Wednesday, October 05, 2016

तू का पळतेस?

         आज ऑफिसमध्ये एकाशी बोलत होते. या रविवारी माझी रेस आहे. त्यामुळे जरा डोक्यात बरेच विचार चालू असतात. वेळेत उठणे, पोचणे, त्यासाठी पायांची, नियमित जेवणाची काळजी घेणे इ. आता बऱ्याच जणांना हे उगाच बाऊ करणे वाटू शकते. पण त्याला काही करू शकत नाही. असो. तर आज एकाने विचारले,"तू का पळतेस? म्हणजे उगाच काहीतरी करायचं म्हणून की तुला खरंच पळायला इतकं आवडतं?". जरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरा. अनेकवेळा पळण्याबद्दल लिहिले आहे, अनेक वेळा फेसबुक वर पळून झाल्यावर त्याचे फोटो टाकते, मित्र मैत्रिणींना पळायला जा म्हणून मागे लागते. त्यात खरंच आवड किती आणि दिखावा किती? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आणि तो मलाही पडला.
         आता एखादी व्यक्ती केवळ दिखाव्यासाठी इतके करू शकते का हा प्रश्न आहेच. पण जाऊ दे. खरं सांगायचं तर आता पूर्वीसारख्या परीक्षा द्यायला जमत नाही. देण्यासाठी तितका उत्साहही नाही. बाकी देश बदलणे, घर बदलणे, नवीन नोकऱ्या-आजारपणं यातून छोट्या मोठ्या परीक्षा चालूच असतात, पण त्यात हातात येईल असं एखादं मेडल नसतं. त्यामुळे एखादी छोटीशी का होईना रेस झाली की काहीतरी मिळवल्यासारखं वाटतं. त्या रेससाठी केली जाणारी तयारी, सराव, प्रत्यक्षात त्या दिवशी पळून आल्यावर काहीतरी ध्येय ठेवून ते साध्य केल्याचं समाधान असतं. जगात अनेक खेळाडू आहेत जे इतकी मेहनत घेतात. आपण खेळाडू म्हणून कधी शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठे भाग घेतला नाही याची उणीव भरून काढण्याचा तो एक प्रयत्न असतो. आता हे सर्व झालं तरीही मी केवळ हट्ट किंवा दिखावा म्हणून हे करते का हा प्रश्न आहेच?
          बरेच वेळा असं होतं की थंडीत बाहेर कुठेही जाता येत नाहीये. घरी बसून मस्त जेवण करून आरामात टीव्ही बघत बसू शकते. पण त्यात मजा येत नाही.  कितीही लोळत पडलं, खाल्लं-पिलं, अजून काही करमणूक केली तरी उगाच काहीतरी कमी पडतंय असं वाटतं. उठून काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागतं. तरीही इतका उत्साह नसतो की जाऊन भरपूर पळून यावं. अशा अनेक वेळा मी बिनाचप्पल घरातल्या ट्रेडमिलवर नुसती चालत राहिले आहे. आणि १५-२० मिनिटांनी एकदम फ्रेश वाटायला लागलं म्हणून मधेच थांबून पायात शूज चढवून पुन्हा जोमाने पळायला सुरुवात केलीय. कधी उदास वाटत असताना २-३ मैल हळूहळू चालण्यानेही फ्रेश वाटायला लागलंय. अशा अनेक क्षणात कुणीही नसतं 'दिखावा करायला'. ते केवळ स्वतःसाठीच केलेलं असतं. पळत नसताना जे वाटतं ना? ते आवडत नाही, म्हणून पळते म्हटलं तरी चालेल. आणि त्या वाटण्याला नावं दिलं नाही तरी चालेल पण ते आहे म्हणून आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी पळत राहणार. :) आणि हो बाकीच्यानाही सांगत राहणार.

विद्या भुतकर.

2 comments:

Gouri said...

विद्या, छान लिहितेस तू. (आणि तरीही नियमित लिहितेस! ;) )बरेच दिवस तुझा ब्लॉग वाचते आहे, मायबोलीवरही अधून मधून वाचते आहे तू लिहिलेलं. पण सद्ध्या मराठी ब्लॉगर आणि ब्लॉग एकूणातच थंडावले आहेत, त्यामुळे लगेच प्रतिक्रिया काही लिहिली नव्हती. आज जाणवलं - आपण रोज वाचतोय, त्याची पोचपावती तरी द्यायला हवी ना!

Vidya Bhutkar said...

Thank you Gauri for aknowledgement and comment. Yes blogs havent been as active as before. So I also started my FB page. I post few on Maayboli. But most of the posts are here and on FB page. :) Its feels great to be able to write regularly.

Thanks again, keep visiting.

Regards,
VIdya.