Thursday, September 27, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - २

      संत्याचं सपनीवर कधी प्रेम बसलं सांगणं तसं अवघडच आहे. कारण शाळेत त्याला 'S' काढायला यायला लागला तेंव्हापासून त्यानं प्रत्येक इयत्तेत वर्गातल्या त्याच्या बेंचवर तिचं आणि त्याच्या नावाचं 'SS' मोठ्या हार्टच्या मध्ये कोरलं होतं, मधून जाणाऱ्या तिरक्या बाणासहित. वर्गात कित्येक वेळा तिच्याकडे चोरुन बघण्याच्या नादात सरांनी -बाईंनी त्याला उठवलं होतं, वर्गात उभंही केलं होतं. जो काय अभ्यास त्याने आजवर केला होता तो केवळ सपनीच्या वर्गात जाण्यासाठीच. दहावी पर्यंत त्याला त्यात यश मिळालंही. पण अकरावीला तिने सायन्स घेतलं आणि त्याला आर्ट सोडून काही जमणार नाही असं त्याने ठरवून आर्टस् ला ऍडमिशन घेतली. तरीही एकाच कॉलेजात होते त्यामुळे निदान तिचं दर्शन तरी व्हायचं. तिला बघण्यासाठी तो न चुकता कॉलेजला जाऊन यायचा.

       बारावी नंतर सपना सातारला कॉलेजला जाणार असं त्याला कळलं तेव्हा संत्याला जाम टेन्शन आलं होतं. ती अशी गावातून बाहेर पडली तर आपल्याला कशी दिसणार या विचारांनी? दिवसभरात तिचं दर्शन झालं नाही तर त्याला चैन पडायची नाही. त्यानंही हट्ट करुन सातारला बीएला ऍडमिशन घेतली. तिथून मग दर्शन विरळ झालं पण निदान आठवड्यातून ४-५ वेळा तरी व्हायचं. तिच्या कॉलेजच्या कँटीनपासून प्रॅक्टिकलच्या लॅबपर्यंत  सर्व त्याला माहित होतं. तिचं वेळापत्रक त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच पाठ करुन ठेवलेलं असायचं. त्यात कुठेही खंड पडला नव्हता. जितका वेळ आणि शक्ती त्याने सपनीवर खर्च केले होते आजवर तितकंच स्वतःवर केलं असतं तर किती पुढे गेला असता तो. पण ते त्याला सांगणार कोण? शाळेपासून आजवर त्याचे मित्र असलेले विक्या आणि अम्याही त्याला समजवायचं सोडून त्याची मदतच करायचे.एकंब्याच्या त्या छोट्याशा गावात घर, मित्र आणि सपना इतकंच संत्याचं छोटंसं जग होतं.

       आज सपनीचा प्रॅक्टिकलचा दिवस होता. त्या जिमच्या नादात आपण हे विसरलोच कसं यावरुन संत्या स्वतःवरच चिडला होता. कट्ट्यावरुन तिला बघून संत्यानं पटकन कल्टी मारली, 'अम्या चल' म्हणाला आणि गाडी घेऊन स्टॅंडकडे जायला निघाला. अम्यानेही गाडीवर टांग मारली होती. अम्या, विक्याला कधी सांगायची गरज पडली नव्हती, संत्या 'चल' म्हणाला की चालायचं.

सपनी वैशू सोबत पाठीला सॅक घेऊन चालली होती. लवकरच त्यांना क्रॉस करुन संत्या पुढे निघून गेला. अर्थात गाडीच्या आरशात तिच्याकडे बघायचं मात्र तो विसरला नव्हता. सपनीचा चुडीदार, त्याच्या ओढण्या, त्यांच्यावर घातलेलं हूड असलेलं खिसेवालं मळखाऊ रंगाचं आणि तरीही मळलेलं जॅकेट आणि मागे लावलेली सॅक सगळं त्याला पाठच झालेलं. चेहऱ्यावर स्कार्फ बांधून, जॅकेटच्या खिशात हात घालून सपना पटापट पावलं टाकत स्टॅंडकडे जात होती. तिच्या आधी स्टॅण्डवर पोचल्याने संत्याला जरा बरं वाटलं.

       गावातून सकाळी दर अर्ध्या तासानं अशा चारच गाड्या सातारला जायच्या. त्या चुकल्या की एकच पर्याय तो म्हणजे 'संतोष ट्रान्स्पोर्ट'. संत्याचं फक्त नावच होतं त्यावर. बाकी कामंकामाला ठेवलेली पोरंच करायची. सपना पळत पळत स्टँडवर पोचली पण तिच्यासमोरुन बस निघून गेली होती. तिलाही माहित होतं आता ट्रॅक्स शिवाय पर्याय नाही. स्टँडच्या जवळच ट्रान्स्पोर्टच्या ४-५ ट्रॅक्स उभ्या होत्या. पोरं, 'सातारा...सातारा ... ' म्हणत वरडत होती. सपना, वैशू एकाजवळ आल्या, "कधी निघणार?".

पोरगा म्हणाला,"लगीचच, तुमी बसा की.".
सपना,"नुसतं म्हणता लगीच आणि तासभर लावता, मला क्लास आहे. ".
वैशू,"जरा चला ना लवकर, घाई आहे".
दोघी ट्रॅक्समध्ये बसल्या, अजून १५ लोक झाले तरी निघायचं नाव घेईना गाडी. सपनीचं लक्ष घड्याळाकडे लागून राहिलं होतं. त्यात उन्हानं जीव नकोसा झालेला. संत्या गाडी लावून बाजूलाच उभा होता. बाईकच्या आरशात ती दिसत होतीच.
त्याने पोराला झापला,"चल की रं, उगाच नाक्याव गाड्या आडवतात, एकादा पडला गाडीतनं खाली तर आपल्यावं यायचं. चल सुरु कर गाडी." असं म्हणत संत्या आणि अम्या पण गाडीत पुढच्या सीटवर बसूनच गेला.
आता मालकाचीच आज्ञा ती. पोरानं चटक्यात गाडी सुरु केली आणि वळवली तशी गाडीतली मंडळी पार आडवी-तिडवी झाली. स्वतःचा तोल आणि सॅक सांभाळत सपना बसून राहिली. गाडी रस्त्याला लागल्यावर जरा वारं अंगाला लागलं आणि सपनीला बरं वाटलं. तिनं सॅकमधून धडपडत पुस्तक बाहेर काढलं आणि वाचू लागली.
तशी वैशू बोलली,"अगं किती वाचणार, बास की आता.".

"काही आठवत नाहीये मला. एकतर उशिर झाला की टेन्शन येतंय. तू पण बघ", म्हणत सपनीनं पुस्तक थोडं वैशुकडं सरकवलं. मधेच काहीतरी आठवत सपनी तोंडातल्या तोंडात उत्तरं पुटपुटू लागली. ट्रक्सचा आरसा संत्याने पुन्हा ऍडजस्ट केला होता तिला बघण्यासाठी. "जरा शीडी लाव की" म्हणत संत्याने स्वतःच नव्या गाण्यांची सीडी सुरु केली. संत्याला गाण्यांची लै आवड. सगळी रोमँटिक आणि शाड सॉंग त्याच्यासाठीच लिहिलीत असं त्याला राहून राहून वाटायचं. गाण्यांसोबत गाडीनेही वेग धरला होता. गाडीचा स्पीड जास्त असला तरी दर ५-१० मिनिटांत लोक उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी तरी थांबतच होती. प्रत्येक वेळी गाडी थांबली की सपनीची चिडचिड वाढत होती. अर्ध्या तासाच्या रस्त्याला तासाभर लागला. गाडी सातारला पोहोचली. सपना, वैशू गाडीतून उतरुन पळतच सुटल्या, इतक्यात तिच्या लक्षात आलं गाडीचे पैसे द्यायचेच राहिलेत. ती पळत आली तर ते पोरगं दुसऱ्या बाजूने परतीची गर्दी भरत होतं. तिने संत्याच्या हातात पैसे कोंबले आणि परत पळत सुटली. संत्या पळत जाणाऱ्या सपनीकडे कितीतरी वेळ बघत राहिला. आता परत कधी दिसणार या विचारांत गुंगला होता.

        तिचं अभ्यासात असलेली एकाग्रता, अभ्यासासाठी, कॉलेजला जाण्यासाठी असलेली धडपड त्याने नेहमीच पाहिली होती. गावात असलेल्या अनेक मुलींच्यापेक्षा कितीतरी वेगळी वाटायची ती त्याला. तिला तसं पळत जाताना पाहून त्याला वाटलं, आपणही काहीतरी इतक्या पोटतिडकीने केलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे हे आजतागायत त्याला उमजलं नव्हतं. गाडी भरली होती आणि परतीच्या रस्त्याला लागलीही.  संत्या मात्र अम्याला घेऊन तिथेच थांबला होता.
--------------

         सपनीचं  प्रॅक्टिकल होणार, मग ती कॅंटीनमध्ये डबा खाणार, क्लासला जाणार आणि मग घरी. सर्व कसं ठरलेलं. अम्या आणि संत्या निवांत चालत कॉलेज कँटीनला पोचले. तिथं मुलांचा आणि मुलींचा सेक्शन वेगळा होता. ठराविक टेबलावरुनच पलीकडच्या भागातलं दिसायचं. संत्यानं 'दोन वडापाव, लिंबू सरबत' अशी ऑर्डर दिली आणि ठरलेल्या टेबलावर येऊन बसला.

वडापावचा पहिला घास खाल्ला की त्याचा डायलॉग ठरलेला,"भारी असतो रं इथला वडापाव."
"अन वहिनीसोबत बसून एकदा खायचाय, बरोबर ना? कितीदा सांगशील? ", अम्या बोलला.
संत्या हसला.
तासाभरात सपना डबा घेऊन कँटीनला आली. तिने 'दोन सरबत' मागवले आणि वैशूशी बोलत जेवण करत राहिली.
वैशू,"मी काय पुढे जात नाही याच्या बहुतेक. पुढच्या वर्षी उरकूनच टाकतील अप्पा लग्न.".
सपना,"का गं?".
वैशू,"असला टेस्ट पेपर आल्यावर काय होणार?"
सपना,"गप, असंच म्हनतीस आणि पास होतीस."
वैशू,"या पोरांना काम नसतं का गं? कधीपण पडीक असत्यात कँटीनला".
सपना,"जाऊ दे, तुला काय करायचंय? जेव क्लास सुरु होईल.".
वैशू,"त्यांचं बरंय, पैसा पाणी सगळं आयतं आहे, मग हे असले उद्योग करायचे".
सपना काहीच न बोलता जेवत राहिली. नको असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला ती शिकली होती. वेळ झाल्यावर उठून डबा बंद केला, सॅक घेऊन क्लासला गेली.
"आता अजून दोन तास काय करायचं?", अम्या कंटाळला होता.
तो आणि संत्या उठून मग ट्रॅक्सच्या कोपऱ्यावर गेला. शेवटी सपनाला घरी इथूनच जायचं होतं. संध्याकाळी कधीतरी सपना, वैशू स्टँडवर आल्या. त्या दिसल्या की संत्या सावध झाला. त्यांना बस मिळणार असे दिसल्यावर तो आणि अम्याही गाडीत चढून गेले. अम्याला एकतर जिममुळं अंग ठणकत होतं त्यात इतकी धावपळ. कधी घरी जाऊन पडतो असं त्याला झालं होतं.

           संध्याकाळी झालेली बस परतीच्या रस्त्याला लागलेली. पुन्हा तीच एसटी बस, तीच धावपळ, थकलेलं शरीर, मन. सपना खिडकीतून बाहेर बघत बसून राहिली. आजच्या पेपरचे विचार डोक्यात होतेच. घरी जाऊन उद्याचा अभ्यासही होताच. वैशूची झोप लागली होती. मागे कुठल्यातरी सीटवर संत्या आणि अम्याही होतेच. मधेच जोरात ब्रेक लागला तसं संत्याचं डोकं जोरात समोरच्या दांड्यावर आदळलं. डोकं चोळत संत्या परत पेंगू लागला.
त्याच्याकडे बघत अम्या बोलला,"दिवसभर नुसता हिंडत राहतोस तिला बघायला, इतकं दमून घरी जायची काय गरज हाय तुला? बघ की जरा स्वतःकड. "
संत्या हसला, "आता आईगत तू पण लेक्चर दिऊ नकोस. रात्री बसमधून कसली लोकं असत्यात तुला माहित नाही का? एकदा ती सुखरुप घरी पोचली की मी सुटलो बघ."
"असं किती दिवस रक्षण करणारंयस तिचं?". अम्या.
"आयुष्यभर !", म्हणत संत्याने डोळे पुन्हा मिटले.

गाडीतून उतरुन सपना, वैशू घरी पोचल्या. संत्या कट्ट्यावर सगळ्यांना तोंड दाखवून घरी पोचला होता. त्याचा दिवस संपला होता.

- क्रमशः

विद्या भुतकर. 

No comments: