Friday, July 22, 2016

निःशब्द

         जुन्या डायरीतले संदर्भ आठवले नाहीत की त्रास होतो, अनेक गोष्टींचा. तेंव्हाच सर्व मनमोकळ, सविस्तर लिहायची का गरज वाटली नाही? कोड्यांसारखे लिहिलेले समजून घेण्यासाठी मग लिहिलेल्या अक्षरांपेक्षा खोडलेल्या शब्दांकडे जास्त लक्ष जात राहतं.
         लिहिण्याइतपत महत्वाचे असलेले बरेच काही इतक्या सहज विसरले जाते? मग आयुष्यात काहीच महत्वाचं नाही? त्या त्या वेळेला महत्वाचं वाटणारं नंतर विसरण्याइतकं क्षुद्र होऊन जातं?
        दुसरं म्हणजे, कधीतरी इतके जवळ वाटणारे लोक इतके दूर गेले याचा खूप त्रास होतो. आणि ते इतके दूर जातील असं स्वप्नातही वाटलं नसल्याने, तेव्हा त्यांचे नंबरही लिहून न घेतल्याचा. नाही का? अशाच अनेक दूर गेलेल्या आपल्या लोकांसाठी कधी तरी तेंव्हाच लिहिलेलं.


विद्या भुतकर.

No comments: