Tuesday, November 08, 2016

बाबा अभ्यास घेतात तेंव्हा

          आज काल संदीप सानूचा अभ्यास घ्यायला लागलेला आहे. मी जेवण बनवत असताना तेव्हढाच वेळी कामी लागतो आणि माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त पेशन्स आहे म्हणून खरंतर त्याला हे काम दिलेलं असतं. पण गेल्या काही दिवसांच्या अनुभवातून मला एक ट्रेंड लक्षात आला आणि बऱ्याचशा अभ्यास घेणाऱ्या बाबांचा, इन्कलुडींग आमचे. :) आमची अभ्यास घेण्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. खरंतर शाळेतून अक्ख्या वर्षभरासाठी 'नो होमवर्क' पॉलिसी अवलंबली आहे म्हणे. तरी आम्ही आमच्या परीने थोडं फार घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अभ्यास करून घेण्यासाठी योग्य पध्द्त कुठली यावर माहितीचा धागा काढला पाहिजे. पण तोवर ही यादी तरी देते:
१. अभ्यासाला घे म्हटलं की पोराने लगेच घेतलं पाहिजे. (इथे आईला माहित असतं की आपलं पोरगं काही एका शब्दात ऐकणारं नाहीये.) थोड्या दिवसात मग, 'हे बघ असं असतं हजार वेळा सांगूनही ऐकत नाही लगेच बसायला' असं आईला ऐकून घ्यावं लागतं.
२. मूळ विषय सोडून एरवी कसे ते पोर आपण सांगितलेलं अजिबात ऐकत नाही यावर आईला आणि पोराला दोन चार शब्द ऐकावे लागतातच. पुढे अभ्यासाला बसताना पोराने कधीही पेन्सिल, वही इ साहित्य एकत्र घेतलेलं नसतं. त्यावरून पेन्सिल घेतली का? खोडरबर घेतलंस का? असे प्रश्न चढ्या आवाजात होतात.कधी अभ्यास करताना पेन्सिल तुटलीच तर मग ते पोर शार्पनर शोधायला म्हणून पळून जातं ते १० मिनिट येत नाही. कारण ते जागेवर सापडलं नाही म्हणून अजून ऐकून घ्यावं लागणार असतं.
३. एकदाचं पोर जागेवर बसलं की अभ्यास सुरु झाल्यावर सर्वात पहिली सूचना येते,"नीट बस. पाठीला पोक काढून बसू नकोस. लोळू नकोस."
४. वैतागून पोर सरळ बसलं की पुढची सूचना,"जरा पेन्सिल नीट धार की, काय ते अक्षर ?". एकतर इथे पोराने पेन्सिल कशीही धरली तरी त्यातून फक्त अक्षर उठतंय ना इतकंच पाहतात. त्यात मग ती वाकडी का सरळ हे कोण बघणार?
५. पाच वेळा पेन्सिलीची सूचना झाल्यानंतर खरा अभ्यास सुरु होतो. जरा कुठे पहिलं गणित झालं की,"हा सांग १८+९ मध्ये १८ मध्ये टेन्स (दहाच्या जागी किती) आणि वन्स किती आहेत? पोराने हवेत पाहिलं की," ते काय हवेत दिसत आहेत का? लिही, १८ची फोड, १-१०, ८-१. नीट नवीन ओळीत लिही.
६. हेच कधी इंग्रजी असेल तर, बोल मोठ्याने बोल. स्पष्ट बोल, वर छताकडे बघू नकोस. किती वेळा सांगितलं आहे लगेच लिहायचं, नुसतं हवेत बघत बसू नकोस.
७. पोराने लिहायला सुरुवात केली की आमच्याकडे एक प्रॉब्लेम होतो. पोरींचे केस डोळ्यावर येतात. मग, केस का मोकळे सोडलेत? जरा नीट बांधत जा की. मग आईकडे मोर्चा वळतो," जरा हिच्या केसांचं काहीतरी कर. नाहीतर कापून आण. पोरीने रबर शोधून आणून केस बांधेपर्यंत ५ मिनिटं जातात.
८. सगळं होईपर्यंत जेवायची वेळ झालेली असते. पोराला कंटाळाही आलेला असतो. "बरोबर टीव्ही बघताना झोप येत नाही. अभ्यास करायला लागलं की झोप येते लगेच. " हे ऐकून घ्यावं लागतं.
९. कधी जेवणाच्या निमित्ताने का होईना पोराची सुटका होते किंवा कधी आई-बाबांचंच कसं पोराला बिघडवलं आहे यावरून जोरात भांडण सुरु होतं आणि मधल्या मध्ये पोर पळून जातं.

मी अभ्यास घेते तेंव्हाही काही ग्रेट होतं असं नाही. पण मी थोडी माहिती वाचली होती त्याप्रमाणे सुरुवातीचे तयारी करायचे चे प्रॉब्लेम आहेत ते सोपे आहेत. उगाच पेन्सिल, पेपर, खोडरबर घेणे किंवा नीट बसणे यासारख्या गोष्टीत ठराविक ठिकाणी सर्व सामान ठेवणे, नियमित बसायची,नीट जागा असणे इ असेल तर सुरुवातीचे बरेच वाद कमी होतात.. नवऱ्याला तेही सांगून झाले आहे पण काही ना काही होतेच. अर्थात हे सर्व किस्से एकाच दिवशी होतात असं नाही पण या यादीतील एक तर होतोच बाबा अभ्यास घेतात तेंव्हा. बरोबर ना?  :)

विद्या भुतकर.

No comments: