Sunday, September 25, 2016

बोलायला पैसे पडत नाहीत!

          माझं कामच असं आहे, प्रश्न विचारण्याचं. मी बिझनेस ऍनालिस्ट म्हणून काम करते. त्यात करायचं काय असतं? तर एखाद्या नवीन किंवा जुन्याच सॉफ्टवेरसाठी त्याच्या यूजर्सच्या ज्या काही मागण्या आहेत, अपेक्षा आहेत ते सर्व समजून घ्यायचं, लिहायचं आणि पुढे डेव्हलपर्स आणि टेस्टर्सना समजवायचं. बरं ते तिथे थांबत नाही, पुढे जाऊन आपण जे काही समजून घेतलंय तेच क्लायंटला मिळालं का नाही हे तपासून पाहणे. आता या सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे 'प्रश्न विचारणे'. कुठलीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही. उदाहरणार्थ, 'अरे आता याला घर हवंय म्हणजे पूर्वेला तोंड असलेलंच बघत असेल'. तर आता पूर्वेला दरवाजा असलेलं घर ही मागणी कितीही कॉमन वाटली तरी विचारलेलं बरं असतं. कोण जाणे एखादा रात्री काम करणारा असेल आणि त्याला सकाळी घरात उजेड नको असेल तर? विचारलेलं बरं ना? त्यामुळे छोट्या छोट्या बाबतीतही प्रश्न विचारणे किंवा एखादी गोष्ट बोलणे, स्पष्ट विचारणे हे महत्वाचं. 
         तर मुद्दा असा की विचारायला पैसे पडत नाहीत. साधी गोष्ट, आता कित्येक कार्यक्रमात असं होतं की शेवटी एखादीच पोळी शिल्लक आहे किंवा थोडीच भाजी शिल्लक आहे, लोक अजूनही जेवतच आहेत. अनेकदा मग बाकी कुणाला हवी असेल म्हणून कुणीच ती थोडी राहिलेली पोळी किंवा भाजी घेत नाही आणि शेवटपर्यंत तशीच राहते. पण तुम्ही विचारू शकता ना,'कुणी घेणार आहे की मी घेऊ?' इतकी छोटीशी गोष्ट, पण विचारायला धजावत नाहीत. लोक काय म्हणतील? आता हे अगदीच घरगुती उदाहरण झालं. पण लहानपणापासूनच शाळेतही कित्येकदा मुलं प्रश्न विचारायला पुढे होत नाहीत. आपला प्रश्न चुकीचा असला तर? कुणी हसले तर? त्यामुळे मला वाटतं की प्रश्न विचारायलाही धाडस लागतं. पण अशावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बोलायला पैसे पडत नाहीत, विचारून टाकायचा. जास्तीत जास्त काय होईल? जरा वेळ हसतील किंवा काय प्रश्न विचारतो म्हणतील. पण निदान आपले समाधान तरी ना?
        अनेकदा नात्यातही आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. तिला मी आवडतच नाही, मी काहीही केले तरी पटतच नाही इ इ. समजा तुम्ही त्या व्यक्तीला बोलावलंय आणि खरंच काही कारणाने तिला जमले नाही तर? अशावेळी स्पष्टपणे बोलून गैरसमज दूर करणेच योग्य वाटते. उगाच समोरच्याने कुठल्या कारणाने असे वर्तन केले हे गृहीत धरून आपण तसेच वागत राहतो. त्यावेळी वाटतं, काय ते बोलायचं ना सरळ, बोलायला पैसे पडत नाहीत! अनेकदा आपण हेही गृहीत धरतो की आपण कसे आहोत हे समोरच्याला माहित नाही का? आणि म्हणतो, 'मला काय वाटतं ते त्याला कळत नाही का?'.  आता लग्नाच्या १० वर्षात तरी हे नक्कीच कळलंय मला, नाही कळत! 'त्याला कळत नाही का?' असे म्हणून स्वतःला त्रास का करून घ्यायचा? सरळ विचारून टाकायचं. जे काही असेल ते स्पष्ट होऊन जाईल ना? असो.
       माझ्यासारख्या नोकरीत योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारून, जास्तीत जास्त माहिती काढणे यातून पैसे मिळतात ही गोष्ट निराळी. पण, 'बोलायला पैसे पडत नाहीत' हे डोक्यात ठेवलं की अनेक प्रश्न सुटतात. जास्तीत जास्त काय होईल? 'नाही' म्हणतील? वेड्यासारखे प्रश्न विचारू नका म्हणतील. पण निदान आपली शंका तरी दूर होते ना? त्यामुळे मनात न ठेवता, वाटलं तर..... विचारून टाकायचं. :) त्याने माझे तरी बरेच प्रश्न सुटलेले आहेत. :)

विद्या भुतकर.

No comments: