Tuesday, May 31, 2016

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता

काल घराजवळच्या फुलांचे फोटो पोस्ट केले होते. मस्त वाटत आहे फुले बघून. त्याला कारणही तसंच आहे. आम्ही पुण्यात असताना असेच ५-६ कुंड्या, गुलाबाची रोपं, कढीपत्ता, असं काही काही घेऊन आलो. पैसे देऊन थोडी मातीही विकत आणली होती. शनिवार-रविवार पाहून कुंड्यांमध्ये रोपं लावूनही टाकली. त्या रोपांना कळ्याही होत्याच आधीपासून. थोड्या दिवसांत कढीपत्ता वाढू लागला. गुलाबाची रोपं मात्र हवी तशी वाढत नव्हती. अगदी आलेल्या कळ्याही सुकून गेल्या. सानुला फुलांची खूप हौस. त्यामुळे आमच्या घरी न फुललेली रोपं पाहून तिला वाईट वाटायचं. आमच्या आजूबाजूंच्या काकूंकडे आलेली फुलं पाहून विचारायची, "आई बाकी सर्वांची फुले इतकी छान येतात. मग आपली का नाही? ". मला काही कळत नव्हतं की आपल्याच घरी का फुलत नाहीत. मी संदीपला गमतीने म्हणालेही की,"May be I am not giving them enough love." :) 
           कदाचित खरंच तसंच असेलही. पुण्यात रोजचा दिवस खूप धावपळीचा जायचा. त्यामुळे कधी सकाळी किंवा संध्याकाळी बाल्कनीत जाऊन किती फुलं आलीत, पाणी घालावं असं कधी जमलंच नाही. उलट बरेच वेळा आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशीच पाणी घालायच्या. तरीही मला वाटायचं की का आपल्याकडे झाडं फुलत नसतील? परत इकडे यायच्या वेळी मी समोरच्या काकूंकडे ती सर्व रोपे देऊन आले, त्यातली बरीच सुकलीत असं मला वाटत होतं. पण साधारण महिनाभरातच काकूंनी मला मेसेज मध्ये एक फोटो पाठवला. त्याच रोपांचा, एकाला एकदम सहा फुले आली होती. ती पाहून तर माझी खात्रीच पटली की नक्कीच आमच्याच घरी किंवा माझ्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. 
         आम्ही परत अमेरिकेत आल्यावर निदान वर्षभर तरी घरी रोपे वगैरे आणली नव्हती. पण आता इथे थंडी कमी होऊ लागली तशी खूप नर्सरीत फुलांची सुंदर रोपे दिसू लागली आणि सानुचा हट्ट सुरु झाला. पण मला पुन्हा त्यात पैसे घालून उगाच निराश व्हायचे नव्हते. पण एक दिवस तिच्या हट्टापायी नर्सरी मध्ये गेले आणि मीही रमले. मग ५ गुलाबाची रोपटी, काही वाफे, काही फुलांची रोपे, माती सर्व घेऊन आलो. थोडी मेथी, बेसिल, टोमाटो यांची रोपे लावली. त्यात तिचा खूप काही हातभार नव्हता. पण मजा आली सर्व करायला. अजूनही शंका होतीच मनात की खरंच काही फुले येतील का? की गेले हेही पैसे वाया. 
        पण काही दिवसातच मेथीचे कोंब बाहेर आले. बेसिलची रोपे टिकली. नव्या बिया लावलेले बेसिलही डोके बाहेर काढू लागलेय. सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे गुलाबाला कळ्या येऊ लागल्यात. मग काय आम्ही परवा अजून फुलांची रोपे घेऊन आलो. आणि लावलीही. आता फक्त वाट बघतोय कधी ते गुलाब फुलतात. बाकी अनेक झाडांनाही फुले येत आहेत. मेथी बरीच वाढली आहे. त्यामुळे दिवसातून एकदा तरी घराभोवती एक चक्कर मारून पाहिलं जातं की कुठे काय नवीन दिसतंय. गुलाबाला थोडी कीड दिसत होती तर संदीप स्प्रे घेऊन आलाय. टोमाटोलाही फुलं आलीत. आता ते कसे येतात ते बघू. एकूण काय तर बऱ्याच अपेक्षा आहेत आणि हुरूपही. :) 
         पण विचार केला हेच जर मी जमणार नाही किंवा आपल्याला ते जमतच नाही म्हणून सोडून दिलं असतं तर? आज ही अशी बाग दिसली नसती. कित्येक वेळा आपण एखादी गोष्ट एकाच प्रयत्नानंतर जमत नाही म्हणून सोडून देतो. यात अभ्य्यास, नोकरी आणि बरीच नातीही असतात. पण आपल्याबाबत अजून थोड्या गोष्टी आहेत ज्या खूप जणींमध्ये कॉमन दिसतात. त्यात, एखादा पदार्थ बनवणे, वगैरे तर असतेच. पण एखादी डाएट करणे, व्यायाम करणे किंवा एखादी चांगली सवय, जसे आपले जेवण वेळेत करणे किंवा नियमित फळे भाज्या खाणे या अशा गोष्टी थोडेच दिवस करतो. त्यात अपयश आलं की मला काही ते जमणार नाही म्हणून सोडून देतो. अनेकवेळा एखादा व्यवसाय किंवा जुनीच एखादी कला जोपासणे यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करतो. कधी आधी प्रयत्न केले ती वेळ चुकीची असते किंवा काहीतरी कमी पडलेले असते. म्हणून सोडून का द्यायचे?
           केलेल्या प्रयत्नाने जो यशाचा आनंद मिळतो तो खरंच खूप काही देऊन जातो. आज मला तो आनंद मिळतोय तोही त्यातलाच. :) मी खूप काही ग्रेट करतेय असे नाही. पण या छोट्या गोष्टीच,'मला ते काही जमत नाही.' किंवा 'ते माझ्यासाठी नाहीच असे म्हणून सोडून दिलेल्या असतात. नाही का? यानंतर अजून कुठली गोष्ट ट्राय करावी विचार करतेय. तुम्हीही करा. :) आपल्याला प्रयत्ने, वाळूचे कण रगडायचे नाहीयेत ते एक बरे आहे. :)  

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: