Sunday, November 06, 2016

फसलेले क्षण

           थोड्या दिवसांपूर्वी एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तिथे एक मॅनेजर आली होती जिने पांढरास्वेटर घातला होता काळे पोकळ गोल असलेला आणि डार्क पिंक पॅन्ट(फुशिया म्हणतात तो). एकदम भारी दिसत होतं कॉम्बिनेशन. तिकडे मोठ्या लोकांची भाषणं सुरु झाल्यावर रिकामटेकडं डोकं त्या ड्रेसवर खिळलं. हातांना काही चाळा म्हणून मी पेपरवर ते काळे गोल गोल काढत बसले आणि मनात विचार आला असा एखादं चित्र कॅनवासवर काढलं तर? पांढऱ्या शुभ्र कॅनवासवर काळे गोळे( एकदम पेनाने रेघोट्या काढल्यासारखे) आणि १/४ हिस्सा फुशिया रंगाचा. एकदा डोक्यात आल्यावर ते ट्राय करायचा विचार पक्का झालाच. दिवाळीमुळे वेळही मिळत नव्हता. शेवटी दिवाळीचा फराळ करून संपल्यावर थोडा वेळ मिळाला आणि मी ते चित्र काढून बघितलंच. :) 
          एकतर ऍक्रिलिकमध्ये जो मला फुशिया वाटत होता तो कॅनवास वर वेगळाच निघाला. कॅनवास कितीही व्हाईट दिसत असला तरी त्याच्यावर आपण ब्रशने दिलेला व्हाईट वेगळाच असतो त्यामुळे तेही दोन चार हात मारले. आता ते काळे गोल कशाने काढायचे हा प्रश्न होता. पेन्सिलने सुरु केले तर थोडे फिकट आले. रोल पेन काही कॅनवास वर उठेना मग सरळ स्केचपेनने काढले. आता एकूण जे चित्र तयार झाले ते मी मनात काढलेल्या इमेजपेक्षा अगदीच सामान्य होतं. कितीही वेळा कितीही तऱ्हेने पाहिलं तरी ते सामान्यच होतं. :) ते काढल्यावर अजूनही दोन चार काढून पाहायचा विचार होता पण सध्या हा निकाल पाहून धीर होत नाहीये. 
         हे माझं पाहिल्यान्दाच झालं नाहीये. अनेकवेळा एखादी रेसिपी डोक्यात येते आणि ती माझ्या डोक्यात एकदम भारी दिसत असते. सर्व सामान आणून तसे कधी एकदा बनवतेय असं होतं. फार क्वचितवेळा खरंच अगदी मनात आहे तसं प्रत्यक्षातही येतं. अनेकवेळा अगदीच प्रयत्न फसतो तर काही वेळा 'ठीक होती' म्हणत पुढच्या वेळी करायचा हुरूपही राहतो. अनेकवेळा एखादं गाणं गातानाही एखादी गिरकी किती छान घेतलीय म्हणत तोंड उघडलं की संपलं. डोक्यात असलेली ती ट्यून बाहेर पडताना वेगळीच झालेली असते. थोडं हिरमुसलं होतं मन की आपल्याला ते येत नाहीये म्हणून. पण तिथेच थांबत नाही. पुन्हा कधी असंच छान गाणं लागलं की पुन्हा प्रयत्न करतंच. 
       कधी, आपल्याला एखाद्या प्रिय व्यक्तीला मनातलं सांगायचं असेल तर मनात अनेक विचार येतात. असं बोलू की तसं बोलू? आता विचार करा मी ही वाक्ये लिहितेय जी एखाद्याला मोठ्याने बोलून दाखवायची आहेत,"मला ना तू खूप आवडतेस. तुझ्यासोबत असताना कसं एकदम मोकळं, कम्फरटेबल वाटतं. आपण सोबत असताना दुसऱ्या कुणाचीच गरज नाहीये असं वाटतं. " मला खात्री आहे की ही आणि अशी अनेक वाक्यं कधी ना कधी आपल्याला कुणालातरी बोलायची असतात.. पण प्रत्यक्षात बोलताना मात्र काहीतरी वेगळंच होतं. ते शब्द डोक्यात कितीही पर्फेक्ट वाटत असले तरी बाहेर पडताना वेगळेच वाटतात आणि मग ते बोलणं लांबतंच. अगदी कुणाला सॉरी म्हणतानाही किंवा एखाद्या जवळच्या मित्राला समजावून सांगताना, कितीही योग्य वाटले तरी ते विचार बाहेर पडताना हवे तसे येतातच असं नाही. मग कधी थोडी धावपळ होते तर कधी ब्रेक-अप. :) 
         हे सर्व विचार, ही वर म्हणाले ती गाणी किंवा एखादी रेसिपी केव्हा एकदा बाहेर पडेल असं होतं तेव्हा त्यातून काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. आणि तो केलाच पाहिजे असं मला वाटतं. एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी थोडी रिस्कही घेतली पाहिजे. पण बरेचदा असे मनात येणारे विचार नेगेटिव्हही असतात. एखाद्यावर असणारा प्रचंड राग, एखाद्या नातेवाईकाला पुढच्या वेळी भेटल्यावर सुनावायची एखादी गोष्ट, टोमणा, मनात शंभर वेळा रिपीट केलेलं असतं. "अजून एकदा ते असं करू देत मग मी सोडणार नाही, बोलणारंच" असं स्वतःला हजार वेळा बजावलेलं असतं. आणि एखादा असा क्षण येतोही जिथे आपण खरंच ऐकवतो आणि फसलेल्या त्या रेसिपीसारखे किंवा बेसुऱ्या गाण्यासारखे ते बाहेर पडलेले शब्द चुकीचे वाटतात आपले आपल्यालाच. कितीही झालं तरी ते शब्द परत येणार नसतात. मनात कितीही राग असला तरी समोरच्या माणसाचा खरंच तो हेतू नसतो किंवा असला तरी प्रत्यक्षांत कुणी असे आपल्याला बोलेल अशी त्यांनी अपेक्षा केलेली नसते. 
       तो एक क्षण अनेक वर्षांची मैत्री तोडायलाही कमी करत नाही मग. त्यात कधी मग जवळचे नातेवाईक असतात तर कधी आई-वडील आणि आपली मुलंही. हे असे फसलेले क्षण कितीही केलं तरी आयुष्यभरासाठी डोक्यात राहतात आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्याही. अशा वेळी मात्र दुरुस्तीची संधी क्वचितच मिळते. माझ्या फटकळ किंवा चटकन राग येण्याच्या स्वभावामुळे असे क्षण मीही मोजलेत आणि त्यांची किंमतही. त्यामुळे बाकी गोष्टीत कितीही प्रयोग केले तरी या अशा बोलण्याच्या बाबतीत मात्र प्रयोग नकोत असं मला वाटतं. त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो, किंवा मनात आतून चिडचिड करून घेते किंवा संदीपला, आईला वगैरे सांगते. पण रागाने फटकळ बोलून पश्चातापाच्या यादीत अजून काही भर घालायची नाही असं ठरवतेय. हळूहळू प्रयत्न करतेय ते क्षण येऊ न देण्याचा. बघू कितपत जमतेय. पण तोवर गाणी, रेसिपी आणि चित्रं मात्र नक्कीच काढत राहणार कितीही चुकले तरी. :) विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
      

No comments: