Friday, July 29, 2016

ओढणी !

       आज सकाळी एका ड्रेस ची घडी घालत होते. त्यात मग त्याची ओढणीही होती. ती ओढणी दिसली आणि मला फार भारी वाटलं. बांधणीची, शिफॉनची ओढणी. तिच्यासाठी म्हणून तो ड्रेस घेतला होता मी. :) म्हणजे नालासाठी घोडा घेण्यासारखं. प्रेमाने मग ती घडी घालून ठेवली. आजकाल एक तर ती शर्ट-जीन्स, फॉर्मल ड्रेस आणि फारतर कुर्ते घातले जातात त्यामुले पंजाबी ड्रेस घालायची वेळच येत नाही. 'आज -काल' किंवा ' एकेकाळी' ऐसे शब्द वापरले की खूप वे वाढल्याचं फिलिंग येतं.  पण खरच पूर्वीसारखे पंजाबी ड्रेस घालणे होत नाही. आणि त्यात ओढणी तर नाहीच. पण एकेकाळचं प्रेम ते असं अधून मधून वर येतं. असो.
       तर ओढणी, शाळेत पहिला पंजाबी ड्रेस घातला तो युनिफॉर्म म्हणून. लाईट ब्लू ड्रेसवर पांढरी ओढणी दोन्ही बाजूना पिन लावून घातलेली. गळ्यासमोर मधोमध 'V' चा आकार व्हायचा. अजूनही अशा कधी शाळेच्या मुली पहिल्या की मजा वाटते बघायला. अर्थात ही सुरुवात होती. असे अनेक प्रकार ती ओढणी ओढायचे. कधी पूर्ण गळ्याला चिकटून मागे लांब सोडलेली, कधी एका बाजूला एकदम कडक इस्त्री केलेली कॉटनची ओढणी. कधी फक्त कोपऱ्यापर्यंत येईल इतकीच पिन-अप केलेली, कधी पूर्ण हातभर. आम्ही शाळेत असताना कधी तरी ती झोळीसारखी घ्यायची स्टाईल सुद्धा केली होती. दोन टोकं गाठ मारून एका खांद्यावर टाकायची आणि दुसरी बाजू दुसऱ्या खांद्यावर. मग मध्ये झोळीसारखा आकार येतो. :) काहीही हां  ! :) 
          नुसते घालायचे प्रकार जाऊ दे, तिचे भावही वेगळे. कधी लेझीम खेळायला, कधी स्वयंपाक करताना एका बाजूला गाठ मारून एकदम तयारीत असलेल्या हावभावात. कधी पोटावरून बांधून घर साफ करायच्या तावात. कधी मुलाला गाडीवरून नेताना, आपलं काळीज पोटाला बांधून नेणारी ओढणी. कॉलेजमध्ये असताना कधी थंडीत चहा घ्यायला जाताना खांद्यावरून कव्हर करून घेतलेली, कधी पावसात डोक्यावरून ओढलेली. कधी आवरता ना येणारं रडू पोटात घेणारी. जुनी झाली तर मऊ केसाला बांधायला ठेवलेली तर आपल्याच पोरांच्या दुपट्याला भर म्हणून घातलेली. हे केवळ नमुनेच.  बाकींच्यांचे असतीलच.
        या ओढणीमुळे शॉपिंगला एक ग्लॅमर असतं. अनेकदा दुकानात गेल्यावर सर्वात पहिली एक ओढणी आवडते. मग त्याचा ड्रेस बघायला मागतो. पण तो काही पसंत पडत नाही. म्हणून तो सोडून देतो. बाकी अनेक ड्रेस पाहिले तरी काही मजा येत नाही. पुन्हा पुन्हा त्याच ओढणीकडे मन जातं. आणि शेवटी तो ड्रेस घेऊन आल्यावर एखादी मैत्रीण म्हणतेच,"ओढणी भारी आहे गं!". आपणही उत्साहाने बोलतो,"हो ना? मी पण त्यासाठीच ड्रेस घेतला." आणि खी-खी करून हसतोही. कधी एखादा ड्रेस आवडतो तर ओढणी आवडत नाही. मग वाटतं नुसता ड्रेस घ्यावा आणि ओढणीसाठी ते ड्रेस मटेरियल दुकान-दुकान फिरत राहावं, 'ओढणी देता का?' म्हणून. 
       मी सेकंड ईयरला असताना 'हं दिल दे चुके सनम आली होती. त्यात मग 'चाँद छुपा बादल में' हे गाणं पाहिलं आणि तारे असलेल्या ओढणीच्या प्रेमात पडले. दुकानात सेम तसाच लाईट ब्लू कलरचा ड्रेसही घेतला आणि जाळी असलेली ताऱ्यांची ओढणी. नीट पाहिले तर जाळीच्या कपड्यावर त्यात प्लॅस्टिकचे छोटे छोटे ठिपके होते. दोन धुण्यात खराब होऊन गेली. पण ते दोन वेळा घातल्याचं समाधान तर अजूनही लक्षात आहे. बांधणीच्या एकदम घट्ट गुंडाळून गाठ मारून ठेवलेल्या पुरचुंडी सारख्या ओढण्या. पहिल्या धुण्यात तिचा रंग जातोच आणि त्या वळ्याही. पण तरीही वेगवेगळे रंग आणि डिसाईन बघून अनेक बांधणीचे ड्रेस घेतले आहेत मी. एखादी शिफॉनची, सिल्कची, गोंड्यांची, एम्ब्रॉयडरी असलेली किंवा फक्त आवडत्या रंगामुळे, अशा अनेक कारणांमुळे अनेक ओढण्याच्या अनेक आठवणी आहेत आणि असतीलही. नाही का? असं होतं. कुठे विषय सुरु होतो आणि कुठे पोचतो. आता या ट्रिप मध्ये एखादी सुंदर ओढणी असलेला ड्रेस नक्कीच घेतला पाहिजे. :)
        
विद्या भुतकर.

No comments: