Thursday, October 27, 2016

५० शेड्स ऑफ शंकरपाळ्या

         दरवर्षी दिवाळीला फराळ म्हणजे चर्चेचा विषय असतो. तो चघळण्यासाठी तितकाच चिवट चिवडा, स्प्रिंग चकली किंवा दगड लाडू पाहिजे. :) लहान असताना कुणाकडून काय काय खायला आलंय आणि त्यातलं काय काय बरोबर जमलं आणि काय फसलं यावरही गप्पा व्हायच्याच. पण तेव्हा त्यावर लिहायला काही स्कोप नव्हता. आता आहे तर लिहितेच ना. तर दरवर्षी प्रमाणे यावेळीही दोन लाडू (रवा, बेसन), शंकरपाळ्या (गोड, तिखट), चकली आणि चिवडा हे माझ्या लिस्टवर असतं. आणि गेले १० वर्षे करूनही त्यासाठी मला त्याच्या रेसिपी, मोजमाप नेटवर पहावंच लागतं. त्यातल्या त्यात सर्वात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे शंकरपाळ्या असं मला वाटतं. आणि यावर्षी मुलांनी माझ्या आईच्या हातच्या शंकरपाळ्या नुकत्याच खाल्लेल्या असल्याने, "aaji is the best shakarpali maker" असं वाक्यही पोरीने टाकलं होतं. त्यामुळे त्या चांगल्या जमणं गरजेचं होतं. नाहीतर पोरं लगेच,"आजीसारख्या झाल्या नाहीत म्हणून खाणार नाही' म्हणायलाही कमी करायची नाहीत. 
        तर दिवस सोमवारचा आणि वेळ रात्री १०.३० ची. म्हणजे थकव्याची परिसीमा. पण पुढे बरीच कामे असल्याने त्यादिवशी ते करणं भाग होतं. नेटवर मोजमाप बघून पीठ, दूध, साखर, मोहन सर्व व्यवस्थित घेतलं. छान घट्ट मळलेही. मधेच एक विचार आला, या पिठात सर्व काही आहे जे केक मध्ये घातलं जातं. थोडी बेकिंगपावडर घालून बेक करून बघाव्यात. पीठ इतकं छान झालं होतं की त्याच्या मस्त फुललेल्या शंकरपाळ्या होणार यात मला कणभरही शंका नव्हती. शिवाय लोकांच्या अनेक पोस्टमध्येही मी 'बेक्ड शन्करपाळ्यांचे' फोटो पाहिले होते. आता आपल्याला एकदा ओव्हर-कॉन्फिडन्स आला की बस ! एकदम जोर येतो सर्व करायला. त्यामुळे नुसते एक-दोन लाट्या नाहीत तर ४-५ लाट्या लाटून माझ्याकडे असलेल्या दोन ट्रे मध्ये शंकरपाळ्या ओव्हनमध्ये ठेवायच्या असं ठरवलं. आणि हो, त्यात माझा नवरा होताच बरोबर. त्याने ओव्हन प्री-हीट करून घेतला. एका ट्रेला त्याने भरपूर तूप लावले आणि माझ्या ट्रेला मी थोडे कमी लावले होते. एक ट्रे जरा पातळ होता तर दुसरा एकदम जाडजूड. 
         आम्ही मस्त अरेंज करून त्या लाट्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि ट्रे ओव्हनमध्ये. २० मिनिटे १८० डिग्री ला ओव्हन लावला. पाचेक मिनिटात एकदम भारी केकसारखा वास येऊ लागला. एक फोटोही काढून घेतला. आता सक्सेस स्टोरी लिहायला तो कामात आला असता ना? संदीप ओव्हनचा लाईट लावून समोरच बसून राहिला. त्याला हळूहळू शंकरपाळ्या फुलत आहेत असंही वाटू लागलं. आमचा प्लॅन तयार झाला होता. पुढचे निम्मे पीठही असेच ओव्हनला लावून द्यायचे आणि मग तासभर टीव्ही बघत बसायचा. :) आत्ताशी ११ वाजले होते. 
         १५ मिनिटात थोडा जळाल्यासारखा वास येत होता म्हणून ओव्हन उघडून पाहिला, तर त्या पातळ ट्रे मधील शंकरपाळ्या खालून करपत होत्या. आम्ही घाईने त्या काढून घेतल्या. आणि हो, ओव्हन छोटा असल्याने दोन्ही ट्रे एकाच लेव्हलला बसत नव्हते. तो पातळ ट्रे वरच होता त्यामुळे त्याला हीट जास्त लागत असेल. तर आम्ही घाईने तो ट्रे बाहेर काढला. तूप लावलेली ट्रेची बाजू बरीच जळली होती. संदीप म्हणे,"जाऊ दे, थोड्या वरच्या अंगाला भाजल्या गेल्यात." :) असे असले तरी, हा पहिला लॉट अगदीच वाया गेला नव्हता. थोड्या लालसर झाल्या होत्या आणि कडक इतकेच. मी तर म्हणाले, "चहात पडल्या आणि भिजत घातल्या तरी मऊ पडणार नाहीत याची गॅरंटी आहे". :) एक चांगले होते, चव एकदम मस्त होती. एखादे कडक बिस्कीट असावे तसे. त्या अजिबात फुगल्या नव्हत्या, किंवा कुरकुरीत नव्हत्या. त्यामुळे उरलेल्या पिठाच्या तळूनच करायच्या असे ठरले. 
           आम्ही भांड्यात तेल घालून तापेपर्यंत त्या जाड ट्रे मधील लॉट बघत होतो. तो ट्रे जाड असल्याने पीठ अजूनही कच्चे वाटत होते थोडे. त्याला ओव्हनमध्ये वरच्या जाळीवर ठेवून, आम्ही तापलेल्या तेलात नवीन लॉट तळायला टाकला. आता इथे थोडा वेळ होता. म्हटले, ओव्हनमध्ये दुसरा लॉट खरंच चांगला वाटत आहे पण थोडा रंग सफेद आहे अजूनही. म्हणून मग मी फक्त दोनच मिनिट का होईना 'ब्रॉईल' सेटिंगवर ठेवते असे म्हणले. आता हे ब्रॉईल सेटिंग काय आहे? तर ओव्हनच्या वरच्या कॉइल्स तापून जरा जास्त तापमानात लवकर रंग आला असता. पण त्याची आणि माझी जुनी दुश्मनी आहे. प्रत्येक वेळी जसे दूध लक्ष नसताना उतू जाते तसे मी ठरवूनही ब्रॉईलला लावलेले काही ही असो, मी २ मिनिटंच असे ठरवून ते विसरून जाते आणि मग जळालेले टोस्ट, ब्रेड, केक असे पदार्थ पदरी पडतात.संदीप बिचारा त्यांचे जळालेले भाग खरडून, उरलेला पदार्थ गोड मानून खातोही. :)
          तर यावेळीही मी लक्षात ठेवून ब्रॉईल सेटिंगला दोनच मिनिट लावायचे म्हणून ओव्हन सुरु केला आणि भांड्यातल्या शंकरपाळ्या तळायला सुरुवात केली. कुठलेही काम मनापासून करणे हा माझा स्वभावच असल्याने, तळण्याच्या नादात खाली जोरदार धूर येऊन त्या ओव्हनमधल्या शंकरपाळ्या बिचाऱ्या करपून गेल्या. माझ्यावर चिडचिड करत, नवऱ्याने परत तो लॉट ओव्हनमधून काढला. त्या वाचण्याचा काही स्कोप नव्हताच. पण.....त्यांच्या नादात इकडे तेलात टाकलेल्याही जास्त जास्त लाल होऊन गेल्या होत्या. नक्की कुठली आग आधी विझवायची हे सुचत नव्हते. त्यात बाहेर थंडी असल्याने खिडक्या बंद होत्या. उगाच धुरामुळे फायर अलार्म वाजून अजून दुसराच त्रास नको म्हणून तिकडेही खिडक्या उघडायच्या कामाला नवऱ्याला लावले. एकूण काय, गोंधळ नुसता. 
       आता ओव्हनमधले सर्व लॉट संपले होते. तेलातील पहिलाही जळून गेला होता. तेलातल्याचा आणखी वेगळाच प्रॉब्लेम होता. पिठात थोडी बेकिंग पावडर आणि तूप असे दोन्हीही असल्याने त्या मस्त तेल पीत होत्या. त्यासाठी मग थोड्या पातळ लाटायचे ठरवले. आणि तेलही थोडे जास्त गरम करून घेतले म्हणजे जास्त वेळ तेलात राहणार नाहीत. पण त्याचसोबत त्या तेलात फुटू नयेत याचीही काळजी घ्यायची होतीच. नुसते नाटक. एकेक लाटीला वेगळे वेगळे प्रयोग करत सर्व शंकरपाळ्या संपल्या. सर्व संपेपर्यत खरंच ५० शेड्स झाल्या असतील. पण 'फेअर न लव्हली' सारखे वेगळे शेड शोधून त्याचा फोटो काढत बसले तर नवऱ्याने वेड्यात काढले असते. आता दोघेही चिडणे किंवा वैतागणे याच्या पलीकडे गेलो होतो. :) भराभर आवरून १२-१२. ३० ला झोपायला गेलो. सोप्या सोप्या वाटणाऱ्या या पदार्थाने बराच व्याप झाला होता. 
         दुसऱ्या दिवशी पोरांना दाखवल्या तर म्हणे, "हे असे का दिसत आहेत?'. म्हटलं, चॉकलेट शंकरपाळ्या आहेत, खायच्यात का?" दोघांनाही खायला दिल्या आणि दोघांनाही त्याची चव आवडली. कडक किंवा खुशखुशीत हे समंजण्याचे त्यांचे अजून वय नाहीये त्यामुळे आम्ही वाचलो. स्वनिकला तर इतक्या आवडल्या की संध्याकाळी दोन वेळा मागून घेतल्या आणि मला मिठीही मारली 'फॉर बेस्ट शंकरपाळी'. :) त्यामुळे गोष्ट कशीही असली तरी शेवट गोड झाला होता. :) पुढच्या वेळी बेकिंग वगैरेंच्या नादाला न लागता सरळ तळून करायच्या असा कानाला खडा लावला. :) दुसऱ्या दिवशी नवऱ्यानं विचारलं की 'चकली बेक करायची आहे का?" मी मुकाट्याने तेलाचे भांडे काढून घेतले तळायला. :) 

त. टी. - इथे थोडे फोटो देत आहे. तुम्हीच शेड्स मोजून घ्या. तुमच्याही अशा काही पदार्थांच्या गोष्टी जरुर सांगा. कारण दिवाळी त्यांच्याशिवाय दिवाळी होत नाही.  आणि हो, Please dont judge my cooking skills by this story. अजून भरपूर आहेत. :D 

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments: