Sunday, February 28, 2016

शिळीपंचमी

            आज सकाळी चहासोबत कालचं उरलेलं थालीपीठ खाल्लं. ते उरलं नव्हतं, तर नवऱ्याला सांगून ठेवलं होतं की 'माझ्या वाटणीचं थालीपीठ संपवू नकोस'. त्याला माझी धमकी माहित असल्याने त्यानेही ते शिल्लक ठेवलं. :) काय भारी लागतं शिळ थालिपीठ आणि चहा? अहाहा ! आणि हो ते थालीपीठ तरी कसं बनवलं होतं? परवाची भरल्या वांग्याची थोडी भाजी शिल्लक होती. ती भाजी नुसती खाऊन पुरणार नव्हती. मग थोडा मसाला, कांदा, तीळ, कोथिंबीर हे सर्व भाजणीच्या पिठात घातलं. त्यात थोडी कणिक, डाळीचं पीठ आणि हळद आणि मीठ. तर असं हे सर्व मिश्रण घालून थालीपीठ बनवलं होतं आणि दह्यासोबत खाल्लं होतं. 
             कुणी म्हणेल ही बाई ताजं काही खाते कि नाही? खाते ना आणि खूप काही बनवतेही. पण काही काही गोष्टी शिळ्याच चांगल्या लागतात. आणि कितीतरी वेळा मी आईकडे, भावा-बहिणीशी भांडले आहे. कारण कुठलीही एखाद्या सुगरण बाईने बनवलेली डिश या शिळ्या पदार्थांशी तुलना करू शकत नाही. म्हटलं चला एक यादीच बनवावी. :) ही यादी बनवताना पण तोंडाला पाणी सुटत आहे. 

१. शिळी भाकरी. शिळ्या भाकरी सारखं सुख नाही. ती मग तुम्ही ठेचासोबत खाऊ शकता. माझी आवडती म्हणजे भाकरीसोबत दही आणि काळा मसाला, किंवा तेल-तिखट. कुठलीही ताजी भाजी या जोडीला मात करू शकत नाही. 
२. शिळा भात. शिळ्या भाताला फक्त कांदा, मिरची घालून फोडणी द्यायची. हळद, मीठ आणि कोथिंबीर, बास्स.. :) सकाळी कितीतरी वेळा आईच्या हातचा शिळा फोडणीचा भात खाल्ला आहे. 
३. शिळी मसाल्याची भाजी. वांगी, दोडका अश्या भाज्या आई मसाला आणि कूट घालून करते. तर या भाज्या थोड्या राहिल्या की त्या थोड्या गरम करून भाकरी किंवा भाजणीच्या पिठात घालायच्या आणि त्यात थोडी तिखट, कांदा, कोथिंबीर ची भर घातली की पुरे. गरम गरम भाकरी किंवा थालीपीठ थापायचे आणि दही किंवा लोण्यासोबत खायचे. :)
४.  शिळी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी. त्या पोळीचं कौतुक सणासोबत संपून जातं. मग संध्याकाळी ती पोळी खायला नको वाटतं. पण तीच पुरणाची शिळी पोळी तव्यात गरम करून गरम गरम कटाच्या आमटी सोबत खायचो आम्ही. तोंडाला पाणी सुटत आहे कटाची आमटी आठवून. 
५. शिळी थालीपीठ. नवरात्री मध्ये आई तळलेली थालिपीठ करते. दुसऱ्या दिवशी ते तळलेले थालिपीठ आणि दही-ठेचा मिक्स करून खायचे. 
६. शिळी बाजरीची भाकरी आणि शेंगसोला. संक्रांतीच्या आधी भोगीच्या दिवशी आई बाजरीची भाकरी आणि शेंगसोला बनवते. संक्रांतीच्या दिवशी मग ते खाता येत नाही म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ती तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि शिळा शेंगसोला खायचा. तुकडे पडणारी कडक भाकरी मस्त लागते. 
 ७. शिळी चपाती. शिळ्या चपातीला भाकरीची तोड नाही. पण तरी फोडणी टाकलेली चपाती आणि दही हे सुद्धा मस्त लागते. पण वरच्या पदार्थांइतकी यात मजा नाही. वाया जाऊ नये म्हणून केलेली  तडजोड आहे ती. 
८. शिळी चपाती आणि शिल्लक राहिलेले चिकन. चिकन दुसऱ्या दिवशीच चांगले लागते बहुतेक. शिळी चपाती आणि मुरलेले तिखट चिकन खाऊन रविवारी दुपारी एक डुलकी काढायची. :) 

कधी विचार करते मुलांनाही या सर्वांची मजा येईल का? त्यांनाही यासर्व गोष्ठींशी ओळख करून दिली पाहिजे. नाहीतर ते मोठ्या आनंदाला मुकणार आहेत. माझ्याकडून बरेच वेळा जेवण शिल्लक राहते आणि मग संदीपच्या आईना माझ्या शिल्लक राहिलेले पदार्थ संपवेपर्यंत पुरे होते. एकदा त्यांनी वापरलेला एक शब्द मला खूप आवडला होता. 'संपली बाई एकदाची शिळीपंचमी'. छान आहे न शब्द 'शिळीपंचमी'? मला तर वाटते असे शिळे पदार्थ असतील तर 'शिळीपंचमी' हाही एक सणच म्हणायला हवा. नाही का? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: