, पेपर बिल, फोन नंबर अशा अनेक गोष्टी त्या कॅलेंडरवर यायच्या किंवा अजूनही येतात. 
        आमचा सध्याचा भारतीय कॅलेंडरचा वापर त्यामानाने कमीच. एकतर अमेरिकेतल्या सुट्ट्या निराळ्या, त्यात उपवास नाहीत त्यामुळे तसं फार काही पाहिलं जात नाही. शिवाय आजकाल वर्ष सुरु व्हायच्या आधीच व्हॅट्सऍपवर पुढच्या वर्षी कुठल्या सुट्ट्या कधी येत आहेत आणि मोठा वीकेंड कधी मिळेल याची मिळून जाते. ऑफिसचं कॅलेंडर तर बोलायलाच नको. रोज सकाळी किंवा आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच्या मिटिंग कोणत्या हे पाहून घेतलं जातं. वाढदिवस, ट्रिप, भारतवारी प्लॅन करण्यासाठी महिनोंमहिने सर्व आधी ठरवलं जातं. मुलांची कॅलेंडर अजून वेगळी. रोज कुणाचा कुठला किती वाजता क्लास, कुणाची पार्टी कधी किती वाजता कुठे हे सर्व कुठे ना कुठे ठेवावं लागतं, त्यामुळे त्यांचं कॅलेंडर वेगळं. 
         या सगळ्या भरगच्च कार्यक्रमांसाठी, धावत्या जगासाठी आपलं ते छापील मराठी कॅलेंडर कुठे पुरणार? तरीही ते घरात असणं एक घराचा भाग झालेला आहे. मोठे सण, त्यांची तारिख वार, मुहूर्त अजूनही पाहिलं जातंच. थोड्या दिवसांपूर्वी मुलाने त्यातले मराठी अंक बघून ते कसे म्हणायचे हे विचारलं, इतकं मस्त वाटलं. निदान मराठी अंक आणि अक्षरं शिकवण्यासाठी त्याचा उपयोग नक्की होईल असं वाटलं. दरवर्षी कुणी ना कुणी आठवणीने कॅलेंडर आणून द्यायचं. या वेळी विसरले म्हणून हुरहूर वाटत होती. यावर्षीही ते वेळेत मिळालं आणि त्याच्या ठरलेल्या जागेवर लावता आलं हाही आनंद नसे थोडका. 

      तुमचंही असेलच असं एखादं ठराविक कॅलेंडर, तुमच्याही असतील अश्याच काही भावना अजूनही गुंतलेल्या, होय ना? 

विद्या भुतकर. 

No comments: