Monday, January 02, 2017

संकल्प

काल एकीशी बोलत होते, आता महिनाभर तरी जिम मध्ये ढिगाने गर्दी असेल. आणि फेब्रुवारीपर्यंत पुन्हा रिकामे होतील. मुख्य म्हणजे रोज खरंच नेटाने जाणाऱ्या लोकांना किती चिडचिड होत असेल अशा लोकांच्या गर्दीची? मला वाटतं, प्रत्येकाच्या संकल्पाच्या यादीत,'जिमला नियमित जाणे', 'वजन कमी करणे', 'वेळेत जेवण करणे',' तब्येतीची काळजी घेणे' यातील एकतरी वाक्य असेलच. आणि ते गेले कित्येक वर्षं असेल दरवर्षीच्या यादीत. मला खरंच कळत नाही की स्वतःची तब्येत सांभाळणे हे अचानक इतके मोठे काम का झाले आहे? भूक लागली की जेवतो, झोप आल्यावर झोपतो, कंटाळा आल्यावर टीव्ही बघतो. बाकी गोष्टींसारखे हेही आपण एकदम सहजरित्या का करू शकत नाही? असो.
          आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे. नवीन वर्षासाठी एखादा संकल्प करणे हे आजकाल एक हास्यास्पद काम झाले आहे. संकल्प करायचाच मोडण्यासाठी असेही म्हणतात. नवीन वर्षात किती लोकांनी किती संकल्प केले हे पाहणारे आणि त्यातले किती लोकांचे कोलमडून पडतील हे पाहणारेही अनेक लोक असतात आजूबाजूला. मग त्यावर टोमणे मारायचा चान्स कोणीही सोडत नाही. अशावेळी मला वाटतं की कुठलीही गोष्ट ठरवणे यासाठीही त्यामागचा विचार असतोच. मग त्यांना पाठिंबा देण्यापेक्षा त्यांच्या फेल होण्याची वाट का बघायची?
         नवीन वर्ष हे खरंतर निमित्त असतं काहीतरी नवीन सुरु करण्यासाठी. आणि ते अगदी योग्य निमित्त आहे असं मला वाटतं. एकतर आख्ख वर्ष हा एक मोठा काळ आहे तो संपला याची जाणीव आपल्याला होते ३१ डिसेंबरच्या दिवशी आणि १ तारखेला पुढे काहीतरी नवीन करायला तितकंच मोठं कारणही मिळतं, नवीन वर्ष सुरु झाल्याचं. नाहीतर विचार करा, रोजचा दिवस आल्यासारखाच चालला आहे, कुठेही सुरुवात नाही, शेवट नाही. रुटीन तर काय असतंच. अशा वेळी काहीतरी नवीन सुरु करायला उत्साह तरी कुठून येणार? एखादा रविवार असतो म्हणूनच सोमवारी काम करायची हिम्मत होते. शाळा सुरु होते तेंव्हाही,  मोठी सुट्टी संपल्यावर नवीन वर्ष सुरु होतं म्हणूनच तो उत्साह असतो. नाहीतर सलग रोज शाळेत जायचं असतं तर नवीन कशाची तरी सुरुवात करायला जोर कुठून येणार?
        अर्थात ज्यांना काही करायचं असतं ते नवीन वर्ष सुरु होण्याची वाट बघत नाहीत. पण आता सुरु झालेच आहे तर एखादे मागे पडलेले काम सुरु करण्यास किंवा अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यास आणि एखादा नवा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन वर्षासारखा चांगला मुहूर्त नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार न करता संकल्प करायचेच, ते पार पाडण्याच्या पूर्ण प्रयत्न करायचा आणि एखादा नाहीच जमला तर पुन्हा वर्षीच्या यादीत जोडायचा.  :) कारण रोजचे रोज तर काय जगतच असतो, काहीतरी वेगळं करायची सुरुवात करायला आजच्यासारखा दिवस नाही. त्यामुळे मीही आज दोन महिन्याच्या ब्रेकनंतर पुन्हा रनिंग सुरु करतेय, तुम्हीही करा. :)

विद्या भुतकर.

No comments: