Tuesday, October 25, 2016

नेकी कर फेसबुक पे डाल

          थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात. पुढे जाऊन माझा त्यात खरंच फायदा होता का? आणि २०० रुपये शेकड्याने मिळणाऱ्या पणत्यातून जिने त्या घडवल्या तिला काहीच फायदा नाही. असे असताना त्यातून मी पैसे कमावणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न मनात येत होतेच.
           पण हे सर्व नाहीसे झाले कारण त्यातला हेतू. मागच्या वर्षी एका मैत्रिणीने तिने बनवलेल्या पणत्या विकून आलेले पैसे दान केले होते. त्यामुळे यावेळी आमचाही तोच विचार होता. हेतू निश्चित असला ना मग बाकी सर्व गोष्टी फिक्या वाटतात. आता फक्त एकच हेतू होता, ज्या संस्थेला आम्हाला देणगी द्यायची होती त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी. अर्थात तरीही ज्यांना पणत्या खरंच आवडल्या आहेत त्यांनाच तो हेतू आम्ही सांगितला होता. कारण त्याची जाहिरात करून त्या मला विकायच्या नव्हत्या. एकेक करत २३०$ च्या पणत्या विकल्या गेल्या. यात झालं काय की अनेकदा मला वाटायचं की कशाला लोकांना पुन्हा विचारायचे किंवा नवीन पणत्यांचे फोटो टाकायचे? या सर्व विचारांना मागे सारून एकच विचार पुढे होता, जितके जास्त विकल्या जातील तितकी जास्त मदत आपण करू शकतो. त्यामुळे काही सोशल ग्रुपवर पण मी पणत्यांचे फोटो आणि त्यांचे दर दिले. ऑफिसमध्ये विचारायला मन थोडं कचरत होतं पण म्हटलं,"कुठे आपल्याला ते आपल्यासाठी विकायचेत?" त्यामुळे तिथेही मैत्रिणींना विचारले. ज्यांना आवडल्या त्यांनी आवर्जून मागून घेतल्या. आता घरी फक्त डझनभर पणत्या राहिल्यात. त्या घरी वापरेनच.:)
          कुणाला वाटेल हे सर्व सांगायची काय गरज आहे? एखादी ५ किमी ची रेस पळल्यावर १० फोटो टाकतो आपण. बाकी कुठं गेलो, काय खाल्लं त्यावर १००. मग यावर का नाही लिहायचं? दोनेक वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने आम्हाला सांगितलं, तिच्या आईच्या ७५ व्या वाढदिवशी तिने एक चांगले काम केले. सिंधुताई सपकाळ यांच्या मुलींच्या आश्रमातील एका मुलीचे शैक्षिणक पालकत्व घेतले आहे. वर्षातून त्या मुलीच्या शाळेसाठी लागणार खर्च ती करते. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या कामाबद्दल मला माहिती झाली. सासवड जवळच्या एका गावात असलेला तो मुलींचा आश्रम. त्यानंतर माझ्या अजून एका मैत्रिणीने तिच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी तिथे देणगी दिली. त्यांच्याकडून त्या आश्रमाबद्दल ऐकून जायची, काहीतरी करायची इच्छा झाली.
        दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो तेंव्हा तिथल्या मुली, त्यांची स्वच्छता, कॉलेजसाठी जाणाऱ्या मुलीची धावपळ आणि तिची शिक्षणासाठीची जिद्द सर्वच प्रेरणादायी होतं. तिथे असणाऱ्या शिलाईच्या मशीन आणि पिशव्या शिवण्याचा, विकण्याचा उद्योगही पाहिला. आपण त्यांना कोणत्या प्रकारे मदत करू शकतो हा एकच विचार तेंव्हा मनात येत होता. कपडे, पैसे, स्टेशनरी, मुलांचे शैक्षिणक पालकत्व किंवा एकरकमी देणगीमुळे त्यांचे एखादे मोठे कामही मार्गी लागू शकते असे अनेक पर्याय समोर आले. सध्यातरी आम्ही एकहाती रक्कम देण्याचा पर्याय अवलंबला आहे. पण खरंच करण्यासारखं खूप आहे आणि लोक कमी असं वाटलं. आणि हो, माझ्या मैत्रिणीने मला त्यांच्या कामाबद्दल सांगितले म्हणून मी काहीतरी करू शकले. मग मी बाकी लोकांना सांगून त्यांच्याकडून काही चांगले झाले तर का नाही? म्हणून हा उपद्व्याप.
        कालच माझी ती मैत्रीण, पणत्यांचे आलेले आणि आमच्याकडून थोडे असे पैसे संस्थेत जाऊन देणगीची रक्कम देऊन आली. दिवाळीच्या आधी हे काम व्हावे अशी खूप इच्छा होती. ती जाऊन आल्यावर, अशा कामासाठी लोकही किती उत्साह दाखवतात असं वाटून गेलं. आपण इथून विचारल्यावर तिकडे कुणीतरी हे करतंय हेही भारीच ना? तिच्यासोबत बाकीच्यांनीही मग पैसे, कपडे, मिठाई जमेल तसं दिलं. आज तिच्याकडून तिथले फोटो मिळाले आणि खूप भारी वाटलं. आपण केलेल्या कामाने कुणाचे तरी काही चांगलं झाल्याचं समाधान. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पणत्या विकत घेतल्या त्यांनाही ते फोटो दाखवले आणि त्यांनाही तोच आनंद मिळाला. तर एकूण काय, तुम्हालाही खरंच काहीतरी करायची इच्छा झाली तर जरूर कळवा त्या संस्थेला. त्यांचा नंबर माझ्या एका फोटोत दिसेलच. आणि हो, त्यांचा मुलांचाही आश्रम आहे पुण्यात. तुमच्याकडून काही भलं झालं तर बाकीच्यांनाही जरूर सांगा. त्याचं समाधान तुम्हालाही मिळेलच.
           माझी मैत्रीण म्हणते ते बरोबर आहे, अशा कामात विचारायची लाज कशाला बाळगायची आणि लोकांना सांगायचीही? "नेकी कर फेसबुक पे डाल", बरोबर ना ? आता पुढच्या वेळी पणत्यांच्या उद्योगाला अजून हुरूप येणार आहे हे नक्की. :)
सर्वाना शुभ दीपावली !

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


No comments: