Saturday, November 03, 2012

गरज काय?

                १५ दिवसांपूर्वी मराठीत ब्लॉग लिहायला परत सुरुवात केली. मध्ये बरेच वेळा मनात विचार यायचे, असे लिहावेत, तसे मांडावेत असे वाटायचे, पण घरी येऊन मुलांचं उरकेपर्यंत वेळ कसा निघून जातो हे कळायचंच नाही. नंतर मला पळायचा नाद लागला. तो पूर्ण झाला की आता त्याबद्दल लिहायचे म्हणून पुन्हा एकदा इथे आले. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एका न दिसणाऱ्या पण ओळखीचे वाटणाऱ्या लोकांचा जणू ग्रुपच झाला होता ब्लॉगविश्वात. पण पुन्हा लिहायला सुरुवात केल्यावर तो हरवल्यासारखा वाटत आहे.  परत इथे आल्यावर जुन्या गावात येउन नवीन लोकांना पाहिल्यासारखे वाटत आहे. असो. मूळ मुद्दा असा की मी काही लिहिल्यावर लगेचच त्याची लिंक मराठी संकेतस्थळावर दिसतेय ना हे मी चेक केले. मग रात्री पोस्ट करून झोपून गेले आणि उठल्यावर उत्सुकता होतीच की कुणी काही कमेंट टाकलीय का. मेघनाची कमेंट वाचून बरं वाटलं की कुणीतरी वेलकम करायला तरी आहे. 
             त्यानंतर परवाची पोस्ट प्रसिद्ध केल्यानंतर १०० वेळा तरी चेक केले असेल की कुणी काय लिहिलं असेल माझ्या कथेबद्दल. कुणीच काहीच नाही. तर प्रश्न हा नाही की मी लिहितेय हे चांगलं की वाईट. मला असा प्रश्न पडला की, एक तर मी मराठीत लिहितेय, ते ही स्वत:बद्दलच. साहित्तिक ग्रेट असं काही नाही. आणि मुख्य म्हणजे, मागची कथा पूर्ण करायला मला ७-८ दिवस लागले आणि ती पूर्ण होईपर्यंत 'ग्रेग' आणि 'ग्रेस' माझ्या डोक्यातून गेले नव्हते. म्हणजे मला माझे डोके रिकामे करण्यासाठी लिहायचं होतं. मग या सगळ्यात लोकांनी ते वाचलं, नाही वाचलं, किंवा वाचूनही त्यांनी नाही कमेंट टाकली, तर याने मला का फरक पडायला हवा? आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीला लोकांची सहमती अनुमती, प्रशंसा, प्रतिक्रिया या सर्वांची गरज काय? 
                 लोक म्हणतात ना शाळेत बाई इतक्या मुलांना कसे सांभाळत असतील? तर याचं उत्तरही हेच आहे. माणसाला प्रत्येक केलेल्या गोष्टीसाठी फळ हवं असतं. मग जेव्हा ३ वर्षांची १६ मुलं एकत्र असतात, त्यांना आपल्या म्हणण्यानुसार वागवण्यासाठी माणसाच्या या गरजेचाच तर फायदा घेतात ते. चांगलं वागल्यास कौतुक आणि नाहीतर लक्ष न दिल्याची शिक्षा. मग मुलंही बाई म्हणतील तसं वागतात. मला सानुच्या  बाई म्हणाल्या होत्या एकदा, 'She is a teacher pleaser'. आणि त्यात वाईट काही आहे असं मला म्हणायचं नाहीये. मला माझ्या मुलीसारख्या अजून १५ पोरांना सांभाळायला लागले, तर मी साम, दाम, दंड, भेद सर्व अस्त्र वापरायला तयार  आहे.  तर परत मुद्दा असा की हा आपला गुणच आपल्याला वरचढ किंवा कमकुवत बनवतो का? 
                 मी केलेल्या प्रत्येक गोष्टीला मला प्रतिक्रिया मिळालीच पाहिजे हा अट्टाहास का? एक जण आहे आमच्या शेजारी राहणारी. अनेकदा असे झाले की समोर दिसणाऱ्या साध्या साध्या गोष्टींबद्दलही ती काही बोलली नाही. मला होणाऱ्या स्वाभाविक संतापावर संदीपचे एकाचा उत्तर, लोकांनी काही बोलावे ही अपेक्षा का? आणि त्याच्या अशाच वागण्यामुळे त्याला मात्र लोक स्वत: येऊन गोष्टी सांगतात (असे मला वाटते.). अगदी फेसबुकचेच बघा ना? आधी लोक कॉमेंट लिहितात म्हणून लोक ओर्कुट असायचे. आता तिथे कुणीच नसतं म्हणून फेसबुकवर नवीन अकाऊंट काढायचं आणि परत तसेच फोटो, स्टेटस अपडेट करत राहायचे. लोकांशी फक्त संपर्कच ठेवायचा असेल तर पर्सनल इमेल करूनही ठेवता येतो. त्यासाठी नवीन गाडीचा फोटो टाकून जगाला दाखवायची गरज काय? त्यातही मग कुणीतरी असे अमुक अमुक स्टेटस टाकले, पण कुणीच काहीच लिहिले नाही याचा कोण आनंद. तर परत मुद्दा असा की कुणीतरी मला, माझ्या वागण्यावर, लिखाणावर, आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करण्याची काय गरज आहे? आणि अशी अपेक्षा करून मी स्वत:लाच कमकुवत बनवत आहे का? 
              मध्ये अख्खा आठवडा ऑफिसमध्ये काहीतरी झोल चालूच होते. हे बंद पडले हे चालत नाहीये, इथे पेग लोड व्हायला वेळ लागतोय, संध्याकाळी मिळणारा सपोर्ट चांगला नाहीये, इ, इ. या सर्वावर मोठ्या संयमाने काम करणारा माझा मैनेजर. मी बोलत असताना, एका मेल आली त्याला. त्यात फक्त लिहिले होते, 'Thanks'. ते वाचून तो म्हणाला, 'Finally a thank you'. म्हणजे आपण टीमचे मैनेजर आहोत आणि सर्व सुरळित चालवणे हे त्याचे काम असले तरी, त्यादिवशी कळले कि त्यालाही एका 'Thank you' or 'Good Job' ची अपेक्षा आहेच. आणि मग तोही मला माझ्यासारखाच सामान्य वाटला त्यादिवशी. 
             तर आता स्वत:वर लोकांचा/ त्यांच्या वागण्याचा कमीत  कमी प्रभाव कसा पडू द्यायचा याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. उगाचच मग 'कर्मण्येवाधीकाराश्ये मा फलेषु कदाचन'  श्लोक आठवला. तसं पाहिलं तर त्याचा अर्थ जरा वेगळा माझ्या वरच्या परिस्थितीपेक्षा (असं मला वाटतं). कदाचित माझ्या परिस्थिती ची तुलना सावरकरांच्या काळ्या पाण्याशी करायची का? म्हणजे मी ग्रेट आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण विचार करतेय की त्यांनी 'सागरा प्राण तळमळला' असं  लिहिलं तेव्हा कुणी कमेंट करावी अशी त्यांना इच्छा झाली असेल का? मी काहीतरी ग्रेट लिहितोय आणि ते लोकांना दाखवलं पाहिजे असं त्यांना वाटलं असेल का? आणि कुणी त्यांचं कौतुक केलं असेल का? बरं साधा प्रश्न पडतो मला. ओबामा जेव्हा रोज तयार होऊन बाहेर पडतात व्हाईट हाउस मधून तेव्हा  त्यांची बायको 'चांगले दिसताय' म्हणत असेल का? आणि  तिच्या कमेंट करण्या किंवा न करण्यामुळे तिचा हात वरचढ असेल का? असो. उत्तर माहित नाही पण प्रश्न महत्वाचा आहे हे नक्की. :) 

-विद्या.  

6 comments:

महेंद्र said...

अगदी खरं आहे, प्रतिक्रिया आली की लिहीण्याचा उत्साह वाढतो. पण बरेचदा एखादी पोस्ट आपण लिहिल्यावर आपल्याला अजिबात आवडलेली नसते, पण तीच पोस्ट मात्र लोकांना खूप आवडते. कोणाला काय आणि कधी आवडेल ते काही सांगता येत नाही. पण तुझं ब्लॉगिंग २००६ पासून सुरु आहे, तेंव्हा ्ही फेज आता कशी काय आली हा प्रश्न पडला. :) हात लिहिता ठेव.. बस्स..

Meghana Bhuskute said...

प्रतिक्रियेमुळे फरक पडायला नको, असं कसं? तसं असतं, तर आपण डायरीतच लिहून गप्प राहिलो नसतो का? आपण काही लिहून प्रकाशित करतो, तेव्हाच कुणी वाचक ते वाचेल अशी आपली अपेक्षा जाहीर करत असतो. हां, म्हणून अमुक प्रतिक्रिया मिळावी या अपेक्षेनं आपल्या लिखाणात बदल करत असू, तर ते चूक. नाहीतर हा दुहेरी व्यवहार आहे, नाही का? एकदा लेखन लिहून प्रकाशित केल्यावर तसा तो असण्यात काही गैरही नाही, असं मला वाटतं.
बाकी कथेबद्दल - मला खूप जास्त नाही आवडली कथा. पण असं झालं की प्रतिक्रिया लिहिणं टाळलं जातं, तसं करायला नको. फक्त वा वा - छान छान न लिहिता नापसंतीही नोंदवायची खूणगाठ या निमित्तानं. :)

Unknown said...

छान...

महेंद्र said...

दिवसभरात जरी हजार बाराशे लोकं ब्लॉग वाचून गेले तरीही प्रतिक्रिया फक्त ज्या दिवशी लेख लिहिला त्या दिवशी आणि त्या पण फार तर ८-१० मिळतात. लेख जूना होई पर्यंत फार तर २० एक प्रतिक्रिया असतात.

प्रतिक्रिया नाहीत याचा अर्थ लेख वाईट झाला आहे असा घेऊ नये ( हे मी पण स्वतःला सम्जावत असतो ). नेहेमी प्रतिक्रिया देणारे लोकं पण काही काळानंतर प्रतिक्रिया देण्याचा कंटाळा करतात, हे असे का? याला काही उत्तर नाही.

एखाद्या व्यक्तीला लेख आवडला, म्हणजे आपण खूप ग्रेट लेखक झालो, आणि एखाद्याने आवडला नाही म्हटले तर आपण एकदम वाईट लेखक झालो असा अर्थ होत नाही.आवड निवड ही वैय्यक्तिक असते. एखाद्याला जडजंबाळ शब्दांनी भरलेले लेख आवडतात, तर दुसऱ्याला अगदी बाळबोध मराठी मधले. पण याचा अर्थ एक प्रकार दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा ्घेता कामा नये, तर आवड वेगळी आहे असा घ्यायला हवा.

Anonymous said...

Mast lihita tumhi......

Vidya Bhutkar said...

Sorry, the thoughts were initiated by the blog, but the intention was not to talk about just the writing and comments. It was mainyly about the people who would have upper hand for holding their opinions and the human nature of expecting the reactions/ opinions and approvals for anything one would do. At times I feel that this nature makes us more vulnerable.
I might not have explained properly in the blow or even now.
Thank you for all your comments.
Vidya.