Thursday, September 29, 2016

दुधात साखर.....

      पुण्यात असताना संध्याकाळी ऑफिसचं काम घरून चालू असायचं. कधी कधी आमच्या सोबत मुलांनाही मग थोडा अभ्यास देऊन जरा कामाला लावायचो. एकदा काम चालू असताना रेडिओवर गाणी लावून ठेवली होती. मग एकाच टेबलच्या आजूबाजूला आम्ही चौघे आणि मध्ये रेडिओचा स्पीकर असे चित्र होते. ते अगदी माझ्या कोरेगावच्या घरातून इथे २५ वर्षांनी कॉपी केल्यासारखे वाटले. दादा पेपर वाचत आहेत, आईचे काही काम चालू आहे. आम्ही अभ्यास करत गाणी ऐकत बसलो आहे. अगदी अगदी असेच. :) एकदा सानू म्हणालीही, 'गाण्यांमुळे माझा अभ्यास फास्ट होत आहे.'  मनात आले, 'एकदम आईवर गेलीय'. :) मीही अनेकदा महत्वाचे काम असेल आणि एकदम लक्षपूर्वक करायचे असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा कानात गाणी लावून बसते. कधी एखादं गाणं ऐकण्यासाठी काम थांबवते, कधी गाणं थांबवून एखादं वाक्य पूर्ण करते. पण एकूण बरंच काम लवकर होते.
       आजकाल गाना.कॉम वर नियमित गाणी ऐकली जातात. बॉस्टनमध्ये दुसरा कुठला हिंदी रेडिओ नसल्याने तोच एक पर्याय असतो. बरीच गाणी परत परत लागल्यामुळे काही काही गाण्यांचे संगीत सुरु झाले की लगेच स्वनिक सांगतो कुठले गाणे आहे ते. कधी तो त्याच्या आवडीचे गाणे लावायला सांगतो मग सानूच्या आवडीचे गाणे. मधेच एका गाण्याच्या वेळेला स्वनिकला आठवत नाही ते गाणं कुठलं आहे ते. तो फोनवर शोधू लागतो. त्यावर गाण्याचे नाव बघूनच त्याला शान्ती मिळते. :) अशा क्षणी वाटतं आपले जीन्स/गुणसूत्र जे काय असतं कसं बरोबर उतरतं मुलांत, नाही? :)  हे सर्व सांगायचं कारण म्हणजे नियमित गाडीत रेडिओ ऐकायची सवय झाल्याने मुलांमधील आमच्यासारखे काही गुण आम्हाला तर दिसलेच. पण त्यांनाही आपल्याला काय आवडते, कुठले गाणे आवडत नाही याची जाणीव होऊ लागली. कधी 'बेबी को बेस पसंद है' ऐवजी हायवे मधलं 'माही वे' किंवा एक व्हिलन मधलं ''तेरी गलियां' ऐकतात तेव्हा ते संगीताकडेही लक्ष देत आहेत अशी जाणीव होते आणि आनंद होतोच. 
     आजकाल असेही होती की आवडते गाणे पटकन फोनवरून शोधून लगेच बघायचा हट्ट करतात. मी अनेकदा त्याला नकार देते. म्हणते, 'रेडिओ लावला आहे, त्यावर जे गाणे येईल ते ऐकायचे'. त्यावर कुरबुर ऐकू येते. पण मी त्यांना समजावून सांगते की 'जर तुम्ही तेच तेच गाणे ऐकले तर नवीन गाणी कशी कळणार?'. एखादं गाणं चालू असताना मी सोबत गुणगुणायला लागले कि त्यांना आश्चर्य वाटतं मला ते कसं माहित याचं. मग मी सांगते, 'मी अशीच सर्व गाणी ऐकलीत त्यामुळे मला जास्त गाणी माहित झालीत'. 
        आजच घरी परत येताना स्वनिक गाणं बदलायचा हट्ट करत होता. पण मी नाही म्हणाले म्हणून त्याला गप्प बसावं लागलं आणि पुढचं गाणं त्याच्या आवडीचं लागल्याने त्याला प्रचंड आनंद झाला. मी म्हटलं,"पाहिलंस, तू मला गाणं बदलायला लावलं असतं तर तुझं आवडीचं हे गाणं तुला ऐकायला मिळालं असतं का?'. इंटरनेट मुळे हवं ते गाणं ऐकायची कितीही चांगली सोय असली तरी, रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं अचानक लागल्याचा आनंद वेगळाच असतो, नाही? तो मला आजपर्यंत अनेकदा मिळाला आहे. मग त्यांनाही तो मिळवायला शिकायला नको का? प्रत्येकवेळी आपल्या आवडीचं गाणं लागतंच असं नाही. पण नको असलेलं गाणं ऐकायलाही शिकलेच पाहिजे ना? कोण जाणो तेही आवडीचं बनून जातं किंवा निदान माहित तरी होतं. आणि त्याच्यामध्येच आवडीचं लागलं तर? मग काय दुधात साखरच !!

विद्या भुतकर.

No comments: