Monday, January 29, 2018

माझी पाठदुखी

      आज मी पोस्ट लिहिणार आहे, पाठदुखीबद्दल. त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांत मला याबद्दल काही अनुभव आले ते लिहायचे होते आणि हे लक्षात आले की डायबिटीस सारखे हेही दुखणे आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. पाठ दुखण्याची अनेक करणे असू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे पाठीचा मणका ज्या स्थितीत राहणे अपेक्षित आहे त्यात न राहता चुकीच्या बसण्याने, झोपण्याने हा त्रास वाढू शकतो. वजन वाढून एकूणच पाठीवरचा ताण वाढतो. गाडी चालवताना ज्या प्रकारे बसतो, खड्डे किती येतात. वजन उचलताना किंवा कामे करताना पाठीत वाकतो की गुढग्यात, हातात पिशव्या घेऊन जाताना वजन दंडावर येतं का पाठीवर? अशा अनेक गोष्टी. 
        पण सर्वांत जास्त ऐकलेले कारण की माझ्यासारख्याच अनेकजणींना पहिल्या बाळंतपणानंतर महिन्यांतच माझी पाठ दुखू लागली असेल आणि अनेकांना डॉक्टरांनी दाखवलेही असेल. त्यांनी फिजिओथेरपी सांगितली असेल, व्यायाम करायला सांगितलं असेल, वजन कमी करायला सांगितले असेल. पण त्यातले काय काय किती जणांनी प्रत्यक्षात केले आहे? आणि केवळ डिलिव्हरीच नाही, वय वाढत जातं तसेही पाठदुखी सुरु होऊ शकते. स्त्रियाच नाही पुरुषांनाही. पण हळूहळू सुरु झालेल्या या त्रासाबद्दल आपण फार कमी उपाय करतो, कारण ते दुखणं आपल्या कायमचं मागे लागलंय हे आपण स्वीकरलेलं असतं. आणि तीच माझी सर्वात मोठी चूक होती.
            एका मैत्रिणीने एका मराठी लेखाचे कात्रण मला पाठवले होते ते इथे देत आहे. पाठदुखी वाढत जाते तसा त्याचा आपल्या बाकी शरीरावर कसा परिणाम होतो ते यात दिले आहे. दोन मणक्यांमध्ये एकेक चकती(डिस्क) असते, डिस्क सस्पेन्शनचं काम करत असतात, म्हणजे मणक्यावर येणारा भार काही प्रमाणात शोषून घेतात. पण जसे जसे त्या डिस्कवरील प्रेशर वाढते त्या डिस्कचा आकार गोल न राहता त्याला पोक येऊ लागतो आणि त्यातून पाठदुखी सुरु होते. डिस्कवरील प्रेशर खूप वाढल्यावर त्याचे बाहेरील आवरण तुटून आतील द्रव बाहेर येऊ शकतो. आता बाहेर आलेली डिस्क किंवा तो डिस्क मधून बाहेर आलेला द्रव पायाकडे जाणाऱ्या शिरांवर दाबू लागतो, माझ्या बाबतीत तो दाब उजव्या पायाच्या शिरेवर पडत होता. ती आपल्या शरीरातील सर्वात मोठी नस आहे, सायटीक.  जर पाठीच्या वरच्या भागातील डिस्कला त्रास असेल तर हाताकडे जाणाऱ्या शिरांवर दाब येऊ शकतो. आणि जसे जसे या शिरांवरील दाब वाढेल, त्या शिरांमधील संवेदना जाऊ शकते आणि अतिशय वेदनाही होतात.
          अनेकांना प्रश्न पडतो की पाठ दुखतंय तर पायाचा काय संबंध? याबद्द्दल त्या कात्रणात जास्त माहिती आहेच. माझ्याबाबतीत उजव्या पायाच्या शिरेवर दाब पडून उजव्या पायाने चालणे  अशक्य झाले त्यासाठी सर्जरी करावी लागली. त्याबद्दलही त्या कात्रणात लिहिलेले आहे. मी या लेखासोबत अजून काही चित्रे जोडत आहेत. त्यात साधी डिस्क आणि बाक आलेली डिस्क दोन्ही दिसतील. तसेच कुठल्या डिस्कवर भार आल्यास कुठल्या शिऱ्या दुखतात किंवा कुठल्या भागावर परिणाम होऊ शकतो ते एका चित्रात दिलं आहे.


आता मी लिहीत आहे माझे जे अनुभव आले.

१. जाऊ दे ना: जसे मी पाठदुखी हे आपल्याला कायमचं लागलेलं दुखणं आहे असं स्विकारुन पुढे जात राहिले तसेच अजूनही बरेच लोक असतील. पण हे लक्षात येत नाही की आपलं शरीर दुखतंय म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय  आणि ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. जे काही चुकत असेल ते दुरुस्त केलेच पाहिजे. ते दुरुस्त होत नसेल तर ते कमी होण्याचे प्रयत्न तरी केले पाहिजेत. माझ्यासारखेच अनेकांना सुरुवातीला जे फिजिओथेरपीसाठी सांगितलेलं असतं त्यांनी अनेकदा ती केलेली नसते आणि त्याबद्दल ते विसरुन जातात. वजन वाढत आहे, ते कमी करा म्हणून सांगतात कुणाला तेही सोडून दिलं जातं. ते करणं टाळलं पाहिजे. मी चूक केली ज्याबद्दल आता मला जाणीव होत आहे. 

२. एव्हढं हातातलं काम: अनेकदा असं होतं की  आपल्या समोर एखादं काम असतं, पाठ दुखत असते. पण वाटतं एव्हढ्या चार पोळ्या करते आणि बसते. आजचा कार्यक्रम तेव्हढा होऊन जाऊ दे मग डॉक्टरकडे जाऊ. दिवाळी संपू दे, मग थोडा व्यायाम करु. पाठदुखीच्या बाबतीत मला असं सांगितलं की आपण ज्या अवस्थेत चुकीच्या प्रकारे किंवा खूप वेळ बसलेले आहोत त्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे उदा: एखादं प्रोजेक्टचं काम चालू आहे, सलग दोन तास बसलोय, माहित आहे की जरा उठलं पाहिजे पण नाही होत. मला या आजारपणात कळलं की मी सलग दोन तास बसले एकाच अवस्थेत तर किती त्रास होत होता. नाईलाजाने मला उठावंच लागत होतं. कारण तसं नाही केलं तर खूप दुखत होतं. तर ते दुखणं वाढायची का वाट बघायची? चालत असू, उभे असू तर मधेच ते सोडून थोडं बसायचं. बसलेले असू तर उठून चालून यायचं. कुणीही सलग चार तास एकाच ठिकाणी आपण बसावं अशी अपेक्षा करत नाही. 

३. जर-तर: आता शेवटी आजारपण वाढलंच तर मग पहिली फेज असते ती म्हणजे, 'जर-तर' ची. म्हणजे काय ?तर माझी पाठ, पाय अतिशय दुखायला लागल्यावर मला पाच मिनिटेही उभे राहणं शकय होत नव्हतं. रोजची साधी साधी कामंही जमत नव्हती. तेव्हा रडू यायचं आणि विचार करायचे की खरंच मी आधी का नाही लक्ष दिलं? कदाचित सतत बसले नसते, पळाले नसते तर कदाचित इतकं झालं नसतं. किंवा अगदी साधी गोष्ट म्हणजे, ज्या ट्रीपमध्ये माझं दुखणं वाढलं तिथे गेलेही नसते तर आज मी वेगळी असते, नॉर्मल असते. असे अनेक विचार यायचे. पण नवरा समजावत राहिला, जे झालंय ते झालंय. आता काही करु शकत नाहीये. उगाच, काय करायला हवं होतं, काय झालं असतं असे विचार करुन काहीच उपयोग नसतो. जे समोर आहे त्याला तोंड देणं आणि पुढे काय करायचं हे ठरवणं इतकंच करु शकतो. 

४. गृहीत धरणं: या आजारपणात माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या शरीराला किती गृहीत धरतो. मला अगदी साध्या गोष्टी करता येत नव्हत्या. उदा: फ्रिज किंवा मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडणेही जमत नव्हते. पोळ्या करायला उभी राहिले तर दोन पोळ्या करुन बसावं लागत होतं. भाजी किंवा वरण असलेलं भांडंही माझ्यासाठी जड होत होतं. तेव्हा लक्षात आलं की या छोट्या गोष्टी एरवी आपण किती सहज करु शकतो पण त्याच्यासाठी शरीराचे निरनिराळे भाग किती कार्यरत असतात. ते बंद पडले तर किती त्रास होतो. माझा उजवा पाय अशक्त झाल्याने, डाव्या पायावर जास्त जोर येत होता आणि शरीराचा तोल मध्यावर न राहिल्याने खुब्यात दुखायला सुरुवात झाली होती. म्हणजे आपण दोन पायांवर स्वतः उठून चालू शकतो हे किती मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि तरीही आपण आपल्या शरीराला इतकं गृहीत धरतो. 

५. व्यक्त होणं: अनेकदा लवकरच दुरुस्त होईल या विचारांनी आपण जास्त काही कुणाला सांगत बसत नाही. त्यात परगावच्या, परदेशात असताना घरच्यांना उगाच काळजी नको म्हणून तर अजून सांगत नाही. पण मग या गोष्टी स्वतःकडेच ठेवून अजून जास्त त्रास होतो. त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे कुणालातरी सांगणं जास्त गरजेचं आहे. केवळ बोलण्याने खूप फरक वाटतो, त्यातून आपण पुढे काय केले पाहिजे हे कळतेही.

६. सोशल मीडिया: मी नियमित लिहिते, फेसबुकवर पोस्ट असतात, फोटो असतात किंवा व्हाट्सएप्प वर ऍक्टिव्ह असते त्यामुळे अनेकांना सर्जरीबद्दल कळलं तर खूप आश्चर्य वाटलं. अरे असं कसं झालं? त्यात त्यांचा काही दोष नव्हता कारण त्यांना माहित नव्हतं, फक्त जवळ असणाऱ्या काही लोकांनाच माहित होतं. कितीही झालं तरी माणूस प्रत्येक गोष्ट प्रत्येकवेळी जगासमोर मांडेल असंच नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जे दिसतं तेच खरं आहे असं समजू नका. आपला एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल, त्यांच्या केवळ सोशल मीडियावरुन ठरवू नका त्याचं कसं चालू आहे. समोरुन कसंही दिसत असलं तरी जवळच्या मित्र-मैत्रिणीला एखाद्या दिवशी मुद्दाम मेसेज करुन विचारा कसा आहेस, कशी आहेस. एखादा अचानक मेसेज पाठवायचा बंद झाला तर विचारा, बरंय ना सगळं म्हणून. कारण हे सोशल मीडियाचं विश्व खरंच अनेकदा आभासीच असतं. आपल्या जवळच्या लोकांच्या बाबत तरी त्याच्यावर विसंबून राहू नका. त्यांच्याशी संपर्क साधा आणि बोला. कदाचित तुमच्या फोनचीच त्याला किंवा तिला तेव्हा गरज असेल.

           सर्जरीबद्दल सांगायचं तर: तिचं नाव आहे, मायक्रोडिस्केक्टोमी. भारतात किती वेळ लागतो माहित नाही इथे, दीड- दोन तासात सर्जरी झाली. पूर्ण भूल दिली होती. भूल उतरुन मला बाथरुमला जाता आलं की त्यांनी लगेच मला डिस्चार्ज दिला. भारतात इतक्यात मला घरी सोडलं नसतं असं मला सांगितलंही काही ओळखीच्यांनी. एकूण ७ तासात मी घरी आले होते. दोन आठवडे झाले त्यानंतर पायात बऱ्यापैकी सुधारणा आहे. चालताना पायाचे मागचे स्नायू अजूनही दुखतात कारण गेले दोन तीन महिने ते नीट वापरले गेले नाहीयेत आणि आखडून आलेत. नस जिथे दाबली गेली होती तिथे अजूनही दुखते, पायातही जिथे संवेदना नव्हती तिथे परत आली असे वाटत आहे. 
         नस पूर्ववत होण्यासाठी २-३ महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यावर वाट पाहणे इतकेच करु शकतो असंही मला नर्सने सांगितलं. जिथे आधी संवेदना नव्हती पायाला तिथे आता दुखत आहे, जे हळूहळू कमी होईल किंवा व्हायला हवे. सर्जरीची सुरुवातीची रिकव्हरी साधारण ४-६ आठवड्याची असते. मी पाचेक आठवड्यात परत ऑफिसला जाऊ शकते म्हणून सांगितलं आहे. सर्जरीनंतर पहिला आठवडा प्रचंड औषधं होती त्यामुळे डोळ्यांवर सतत झापड होती आणि दुखतही होती. आता जिथे इन्सिजन केले तिथे जास्त दुखत नाहीये पण मूळ पाठदुखी अजूनही आहेच. त्यावर फिजिओथेरपि हाच उपाय आहे असं सांगितलं आहे. ती मला सर्जरीपासून ६ आठवडयांनी सुरु करता येणार आहे. पायात शक्ती येण्यासाठीही PT घेणार आहे. एकूण सर्जरीनंतर PT ने पूर्ण बरे होण्यासाठी कदाचित ६ महिने तरी लागतील असं वाटत आहे. कमी की जास्त माहित नाही. 

तर हे असं आहे एकूण. माझ्या अनुभवातून कुणाला फायदा झाला तर चांगलेच आहे म्हणून सर्व लिहिण्याचा प्रपंच. मी डॉक्टर नाही त्यामुळे काही चुकले असल्यास क्षमस्व. या निमित्ताने निदान पाठदुखीचा आणि त्यावर काय केले पाहिजे याचा विचार केला जाईल. आपण योग्य उपाय केले नाहीत तर तो वाढू शकतो हेही सांगायचे होते. वेळीच उपाय केल्याने नक्कीच फरक पडू शकतो, त्यामुळे कुणाची पाठ दुखत असेल तर विलंब करु नका. 

विद्या भुतकर. 

2 comments:

Anonymous said...

Get well soon.... My best wishes with you always...

Vidya Bhutkar said...

Thank you very much for the wishes.
Vidya.