Monday, November 07, 2016

Live in the moment

       मागच्या आठवड्यात 'ऑफिसातल्या पाट्या' बद्दल लिहिताना विचार करत होते की ते जुनं ऑफिस काही इतकंही जवळचं नव्हतं की त्याची आठवण यावी. केवळ एकंच वर्ष तिथे झालेलं आणि असेही इतके छोटे डेस्क होते की याच्यापेक्षा दुसरे काहीही चालेल असं वाटलं होतं. आणि आता इतके वर्षात थोडी का होईना नवीन ऑफिसची क्रेझ तशी कमी झालेली असेल असंही वाटत होतं. त्यामुळे आपण अगदीच 'कूल' असल्यासारखे आज मी ऑफिसच्या नवीन बिल्डिंगला गेले. ट्रेनमधून उतरल्यावर जातानाच एकदम वाटलं, 'अरे मागच्या ऑफिसला २-३ मिनिटंच चालायला लागत होतं. आता १० मिनिटे लागत आहेत. :('  नकळत माझ्या तुलना सुरु झाल्या होत्या.
        आता गेल्यावर नवीन ऑफिसच्या निमीत्ताने मस्त नाश्ता ठेवला होता. नवीन डेस्कवर एकेक छान फूलही ठेवलेलं होतं. कितीही नाही म्हटलं तरी बाकीच्या मैत्रिणींसोबत तिथल्या नवेपणात मीही हरवून गेले. बाथरूम कुठे, कॅफे कुठेय, कसा आहे, नवीन बिल्डिंगच्या आजूबाजूला काय काय आहे? म्हणजे मी कितीही नाही म्हटलं तरी जुन्या बिल्डींगच्या आठवणी आणि तुलना होतंच होत्या आणि त्यासोबत नवीन बिल्डिंगच्या नवेपणाचं कौतुकही वाटत होतं. प्रत्येक मैत्रीण ऑफिसला कशी पोहोचली, कुणी कुणाला सोडलं, इथपासून अगदी ऑफिस सुटेपर्यंत मैत्रिणींच्या डेस्कवरील वेगवेगळ्या फुलांचे फोटो काढून त्याचं एक कोलाजही बनवलं. एकूण काय मी कितीही निरुत्साह दाखवला तरी या बदलाचा माझ्यावर नक्कीच परिणाम झाला होता. पण तो मान्य करायला मला तिथे एक दिवस घालवावा लागला.
         आम्ही शिकागोला असताना आमच्या बिल्डिंगमध्ये अनेक लोकांशी ओळखी झाल्या. अनेकदा आम्ही पॉटलक करायचो. नुकतंच लग्न झालेलं आणि अशा संसारी गोष्टी करायची सवय नव्हती, किंवा तेव्हा मुलंही नव्हती त्यामुळे मुलांचे विषय आले की आपण काय करणार असे प्रश्नही पडायचे. या सगळ्या लोकांच्या त्या त्या भेटी इतक्या खास असतील हे मात्र ते तिथून निघून गेल्यावर जाणवलं. आजही दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या पार्ट्या आणि गम्मत आठवत राहते. पण ते जाणवायला बाकी ठिकाणी राहून बघायला लागलं. ते इतके स्पेशल असतील हे तेव्हा जाणवलं असतं तर कदाचित अजून जास्त भेटलो असतो. असे अनेक वेळा त्या त्या ठिकाणी राहत असताना तिथल्या अनेक चांगल्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या ज्या तिथून निघाल्यावर जाणवल्या.
        आजही एक हुरहूर वाटली होती ती म्हणजे त्या जुन्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या बाहेरचा एक आवडता व्ह्यू होता, त्याचा फोटो काढला नाही. कदाचित तिथे परत जाऊन काढताही येईल पण प्रत्येक वेळी अशी संधी मिळेल असं नाही. तीच गोष्ट बॉस्टनची झाली आहे. इथे येऊन साधारण दीडेक वर्ष झालंय आणि अजूनही पुण्यातल्या आठवणी येत राहतात आणि बॉस्टन 'आपलं' वाटत नाही. कदाचित त्याची किंमत कळायला इथून बाहेर पडायला लागेल. 'live in the moment' किंवा जे आहे त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे, इ इ कितीही वेळा बोललं आणि कितीही मान्य असलं तरी प्रत्यक्षात ते स्वीकारणं, अंमलात आणणं किती कठीण आहे नाही? कितीही ठरवलं तरी आहे ते सोडून मागच्या आठवणीत आणि पुढच्या स्वप्नांत मन जातंच. असो, सध्यातरी आजचं ते फुलांचं कोलाज पोस्ट करतेय, आज काहीतरी छोटंसं पण आनंद घेऊन केलेलं.

विद्या भुतकर.

No comments: