Tuesday, September 04, 2018

Daemon process (डिमन प्रोसेस)

प्रिय तुला, 
     आमच्या कंप्युटर इंजिनीयरिंगमध्ये दोन प्रकारची देवाण घेवाण चालते बघ. म्हणजे दोन प्रकारच्या processes असतात communication साठी, संवादासाठी. एक synchronous आणि दुसरी asynchronous. पहिल्या पद्धतीत दोन लोकांमध्ये संवाद हवा असेल तर, एक जण सांगतो, ते दुसऱ्याला लगेच ऐकू येतं. आणि तो दुसराही उत्तर देऊन लगेच confirmation देऊन टाकतो, पहिल्याचा मेसेज मिळाल्याचं. तर ही synchronous process म्हटलं की दोन लोकांचा सततचा सहभाग आलाच. 
     आता ही दुसरी asynchronous process म्हणजे काय? तर यात दोघे एकमेकांसमोर नाहीत एकावेळी. मग पहिला एका पत्त्यावर मेसेज करून ठेवणार. दुसरा जेव्हा केव्हा त्या पत्त्यावर येईल तेंव्हा त्याला तो मेसेज मिळेल. आता मेसेज मिळाल्यावर दुसराही त्याचं उत्तर पहिल्याच्या पत्त्यावर पाठवू शकतो. एकूण काय तर टपालासारखं एकमेकांच्या अनुपस्थितीत केलेला संवाद. पण दुसऱ्यानं मेसेज मिळाल्याचं कळवलंच  नाही तर? तुटला ना संवाद? 
      आता हे वरचे दोन्ही प्रकार झाले दोन व्यक्तींनी सहभाग घेण्याचे. तर networking मध्ये ना अजून एक process असते, तिचं नाव daemon process, डिमन प्रोसेस. या प्रोसेसचं काम काय? तर एका दिलेल्या पत्त्यावर दर ठराविक वेळानं तपासत राहायचं काही निरोप आहे का? तो पत्ता म्हणजे 'port'. ती process आपली दर थोड्या वेळाने चेक करत राहते त्या port वर. मग जे काही येईल त्या port वर ते पुढं पाठवायचं किंवा समजून घ्यायचं. 
      कंटाळलास? मी तुला का सांगतेय हे सर्व? बरोबर ना? कोण कुठली daemon process? का सांगतेय माहितेय? मी ती daemon process आहे. दर क्षणाला तुझा काही निरोप येतो का पाहणारी, तुला माझी आठवण येते का तपासणारी. आधी आपला संवाद synchronous होता, समोरासमोर बोलणारा, उत्तर देणारा. मग तो asynchronous झाला, ज्यात आपण एकाच वेळेला एका भावनिक पातळीवर कधीच नव्हतो. फक्त निरोप ठेवून जायचो एकमेकांसाठी, कधीतरी वाचण्यासाठी. 
      आता फक्त एकेरी संवाद (?) उरलाय. तू कधीतरी बोलशील आणि मी त्या daemon process सारखं लगेच ऐकून घेईन, process करेन, समजून घेईन याची वाट पाहतेय. भीती कशाची आहे माहितेय का? ती daemon process बंद पडली, तो listening port बिघडला आणि तुझ्याकडून निरोप आला तर? 

तुझीच, 
Daemon process
०४/०९/२०१८

No comments: