Wednesday, July 06, 2016

जावे त्याच्या वंशा

        आयुष्यात काही काही गोष्टी बोटावर मोजता  इतक्याच वेळा होतात, निदान आपल्याकडे तरी. त्यातली एक म्हणजे घराला रंग लावणे. काय तो पसारा. सर्व वस्तूंवर उडालेली धूळ, सामान जागेवरून हलवलेलं, पायांनी पांढऱ्या भुकटीने माखलेली फरशी. आणि त्यात जर स्वयंपाकघर रंगवायचे म्हणाल तर बोलायलाच नको. डबे झाकायचे तरी किती? जेवण कुठे करायचं? आपण मग हलवलेल्या सामानातून मार्ग काढत दिवस काढायचे. भांडी कुठे धुवायची सगळाच गोंधळ. तर माझी पहिली आठवण म्हणजे २० वर्षांपूर्वी आईकडे घराला रंग लावला होता ती. त्यात फक्त घरात झालेला कचरा, किचन बाहेर मांडलेलं, तो पेन्टचा वास आणि भिंतींचा लॅव्हेंडर रंग हेच जास्त आठवते. शिवाय हे पेटर लोक एखादी खोली बाकी राहिलेली असताना, पैसे घेऊन, सुट्टी टाकून निघून जातात याचा आमच्यापुरता तरी अनुभव आला होता.
          याच्या पुढचा अनुभव मात्र अविस्मरणीय आहे. दोनेक वर्षापूर्वी पुण्यातल्या घरी दोन खोल्यांचे रंग लावायचे काम काढले होते. मग रंग लावायच्या आधी वायरिंगचे काम करून घ्यायचे म्हणून भिंती थोड्या फोडल्या. बाप रे ! काय ती धूळ, कचरा, भिंतीची पडलेली पोतीभरून माती काढली मी. त्यानंतर रंग द्यायचे काम म्हणजे त्यामानाने सोपेच म्हणावे लागेल. एका बेडला स्प्रे-पेन्ट पण करायचा होता. तर त्या स्प्रे पेन्टने आक्खे घर स्प्रे झाले होते.  हो दार बंद करून पेन्ट केले होते तरी. घर ठिकाणावर यायला खूप वेळ गेला. त्यावेळी पेन्ट करायला आलेल्या लोकांना वारंवार सांगत असायचे,"प्लिज सुट्टी घेऊ नका. काय ते काम पूर्ण करूनच टाका लवकरात लवकर."
           हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेल्या दोनेक आठवड्यात इथे घरात रंग दिला. हॉल आणि डायनिंग मध्ये एकदम डार्क ब्राऊन रंग होता. त्यात मग हिवाळ्यात अजूनच अंधार दिसायचा. बाकी लोकं उन्हाळी कामे काढतात तसे आपणही काढावे म्हणून शेवटी रंग द्यायचे ठरवलेच. द्यायचे म्हणजे आम्ही दोघे मिळून रंग देणार होतो. साधारण एक दोन रंग डोक्यात होते. म्हणून इथे हार्डवेअर शॉप मध्ये गेलो. त्यात एक नशीब होते की मी जायच्या आधी कुठल्या कंपनीचा रंग घ्यावा आणि त्यातही कुठला टाईप घ्यावा यावर जरा वाचून गेले होते. म्हणजे घराला बाहेरून द्यायचा रंग वेगळा, आत भिंतींना द्यायचा वेगळा, लाकडी रेलिंग्ज-ट्रिम ना द्यायचा वेगळा. दारांचा कुठला इ इ. आम्हाला फक्त भिंतींना द्यायचा असल्याने बरेच प्रश्न कमी झाले होते. तरीही तिथे गेल्यावर मजा झालीच. 
           दुकानात आम्हाला एक माहिती देणारा माणूस भेटला. त्याने विचारले रूमचा आकार किती आहे. ते काय आम्हाला माहीत नव्हते. मी अंदाजे आकार सांगितला. मग छताची उंची? तीही अंदाजे सांगितली. त्यात आमच्याकडे ढिगाने खिडक्या आहेत. त्यांचे आकार विचारले. यात मध्ये आमच्या पोरांची लुडबुड. कसेतरी त्याने काहीतरी गणित केले आणि म्हणाला तुम्हाला इतका इतका पेन्ट लागेल. मग भिंतीचे खाच खळगे भरायला काय हे विचारले. पुढे पेन्ट ब्रश, रोलर, ट्रे हे सर्व सामान घेतले. आता बाकी सर्व माहिती मिळाल्यावर रंग कुठला तेच ठरवायचे बाकी होते. साडीच्या दुकानातही इतक्या मिळणार नाहीत त्या शेड्स इथे. आपल्याकडे कसे, निळसर जांभळा, काळपट लाल, लालसर केशरी वगैरे रंग नुसते म्हणाले की दुकानदार सर्व साड्या बरोबर काढून दाखवतो. पण इथे 'सनसेट ऑरेंज', 'मिस्टीक ब्लू' असे काय कलर कळेना. तिथेच एक मशीन होते त्याला आपल्याला हवा त्या रंगाचा कागद स्कॅन केला की रूमला तो कसा दिसेल हे लगेच दाखवायचा तो. मग आम्ही त्यातून 'ओपल वॉटर' घेऊन आलो, अंदाजपंचे! :) ओपल वॉटर म्हणजे साधारण आकाशी निळा. :) 
           दुसऱ्या दिवशी, वाढदिवसाला पोरांना असते तशी उत्सुकता मला होती रंगाची. मग नास्ता उरकून आम्ही कामालाच लागलो. म्हणले कोपऱ्यातील एक भिंती आधी बघावी. अरे हो, त्याआधी आम्ही यु ट्यूब वरून रंग घराच्या घरी कसा द्यायचा याचे व्हिडीओ सुद्धा पाहिले. त्यामुळे आम्हाला एकदम 'आय आय एम' मधून पास झाल्याचं फिलिंग आलं होतं. त्यात काय विशेष नव्हतं. इथे असेही लाकडी भिंती त्यामुळे त्याला जास्त खाचखळगे नसतात. भिंत आधी जरा घासून एकसारखी करून घ्यायची. बाकी रंगांवर नवीन रंग लागू नये म्हणून भिंतीला चौकोनाच्या सर्व बाजूनी एक टेप मिळतो तो लावायचा.  भिंत तयार झाली की रंग डब्यात हलवून घ्यायचा. मग ट्रे मध्ये ओतायचा. आणि आधी ब्रशमध्ये रंग घेऊन, सर्व कोपरे रंगवायचे आणि मग मध्ये रोलरने फिरवून रंग लावायचा. रंग लावताना वरून खाली जायचे आणि W च्या आकारात रोलर फिरवायचा म्हणजे रंग एकसारखा लागतो. आता हे सर्व कळल्यावर तर रंग देणे 'बाये हात' का खेळ होता. 
           सर्वात आधी एक कळले की दुकानात  रंगाचा डबा उघडतो तसाही सहज आपल्याला जमत नाही. आम्ही प्रायमर + रंग असे एकत्र आणल्याने एकाच वेळेत काम होणार होते. रंग ट्रे मध्ये ओतल्यावर त्याला आमटीच्या भांड्यासारखा तो ओघळ येतो. पण त्याला हात लावायची इच्छा होत नव्हती पटकन. शेवटी संदीपने तो ओघळ बोटाने पुसून घेतला. तो चुकून बोट तोंडात घालेल अशी भीती वाटत होती सारखी मला. भिंतीचे कोपरे ब्रशने रंगवायला घेतले तर ब्रशचे फटकारे दिसत होते. कसेतरी ब्रश फिरवून आम्ही रोलर हातात घेतला पण ते W च्या आकारात रोलर फिरवायला काही जमेना. पुढे मधेच एका ठिकाणी फिका तर काही ठिकाणी रंग गडद दिसत होता. काही ठिकाणी जुना रंग बारीक दिसत होता. त्यामुळे एकच थर द्यायचा असूनही आम्ही चार चार हात त्याला मारले होते. शिवाय संदीप मधेच जरा जास्त जोर देऊन रोलर फिरवत होता त्यामुळे त्या रोलरचे धागे दिसल्यासारखे वाटत होते. पहिल्याच भिंती मध्ये आम्हाला इतक्या शंका आल्या. आम्ही पुढे खिंड लढायची की इथेच माघार घेऊन त्या उरलेल्या भिंतीला जुनाच रंग देऊन गप्प बसावे असा विचार करत होतो. शेजाऱ्यांनी 'नवीन रंग छान वाटत आहे' असे म्हणल्याने मग जोर आला आणि पुढच्या कामाला लागलो. 
           यात सर्वात कंटाळवाणे काम होते ते म्हणजे चिकटपट्ट्या लावणे. भिंतीला चारी बाजून बारीक बारीक करत टेपचे तुकडे लावले. वर चढून रंग द्यायचा, खाली उतरून ब्रशमधे रंग घ्यायचा, पुन्हा वर चढायचे. किंवा खाली रंग देताना दोन पायावर बसून द्यायचा. असे एकदम दमवणारे काम होते. रोलर धरून बोटांची वाट लागली होती. हात पाय तर कामातून गेले होते. कसेबसे दोन दिवसात आम्ही बरेच काम पूर्ण केले. आता एक भिंत तशीच राहू द्यावी असा विचार करत होतो. पण ती योग्य दिसत नव्हती. पडदे ज्या रंगाचे आहेत तसा रंग घ्यायचे ठरवून पुन्हा दुकानात गेलो. पुन्हा तेच प्रश्न. कसेतरी एक रंग निवडला आणि लावला. पण तो म्हणजे एकदम भगवा दिसत होता. म्हणले सुकल्यावर बदलला तर ठीक नाहीतर काही खरे नाही. एकूण साधारण अडीच दिवसात आम्ही ते काम संपवले. शिवाय साफ सफाई बाकी होतीच. टेप काढल्यावर काही ठिकाणी बारीक रेषांत जुना रंग दिसतोय. पण ते कोण बघणार? असा विचार करून अजून ते पडून आहे. मुव्ही मध्ये ते अंगावर रंग उडवत वगैरे रंग लावतात ना घराला ते एकदम खोटे आहे बरं का ! जमिनीवरचा रंग खरडून काढेपर्यंत वैताग येतो. असो. 
           सध्या तरी हे काम पूर्ण झाले आहे. आता पुढचे चार वर्ष तरी हा रंग बदलणार नाहीये. :) कसाही असला तरी आहे तो तो आहे आता. पण घरी रंगकाम करायला येणाऱ्या लोकांना किती कष्ट असतात ते आता कळते. नशीब आम्हाला छत करायचे नव्हते, नाहीतर मान मोडलीच असती. ज्याचं काम त्यानेच करू जाणे. माझ्या चुका आहेत तशा त्यांनी केल्या तर मी किती गोंधळ घातला असता. आता आहे ते मुकाट्याने खपवून घेत आहे. :) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! हेच खरे. अर्थात स्वतः काम केल्याचे समाधान आहेच. असो,  हे आधी आणि नंतरचे काही फोटो. :) 

विद्या भुतकर. 



           

No comments: