Sunday, February 07, 2016

मल्टीपर्पज स्कार्फ

          मी पहिल्यांदा पुण्याला आले आणि १२ वर्षानंतर या दोन्ही मध्ये एकच साम्य होते ते म्हणजे पोरींच्या तोंडावरचे स्कार्फ. २००१ मध्ये पुण्यात आले तेंव्हा 'मी त्यातली नाहीच' या आवेशात स्कार्फ बांधण्याचं नाकारलं होतं. पण लवकरच खराब होणाऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरच्या पुळ्यानी मला वास्तवता आणलं. त्यानंतर गेले २ वर्षे जेव्हा तिथे होते तेव्हा मला त्या स्कार्फचं सत्यदर्शन झालं. त्याचे जे जे उपयोग मी केले त्यानंतर पर्स सोबत नसेल तरी चालेल पण स्कार्फ हवा हे माझं ब्रीदवाक्य बनलं. 
           अर्थात १०-१२ वर्षात थोडे फार बदल झाले होते, ते म्हणजे स्कार्फ बांधण्याच्या पद्धतीमध्ये. कधी मुली पंजाबी बायकांसारखे पदर घेतात न तसे घ्यायच्या, कधी मुसक्या बांधतात तसे पूर्ण चेहरा घट्ट बांधून तर आज काल नवीन पद्धत म्हणजे, 'दाढीवाले बाबा' असतात न तसे पुढे मोठा तुकडा मोकळा सोडून बाकी सर्व बंद करायचे. ते कसे करायचे हे मला शिकता आले नाही. मी आपली जमेल तसं बांधायचे. पण हा स्कार्फ किती मल्टीपर्पज हे मला खूप दिवसांपासून लिहायचे होते. आज त्याचे सर्व उपयोग मी इथे लिहिल्याशिवाय सोडणार नाही. 

१. गाडीवरून जाताना चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी. उन्हात काळे पडू नये म्हणूनही. 
२. केस धुतले असल्यास तसेच अजून २ दिवस नीट राहण्यासाठी किंवा धुतले नसल्यास कुणाला न दिसण्यासाठी. 
३. चेहरा लोकांपासून लववून बॉयफ्रेंड सोबत फिरण्यासाठी. 
४. रिक्षातून जाताना ऑटोवाल्याला कोण मुलगी आहे आणि काय बोलत आहे हे कणभरही न कळता फोनवर बोलत जाण्यसाठी. 
५. पोरांना रिक्षा किंवा बसमधून नेताना थंडी वाजू नये म्हणून. 
६. रेल्वेमध्ये सीटवर झोपवण्यासाठी, खाली किंवा अंगावर, गरजेप्रमाणे. 
७. पाहुण्यांकडे गेल्यावर पांघरूण कमी पडत असेल तर आतून ओढण्यासाठी.
८. सर्दी झाल्यावर रुमाल नसेल किंवा पेपर न्यापकीन नसेल तर, किंवा माझ्या सारखे गळके नाक असेल तर जोरदार नाक शिंकरण्यासाठी. मुलांना सर्दी झाली असेल तरीही हा उपाय आहेच. 
९. घरी अचानक पाहुणे आल्यास ओढणी म्हणून अंगावर घेण्यासाठी. 
१०. मी स्विमिंग क्लास ला जायचे तेव्हा केस सुकविण्यासाठी. 
११. पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यास थोडं कमी भिजण्यासाठी. 
१२. पर्स, महत्वाचे पेपर किंवा तत्सम महत्वाच्या वस्तू सांभाळण्यासाठी, झाकण्यासाठी. 
१३. फळे, भाजी आणायला गेल्यावर पिशवी मिळणार नाही असे म्हटल्यावर भाजी ठेवून घरी आणण्यासाठी. 
१४. कुणाच्या घरी ओटी भरल्यास ती घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी. 

          माझे हे उपयोग वाचून कुणाला वाटेल बाईला नक्कीच रुमाल, एक पिशवी आणि पांघरुणाची गरज आहे. ते सर्व मलाही मान्य आहे. पण वेळ पडल्यावर तो स्कार्फच उपयोगी पडतो. त्यामुळे माझ्याकडे १ नाही तर ३-३ होते.
          पहाटे, सकाळ, संध्याकाळ, रात्र कधीही आपला स्कार्फ आणि टू-व्हीलर घेऊन मुलांना मागे बसवून फिरणाऱ्या मुली पहिल्या की एकदम भारी वाटते. कधी एखादी आई मुलाला त्याच स्कार्फने पोटाला बांधून चाललेली असते. तर कधी एखादी काकू आपली भली मोठी स्वयंपाकाची कढई घेऊन जेवण बनवायला चाललेली असते. एखादी तरुणी बिग बाजार मधून घराचं सर्व सामान सांभाळत गाडीवरून जात असते. कधी दोघी मैत्रिणी खीखी करत जगाची फिकीर न करता फिरत असतात, तर एखादी आठ महिन्याचं पोट घेऊन खड्डे सांभाळत जात असते. 
           खरंतर या स्कार्फ बद्दल अनेक जोकही येत असतात. गंमत वेगळी, पण मला वाटते तो स्कार्फ पुण्याचं प्रतिक आहे आणि पुण्याच्या मुलींचे, त्यांच्या स्वातंत्र्याच. मला खात्री आहे पुढे पुण्याला येईन तेव्हा परत एकदा पुण्याची होऊन राहीन स्कार्फ बांधून. 

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: