दोन हातात पाच पाच किलोच्या कापडी पिशव्या धरून माय खोलीवर आली. तिच्या हाताच्या गट्ट्यानाही गट्टे पडले असतील. मालकीणबाईंच्या घरातून रेशनिंगचे तांदूळ, ज्वारी, डालडा घेऊन यायचं म्हणजे लै वैताग यायचा तिला. एकतर दरासाठी घासाघीस. मग वजनात काटछाट आणि हे सगळं कमी का काय म्हणून त्यांच्या बागेतलं गवतबी काढायला लागायचं. घरी येऊन भाकरी करंस्तोवर जीव घाईला यायचा. पोराला पन आवडायचं नाय तिनं त्यांच्याकडनं आणलेलं. "घरची ज्वारी असताना त्याला काय सोनं लागलंय का?" तो तिला विचारायचा. घरची ज्वारी न्हाई म्हटलं तर चार पैसं जास्त द्यायची. राशनची कदी खडा कुडा असला तर काढून साफ करून घ्यायची पन दर तरी कमी असायचा. 'तेव्हढंच चार पैसं जमत्यात, तुला नाय कळायचं', तिने अनेकदा पोराला समजावलं होतं.
खोलीत आली तर अंधारबुडुख सगळा. पक्या अजुनपन आला नव्हता. 'मुर्दा बसवला त्याचा, नुस्ता गावभर बोंबलत फिराय पायजे' मनातल्या मनात त्याला एक शिवी दिवून तिनं दिवाबत्ती केली. देवाजवळ हात जोडलं आन कामाला लागली. स्टो पेटवला तर नीट लागंना, शेवटी पिन मारून जरा घाण काढली आन मग कसा विस्तू पेटला. डब्याच्या तळाशी असलेलं ज्वारीचं पीठ परातीत घिऊन मळून त्राग्यानं दोन चार भाकरी थापल्या. 'आला की लगी जेवाय मागंल आन जनावर गत गपागप खयील' तिच्या डोक्यातला राग वाढतच होता. आजून जरा उशीर झाला तर त्याला भाकरीच्या जागी तिचं पायतानच खायला लागनार हुतं. त्याच्या नशिबानं तो टपकला. धाडकन दार उघडून डायरेक ताट घिऊन जेवाय बसला. समोरच्या पातिल्यातली आमटी वाटीत घेतली आन भाकरी मोडून सुरुवात केली. माय त्याच्याकडं बघतच बसली. त्याच्या काटकुळ्या बारीक अंगावर मांस कधी चढायचं? केसं तर कोंबडीच्या खुराड्यागत झाली होती. आला तसा दहा मिन्टात तीन भाकरीचा त्यानं फडशा पाडला.
"जरा दमानं खा की. कुत्रं मागं लागल्यागत का खायल्यास?", त्याची भूकभागल्यावर तिनं रागानं विचारलं.
"मला रातच्या पिच्छरला जायचंय पोरं वाट बघायलीत." त्याने ताट तसंच टाकलं. मोरीत हातावर उगा पानी घेतल्यासारखं केलं आन पायतान घालून निघायला लागला. आता मात्र मायेचा पारा चढलाच. भाकऱ्या सोडून तशीच उठली आन त्याला शर्टाला धरून तसाच आत खेचला. माय इतक्या रागात आल्यावर आपलं काय खरं नाय हे त्याला बी ठाव होतं.
"अगं असं काय करायलीस? ९ चा शो हाय. स्टार्टींन बुडल माजी.", पक्या बोलला तशी खाडकन त्याच्या गालावर एक बसली.
"मी हितं जीव घायकुतीला इस्तवर काम कर्तो आन तू पिक्चर बघ मेल्या. कितींदा म्हनलं कामावर ये, नायतर शेतावर बघ, तुला काय पन करायला नकु. आन वर पिच्छर्ला पैसं कोन देतंय तुज्या?"
"अमल्या देतुया तुला नाय मागनार" तो वैतागून बोलला.
त्याच्या शर्टावरचा हात अजून तसाच होता तितक्यात बाहेरनं शिट्टी ऐकू आली. तसं त्याला राहवना.
"आजचा दिवस जातो. परत काय म्हनशील ते कर्तो." त्यानं विनवणी केली. पन आज माय लैच चिडली हुती.
"तुला शिकायला पाठवला तर नुसतं दिवसभर हुंदडत असतुस. त्या पुस्तकाच्या पैशापारी लोकांची कामं करायला लागत्यात मला पन तुला त्याचं काय बी पडलं नाय." तिच्या शब्दाचा मार चालूच होता. तिकडं अजून एक शिट्टी आली आन त्यानं मान सोडवून घेतली आणि धावत सुटला. रागानं माय थरथरली.
"तू घरी कसा येतुस बगतो", जोरात वराडली.
तिला रागानं उभं राहवना मग मट्कन बसली बराच येळ डोक्याला हात धरून. समोर भाकरी आमटी पडलेली पन भूक बी गायब झाली. तसंच तांब्याभर पानी पिऊन ती लवंडली. रात्री कधीतरी पक्या हळूच दार उघडून आत आला. तिला कांबरून घातलं आन तिच्याशेजारी झोपून गेला.
सकाळी मायला जागा आली तर पक्या उठून चार घागरी पाणी आणून बादल्या भरून ठेवत हुता. त्यानं स्टो पेटवून तिच्यासाठी पानी गरम केलं, अंघोळबी झालेली. तिला काय कळंना हे काय चाललंय.
ती उठून बसलेली दिसली तसा पक्या तिच्याशेजारी बसला म्हनला,"माये चुकलं माझां काळ रातच्याला. उगा तुला तरास दिला परत असं नाय करनार, तुजी शप्पत.".
तीबी सकाळी कशाला उगा चिडायचं म्हनून गप बसली.
"बर जाऊ दे" म्हनाली.
तिनं चूळ भरून चा ठेवला. त्यानं बशीतनं चहा सुरुक्कन वडला. तिच्याकडं बघत हळूच म्हनला,"माय मला एक मोबाइल पायजे."
"काय?" तिनं तसा मोबाईल पायला हुता पन हे काय आपल्यासारक्याचं काम नाय हे तिला पुरतं ठावं होतं.
"ही असली थेरं कराय पैका कुटून आननार?" तिनं विचारलं.
बोलू का नको करत त्यानं कोपऱ्यातल्या ज्वारीकडं बोट दाखवलं. तिनं डोक्यावर हात मारून घेतला.
"काय करावं रं देवा तुजं? माज्याच नशिबाला असलं पोर का घातलास?", तिनं देवाला दोश लावला.
"समद्या पोरांकडं हाय मोबाइल. मी तरी किती कळ काडू?" त्याचा चेहरा बोराएवढा झाला.
"आरं कधी कामाला लागलं म्हनून ठेवल्या ती पोती. उद्या दुसरं काय हाय आपल्याकडं? रोजचा भाजीपाला विकून दिवस कसाबसा काढतूय. तुजा तर कशाला हात नाय. त्या एवढ्या तुकड्यात काय काय करनार मी एकटी?"
"मी कर्तू मदत तुला. बास मला फकस्त मोबाईल घेऊन दे."
तो ऐकना मग ती म्हनाली,"मलाच वीक आता."
"मी म्हनलं ना मी करतो मदत तुला.", त्यानं विनवलं.
"एक काम कर तूच जा मार्केटयार्डात पोती घिऊन, काय मिळालं ते घे त्याचं काय करायचं ते कर. परत माज्याकडं यीऊ नगंस." ती दमली व्हती.
"मी करतो समदं तू चिंता नकु करुस", पक्या.
"जा निघ घरातनं", ती वराडली.
पक्या एकदम उडी मारून उठला. सायकलवर टांग मारून मित्राकडं गेला. माय कामाव निघताना तिला पक्या आन अमल्या पोती त्याच्या गाडीवर बाजूला लावताना दिसलं.
"काय करू रं या पोराचं?" तिनं परत पांडुरंगाला विचारलं.
पक्यानं ती पोती कशीतरी गाडीवरनं मार्केट यार्डात नेली. तिथं ही गर्दी उसळलेली. लोकं नुसती आरडत-वरडत हुती. त्यानं एकाला विचारलं,"ज्वारी हाय?"
"मग?"
"कुठं विकायची?"
"किती टन हाय?", त्यानं विचारलं.
"नाय ठावं."
"मग आदी वजन करून आना."
"वजन कुठं करायचं?"
"आरं काय डोसकं फिरवायलायस सकाळ सकाळी. जा बरं हितनं."
मग पक्या मार्केटयार्डभर फिरला. एकानं सांगितलं म्हनून गेला तर भली मोठी रांग लागलेली. दोनच वजनकाटे आनी इतकी मानसं. तरी तसाच भर उन्हात उभा राह्यला पक्या. अमल्या तर वैतागला व्हता. आजून किती येळ लागनार रं" विचारून पक्याला जीव नकुसा करून टाकला त्यानं. कसाबसा नंबर लागला त्याचा. अडीच एक पोती भरली सगळी ज्वारी. त्याचा चेहरा पार सुकून गेला हुता.
"तिकडं रेट लावलेत बघा जा", म्हनून मागच्या माणसानं त्याला सांगितलं.
धावत धावत दर पायला पन हिशोब कुटला येतोय त्याला? पयल्या वर्षी मायकडून ते कॅल्सी-पाल्सी ला पैशे घेतले आन उडवले पन. त्यात इतका मोटा हिशोब त्यानं जल्मात केला नव्हता. २५० किलो ज्वारी २५ च्या दरानं किती पैशे मिळतील असं लैच डोकं खाजवलं. अमल्यानं तर आधीच माघार घेतली. परत शोधत त्यानं ते गणित करायचं मशीन आनलं. इतक्या वर्षात आज त्याला त्याचा वापर काय असतो ते कळलं होतं.
"सा-साडेसा हजार येतील म्हनत्यात.", पक्यानं अमल्याला सांगितलं. अमल्याला काय पन पडली नव्हती. पन इतक्या पैशात साधाच फोन येनार त्ये त्याला पक्कं मायती हुतं. तो बोलला तसा पक्याचा चेहरा आजून पडला. शेजारीच उभ्या असलेल्या एका शेतकऱ्यानं त्यांना सांगितलं,"शेरात जावा दर जास्ती यील. दीडपट तरी मिळलं. मला नाय जमत इतक्या लांब जायला. तुमी पोरं हाय जाऊन या की."
पक्याला ते लगेच पटलं. आता ही बोचकी न्यायची कशी? दोघांनी परत तीन फेऱ्या मारून स्टँडवर पोती नेली. अमल्याला काय पुढं जमत नव्हतं मग त्यानं मंग्याला फोन केला. बस आली तशी मंग्या आन पक्यानं एकेक करून पोती टपावर चढवली आन गाडी निघाली. अमल्या तिथंच थांबला आन पक्या नव्या मित्राला घिऊन पुढं निगाला हुता.
क्रमश:
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment