Tuesday, May 09, 2017

तो एक क्षण

      गेलं जवळजवळ वर्षभर पोरांनी त्यांना शाळेसाठी घेतलेले शूज बरेच नीट वापरले. निदान नवे घ्यायची वेळ तरी आली नव्हती. (आता हे वाक्य लिहिताना जाणवतंय की ४ आणि ७ वर्षाच्या मुलांसाठी तेच एक मोठठं काम आहे आणि आई-वडील म्हणून कदाचित थोडं जास्त श्रेय त्यांना आम्ही दिलं पाहिजे. असो. ) अजून दोन महिन्यांनी शाळा सुरु होत असल्याने नव्या खरेदीची तयारी सुरु झाली होती. यात स्वनिक डे-केअर मधून शाळेत जाणार असल्याने त्याच्यासाठी अजून उत्साहाची गोष्ट.  

     तर झालं असं, दुकानात त्याच्यासाठी शूज बघताना त्याला 'स्पायडरमॅन' चे रंगीत लाईट लागणारे शूज दिसले. निदान मला तरी ते बटबटीत वाटले. आणि आता त्याच्या साईजमध्येही असेही लाईट असलेले शूज मिळणं अवघड होत होतं. म्हणून मी नाईलाजाने त्याला म्हटलं"बाबू तुला आता शाळेत घालायचे आहेत ना हे शूज मग कशाला लाईटचे बघतोस? तू आता बिग बॉय झाला ना?"

त्याने पटकन मान हलवली आणि माझ्या हातात असलेले थोडे मोठ्या मुलांसारखे वाटणारे शूज पायात घालून बघायला तो लगेच तयार झाला. तो ते घालून बघत असतानाच मला त्याच्या आकाराचे लाईटचे शूज दिसले आणि मी आनंदाने त्याला ते दाखवले. पण ते नाकारून लाईट नसलेले शूज त्याने घेतले होते. 

त्या एका क्षणात त्याचं मन पक्कं झालं होतं. आणि आई म्हणून मला मात्र अतिशय वाईट वाटलं होतं. 'तू बिग बॉय आहेस ना?' , 'तू मोठी झाली ना आता?' या अशा वाक्यांनी किती मोठी जबाबदारी आपण त्यांच्यावर देतो याचं वाईट वाटलं आणि त्या एका क्षणात मोठ्या झालेल्या आमच्या बाळाचंही. दुसऱ्या दिवशी  सकाळी उठल्या क्षणी तेच  शूज घालून तो घरभर नाचला तेंव्हा थोडं बरं वाटलं. पण तो एक क्षण येऊन गेला होता आणि आमचे 'लाईटचे शूज' कायमचे निघून गेले होते. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: