Thursday, January 26, 2017

भारत माता की जय !

       २६ जानेवारी संपला की सर्वांच्या प्रोफाईल वरचे झेंडे खाली असतील, नसतील, आपापल्या तत्परतेचा प्रश्न आहे तो. बाकी सकाळपासून रस्त्यांवर खाली पडलेल्या, अवहेलना होणाऱ्या झेंड्यांचेही फोटो येतीलच पेपर मध्ये इत्यादी. कुणाच्या उपहासात्मक पोस्टही दिसल्या असतील किंवा दिसतीलही. मध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहण्यावरून झालेली भांडणं किंवा प्रत्येकवेळी थिएटर मध्ये चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याच्या कोर्टाच्या आदेशावरून बरेच वाद झाले. प्रत्येकवेळी असं वाटतं की खरंच हे इतके वाद का? आणि असे १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला एकदम येणारे प्रेम का? असो. 
         आज पर्यंत मी अमेरिकेत जितक्या पळण्याच्या इव्हेन्ट मध्ये भाग घेतला आहे त्या सर्व रेसची सुरुवात अमेरिकन राष्ट्रगीत होऊन होते. जो कुणी गायक किंवा गायिका ते म्हणत आहेत ते अगदी मन लावून म्हणतात. आणि मला लक्षात येतं की या सगळ्यांत मी कुठेच नाहीये. परदेशात, परक्या हजारो लोकांमध्ये उभे राहून त्यांचे राष्ट्रगीत ऐकताना जे एकटेपण जाणवलं आहे त्याबद्दल केवळ शब्दांत सांगणे अवघड आहे. त्याच्या १० टक्के जरी कुणाला अनुभवता आलं तर ते आपल्या राष्ट्रगीताला आपोआप उभे राहतील असं मला वाटलं. आपल्या देशात उभे राहून आपले राष्ट्रगीत म्हणता येण्यासारखा अभिमान नाही. तो जाणवण्यासाठी माझ्यासारखं कधी एकटं उभं राहून पाहिलं पाहिजे हजारो लोकांमध्ये. 
     सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहितेय का? ते अमेरिकन राष्ट्रगीत संपल्यावर लोक जोरात टाळ्या वाजवतात आणि मी मात्र आतून जोरात ओरडू इच्छिते,"भारत माता की जय !". आपल्या संस्कृतीमुळे म्हणा किंवा सवयीमुळे म्हणा, राष्ट्रगीतानंतर 'भारत माता की जय' म्हणता आलं नाही तर काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना मनात येते. आणि मुख्य म्हणजे ती बाजूला असणाऱ्या हजारो लोकांना मी सांगूही शकत नाही. अशा वेळी वाटतं, आपल्याकडे थिएटरमध्ये असणाऱ्या शेकडो लोकांसोबत आपण ते म्हणू शकतो, बोलू शकतो हा हक्क काय कमी आहे?
       गेल्या वर्षी १५ ऑगस्टला भारतात होतो आणि बिल्डिंगच्या झेंडावंदनाला आणि पुढच्या कार्यक्रमाला हजर होतो. .मुलांनाही त्यात भाग घेता आला याबद्दल खूप आनंद झाला होता, पुढच्या वर्षीही करायचा विचार आहे. राष्ट्रगीत म्हणताना अंगावर उभे राहणारे रोमांच केवळ तेंव्हाच येतात. आयुष्यात दुसऱ्या कशानेही ते मी तरी अनुभवले नाहीयेत. ते वातावरण, झेंडावंदन, राष्ट्रगीत, ते शुभ्र पांढरे स्वच्छ कपडे आणि त्यानंतर मिळालेली जिलेबी या सगळ्यांत जो सण साजरा केल्याचा भाव असतो ना तो कुणाला सांगून कळत नाही. निदान भारतीय नसलेल्या लोकांना तरी. एक भारतीयच हवा आपला आनंद वाटून घेण्यासाठी. असो. आज तुमच्यासोबत हे शेअर करू शकले याचाही आनंद आहेच. पुढच्या रेसला 'भारत माता की जय' असे जोरात म्हणायचा विचार आहे, बघू काय होते. 
तोवर, भारत माता की जय ! :)

विद्या भुतकर.

2 comments:

raju said...

तुम्हाला कसा काय वेळ मिळतो हो दररोज पोस्ट करायला सगळे संभाळून? सिम्पली ग्रेट !

Vidya Bhutkar said...

मी दिवसातून एखादा तास तरी लिहिण्याचा प्रयत्न करते. :) सध्या नियमित लिहीत राहणे हा निश्चय आहे. बघू कितीपत जमतो. :) धन्यवाद.