दिवाळी येतेय त्यामुळे घरात सर्वांचीच घाई, गडबड, खरेदी, सफाई, फराळाची तयारी चालू असेल असं गृहीत धरतेय. :) यावर्षीच्या पणत्यांचे काम एकदाचे उरकले. त्यासाठी गेल्या दोन तीन दिवसांच्या पोस्टना कल्टी द्यावी लागली. पण पुढे बरीच कामं आहेतच, दिवाळीची. लगेचच फराळाचे सामान घेऊन आलो. दरवर्षी निदान चार पाच पदार्थ तरी बनवण्याचा प्रयत्न असतोच. अनेकदा मित्र-मैत्रिणी म्हणतातही, "तू अजूनही फराळ करतेस? कशाला पण?" बरं, असंही नाही की मला सर्व उत्तम बनवता येतं.दरवर्षी आपण नव्याने फराळ शिकतोय असं वाटतं. त्यामुळे दरवेळी मी वेगवेगळ्या रेसिपी ऑनलाईन बघते आणि फराळ बनवते.तसाच यावेळीही सुरु केला आहे.
ही पोस्ट लिहितानाच व्हाट्स अँप वर एक पोस्ट वाचली, दिवाळीला आपण काय काय करायचो आणि आता कशी त्यातली काहीच गम्मत नाहीये. पण मला वाटतं की गम्मत असणे किंवा नसणे हे आपल्याच हातात आहे ना? आजच बेसन भाजत असताना, स्वनिकने त्याचा वास घेतला आणि म्हणाला, "याचा वास खरंच लाडूसारखा येत आहे. आपण कधी बनवणार लाडू?". त्याला हेही आठवत होते की मागच्या वर्षी लाडू वळताना त्यांनी मदत केली होती. त्यामुळे यावर्षी त्यांना त्याचीही उत्सुकता आहे. एकूण काय, घरात रव्या-बेसनाचे खमंग वास, ताज्या गरम दळून आणलेल्या भाजणीचा वास, मैत्रिणींनी एकमेकांना,"तुझं काय काय करून झालं गं?" हे विचारणं, हे सर्व आपल्याच हातात आहे. मग उगाच आपण लहान असताना दिवाळी कशी होती आणि ती आता कशी मिळत नाही यावर का रडायचे?
आजच मुलांना लाडूसाठी वेलदोडे सोलून द्यायला सांगितले. एकदम मन लावून करत
होते. आपल्याला जशा दिवाळीच्या आठवणी आहेत, तशाच त्यांनाही मिळतीलच, नाही
का? एका मित्राला विचारले की फराळाचे काय? तर म्हणाला, त्यातले निम्मे काम मलाच करायला लागेल. मग त्यात काय चूक आहे? करायचं निम्मं काम ! आयतं हातात आलेलं ताट चांगलं वाटतच कुणालाही. पण स्वतः राबून बनवलेल्या फराळाचा आनंद वेगळाच. आणि तो मुलांनी आवडीने खाल्ला तर अजूनच आनंद. आणि खरंच, त्यात थोडेफार प्लॅनिंग असले की पटकन होऊन जाते सर्व.
एकतर आता माझ्या यादीत, रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, चकली, तिखट आणि गोड शंकरपाळ्या साधारण यातले पाच पदार्थ तरी होतातच. दोघेही थोडे जागून, कधी शनिवार-रविवारी बसून काम उरकतो. मुलं मदत करतातच. शिवाय दिवाळीच्या दोन आठवडे आधी रवा आणि बेसन भाजून ठेवून देते. म्हणजे ऐनवेळी लाडूसाठी पाक घालून किंवा साखर घालून वळून घेता येतात. चकली साठी भाजणी शक्यतो विकत आणते किंवा मैदा आणि मूग डाळीचीही करते कधी कधी. त्यासाठी सर्व मसाले (तिखट, मीठ, ओवा, हळद, धणे-जिरे पूड ) तयार करून ठेवते. या गोष्टी रोजच्या कामासोबत एकेक करून होऊन जातात. मग एका शनिवार-रविवारी बसून सर्व काम उरकून घ्यायचं. ते दोन दिवस जरा कंटाळा येतो. पण पुढे महिनाभर मस्त वाटतं फराळ खायला(हो महिनाभर होईल इतका करते. ) आणि हो मी सुरुवात केली तेव्हा माझ्याही यादीत एक-दोन पदार्थच होते. पण ती हळूहळू मोठी होत आहे.
दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालणे, रांगोळी काढणे, पणत्या लावणे, आकाशकंदील लावणे ही सर्व छोटी मोठी कामं करण्यातही वेगळाच उत्साह असतो. उगाच आपण आता दु:खी आहोत म्हणत, 'गेले ते दिवस' टाईप पोस्ट फॉरवर्ड करण्यात काहीच साध्य होत नाहीत हे खरंय. त्यापेक्षा आपण त्यातले काय काय करू शकतो आणि याचा विचार करून त्याचा आनंद दघ्यावा आणि मुलांनाही द्यावा असं मला वाटतं. असो. माझा फराळ बनवून झाला की फोटो टाकतेच. तोवर, तुमचीही तयारी चालू राहू दे ! तोवर हे पणत्यांचे काही फोटो.
विद्या भुतकर.
1 comment:
मस्त दिसताहेत पणत्या!!!
मला पण "गेले ते दिवस" म्हणत बसण्यापेक्षा जे शक्य आहे ते करावं असं वाटतं. दिवाळीचा आकाशकंदिल बनवणं, फराळ बनवणं, पणत्या, रांगोळी, तेल लावून आंघोळी या सगळ्याच गोष्टी करायला मुलांना किती गंमत येते! या सगळ्याच सगळ्या घराने एकत्र येऊन करायच्या गोष्टी आहेत. यातलं दर वर्षी जितकं जमेल तितकं करतो आम्ही. पण एखाद्या वर्षी कंदिल करायला जमला नाही, तर नाही लावायचा. विकतचा आणायचा नाही असं ठरवलंय. :)
दिवाळीच्या शुभेच्छा!
Post a Comment