Sunday, September 30, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ३

       सपना घरी पोहोचेपर्यंत अंधार झालेला असायचा. पोरगी एकदाची घरी पोचली की तिच्या आईचा जिवात जीव यायचा. सपना घरी येऊन फ्रेश होतच होती की सरांनी विचारलं,"कसा गेला पेपर?".
"चांगला गेला. टेस्ट पेपरच होता पण चांगला गेला.", सपना.
"ह्म्म्म गुड. यावेळी युनिव्हर्सिटी टॉपर पाहिजे बरं का?", सरांनी हजार वेळा बोललेलं वाक्य आज पुन्हा ऐकवलं. सपनाने मान डोलावली.
        सर म्हणजे अख्ख्या गावाचे ते 'सर' होते. गेली २० वर्षं त्यांनी एकंब्यात शिक्षक म्हणून काढली होती, आजही त्यांना शिक्षक म्हणून गावात मान होता. अगदी चार भिंतींच्या शाळेपासून पूर्ण अनुदानित शाळेपर्यंतचा शाळेचा प्रवास त्यांनी स्वतः पाहिलेला, अनुभवलेला होता. त्यातील प्रत्येक कार्यात त्यांनी जीव ओतून काम केलं होतं. शाळेत मुलांनी नीट शिकावं म्हणून जितके प्रयत्न ते करत तितकीच आपल्याही मुलीने मेडिकलला ऍडमिशन घ्यावी अशी सरांची खूप इच्छा होती. पण बारावीच्या मार्कांवर सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नसती आणि त्यांच्या शिक्षकाच्या पगारात तिची खाजगी कॉलेजची फी भागली नसती.
      खूप जड मनाने दुःखाने सरांनी तिला बीएस्सी, इम्मसी करायला सांगितलं. तिलाही परिस्थितीची कल्पना होतीच त्यामुळे 'आपल्याला जे मिळालंय ते एकदम बेस्ट करायचं' इतकंच तिने ठरवलं होतं. आणि 'पुढे पीएचडी केली तर 'डॉक्टरेट' मिळेलंच की?' असाही विचार तिने अनेकदा केला होता. सातारला एम्मेस्सी झाली की पुण्यात किंवा मुंबईला पुढचं शिक्षण करायचं तिने ठरवलं होतं. शिवाय एम्मेस्सी झाल्यावर प्रोफेसर म्हणून नोकरीही करता येणार होती तिला. आयुष्यात काय करु शकतो, काय केलं पाहिजे याचे सर्व आखाडे तिने मनात अनेकदा बांधले होते. पुढे जाण्याची ती योग्य वेळ येईपर्यंत या गावातून मात्र तिला जाता येणार नव्हतं.
      सरांची शाळा होती म्हणून केवळ ती तिथे राहत होती. नाहीतर सपनाला या गावाचा अतिशय वीट आला होता. आजूबाजूच्या लोकांचं वागणं, कोते विचार, आहे त्यातच समाधान मानण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संत्याच्या रुपाने रोज दिसणारी तिथली तरुण पिढी. सर्व नकोसं झालं होतं. रोज उठून एकेका क्लाससाठी बस, ट्रॅक्स मधून जायचं, दिवसभरात दमून परत येऊन अंग टेकेपर्यंत पुढचा दिवस यायचाच. त्यातून आजूबाजूला सतत जाणवणारं संत्याचं अस्तित्व. तो पुढे येऊन कधीच तिच्याशी एकादाही बोलला नव्हता. पण शाळेत, कॉलेजमध्ये तिने अनेकदा त्यांच्या नावाचं कोरलेलं 'SS' पाहिलं होतं. मुलांना ती बाजूने जाताना संत्याकडे बघून हसताना पाहिलं होतं. सगळ्याचा वैताग आला होता तिला. या सगळ्यातून कधी सुटका होईल याची ती वाटच बघत होती.
सरांचं आणि बाईंचं आयुष्य मात्र चाकोरीबद्ध. आता बाई म्हणजे केवळ 'सरांची बायको म्हणून सगळे त्यांनाही 'बाई' म्हणायचे. तशा १२वी पर्यंत शिकलेल्या त्याही पण पुढं नोकरी-बिकरी काय जमली नाही त्यांना. पोरीचं सगळं लक्ष देऊन करायच्या. तिला जमेल तशी मदत करायच्या. आई म्हणून रोजच्या तिच्या येण्याजाण्याची चिंता असायचीच तरीही तिला कॉलेजला जायला एकदम सपोर्ट द्यायच्या. तरीही एक गोष्ट मात्र त्यांना मनात खायची. गावातल्या अनेक पोरींची लग्नं लागली, त्यांना मुलं-बाळ झाली तरी आपली मुलगी अजून शिकतीच आहे. किती वर्षं असं चालणार? आता एम्मेस्सी झाली की तिचं उरकायचंच असा त्यांनी हट्टच धरला होता.
आजही सपनाचा पेपर होता म्हणून त्यांनी आधीच गरम गरम भाकऱ्या थापल्या, पिठलं केलं होतं. सपनीनं ताटं, तांबे घेतले. जेवायला बसल्यावर त्यांनी विचारलंच,"अजून किती पेपर राहिलं आता?".
सपनी," या आठवड्यात टेस्ट पेपर संपतील अन मग फायनल पुढच्या महिन्यात."
"चला, बरं झालं म्हणजे दोन महिन्यात सुटका होईल एकदाची. ", बाई म्हणाल्या.
"होय ना, कंटाळा आलाय नुसता उन्हाचा. जरा सुट्टी मिळाली म्हंजे आराम होईल.", सपना म्हणाली.
विचार करुन बाईंनीं हळूच सरांकडं विषय काढलाच,"ते शिंदे बाईंचा फोन आला होता आज."
"अच्छा काय म्हणत होत्या?", सरांनी विचारलं.
"काय म्हणणार चांगलं चाललंय त्यांचं. त्यांचा मुलगा मनोज बीएस्सी बी एड झालाय ना? तर म्हणत होत्या आता रहिमतपुरात नोकरीला हाय. शाळेला अनुदान मिळालंय नुकतंच.", बाईंनीं माहिती दिली.
"अस्स, बरं झालं म्हणजे बिचाऱ्याचा पगार पक्का.", सर म्हणाले.
"होय ना, त्यांना सारखी काळजी होती पोराची कधी शाळेला अनुदान मिळतंय याची. आता एकदम पगार येईल आणि सुरळीत पण लागलंच म्हणायचं.", बाई बोलल्या.
"हां करतो सरांना एकदा फोन. बरेच दिवस झालं बोलून", सर म्हणाले.
"हां तेच म्हणत होत्या बाई पण, त्यांच्या मनोजसाठी आपल्या सपनाला विचारात होत्या.", बाईंनी फायनल बोलूनच टाकलं.
सपना चिडणार, जेवण सोडून जाणार, भांडणार, अजून शिकायचं म्हणणार हे सर्व त्यांना माहित होतं. तरीही त्या बोलल्याच.
पण सर शांतपणे म्हणाले,"ह्म्म्म तसा चांगलंय पोरगा पण घाई काये? तिला शिकू देकी अजून. आपल्या घरात कुणी पीएचडी केली तर ती हीच करणार बघ.".
त्यांनीच आपली बाजू घेतल्यानं सपना शांत बसली.
"अवो पण ते पण शिकेलेलंच लोक आहेत, करू देतील की तिला पीएचडी. कोण नको म्हणणार हाय का?", बाई बोलल्या.
"हे बघ आई, मला उद्याचा अभ्यास हाय उगाच तू टेन्शन दिऊ नकोस.", असं म्हणत सपनानं ताट उचलून मोरीत टाकलं आणि निघून गेली.
"आता हे बघा, पोरीला अभ्यासात बाकी काही काम नको, नुसतं स्वतःचं ताट पण धूत नाय.", बाई वैतागल्या होत्या.
"असू दे की मग, तुला जमल का रोज असं बसमधून ये जा करायला? अभ्यास करायला? इतकी मेहनत करतेय पोर तर शिकू देकी.", सर म्हणाले.
"पण आता एवढं चांगलं स्थळ येतंय तर नको का म्हणायचं? परीक्षा संपत्तीय, लग्न करुन पुढच्या ऍडमिशनचं बोलताच यील की. त्यात त्यांच्या घरात सगळं शिकलेले लोक. कोण नायी कशाला म्हणल? ",बाई समजावत होत्या.
"बरं बघू तिची परीक्षा होऊ दे. मधेच ताप नको तिला.", सर म्हणाले.
"तिला काय करायचंय? आपण बोलून घेऊ की एकदा. तुम्ही सरांना फोन तर करा", बाई बोलल्या.
"बरं, करतो लवकरच", म्हणत सरांनी बोलणं थांबवलं.
सपना मात्र त्यांचं बोलणं ऐकून अजूनच नाराज झाली होती. तिला गावातून अजून दुसऱ्या तसल्याच गावात जायचं नव्हतं. तिला या छोट्या जगातून बाहेर पडायचं होतं. एकदा ती लग्नात अडकली की सगळं संपलंच ना?  तिचं अभ्यासातून मन उडूनच गेलं.
----------------------------
          तिकडे संत्याची संध्याकाळ निराळीच असायची. पुन्हा एकदा मित्रांचा अड्डा, गप्पा, खेचाखेची, चहापाणी सर्व करुन ९ पर्यंत तो घरी पोचायचा. घरी गेल्यावरचे पुढचे दोन तास मात्र त्याला नको व्हायचे. घरी जाऊन पप्पांचं लेक्चर ऐकायला लागणार यात शंकाच नव्हती. अनेकदा त्यांना टाळण्यासाठी तो अजूनच उशिरा यायचा. पण मग पप्पा पण अजून जागून अजून शिव्या द्यायचे. त्यामुळे उशीर करुन काही फायदा नाही हे त्याला कळलं होतं. संत्यानं दारात गाडी लावली. घराच्या शेडमधलं कव्हर आणून गाडीवर टाकलं, गाडीचं लॉक पुन्हा एकदा चेक केलं आणि घरात घुसला.
"सुटलं वाटतं कॉलेज?", घरात येताच प्रश्न कानावर पडला होता.
"होय", संत्या हळूच बोलला.
"उशीर झाला ते?"
"होय आज प्रॅक्टिकल हुतं", संत्या बोलला.

पाटीलच ते, इतक्या वर्षात पोरगं किती खरं किती खोटं बोलतं ते त्यांना चांगलं कळलं होतं. त्यांच्या घरात हे असलं बेशिस्त पोरगं आलंच कसं असा त्यांना प्रश्न पडायचा? आजोबांपासून गावाची पाटीलकी त्यांच्याकडं होती. जितका रुबाब तितकीच शिस्तही त्यांना होती. तीच शिस्त पाटलांनाही आली होती. अगदी घरात घालायच्या पायजम्यालाही नीळ-खोळ घालून, कडक इस्त्री केलेली असायची. सकाळी तासभर लवकर उठायला लागलं तरी चालेल पण दाढी केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नसत. सगळे कपडे कसे कपाटात नीट लावून ठेवलेले असत. कधी कार्यक्रम असला तर घालायचा सफारी, जॅकेट खास बॅगेत भरुन ठेवलेलं असायचं. कुठल्या वेळी काय घालायचं हे त्यांना अगदी बरोबर जमलं होतं.
       काकी मात्र एकदम उलट. माहेरची श्रीमंती म्हणून या घरात स्थळ मिळालं. घरी कधी काम करायची सवय नव्हती त्यामुळं इथं येऊन सगळं अंगावर पडल्यावर जडच गेलं त्यांना. कितीही गडी-माणूस घरात असला तरी लक्ष ठेवायला पण जमायला पायजे ना? त्यांच्याकडून थोडं इकडं-तिकडं झालं की पाटलांची चिडचिड नक्की. त्यात पोरगं हे असलं. किती शिकवण्या लावल्या, अभ्यास करुन घेतला पण त्याची लक्षण काही गुणाची नव्हतीच. मार खाऊन कोडगाच होत गेलेला अजून. अनेकदा त्यांनी नवऱ्याला विचारलंही होतं 'याचं बघा कायतर' म्हणून.
पाटील त्याच्यावर नजर ठेवून होते आणि बहुतेक योग्य संधीची वाटच बघत होते.
संत्यानं हात धुतले आणि जेवायला बसला. 
त्यानं भाकरी कालवण ताटात वाढून घेतलं आणि मुकाट्यानं खायला सुरुवात केली. 
पाच मिनिटांच्या शांततेनंतर पहिला प्रश्न आला,"कसं चाल्लंय कॉलेज?". 
"हां बराय", संत्यानं नेहमीचं उत्तर दिलं. 
"या वर्षी होनार का पास?", पाटील. 
"चालूय अभ्यास पण कठीण सिल्बस हाय", संत्या बोलला. 
"मग अजून किती वर्षांत हुईल?", पाटील. 
"तसं काय नाय, या वर्षी हुईलच की पास", संत्या हलकेच बोलला. 
"ते राऊ दे, जेवन झालं की तिकडं आतल्या खोलीत पोस्टरं पडलीत पार्टीची तेव्हडी बन्याकडे दिवून ये", पाटीलांनी फर्मान सोडलं. 
इतक्या लवकर सुटलो म्हणून संत्यापण खूष झाला.  
ताटावरुन उटणारच इतक्यात पुढचं वाक्य आलं,"उद्या सकाळच्याला काम हाय, लौकर तयार ऱ्हावा."
"सकाळी? कसलं काम?", संत्यानं विचारलं. 
"सांगितलं ना जायचंय, नवाच्या आत तयार पायजे, आन हे असलं कापडं नकोत.", त्याच्या अवतार निरखत पाटील बोललं. 
"न्हाई त्ये जिमला जातोय ना सकाळी, चांगलं दोन तास जातो रोज", संत्यानं अजून एक ठोकली. 
"दिसतीय किती कसरत चाल्लीय, मुकाट तयार ऱ्हावा, कळलं?", पाटलांनी मान हालवून विचारलं. 
संत्या फक्त मानेनं उत्तर दिऊन उठला. यापुढं नाही म्हणायची त्यांची हिम्मत नव्हती. 
जेवण उरकून त्याच्या खोलीतली पोस्टरची गुंडाळी उचलली आणि बंद करुन ठेवलेली गाडी पुन्हा फटफटली. 
निदान बाहेर तरी पडायला मिळालं म्हणून संत्याला बरं वाटलं. 
बन्याचं घर काय जास्त दूर नव्हतंच. दहा मिनिटांत पोस्टर त्याच्या हातावर टिकवून संत्या घरी परत आला. गाडीवरुन येताना वारं लागलं आणि संत्याला जरा बरं वाटलं. पप्पांबरोबर जेवायचं म्हणजे उपाशी राहिलेलं बरं असं त्याला वाटायचं. पण सुटका नव्हतीच. 
घरी येऊन संत्या डायटेकट त्याच्या खाटेवर जाऊन लेटला. पळत पळत येऊन त्याच्या हातात पैसे कोंबणारी सपना त्याला आठवली. 
तिचं ते जोरात येणं, गाडीत अभ्यास करणं, कँटिनमधला डबा, सगळ्यांची उजळणी करुन झाली. ती कशी दिसत होती, बोलत होती आठवून झालं. उगाच तिची आठवण काढत असं छताकडं बघत राहणं हा त्याचा अजून एक छंद होता. इतक्यात फोन वाजला. विक्याचा होता. 
"काय रे? ", संत्यानं विचारलं. 
"उद्या जिमला येनार ना?", विक्यानं विचारलं. 
"आरं आताच पप्पानी काम सांगितलंय सकाळी. परवा जावूया", संत्या. 
"सुटलो. तो अम्या नौलाच झोपला. झेपलं न्हाय त्याला. माझं आंग पण दुखतंय. उद्या सुट्टी तर मग.", विक्या बोलला. 
"हां, चल ठेवतो", म्हणून संत्यानं फोन बंद केला. 
उद्या सपनीचं एक्स्ट्रा लेक्चर असायचं. तिला यायला उशीर व्हायचा त्यामुळे पप्पांचं हे काय काम असेल ते लौकर उरकून पुन्हा सातारला जायचं होतं संत्याला. 
त्यानं अंगातला शर्ट उतरवला, कोपऱ्यात टाकला, पॅन्ट काढून शॉर्ट घातली आणि कोनाड्यातून पुस्तक काढलं, 'अमृतवेल'. पुस्तकं वाचणं हा संत्याचा एक आवडता छंद होता. मराठीतली जमतील ती सगळी पुस्तकं त्यानं वाचून काढली होती. एखादं पुस्तक संपवण्यासाठी रात्र-रात्र जागून काढली होती. कॉलेजच्या विषयांचा अभ्यास कमी असला तरी त्याची ही आवड त्याला मराठी साहित्यात खूप खोलवर घेऊन गेली होती. 
पुस्तकात गुंग होणं हा एकच उपाय त्याला सपनीला क्षणभर का होईना विसरायला लावायचा. पुस्तक वाचता वाचता कधीतरी संत्याला झोप लागून गेली. 

- क्रमशः

विद्या भुतकर.

No comments: