कधी कधी आम्ही जरा जास्तच वाहवत जातो आणि एखादया विकेंडला ढिगाने कामं किंवा कार्यक्रम येऊन पडतात. शेवटी स्वतःवरच चिडचिड होते की आपण नीट विचार का करत नाही. अर्थात आधीच ठरवल्यामुळे नाही तर म्हणता येत नाही कशालाच. यावेळीही असेच झाले. मुलांचा पोहण्याचा क्लास होता. त्यात शनिवार रविवार त्यांचा आईस स्केटिंग चा शो होता. गेले १० आठवडे ते सराव करत होते. एकदाचा शो संपला की त्यांचा सरावही संपला. त्यामुळे तो शो नीट व्हावा इतकाच विचार मनात होता. हे सगळं आधी ठरलेलं. मग स्वनिकच्या एका मित्राबरोबर प्ले-डेट ठरली. (प्ले डेट म्हणे, आम्हाला इथे 'डेट' वर जायला सुद्धा जमेना का? ) जाऊ दे. त्यात नुकतेच मुलांच्या शाळेत एक ५किमी रेस होणार आहे कळले होते. त्यातही भाग घेतलेला. एकूण काय तर नुसता सावळा गोंधळ.
तर या सगळ्यात दोन दिवस बरेच धावपळीचे गेले. खरंतर प्रत्येक गोष्ट ठीकच झाली. मुलांचे कार्यक्रम, त्याच्या मित्राची भेट, पण सगळ्यात अविस्मरणीय ठरली ती ५किमी ची रेस. सकाळी शाळेत गेलो, तिथे सुरुवातीला मुलांना थोडेसे पळायला दिले होते प्रोत्साहनपर मेडल्सही मिळाली त्यांनी. पुढे आमची रेस सूरु झाली. मैत्रिणीसोबत पळून अगदी निवांत पूर्णही झाली. बक्षिसे वाटताना महिलांमध्ये तिसरे पारितोषिक जिला मिळाले तिला पाहिले आणि माझी उत्सुकता जागी झाली. कारण ती स्त्री बरीच वयस्कर दिसत होती.
मी पुढे होऊन त्यांना 'अभिनंदन' बोलले आणि विचारले तुम्हाला किती वेळ लागला ती पूर्ण करायला.त्यांनी सांगितले २२ मिनिटं. बाप रे ! मला नेहमी वाटते की संदीप बराच जोरात पळतो. साधारण ५ मिनिटांत त्याचे एक किमी अंतर होते. पण त्या आजी २२ मिनिटांत पळाल्या. आणि त्यांचं वय? ६५ वर्षं !!! मला आजही ३८ मिनिट लागले. मी तर ४०-४५ वर्षांनंतर पळेन की नाही अशी मला शंका वाटते आणि त्या इतक्या जोरात ५ किमी अंतर पळून आल्या होत्या. त्यांनि सांगितले की त्यांच्याकडे ना फोन आहे ना अंतर किंवा वेळ किती झाला हे पाहण्यासाठी घड्याळ. म्हणजे केवळ वेळ झाली की पळत सुटायचे. त्यांना विचारून फोटो काढला तर तोही इमेल कर म्हणाल्या. कारण त्यांचे फेसबुक अकाऊंटही नाहीये.
त्यांच्याशी बोलून आपण जे काही करतोय ते किती सामान्य आहे असं वाटलं. आधी त्यांनी आपला स्पीड कसा वाढवायचा यावर टिप्स दिल्या. मग हेही बोलल्या की आता त्यांच्या वयोगटात जास्त लोक नसतात त्यामुळे बरेचदा अगदी हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच लोक पळताना दिसतात. तेव्हा थोडंसं वाईटही वाटलं. दुपारी संदीपही जेव्हा पळताना कसा दम लागला सांगत होता तेंव्हा त्याला म्हटलं, जोपर्यंत आता तुझा टायमिंग २२ होत नाही तोवर सांगू नकोस. :) जोक्स अपार्ट, मला असं वाटतं की आपण कितीतरी कारणं सांगून साधा किंवा थोडासाही व्यायाम करायचं टाळतो. पण या अशा व्यक्ती पाहिल्या की वाटतं आयुष्यात अजून कितीतरी काय काय करायचं आहे. So no more excuses. :)
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment