Tuesday, September 25, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १

रस्त्यावरुन जोरजोरात ट्रकच्या हॉर्नचा आवाज येत राहिला.......कितीतरी वेळ झाला तरी बंद होईना. ट्रकवालाही कुठल्या तरी गाण्याच्या ट्यूनचा सराव करत असल्यासारखा हॉर्नवरचा हात क्षणभरही न काढता वाजवत चालला होता.  संत्याचं डोकं उठलं आवाजानं. एकतर उन्हं वर आल्यानं जीव कासावीस होत होता. त्यात सगळे आवाज त्याला उठवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. हॉर्नचा आवाज दूरवर जाऊ लागला तसा कमी झाला. संत्यानं कूस बदलून अंगावरचं पांघरुण झटकून जरा अंग पसरुन झोपायचा प्रयत्न केला. फेब्रुवारी लागला तसा उन्हाची झळ वाढली होती. पुन्हा झोप लागणार इतक्यात पांघरुणात कुठेतरी फोन थरथरला. तो मोबाईल शोधून कुणाचा मेसेज आहे हे बघेपर्यंत संत्याची झोपमोड झाली.
      संत्या वैतागून उठून बसला आणि फोनवर पाहिलं तर १२-१४ मेसेज येऊन गेले होते. स्वतःवरच चिडत त्याने मेसेज वाचले. मेसेज कुणाचे होते ते सांगायला नकोच होतं. तो भिंतीवरच्या घड्याळात बघून पुन्हा गप्प बसून राहिला. अंग घामानं भिजलेलं होतं, अंगातला बनियन अर्धं ओला झालेला होता. त्याने चिडून तो काढून टाकला. पुन्हा एकदा मेसेज वाचले आणि पुन्हा खाटेवर पडून, डोळे उघडे ठेवून छताकडे बघत राहिला. नजर फिरली तशी कोपऱ्यात कोळ्याची जाळी दिसत होती. त्याच्या खोलीतल्या खुंटीवर पॅन्ट आणि शर्ट एकावर एक असे अडकवून ठेवलेले, कुठल्याही क्षणी पडणार होते. एका खोबणीत वह्या पुस्तकं एकावर एक पडून होती. कित्येक वर्षं हात न लावल्यासारखी. शेजारीच जुनं टेबल होतं. त्याच्यावर पप्पांच्या कामाची कागदं ढिग लावून ठेवलेली होती. शेजारीच मोठमोठे बॅनरचे रोल पडले होते.  माजघरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गाणी ऐकू येत होती.
'पप्पा गेलं असतील बाहेर आता' विचार करत संत्या नाईलाजाने खाटेवरुन उठला. तो ओला बनियन पुन्हा अंगात घालायची त्याला इच्छा झाली नाही. खुंटीवरचा एक टी-शर्ट त्याने अंगावर घातला. खाली पडलेले दोन शर्ट त्याने मिळेल त्या खुंटीवर टांगले आणि चिडूनच खोलीतनं बाहेर पडला.
"किती वर्षं अशा खुंट्या वापरायच्या? घरात नवीन कपाटं करुन घेऊया की?", असं त्यानं पप्पाना हजार वेळा सांगितलं असेल.
"तुझं एकदाचं लग्न झालं की तुझी बायको म्हनल तसं करु, चालंल?", पप्पांनी हेच उत्तर त्याला हजारवेळा दिलं होतं.
संत्या उठून तडक घराच्या मागच्या संडासात गेला.
आत बसून त्यानं मेसेज वाचायला सुरुवात केली.
"संत्या कुटं हायस?"
"कॉल कर"
"फोन उचल"
"कुठं उलथलास?"
"जिमला ये"
"लवकर ये"
"मर तिकडं"
"आमी घरी चाललो"
हे आणि बाकी शिव्यांचे अनेक मेसेज येऊन गेले होते.
विक्या आणि अम्या संत्याच्या नादात 'अर्नोल्ड जिम' ला पहाटे पहाटे जाऊन आले होते.
--------
गेल्या दोन महिन्यांपासून 'अक्षय कुमार' सारखी बॉडी बिल्डिंग करायची असं ठरलं होतं.
"हे बघा मी सांगतोय, अक्षयच बेश्ट आहे. ", संत्या.
"का बरं? सलमान काय वाईट हाय?", अम्यानं सलमानची बाजू घेतली.
"आर तो अक्षय बघ एकदम निर्व्यसनी हाय आन एकदम सकाळ सकाळ उठून व्यायाम करतोय, नुसतं तेच नाय रात्री पन लवकर झोपाय जातोय.", संत्यानं सगळी माहिती काढून घेतली होती.
"हे बघ नुसतं व्यायामानं काय होत नाय, रोज अंडी, मटन खाल्लं पायजे. ते मोडाची धान्यं खाल्ली पायजेल.", विक्यानं महत्वाची माहिती दिली होती.
"होय बास उद्यापासनं त्या अर्नोल्ड वाल्याकडं जाऊया बघ. तू रात्रीच मोड यायला मूग-मटकी भिजवाय सांग आईला. ", अम्यानं निर्णय घेतला.
"आरं पर ते मोड यायला दोन दिवस लागत्यात.",विक्या.
"बरं मग पर्वा जाऊया.", संत्यानं फिक्स केलं.
"चला उद्याच पैसं भरुन घेऊ आन काय काय पायजे जिमला ते इचारून घेऊ.", अम्या बोलला.
सगळ्यांनी मान हलवली.
--------
हो नाही करत दोन महिन्यांनी आज मुहूर्त लागला होता सगळं जुळून यायला तर संत्यानं घोळ घातला. पहिल्याच दिवशी विक्या आन अम्याला चांगला कुथवून घेतला होता आणि संत्या मात्र दहापर्यंत झोपा काढून निवांत होता. भेटल्यावर 'लई शिव्या बसणार' हे त्याला पक्कं माहित होतं.
संत्या कुठल्याच मेसेजला उत्तर न देता, संडासातनं बाहेर आला. ब्रश करत, मागच्या अंगणात फिरला. गुलाब, कढीपत्ता, चिंच, मोगरा सगळी झाडं त्यानं स्वतः तपासून घेतली. एखादं सुकलेलं पान डाव्या हातानं तोडत ब्रश करत राहिला. मागच्याच दारातल्या बंबातून उरलेलं पाणी काढून घेतलं. खाली जमलेली राख काढूनकोपऱ्यातल्या खड्ड्यात टाकली. पाणी कोमटच होतं. पण असंही उन्हानं गरम पाणी अंगावर टाकवत नव्हतं. नळाचं पाणी गेलेलं होतं. त्यानं मोटार सुरु करुन विहिरीचं पाणी टाकीत सोडलं. गार पाणी बादलीत पडायला लागल्यावर त्याला जरा बरं वाटलं. अंघोळीला सुरुवात करणार इतक्यात आतून काकीचा आवाज आला,"मोटार बंद कर रं".
त्याने घाईने जाऊन मोटार बंद केली. पाणी अंगावरून घेतलं आणि टॉवेल गुंडाळून घरात आला.
"संत्या जा आवर पटकन, त्या मालीच्या घरी बघून ये. सकाळी लवकर ये म्हटलेलं तिला तर अजून आली नाही. भांड्याचा ढीग पडलाय.", काकींनं त्याला हलवला.
संत्याचं तोंड वाकडं झालं. आठवड्यातनं एकदा तरी त्याला हे काम करायला लागायचं. माली आली नाही तर काकीचं काम अडूनच असायचं. ती पण काय ऐकणारी नव्हती. जमलं तसं यायची. कधी यांचं पहिलं काम कर कधी दुसऱ्याचं. काही वेळ काळ नव्हतंच. तिला कधीतरी गाडीवरुन आणायला पण सांगायची काकी, अगदीच अडलं तर. संत्यानं समोर ठेवलेला चहा-खारी खाल्लं.
ते खाताना काकी म्हणालीच,"आरं तुझं ते मोड आल्यात".
'सकाळी मोड खायचे सोडून चहा खरी खाल्ली हे विक्याला समजलं तर ?', संत्या त्याचं तोंड आठवून हसला. तिकडं काकी परत ओरडायला लागली. संत्या उठला, गाडीला किक मारली इतक्यात काकीने हाक मारली, "येताना २०० ग्रॅम जिरे घेऊन ये रे".
संत्या अजून चिडला. ही असली बारीक सारीक सामान आणायची कामं म्हणजे डोक्याला ताप होता. एकतर त्याला सगळी माहिती नसायची, मग चुकीची वस्तू, खराब झालेली किंवा कधी कमी तर कधी जास्त आणली जायची. मग काकीच्या शिव्या, परत बदलून आणा, नसते उद्योग. संत्या चिडूनच निघाला.
बाहेर पडल्यावर त्याला जाणवलं दिवस किती उजाडलाय. सगळी माणसं कामाला लागली तरी
संत्याचा दिवस आता सुरु झाला होता. त्यानं मालीच्या घराजवळ गाडी थांबवली, बाहेरुनच 'मालीआत्या' म्हणून हाक मारली. माली बाहेर आली म्हणाली, "येतच हुते, थांब मला घरी सोडूनच जा" म्हणून पटकन गाडीवरच बसली.
संत्या अजूनच चिडला. त्याने गाडी जोरात दामटली. रस्त्यात गाडी थांबवून दुकानांत गेला.
"२०० ग्रॅम जिरे द्या", त्याने शेटला सांगितलं.
त्याने वजन करुन बांधून दिले. पुडी मालीआत्याच्या हातात देऊन तो घरी पोचला. दारातूनच तिला उतरवलं आणि गाडी परतवली.
संत्याचा दिवस सुरु झाला होता.
------------
जन्मापासून आज २४ वर्षाचा झाला तरी संत्या सुधारला नव्हता. आणि सुधारेल अशी अपेक्षाही काकीनं सोडली होती. शाळा उनाडक्या करण्यात गेली, कसाबसा पास होत कॉलेजला जायला लागला. सातारला बीएला ऍडमिशन घेतली होती त्याने, कधीतरी ६-७ वर्षांपूर्वी. किती वर्षात पास व्हायचं असं काही त्याने ठरवलेलं नसल्याने त्याचं आरामात चाललेलं होतं. घरचं सगळं पप्पा बघतच होते. पैशाला कमी नव्हतीच. घरची शेती, जुनं का होईना मोठालं घर, पप्पांनी मिळवलेली सत्ता आणि टेम्पो ट्रॅक्सचा बिझनेस सर्व काही त्याच्या पथ्या वरच पडलं होतं. आयुष्यात कष्ट आणि दुःखं म्हणजे काय हे त्याला माहीतच नव्हतं.
       रोज उठून नवे शौक आणणे आणि त्यावर पैसे आणि वेळ खर्च करणे हा त्याचा साईड बिझनेस होता. संत्या बारीक उंच सडसडीत होता. त्याच्या वयाच्या सगळ्या पोरांसारखंच आपणही आता बॉडी बिल्डिंग करायचं हे त्याच्या डोक्यातलं नवं खूळ होतं. घरात सामान आणि माली पोहचल्यावर तो तडक अड्ड्यावर गेला होता. स्टॅन्डवरच्या त्याच्या एका मित्राच्या दुकानाच्या बाहेर विक्या आणि अम्या भेटणार हे त्याला माहित होतं. त्याने गाडी तिकडे घेतली. तो दिसला तसे कट्ट्यावरुन उठून अम्या जणू मारायलाच आला त्याला.
"अरे हो गाडी तरी लावू दे की", संत्या हसत म्हणाला.
"हे बघ पाय दुखतायत नाहीतर मी पण आलो असतो", विक्याने जमेल तितक्या रागाने सांगितलं. तसा संत्या अजूनच हसला. विक्याच्या आवाजात जितका दम होता तितका अंगात असता तर असा पाय धरुन बसला नसता. संत्या शेजारी बसला की लगेचच विक्यानं आपल्या बारकुट्या हातानं त्याच्या पाठीत जोरात बुक्का घातला.
"ओ पैलवान लागतंय आमाला" म्हणत संत्या खोटं विव्हळत हसला. अम्यानं मग खरंच त्याची मुंडी धरुन पाठीत जोरात धपाटा दिला.
"तुज्या मारी, इथं सकाळी सहा आमी दिवाळीला पन बघत नाय, त्यात ते आलेलं उसळी खाल्ल्या सकाळ सकाळी. केळी खाल्ली. तुला मायतेय काय किती वाट लागलीय त्ये? " अम्या चिडून बोलला.
"आरं हो की आता नाय जाग आली तर काय करु? उद्या येतो बस?", संत्यानं माफीच्या स्वरात सांगितलं.
"उद्या आम्ही कशाला जातोय? हा विक्या तर उद्या जगला तरी बास म्हनायचा." अम्या बोलला आणि गप्प बसला.
"आर असं सोडायचं नाय, जाऊयात उद्या, मी येतो नक्की.", म्हणत संत्या कट्ट्यावर स्थिरावला.
काही बोलणार इतक्यात त्याला समोरुन सपनी तिच्या मैत्रिणीसोबत जाताना दिसली आणि संत्या एकदम गप्प झाला. अम्या आणि विक्याही तोंड फिरवून गप्प बसले.
 सपनी संत्याचा 'मेन बिझनेस' होती. त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय आणि त्याचं प्रेम.

----------

क्रमशः

विद्या भुतकर.

No comments: