Wednesday, March 29, 2017

उन्हाळ्याची सुट्टी

          गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या वाढत्या त्रासाबद्दल आणि योग्य ती काळजी घेण्याबद्दल अनेक मेसेज वाचले. त्यावरून डोक्यात उन्हाळयाच्या सुट्टीचे विचार मनात यायला लागले. खरंतर पाऊस, पहिला पाऊस, पावसातलं प्रेम, हरवलेला पाऊस, डोळ्यातला पाऊस आणि त्यावर अनेक कवितांचा पाऊस दरवर्षी नेमाने येतो. तिकडे शिवाजीनगरला पाऊस पडला की इकडे वारज्यात दहा बातम्या आणि २-४ कविता धपाधप येतात.   आता इतकी सवय झाली आहे की लोकांच्या पोस्ट वाचून पावसाचा अंदाज येतो इकडे मला अमेरिकेत राहूनही. :) असो. तर मुद्दा असा की पावसाबद्दल जितकं लिहिलंय मी स्वतः तितकं कधी उन्हाळ्याबद्दल लिहिलं नाहीये, किंबहुना अजिबातच नाही. म्हणून म्हटलं या सर्व आठवणींची एक पोस्ट लिहावीच.  एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे या पोस्ट मध्ये 'गेले ते दिवस' असा सूर नसून 'आठवणी मांडण्याचा' विचार आहे. मला वाटते की प्रत्येक ऋतूची वेगळी एक गमंत असते ती प्रत्येकजण अनुभवत असतो. त्यासाठी लहानपणच हवे असे नाही. आताही ती येतेच, कधी मुलांचे पोहणे पाहण्यात, त्यांच्यासाठी आईस्क्रीम बनवण्यात किंवा त्यांच्या सुट्ट्या ते कसे घालवतात हे पाहण्यात. असो. 
           तर मला आठवणारा उन्हाळा म्हणजे परीक्षा संपल्यावरचा. तोवर परीक्षेच्या विचारांनी म्हणा किंवा अजून काय पण त्या परीक्षा संपली की उन्हाळा हे गणित डोक्यात एकदम पक्कं. तर शेवटचा पेपर टाकून घरी आलो की फार भारी फीलिंग असायचं. एकदम मोकळं मोकळं. काय करू काय नको असं व्हायचं. एकदा दोनदा तर आईने पापडाचे पीठ मळून ठेवलेलं होतं. आम्ही घरी आलो की लाटायला घेण्यासाठी. इतक्या वर्षात अजूनही माझी चिडचिड विसरले नाहीये त्यावर. दोन मोठी आकर्षणं असायची, टीव्ही आणि दुसरं पुस्तकं. टीव्हीवर फक्त दूरदर्शन त्यामुळे मर्यादितच पर्याय असायचे. पण त्यापेक्षा बरेच दिवस अभ्यासामुळे शेजारी पडूनही वाचता ना आलेलं पुस्तक बिनधास्त वाचायचं असायचं. तो त्या पहिल्या दिवसाचा उत्साह म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होती माझ्यासाठी. 
          पुढे मग रोज सकाळी लायब्ररीमध्ये जाऊन दोन तरी पुस्तकं घेऊन यायची. जेवण झालं कि दुपारी वाचत बसायची हे ठरलेलं. सायकलवरून जाताना डोक्यावर तापलेलं ऊन असायचं. घरात आल्याआल्या डोळ्यासमोर अंधारीच यायची. लायब्ररीयन माझी चांगली मैत्रीणच झाली होती. वेगवेगळ्या वयात वाचलेली निरनिराळी पुस्तकं आजही आठवणीत आहेत. दुपारी घरी अनेकदा आई हाक मारायची आणि ओरडायची की उत्तर देत का नाहीस म्हणून आणि मी चिडायचे की मला ऐकूच आली नाही. इतकी त्या वाचनात गुंग असायचे. अनेकदा भाऊ-बहीण, चुलत/आते  भाऊ-बहीण यांच्या सोबत खेळायचं सोडून बसायचे. स्वामी, श्रीमान योगी,पुलं, गंगाधर गाडगीळ यांची पुस्तके आणि बरेच काही वाचल्यावर, त्यात काय वाचलं हे मैत्रिणीला रोज सांगण्याची आठवणही आहे एक. त्या छोट्याशा गावातल्या लायब्ररीने खूप काही दिलं. आजही ते सोबत आहे आणि राहील. 
           पुस्तकं यायच्या आधी एकी खास आठवण म्हणजे आजोबांच्या सोबतची सकाळ. आम्ही आवरत असताना दारात कारंजाच्या झाडाखाली खुर्ची घेऊन आजोबा बसायचे. पेपर वाचत बसायचे. आणि दारातून सायकलवरून टोपली घेऊन जाणाऱ्या प्रत्येक  माणसाला हाक मारायचे. गावठी आंबे असायचे त्यात. माणूस थांबला की आबा आम्हाला,आईला हाक मारायचे. आम्ही मग आंबा चाखून बघणार. दर वगैरे आबाच ठरवणार. कधी कधी तर आम्हाला न विचारताच घेऊन टाकायचे. मग घरात एखाद्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक डझन आंबे असायचे. लहान असताना आम्ही रोज सकाळी दात घासून एकदम आंबे खायलाच बसायचो. दुपारी जेवणातही आमरस असायचा. अर्थात त्यासाठी खास रसाचे आंबेच लागायचे. नाहीतर मग चाखून खायचे आंबेच जास्त. सुट्टी संपायला येईपर्यंत आंबे खाण्याचा उत्साह पार संपून जायचा. 
         आंबे सोडले तर दुसरं आकर्षण होतं ते वेगवेगळ्या कलाकुसरीचं. कापडावर धागे विणून पिशवी बनवायची, रेशमी धागे जोडून वर्तुळावर नक्षी करायची असे छोटे मोठे उद्योग आई करायला द्यायची. पण ते पूर्ण कधी केल्याचं आठवत नाहीये. एक मात्र आठवतं ते म्हणजे दारातले चमेलीचे वेल. दोन दारांच्या दोन मजल्यापर्यंत उंच गेलेले वेल होते. सकाळी उठून दार उघडलं की वाऱ्यासोबत त्याचा घमघमाट यायचा. आम्ही बहिणी आवरून फुलं वेचायच्या घाईत असायचो. का तर जास्तीत जास्त ताजी फुले गोळा करून मोठ्यातला मोठा गजरा कोण बनवणार याची स्पर्धाच असायची. बनवलेला गजरा मळून संध्याकाळी गावातच चक्कर व्हायची, कधी काकूंकडे किंवा लायब्ररीत, नाहीतर भाजी आणायला. मोगरा, चमेली आणि त्यांचे सुवास आजही उन्हाळ्याची आठवण ताजी टवटवीत करतात. 
         दुपारचं जेवण करून आतल्या खोलीतल्या काळ्या फरशीवर पडून टीव्ही बघायला, झोपायला भारी वाटायचं. आजही घरी गेले की त्या खोलीत डाराडूर झोप लागते. संध्याकाळी कधी कधी सायकली घेऊन शाळेच्या ग्राऊंडवर फेरी मारायला जायचो. कधी चालत जायचो. तर कधी दारातच गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी दुसरं आकर्षण असायचं ते म्हणजे दारातून जाणाऱ्या आईस्क्रीमच्या गाडीचं. आबांना गाडी दिसली की ते थांबवायचेच. नाहीतर आम्ही पोरं होतोच आठवण करून द्यायला. जवळजवळ रोज स्टीलच्या छोट्या वाटीतून आवडत्या चवीचं आईस्क्रीम खायला मिळणं हा त्या काळातला सर्वात मोठा आनंद.
        रात्र होईल तसे घरात खूप गरम व्हायला लागायचं. केव्हा एकदा जेवण उरकून बाहेर येऊन बसतोय असं व्हायचं. पंखा कितीही मोठा ठेवला तरी कासावीस व्हायचं. टिव्हीवर जेवताना जे काही पाहिलं तितकंच. मग अंगणात येऊन बसायचो. बरेचदा लाईटही जायचीच. त्यामुळे अंगणात बसून आकाशाकडे पाहायला भारी वाटायचं. तितकं ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहून खूप वर्षं झाली. लहान असताना आबा गोष्टी सांगायचे. एकच गोष्ट थोडीफार बदलली तर 'तुम्ही काल असं सांगितलं होतं' म्हणून भांडायचो. उन्हाळ्यांत दारासमोरून उसाचे ट्रक, बैलगाड्या भरभरून जायचे. बैलगाड्या तर आम्ही मोजायचो एका वेळी किती जातात म्हणून. मग मागून एखादा ऊस काढून घ्यायचा. कधी ४-५ काढले तर ते गुऱ्हाळात घेऊन जाऊन रस काढून किटलीतून घेऊन यायचो. जवळच्याच गावात साखर कारखाना असल्याने तिथल्या मळीचा वासही ओळखीचा झाला होता. रात्र चढेल तसा तो वासही वाढायचा. 
        आम्ही जेवणानंतर कधी चालत जायचो तर काळ्या कुळकुळीत रस्त्यावरून चप्पल काढून चालायला भारी वाटायचं. जितके जोरात पळत जाऊ तितका जोरात अंगाला वारा लागणार.पण घरी आले की तितकेच जास्त गरमही व्हायचे. थोडी वर्षं आम्ही अंगणात गाद्या टाकून, मछरदाणी लावून झोपायचोही. तेव्हा रात्र वाढेल तसा लागणारा गार वारा कधी झोप घेऊन यायचा कळायचं नाही. जाग यायची तेव्हा उन्हं चढलेली असायची. तर कधी ६-६.३० लाच उजेडामुळे जाग यायची. मग आम्ही घरात जाऊन झोपायचो. :) कधी कधी मात्र वळवाच्या पावसाने एकदम धावपळ व्हायची आम्ही झोपेतून उठून कसेबसे आत पळत जाऊन गाड्या टाकून पुन्हा झोपून जायचो. एका रात्री बाहेर झोपलेलो असताना, मला काहीतरी अंगावर आहे असे जाणवले म्हणून ओरडले तर एक माणूस माझ्या गळ्यात चाचपत होता. पुढे काय झाले माहित नाही. बहुतेक तो चोर पळून गेला. पण तेव्हापासून बाहेर झोपणे बंदच झाले. अजूनही कधी ते आठवले तर एकदम भीती वाटते. अनेक वर्षात असा वाईट अनुभव पहिल्यांदाच आला होता. आता मात्र रात्री दारांना कुलूप लावून झोपावे लागते आई-दादांना. चोरीचे प्रमाण जास्तच वाढले आहे गावात. असो.
         सातवीच्या उन्हाळयात घरी कॅरम आणला. आई दादा दोघेही उत्तम कॅरम खेळायचे. दिवसभर आम्ही शिकायचो आणि भाऊ-बहिणी, घरात येणारे पाहुणे सर्व खेळायचे. रात्री मात्र आई, दादा आणि आम्ही चौघांपैकी दोन असे मिळून डाव मांडला जायचा. तेव्हा मजा यायची खूप. घरात पत्ते तसे कमी खेळले जायचे. दादांना जास्त आवडायचे नाहीत त्यामुळे. कधी कधी सख्खे,चुलत, आते भावंडं मिळून लपाछपी, पळापळी खेळायचो तर कधी उगाच शेतात भटकलोही आहे. अर्थात केवळ खेळच नाही तर अभ्यासही व्हायचा. आजोबा चुलत बहिणीला इंग्रजी किंवा संस्कृत शिकवायचे. मी तिच्याहून एकच वर्षाने लहान. त्यामुळे तिच्यासोबत मलाही बसवायचे. त्यामुळे इंग्रजी आणि संस्कृत सुट्टीमध्ये आणि परत पुढच्या वर्षी असं शिकले आहे. माझी खूप चिडचिड व्हायची सुट्टीत अभ्यास करावा लागतो म्हणून पण तेव्हा जे शिकले त्याने खूप काही मिळालं. मुख्य म्हणजे आजोबांच्या आठवणी. :) 
          मे मध्ये निकाल लागायचे, कधी खूष तर कधी नाराज व्हायचे. पण सुट्टीत पुन्हा विसरून जायचे. मेच्या शेवटी मात्र उन्हाने, दमट वातावरणाने आणि मोठ्या सुट्टीचा कंटाळा यायचा. शाळेचे वेध लागायचे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कधी एकदा शाळा सुरु होते असं व्हायचं. अर्थात अभ्यास, रुटीन यामध्ये यायला मन थोडं त्रास द्यायचं. शाळा सुरु झाली की महिन्याभरात सुट्टीबद्दल विसरूनही जायचे. किती छान होतं ते सारं. 
         इथे लिहिल्या इतक्या सगळ्या गोष्टी एकाच वर्षातल्या नसून अनेक वर्षांच्या आठवणींचा संग्रह आहे. माझ्या त्या काळातल्या छोट्या जगातल्या मोठया गोष्टी आहेत. आता विचार केला तर वाटतं तेव्हा हे सर्व अनुभवलं यासारखं सुख नाही. आता धावपळीत असा निवांत क्षण मिळत नाही. मुलांना त्यांच्या सुट्टीचा आनंद घेता यावा अशी खूप इच्छा असते, आहे. मागच्या वर्षी त्यांच्या सुट्टीत २ महिने भारतात राहिलो. दोघेही अजून त्या सुट्टीच्या आठवणी काढतात. त्यांनाही माझ्यासारखं काहीतरी आठवणीत ठेवण्यासारखं मिळावं, आमच्याकडून दिलं जावं हीच अपेक्षा आणि प्रयत्न आहे. आज या लिखाणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटलं. आता मी या वर्षीच्या आमच्या सुट्टीची वाट बघतेय.
:) 

विद्या भुतकर.

Tuesday, March 21, 2017

सिनेमाच्या गंमती

         लग्न व्हायच्या आधी आणि मुले होईपर्यंत आयुष्यात बऱ्याच मारामाऱ्या केल्या. एखादी ट्रिप किंवा ट्रेक किंवा मुव्ही पाहायला जाताना, पुढे काय होईल किंवा उद्या ऑफिस आहे तर मग आज नको असे फालतू विचार मनात कणभरही आले नाहीत. हे असले प्रकार सुरु झाले ही मुलं झाल्यावर. आता अचानक कुठेही बाहेर पडायला, रात्री उठून कुठेतरी लॉँग ट्रिपला, ड्राईव्हला वगैरे जाता येत नाही. एक दिवस जरी कुठे जायचं म्हटलं तरी लढाईला चालल्यासारखे सर्व सामान घेऊन जावे लागते आणि कितीही घेतले तरी जे नाहीये तेच बरोबर हवे असते.
         सर्वात जास्त फरक पडला तो म्हणजे आमच्या टीव्ही बघण्याला आणि उठून लगेच एखादा सिनेमा बघायला जाण्याला. गेल्या ७-वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिले त्यातले हिंदी तर अजून कमी. मुलांसोबत हिंदी चित्रपट पाहणे म्हणजे अतिशय त्रासाचं काम आहे एकतर त्यांना बरोबर शु-शी लागते, कंटाळा येतो, भीती वाटते, रडू येते. मागे 'प्रेम रतन धन पायो' बघायला जाऊन आलो तर मुलगा डोक्याला हात लावून बसला होता पुढचा अर्धा तास. तेव्हा तर ४ च वर्षाचा होता. :) असो. तर मुद्दा असा की एकूण बाहेर मुव्ही बघायला जाणे बंदच झाले आहे. 
        पण मला 'बद्रीनाथ की दुल्हनिया' बघायला जायची खूप इच्छा होत होती. पहिला आठवडा 'राहू दे' म्हणून सोडून दिला पण मागच्या शुक्रवारी मात्र राहवले नाही अजून एक आठवडा थांबले तर इथे थिएटर मधून तो सिनेमा गेलेला असतो.संध्याकाळी ७.१० झाले होते. म्हटले काहीही करून जायचेच. ८.१५ चा शो होता आणि पोचायला ४५ मिनिटे लागणार होती. तिथेही सीट्सना नंबर देत नाहीत. हाजीर तो वजीर. त्यामुळे लवकर पोहोचणं आवश्यक होतं. अजून जेवणही झालं नव्हतं.. एकदा जायचं म्हटल्यावर, पटकन ऑनलाईन तिकीट बुक केले. सकाळचा पास्ता गरम करून दोन डब्यांत भरला, एकेक संत्रं आणि पाणी घेतलं. कपडे बदलून १० मिनिटांत निघालो. मुलांना गाडीतच पास्ता आणि संत्रे खायला दिले. थिएटरला पोचलो ८.१० पर्यंत. आम्ही जेवण केलेलं नव्हतंच. पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक घेऊन आत गेलो आणि ५-१० मिनिटांत पिक्चर सुरु झाला. गर्दी कमी होती त्यामुळे सीटही चांगले मिळाले. पिक्चरही आवडला त्यामुळे एकूणच सर्व नीट झाले म्हणायचे. 
       आता यात काही खूप महान कार्य केले नाहीये पण मला वाटतं की या अशा अनेक छोट्या का होईना प्रत्येकाचा वेगवेगळ्या सिनेमाच्या आठवणी असतात. एकदा भारतात असताना मुलं लवकर झोपली म्हणून अचानक कुठला तरी सिनेमा पाहायला गेलो. दोन लागले होते, त्यातला 'खूबसूरत' पाहून परतलो. असे क्षण कमीच पण अविस्मरणीय असतात. म्हणजे कुणी पैसे नसताना उधार घेऊन पाहायला गेल्याची गोष्ट, कुणी एका गाण्यासाठी १० वेळा पाहायला गेल्याची तर हं आपके सारख्या सिनेमाला आख्खी फॅमिली घेऊन गेल्याची असो. तिकीट मिळालं नाही तर ब्लॅकने पाचपट दार देऊन पाहिल्याची आठवण. अगदी लास्ट मिनिट दोन टोकांनी धावत-पळत येऊन पिक्चर पहिल्याच्या आठवणी तर कुणाची आत जाऊन झोपल्याची आठवण. फर्स्ट दे फर्स्ट शो पाहायचाच म्हणून हट्ट करून अगदी पहिल्या रांगेतून पाहिल्याचंही ऐकलंय. अशा अनेक. 
        सिनेमा असा पाहणं यात खास काय असतं माहित नाही, पण ते लक्षात मात्र राहतं. तुमच्याही अशा काही गमती असतील तर जरूर सांगा. :) 

विद्या भुतकर.


अस्तित्व


Monday, March 20, 2017

स्वप्ना आणि सत्या- भाग ७

दोघेही एका हॉटेलमध्ये समोरासमोर बसलेले.
ती: मघाशी त्या दोघांना पाहिलंस?
तो(घास खाता खाता): कोण?
ती: तेच रे टेबलच्या एका बाजूला बसले होते?
तो: ओह.. मला नाही आवडत हे असलं.
ती: आता त्यात काय?
तो: समोरासमोर बसायचं, हे काय एका बाजूला बसायचं?
ती: मग प्रेमात असतं.
तो: आपण नव्हतो का कधी प्रेमात?
ती: असं काय अरे? किती क्यूट दिसत होते दोघं.
तो: क्यूट?
ती: मग काय? आपण पण होतो की असेच.
तो: हां पण हा असला फालतूपणा कधी केला आपण पब्लिकमध्ये?
ती: विसरलास? असा टेबलाखालून धरलेला हात?
तो(हसून): ते होय? आता ते लग्नाआधी होतं.
ती: मग आता लग्न झाल्यावर?
तो: आता काय? कधीही धरता येईल.
ती: मग का नाही धरत?
तो: हे काय नवीन?
ती: लग्न झालं म्हणजे या साध्या गोष्टी संपल्या?
तो: मी कुठे असं म्हणतोय? पण तू माझी बायको आहेस ते दाखवायची काय गरज आहे?
ती: पण मी म्हणते दाखवलं तर काय बिघडलं?
तो: माझं प्रेम आहे हे तुला दाखवायला ते चार चौघात कशाला सांगितलं पाहिजे? घरीही सांगता येतं !
ती:  पण समजा बाहेर हात धरला तर असं काय पाप लागतं? बायकोच आहे ना?
तो: तुझं ना? काहीही असतं? चार लोकांत हे असं वागणं शोभतं का?
ती: बरोबर. तुला माहितेय लग्नाआधी मीच नको म्हणायचे, कारण तेव्हा तू हक्काचा नव्हतास.पण हक्काच्या माणसाकडून हक्काचा हात मिळणं वेगळंच असतं. जाऊ दे तुला नाही कळणार.
तो: आणि या उलट 'आपलं माणूस आहे' हा स्टॅम्प लावायची गरज मला वाटत नाही. ते ज्याला कळायचं त्याला माहित असलं म्हणजे झालं. जाऊ दे तुला नाही कळणार.

दोघेही मुकाट्याने ताटात बघून जेवत राहिले. आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं भांडण झालं होतं.


विद्या भुतकर.

Thursday, March 16, 2017

हसरं बाळ

        सकाळी जाग आली तसे निशाने पलीकडे घड्याळाकडे पाहिले. अलार्म चुकलाच होता. नवरा आणि बाळ दोघेही गाढ झोपलेले होते. ती हळूच उठून बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आली तर झोपलेल्या विनयच्या बाजूला विहान इकडे तिकडे गंमत पहात लोळत पडला होता. तिला पाहिल्यावर तो आपलं बोळकं दाखवून हसला. त्याच्या मोठाल्या डोळ्यांत चमक आली. त्याच्या केवळ हसण्यानेही दिवस छान वाटतो हे तिला पुन्हा एकदा जाणवलं. 
तिनेही हसून,"ए ढमू उठलास होय? तरी किती हळू जायचं माणसानं? हां?" असं म्हणत त्याला हातात घेतलं. त्यानेही सकाळ सकाळी छान झोप झाल्याचं एक मोठठं हसू तिला दिलं. तिने त्याच्या वाढलेल्या कुरळ्या केसांच्या बटांमधून हात फिरवून त्याचे केस मागे घेतले आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.
        तिच्याजवळ आल्यावर पुढे काय होणार हे त्याला माहीतच होतं. तिनेही मग गादीवर मांडी ठोकली आणि त्याला दूध पाजायला सुरुवात केली. त्यानेही घाईघाईने दूध प्यायला सुरुवात केली. 
त्याचे केस कुरवाळत तिने विचारलं,"इतकी भूक लागली होती होय?". 
        भुकेचा भर कमी झाल्यावर दूध पिता पिता तो हाताने तिच्या गळ्यापाशी चाचपडू लागला. तिनेही मग सवयीने गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या हातात दिलं त्याच्याशी चाळा करत करत तो दूध पिऊ लागला. त्याचं चालू आहे तोवर निशाने विनयकडे पाहिलं. रात्री उशीरपर्यंत आवरा आवर करत बसला होता. तिने हलकेच आपला हात त्याच्या छातीवर ठेवला, तसा विनय एकदम दचकून उठला.
"अरे झोप झोप. तुम्ही बाप लेक दोघं सारखेच. कणभरही आवाज नको तुम्हाला की स्पर्श. असली कसली झोप ती?", निशा वैतागली.
विनय डोळे चोळत उठून बसला आणि म्हणाला,"अगं, कामं आहेत अजून बरीच. रात्री जरा कुठं आवरून झालं बाहेरचं. अजून थोड्या खुर्च्या हव्यात आणि ती भाड्याने सांगितलेली भांडीही घेऊन यायचीत."
"मला माहितेय, तरी मी अलार्म लावला होता. कधी बंद केला कळलं पण नाही. याचं पिऊन झालं की मी पण आवरते.",निशाने सांगितले.
१५-२० मिनिटांनी तिने विहानला पाजायचं बंद केलं. "चला महाराज, बास आता."
विनयकडे पाहून म्हणाली,"अरे याचं फीडिंग बंद  केलं पाहिजे. वर्षाचा होत आला."
विनयने त्याला हातात घेत म्हटलं,"हो.... मोठठे झालो आता आम्ही. दूध भाता खाणार, भाजी पोळी खाणार...."
विहानने त्यालाही मोठठं बोळकं काढून दाखवलं.
निशा आपला गाऊन बंद करत उठली आणि बाथरुमकडे गेली, आज भरपूर कामं होती. जाताना वळून म्हणाली,"आता बाप लेक एकदम रात्रीच भेटाल म्हणजे मला?"
विनयने विचारलं,"म्हणजे?"
"म्हणजे, लोक असले की मला कोण ओळख देतंय? ना तू ना तुझा लेक."
तसा विनय हसला हातातल्या विहानकडे बघत म्हणाला,"मग काय? हसरं बाळ आहे आमचं ते..."
तिने मान हलवली आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला.
          अर्ध्या तासात सर्व आवरून निशा किचनमध्ये गेली. सासूबाईंना म्हणाली,"तुम्ही कधी उठला? मला उठवायचं ना? गजर कधी झाला कळलंच नाही. "
त्यावर त्या म्हणाल्या,"असू दे गं. मी रात्री लवकर झोपले होते. दिवसभर आहेच काम परत."
त्यांनी आंघोळ करून कुकर लावला होता. कणकेचे मोठे गोळे मळून ठेवले होते. तिने विचारलं,"मी काय करू?"
"बटाट्याच्या भाजीचा कांदा चिरतेस का?" तिने मान हलवली आणि ८-१० कांदे चिरायला घेतले. सासूबाईंनी मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व सामान गोळा करायला सुरुवात केली.
        आज त्यांची नुकतंच लग्न करून गेलेली मुलगी विशाखा, तिच्या सासरचे ८-१० लोक, दुसरी मुलगी, तिचे कुटुंबीय घरी येणार होते. लग्नाला महिना पालटून गेला होता. लग्नाच्या घाईतून सर्व जरा रिकामे झाल्याने पुन्हा हा भेटीचा कार्यक्रम ठरला होता. घरातली साफ सफाई वगैरे निशा आणि विनयने रात्रीच केली होती. दोन्ही मुलींच्या सासरचे येणार म्हणून सासूबाई जरा जास्तच काळजीत होत्या. सून आणि मुलगा मात्र जमेल तितकं काम करत होतेच.
        सासू सुना जोमाने स्वयंपाकाला लागल्या होत्या. विनय, सासरे बाहेरचं सामान आणायला गेले होते. स्वयंपाक चालू असताना विहानची लुडबुड चालू होतीच. तिनेही त्याला २-३ वाट्या, चमचे खेळायला दिले होते. पण त्यावर थोडेच त्याचं भागणार होतं. कपाटातल्या वस्तू, कांदे बटाटे सर्व बाहेर येत होतं. मध्ये दोन तीन वेळा पडलाही तो आणि थोडा रडलाही. तिने त्याला काम करता करताच काखेत धरून ठेवलं पण कामापुढे थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतंच. तोही वेडा लगेच रडू विसरून पुन्हा तेच खेळ खेळत होता. लवकरच सासरे घरी आले तसं तिने त्यांच्या हातात एका ताटलीत थोडे पोळीचे तुकडे त्याला भरवण्यासाठी दिले आणि पुन्हा ती कामाला लागली.
        थोरली विश्पला लवकरच आली. सोबत नवरा, सासू सासरे आणि दीड वर्षाचा मुलगा होता. लेक आली तसे सासूबाईंनी हातचे काम सोडून नातवाला हातात घेतले. पण नातू लगेच रडायला लागला. 
मुलीने समजावले,"अगं गाडीत झोपला होता ना? थोड्या वेळात येईल तुझ्याकडे."
थोडे नाराज होत सासूबाई पोळ्या लाटायला बसल्या. वर उभे राहून निशा एका बाजूला भाजी परतत होती तर एकीकडे पोळ्या भाजत होती. नणंदेने पुढे होऊन विहानला हातात घेतले. तोही गेला लगेच तिच्याकडे. 
"काय करतो रे लबाडा....?" म्हणत तिने मोठी पापी घेतली. त्याने पुन्हा आपलं बोळकं दाखवलं. तशी नणंद म्हणाली,"वहिनी दात नाही आले याला अजून? ऋषीला तर ७व्या-८व्या महिन्यांतच यायला लागले होते."
"हां विचारलं होतं मी डॉक्टरांना तर म्हणाले, 'होतं असं. थोडे पुढे मागे झाले तरी चालते.'" निशाने तिला सांगितलं.
"पण बरंय, त्यामुळेच याची तब्येत अशी छान आहे. नाहीतर ऋषी बघा, किती खायला दिलं तरी तसाच. लवकर दात यायला लागले आणि तब्येत उतरली.",नणंद म्हणाली. तिने सासऱ्यांच्या हातातली ताटली घेऊन विहानला भरवायला सुरुवात केली. बोलत बोलत त्याची एक पोळी सम्पलीही.
"चांगलं आहे हो, दात नसूनही त्याने पोळी संपवली?" ताटली ओट्यावर ठेवत नणंद म्हणाली.
'आपल्या पोराला उगाच ही बाई दृष्ट लावतेय' वाटून निशाने मान फिरवली.. क्षणभर तिला विहानचा रागच आला. त्याला काय सारखं दिसेल त्याला बघून दात काढायचे असतात? आणि त्यात आवर्जून खाऊही खायचा? काय गरज असते त्याला?
पण पाहिलं तर तो पुन्हा आपल्या उचापत्या करायला पळून गेला होता. ढुंगण मागे काढत स्वतःला सावरत दुडूदुडू धावणाऱ्या पाठमोऱ्या विहानला पाहून तिला त्याला एकदम हातात उचलून घ्यायचा मोह झाला. पण काय करणार? काम होतं. निशा त्याच्याकडे पहात पुन्हा पोळ्या भाजू लागली.
         उरलेले सर्व पाहुणे आले. ताटं वाढली गेली. विनय आणि सासरेही आग्रहाने सर्वांना वाढत होते. निशा आत बाहेर करत हवे नको ते पहात होती. मधेच तिने विचारलं,'विहान कुठेय?' तर तो नव्या जावयाच्या मांडीवर बसून त्याच्याशी खेळत होता. 
मधेच मोठी नणंद येऊन म्हणाली,"वहिनी जरा वरण भात देता का एका ताटात? ऋषीने काहीच खाल्लं नाहीये मघापासून." 
निशाने तिला ताट आणून दिलं. नणंदेच्या पदराला लटकलेला ऋषी तिला दिसला. तिने घ्यायचा प्रयत्न केला पण तो काही कुणाकडे जात नव्हता. त्याची कुरकुर चालूच होती. किचनच्या एका कोपऱ्यात बसून तिने ऋषीला मागे लागून एकेक घास भरवायला सुरुवात केली आणि निशाला 'आपल्या पोराला अनेक वर्ष पाहिलं नाहीये' असं वाटलं. भाजी वाढायला म्हणून बाहेर गेली तर तो आता जावयाच्या मांडीवर बसून त्याच्या ताटातलं श्रीखंड खात होता. ती समोर आली तसा हसलाही.
तिने विचारलं,"घेऊ का?"
तसे जावईबापू म्हणाले,"मस्त खेळतोय तो माझ्यासोबत. असू दे."
आता तेच असे म्हटल्यावर काय करणार? ती मुकाट्याने निघून गेली. मनातल्या मनात हसणाऱ्या विहानला तिने एक चिमटा देखील काढला. निदान रडला म्हणून तरी माझ्याकडे येईल या विचाराने.
आत आली तर नणंद म्हणाली,"बरंय वहिनी तुम्हाला विहानकडे बघायला लागत नाही. नाहीतर हा.. सारखा मला चिकटलेला."
तिला वाटलं पटकन बोलून टाकावं,'उलट तुमचंच बरं आहे, तुमच्याजवळ तरी आहे, मला तर पोराला बघायलाही मिळालं नाहीये'. 
पण ती गप्प बसली.
       पाहुण्यांची जेवणं उरकली तेव्हांच ३ वाजून गेले होते. सासूबाई जेवायला बसू लागल्या. निशा 'येतेच' म्हणून बाहेर गेली.  पुन्हा एकदा विहानला शोधलं आणि त्याला मांडीवर घेऊन जेवायला बसली. पण त्याचं आईकडे लक्ष कुठे होते? तो ताटातल्या वाटीत हात घालू लागला तसे विनय म्हणाला,"थांब मी बघतो त्याला. तुम्ही नीट जेवण करून घ्या."
तिने नाईलाजाने त्याला विनयकडे दिले आणि म्हणाली,"तो प्याला नाहीये अजून. मी घेते त्याला जेवले की.. झोपवू नको त्याला."
तो,"अगं, आता तूच म्हणतेस ना बंद करायचे आहे? मग कशाला? मी झोपवतो त्याला. त्याने खाल्ले आहे आमच्यासोबत. तू जेव."
        ती मग नणंदा, त्यांच्या सासूबाई, संपली सासू या सर्वांशी गप्पा मारत जेवली. 
नंदेने विचारलेच,"वहिनी अजून बंद नाही झालं फीडिंग?". 
ती नाईलाजाने बोलली,"नाही अजून, जमतंच नाहीये. रात्री रडतोच."
नंणद म्हणाली,"ते होणारच. पण करायला लागेलच ना?"
       ती गप्प बसली. करायला तर लागणारंच होतं. भांडी, किचन आवरून निशा बेडरूममध्ये आली तर बेडवर दोन्ही बाजूनी उशा लावून विहान गाढ झोपला होता. आपल्याशिवायच तो झोपला म्हणून तिला कसंसं झालं. दोन क्षण त्याला पाहून ती पुनः पाहुण्यांशी बोलायला निघून गेली. नाही म्हणता म्हणता चहा पाणी करून सर्वाना निघायला संध्याकाळ होऊन गेली. जाता जाता प्रत्येक पाहुण्यांनी विहानला हातात उचलून घेतलं, त्याची पापी घेऊन त्याच्या हातात ऐपतीप्रमाणे एकेक नोटही टिकवली. पाहुणे गेल्यावर घर एकदम रिकामं झालं आणि मागे राहिली ती विहानची गडबड आणि बडबड. गप्पा मारत सगळेच त्याच्याकडे पहात बसले. 
"किती धडपड याची? सगळ्यांकडे राहिला, नाही?" सासूबाईं कौतुकाने म्हणाल्या. 
"हो ना, मी घ्यायला गेलो तर भाऊजींकडून यायलाच तयार नाही?", विनय पुढे बोलला. 
"कसा त्यांच्या मांडीवर बसून त्यांच्याच ताटातून त्यांच्या हातून जेवला.", सासूबाई बोलल्या. ती सर्वांचे बोलणे ऐकत चालत फिरत राहणाऱ्या विहानकडे कौतुकाने बघत राहिली. सासूबाईंनी पटकन जाऊन मीठ आणलं आणि नातवाची दृष्ट काढली अगदी सगळी सगळी बोटं मोडली. 
रात्र झाली तसे निशाला मात्र तिला राहवेना. जरा घाईनेच विहानला घेऊन बेडरूम मध्ये आली. सकाळपासून त्याला दूध न दिल्याने तिची छाती भरून आली होती. तिला आता दुखायला लागलं होतं. त्याला दूध देणे हा तिच्यासाठी आता नाईलाज होता. त्यात हा असा खेळकर पोरगा अजूनही गोड  गोड हसून खेळत होता. गादीवर ती बसल्यावर मात्र विहानला आईची आठवण झाली. तिच्याकडे येऊन आपले इतकुसे हात घेऊन तो तिच्या गळ्यात पडला. 
"इतका वेळ आईची आठवण नाही का आली?", ती रागानेच त्याला बोलली. त्यावरही त्याने आईला खळखळून हसून दाखवलं. मग भरल्या डोळ्यांनीच तिने त्याला दूध पाजायला घेतलं. 
        त्यानेही इतक्या वेळाने मिळालेला तो पान्हा घाईघाईने प्यायला सुरुवात केली. तिला राहून राहून रडू येत होतं. त्याच्या केसांत हात घालून ती त्याला गोंजारत होती आणि तोही तिच्या मंगळसूत्राशी चाळा करत दूध पीत होता. 
विनय आत आला तर त्याला कळेना ही रडतेय का? 
तो म्हणाला," अगं वेडाबाई रडतेस काय? तो हट्ट करत होता का प्यायला?"
तिने नाकारत मान हलवली. 
"मग?", विनय, "मग रडतेस का?" 
"सकाळपासून याला आईची आठवण आहे का बघ की?", ती रडत बोलली. 
"अगं पण त्यात इतकं रडण्यासारखं काय आहे?", त्याने विचारलं. 
"तुला नाही कळणार ते?", ती. 
"मग समजावून सांग ना?" तो हट्टाने म्हणाला. 
"अरे, विहान मोठा होतोय तसा तो आपल्या पायावर उभा राहील, स्वतः सर्व करेल."
"अगं पण त्याला अनेक वर्ष आहेत." विनय बोलला. 
"हो ना. पण आज हे असं त्याला दूध पाजण्यात जे आईपण आहे ती जवळीक कशी मिळणार परत? मी किती विचार करतेय बंद करायचं आहे. पण रात्र होत आली की जीव राहात नाही. आज त्याला लोकांशी खेळताना पाहिलं, जेवताना अगदी झोपताना पाहिलं तेंव्हा वाटलं तो मला सोडून किती सहज राहू शकतो. त्यात तो इतका हसरा मग काय? असाही सगळ्यांकडे राहतो. हे चार क्षणच काय ते फक्त माझे. आम्हाला दोघांना ही अशी जवळीक परत कधी मिळणार आहे? पण तरीही हे मला बंद करावंच लागणार आहे ना? आज ना उद्या? तो पुढे निघून जाईल आणि मी मात्र आई म्हणून इथेच असेन त्याला उराशी धरून. जन्माला तेंव्हा नाळ तोडताना इतका त्रास नाही झाला रे जितका यावेळी होईल." तिला रडू अनावर झालं होतं. दूध पिऊन समाधानाने झोपलेल्या आपल्या बाळाला तिने पुन्हा एकदा पाहिलं मनभरून आणि त्याला बराच वेळ तशीच धरून बसली.

विद्या भुतकर. 
          
      

Thursday, March 09, 2017

मावशी ती मावशीच असते

       मागच्या वर्षी भारतात जाताना एक काळजी होती,'मावशी' झाल्याची. आता यात काळजी करण्यासारखं काय ते पुढे कळेलच. पण मावशी म्हटलं की मला आमची मावशी आठवते. आई आणि मावशी या पाच भावानंतरच्या दोन मुली, त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक होती आणि आजही आहे. दोघीही बहिणी,'आपल्याला आईने जावई कसे अगदी सारखे शोधून दिले आहेत' म्हणत अजूनही नवऱ्यांच्या गोष्टी एकमेकींना सांगत बसतात. आई धाकटी, त्यामुळे मावशींमध्ये असलेला समंजसपणा तो आम्हालाही कायम दिसत राहिला , अजूनही दिसतो. 
       तर आम्ही लहान असताना वर्षातून एकदाच जाणं व्हायचं आजोळी, तिथेच मावशीही जवळच राहायची त्यामुळे सर्वांना भेटून व्हायचं मावशीकडून निघताना, रिक्षा पकडायला, बसटॉपवर येताना ती रस्त्यांत कोपऱ्यावरच्या बेकरीत थांबून आमच्यासाठी नानकटाईची बिस्किटं घेऊन द्यायची. त्याकाळी ती पर्वणीच होती. अशा मावशीकडे असल्याच्या अनेक आठवणी आहेत त्यातली ही पहिली. पुढे मी कॉलेजला तिकडेच राहायला गेले आणि बरेच वेळा शनिवारी-रविवारी खूप कंटाळा आला रूमवर की मावशीकडे जायचे. मावशीच्या हातचा चहा, साबुदाण्याची खिचडी, अजून बरंच काही आवडीने खायचे. अगदी एका आंब्याच्या सीझनमध्ये माझ्यासाठी आठवणीने आंबे आणले होते आणि लपवून ठेवले होते. मी वासाने बेजार. शोधून मिळेनात. सगळ्यांनी हसून घेतलं. पण शेवटी आमरस खाऊनच रूमवर गेले. 
       तर हे असे अनेक लाड, हौस मावशीकडे पुरवली गेली, ज्या परिस्थितीत, जशी जमेल तशी. त्याचसोबत हक्काने रागवलीही. एकदा कॉलेजमध्ये असताना एक मुव्ही आधी पाहून आले होते. मैत्रीण विचारायला आली म्हणून पुन्हा गेले. मावशीने नाही म्हटले होते जायला पण तरी गेले. परत आल्यावर रागावलेली मावशी पाहून भीती वाटली आणि अजूनही तो प्रसंग विसरणार नाही, कारण अशा अजून २-३ वेळाच ती माझ्यावर चिडली असेल. कॅम्पस मधून नोकरी लागली तेंव्हाही किती उत्साहाने भेटायला गेले होते. प्रत्येक परीक्षेत टेन्शन आले की तिच्याकडे जाऊन बसायचे रूमवरन. तर अशी आमची मावशी लाड पुरवणारी आणि रागावणारीही, परीक्षेत धीर देणारी. 
     पुढे माझी मुलं झाली तेंव्हा दोन्ही बहिणी मावशा झाल्या. सानूचे खाणे-पिणे, आजारपण, लाड सर्व पुरवलं त्यांनी आधी वाटायचं तिचे इतके लाड करतात तर स्वनिकला स्वीकारतील का? पण त्यालाही भेटल्या आणि त्याला एकदम आपलंस केलं. दोघांनाही त्यांच्याकडे देऊन मी अनेकवेळा बाहेर गेले आहे. त्यांच्यासोबत पोरांना सोडून एकदम बिनधास्त व्हायला होतं. सानू ६-७ वर्षाची होईपर्यंत घरात ही दोनच मुलं, मावशी मामाकडून लाड करवून घेणारी, पण त्याचसोबत कधी त्यांचं चुकलं तर रागावणारी. आम्ही इथे असतानाही त्यांच्याची बोलणारी मावशी. 
      गेल्या वर्षी मी मावशी झाले, मोठी मावशी. मी अमेरिकेत असल्याने बाळाला भेटायच्या वेळेपर्यंत ते एक वर्षाचं झालं. आम्ही दोघीही सुट्टीला भारतात गेल्यावर भेट होणार होती. वाटलं, आपल्या मावशीने जे प्रेम दिलं, माझ्या मुलांना त्यांच्या मावशांनी जे प्रेम दिलंय तसं आपल्याला देता येईल का? विशेषत: स्वतःची मुले असल्यावर त्याची तुलना त्यांच्याशी होईल का असे अनेक प्रश्न मनात होते. त्या मुलाचे मनसोक्त लाड करता येतील का असे वाटत होते. की आपल्या मुलांसारखे त्यालाही वळण लावण्याचा प्रयत्न करू? असे अनेक विचार करत आमची भेट झाली. 
      बाबू,म्हणजे भाचा आजारी पडला होता भारतात येताना त्यामुळे तो कुणालाच हात लावू देत नव्हता आणि आईला तर सोडतही नव्हता. पण मी गेले आणि त्याला घेतलं तर एकदम लगेच माझ्याकडे आला. आणि पुढचे दोन दिवस मला चिकटून राहिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले कसा काय माझ्याकडे गेला म्हणून. मीही छोट्या बहिणीला चिडवत राहिले की बघ तुझ्याकडे येत नाहीये पण माझ्याकडे आलाय. मग पुढे त्याला झोपवायचा प्रयत्न करणे, किंवा त्याला नुसते हातात धरून बसणे, त्याला बरं वाटावं म्हणून काही उपाय करणे किंवा खेळवणे यात मनातल्या सर्व शंका पळून गेल्या होत्या. त्यानंतर प्रत्येकवेळी भेटल्यावर तितक्याच लाडाने तो माझ्याकडे आला, राहिला आणि मलाही त्याला धरून बसावसं वाटत राहिलं. एक दिवस बहीण त्याला घरी सोडून बाहेरही जाऊन आली. 
          हे सगळं इतक्या सहजपणे झालं. जमेल की नाही अशा अनेक शंका मनात घेऊन बसले होते त्या किती सहजपणे दूर झाल्या. मी माझ्या मावशीच्या भूमिकेत नकळत शिरून गेले होते स्वतःलाही न जाणवता. भारतात असताना सर्वजण समोर असताना ही नाती सहजपणे अनुभवता येतात. पण हे असे वेगवेगळ्या देशात असताना अशी प्रेमाची नाती इतक्या दूर असतात, मग त्यात आपल्या मनात शंका येणं मला स्वाभाविक वाटतं. पण शेवटी मावशी ती मावशीच असते. तिचं प्रेम बहुतेक आईसारखंच आपोआप येत असावं.  

विद्या भुतकर.


Wednesday, March 08, 2017

आधीच भरलं वांगं त्यात थालीपीठ

       शीर्षक वाचून काय काय विचार केले असतील माहित नाही. भरलं वांगं हेच मुळात इतक्या लोकांचं आवडतं आहे आणि थालीपीठही. आजची ही पोस्ट आहे भरल्या वांग्याच्या थालीपीठाची. घरी अजूनही आई कधी कधी शिल्लक राहिलेल्या वांग्यांची, दोडक्याच्या भाजीची कधी आमटीची भाकरी करते. भाकरीच्या पिठात ती राहिलेली थोडीशी भाजी, तिखट, कांदा, कोथिंबीर घालून मोठ्या भाकरी थापते. आम्ही घरी असताना आवडीने अशा भाकरी खायचो त्यावर भरपूर तूप किंवा लोणी घेऊन. इथे माझ्याकडे भाकरीचे पीठ नियमित नसते, जे थोडंफार भारतातून आणते ते संपून जातं. घरून आणलेलं भाजणीचं पीठ मात्र मी फ्रिजर मध्ये ठेवून पुरवून वापरते. आता भाजणीचं पीठ पुरण्यास मुख्य कारण म्हणजे मी प्रत्येक वेळी थालीपीठ करताना भाजणीच्या पिठात थोडी कणिक, तांदळाचं पीठ, बेसन अशी भर घालून मळते त्यामुळे ते थोडे जास्त दिवस पुरतं.
       तर एकूण काय की मला अशा मसाल्याच्या भाजीच्या भाकरी करता नाही आल्या तरी थालीपीठ मात्र नक्की करते. कालच वांगी करताना थोडा जास्त रस ठेवला होता. भाजीही आज सकाळी डब्यात न नेता फ्रिज मध्ये ठेवली होती संध्याकाळी थालीपीठ करायची म्हणून. आज ती बनवताना आठवणीने थोडे फोटो काढून घेतलेत. कदाचित अनेक जणी करतही असतील. आजच एका मैत्रिणीशी बोलताना लक्षात आले की ती तव्यावरच थापते. माझ्या सासूबाईही तव्यावरच थापतात. त्यामुळे गरम तवा थोडा थंड करून करेपर्यंत बराच वेळ जातो. इथे मी फोटो इन्वा व्हिडीओ मध्ये आई करते तसे कापडावर थापून तव्यात टाकायची कृती देत आहे. सुरुवातीला थोडे हळू होते पण एकदा हात बसला की एकावेळी दोन तव्यात थालीपीठे पटापट होतात.

साहित्य: शिळी शिल्लक राहिलेली मसाल्याची भाजी,
एक बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर चिरून, धणे-जिरे पूड, मीठ, हळद, हिंग, १ चमचा तिखट,४ चमचे तीळ, भाजणीचे पीठ(भाजीत मावेल इतपत, साधारण एक वाटी भाजीमध्ये २ वाट्या पीठ मावते).
कृती: भाजी पूर्णपणे चुरून पिठात आधी मिस्क करून घ्यावी.
पीठ कोरडे असतानाच त्यात हळद, तिखट, हिंग, मीठ, तीळ, कांदा, कोथिंबीर, धणे-जिरेपूड सर्व साहित्य कालवून घ्यावे.
एका वाटीत थोडे गरम पाणी घेऊन पिठात लागेल तसे घालून पीठ मळून घ्यावे. (मी सर्व पीठ पातळ करत नाही. सर्व पीठ घट्ट मळून घेते आणि लागेल तसे प्रत्येक गोळा थापताना त्यात पाणी घालते.)
गॅसवर तवा किंवा जाड बुडाचा पॅन ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
एका ताटात एक रुमाल किंवा सुती कापड ओले करून पसरून घ्यावे. ( माझ्याकडे सध्या रुमाल नसल्याने मी जाडजूड टीशू पेपर आहेत बाऊंटी ब्रँड चे ते दुहेरी करून वापरते. ८ थालीपिठांना टिकतात. )
कणकेचा गोळा थोडे पाणी लावून त्या रुमालावर हातानं थापून पसरवावा. चार ठिकाणी भोके पाडून पुन्हा एकदा त्या थापलेल्या  थालीपिठावर पाणी मारून रुमाल ओला करून घ्यावा. (याने थालीपीठ रुमालावरून अलगद सुटून येते तव्यात.
रुमाल दोन्ही टोकांना धरून थालीपीठ तव्यात पालथे करावे. थोडा झटका दिल्यावर ते सहजपणे तव्यात उतरते.
एकदा ते तव्यात पडले की मग दोनीही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घ्यावे.
थोडे शिजण्यासाठी वरून झाकण ठेवले मिनिटभर, तरी चालते.  तेलावर परतून गेल्याने जास्त तेल वापरले जात नाही(आई तळूनही करते, ती चांगली लागतात पण तेल खूप खातात . )
दही, शेंगदाण्याची चटणी, थालीपिठावर भरपूर तूप घेऊन खायला मजा येते. सोबत लोणचं असेल आंब्याचं तर उत्तमच. :)

कधी कधी मसाल्याची भाजी दोन वेळा खायचा कंटाळा येतो. अशावेळी त्या भाजीची थोडी चव, भाजणीच्या पिठाचा खमंग वास, कांदा-कोथिंबिरीची चव, दाताखाली येणारे तीळ हे सर्व एकदम जमून येतं आणि जेवण एकदम झकास होतं मग. आधीच भरलं वांगं त्यात त्याचं थालीपीठ, मग काय? आजचा बेतही तसाच झाला. तुम्हीही करून बघा नक्की.
























विद्या भुतकर.

Tuesday, March 07, 2017

छोट्यांसाठी छोटे निर्णय

       मागच्या आठवड्यात डिस्नेच्या आईस स्केटिंग इव्हेंटला मुलांना घेऊन गेलो होतो. छान होता शो, विशेष करून दोघेही स्केटिंग शिकत असल्याने अजून पुढे काय शिकता येईल हे दाखवायला चांगले होते. तिकीट तसे महाग होते पण मागच्या सीट घेतल्या. तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे खाण्याचे पदार्थ, पाणी हे सर्व ४ पट किमतीचे होतेच. अनेकदा अशा ठिकाणी उगाच चिडचिड झाल्याने आता अशा गोष्टींचा त्रास कमी करायचा हे ठरवून गेलेले. बेसिक खाण्याचे आणि पाणी घेऊन शो ला गेलो. मुलांना सर्व आवडले. नेहमीप्रमाणेच तिथे असलेल्या खेळण्यांच्या स्टॉलवरून काहीतरी घेण्याचा हट्ट त्यांनी केलाही. ज्याची किंमत योग्य वाटली ते घेतलेही. स्वनिकला तिथे एक खेळणे आवडले जे आम्हाला जरा जास्तच महाग वाटत होते. तरी मी त्याचा हट्ट म्हणून लाईन मध्ये उभी राहून तिथे गेली. पण शेवटी इतके पैसे घालून ते घेण्याची इच्छा झाली नाही आणि हिम्मतही. सर्व शो चांगला होऊनही स्वनिक नाराज होऊन घरी आला.  आता एक आई म्हणून त्यांनी त्या शोबद्दल खुश व्हावे अशी आमची इच्छा असणारच. पण ती काही पूर्ण झाली नाही.
       खूप चिडचिड होते अशा अनेक ठिकाणी जिथे तुमच्या मुलांच्या हट्टाचा वापर त्या वस्तू घेण्यासाठी केला जातो आणि तेही अव्वाच्या सव्वा दर लावून. डिस्ने तर या बाबतीत नंबर एक वर असेल. असो. आपल्याला जे अनुभवता आलं नाही ते मुलांना मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. पण शेवटी आई-बाप म्हणून किती पिळवणूक व्हावी याला काही मर्यादा? यातील काही वस्तू घेऊन देऊही शकतो. कुणाला वाटेल,'This is a good problem to have'. पण ते तितकं सोप्प नाहीये. मी किंवा नवरा लहान असताना घरची परिस्थिती वेगळी होती शिवाय पैशाची किंमत जरा जास्तच समजावलेली होती आणि वेळप्रसंगी समजलीही होती. त्यामुळे तेच संस्कार मुलांनाही देता यावेत अशी धडपड नेहमी चालू असते.  मी आणि संदीपने बरेच प्रयत्न केले त्यादिवशी स्वनिकला समजवण्याचे पण त्याने ऐकले नाही. त्यादिवशी आम्ही नाराज झालो तरीही खरा आनंद पुढच्या वेळी त्यांना आईस स्केटिंग घेऊन गेल्यावर झाला. स्वनिक स्वतःहून म्हणाला की 'तो शो पहिला त्यामुळे मला आज स्केटिंगला जायची जास्त इच्छा होत आहे'. त्याचं हे वाक्य ऐकून मला आपल्या त्यादिवशीच्या निर्णयाचाही आनंद झाला. 
      
        तर आज काल असे अनेक प्रसंग येतात जिथे आम्हाला सारखे त्या त्या वेळी योग्य-अयोग्य ठरवावे लागते. उदा: बाहेर गेलेले असताना दुकानांमध्ये अनेक ठिकाणी चॉकलेट, गोळ्या, चिप्स, बिस्किटे इत्यादी समोर ठेवलेले असते. तिथे त्यांना काही मागण्यापासून, हट्ट करण्यापासून परावृत्त करणे हे तर कठीणच, शिवाय त्यांनी हट्ट केल्यावर तिथेच स्पष्टपणे 'नाही' म्हणून सांगून टाकणे, मग रडारड हे अजून अवघड. अगदी 'त्याच्या हातात अख्खा बिस्किटाचा पुडा आहे तर मला का नाही?' असे प्रश्नही येतात. असे प्रसंग येतातच. स्वनिकच्या बाबतीत तर असेही झाले आहे की तो म्हणतो,'माझ्या मित्राला फक्त चिकन नगेट्स असतात डब्यात रोज, मग मी का रोज वेगळं जेवण न्यायचं आणि संपवायचं? '. बरीच मुले डबा अर्धवट खाऊन उरलेला टाकून मोकळी होतात. अशावेळी त्याला तू स्वतःचा डबा पूर्ण संपव असा आग्रह किती दिवस टिकणार?
        बरं खेळण्यांच्या बाबतीतही तेच. मुलांकडे, मित्र-मैत्रिणींकडे अनेक महागडी खेळणी त्यांना दिसतात आणि तसेच एखादे घ्यावे म्हणून आग्रह करतात. अशा वेळी वाटते की प्रत्येक दिवस म्हणजे एक लढाई आहे. आणि ती लढाई किती दिवस लढाईची? बरं, समजा मुलांच्या चांगल्यासाठी ते केलंही, पण मग लाड पुरवणे आणि वळण लावणे यातली 'डॉटेड लाईन' कशी ओळखायची?
        आज अनेक वर्षात पहिल्यांदा मी दोघांसाठी व्हेंडिंग मशिनमधून चिप्स घेतले तर त्यांना कोण आनंद झाला. स्वनिकने दोनदा मिठी मारली. तसं पाहिलं तर १$ च्या आतली ती वस्तू पण 'घ्यायची नाही' हे त्यांना अनेकदा सांगितलं आहे. अशावेळी कधीतरी ती मिळाल्यावर होणार आनंद जो असतो तो खूप जास्त महत्वाचा वाटला. रोजच किंवा नियमित जर तेच त्यांना मिळाले तर त्याची किंमतही राहणार नाही असे वाटते. किंवा कधी कधी जेव्हा सान्वी माझी वांग्याची भाजी, तूप मीठ भात चवीने खाते तेंव्हा असं वाटतं आपण केलेला आग्रह योग्य होता. 
        मध्ये सानूच्या शाळेत एका कार्यक्रमात तिने सहभाग घेऊन घरी बनवलेल्या काही वस्तू तिने विकल्या. लोकांना वस्तू नको असतील तर ते कसे आपल्यासमोरून न बोलता निघून जातात असा वाईट अनुभव तिला त्या दिवशी आला. ते पाहताना वाईट वाटलं. पण तिला तो एक महत्वाचा धडा मिळाला त्यादिवशी. प्रोत्साहन म्हणून तिला १० डॉलर दिले. तिनेही मग नीट विचार करून, २-४ दुकाने फिरून आधी खेळणी पाहिली आणि एक ६ डॉलरचे सॉफ्ट टॉय आणि ४ डॉलरचे एक छोटे खेळणे घेतले. ती ते घेत असताना तिला दिसत होतं की 'अजून थोडे पैसे असते तर मी हे मोठं खेळणं घेऊ शकले असते'. तिचा चेहरा बघून वाटत होते की घेऊ द्यावे का पण तिनेही जास्त आग्रह न करता त्याच पैशात मिळेल ते घेतले. शिवाय 'स्वनिक रडत आहे तर मी त्याच्यासाठीही काहीतरी घेते म्हणाली'. तिचे ते बोलणे ऐकून एकदम भरून आल्यासारखं झालं. आपण इतके दिवस जे शिकवत आहोत ते योग्य आहे असं वाटलं. हे असे प्रसंग दुर्मिळच पण अनमोल.
         मी आणि नवरा दोघेही अनेकवेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात गेलो की मदत करण्याचा, निदान फोटो काढण्याचा, कधी कुणाच्या मुलांना सांभाळण्याचा किंवा जेवायला वाढण्यात जमेल तशी मदत करत असतो. आपल्या मुलाला घेऊन त्याचेच बघत बसणे आम्हांला दोघांनाही जमले नाहीये. मुलं लहान असताना अनेकवेळा वाटायचं की आपण पण तसं करावं का? पण ते जमलं नाही. आणि खरं सांगायचं तर त्यामुळे मुले बरीच सोशल झाली. कार्यक्रमात आम्हालाच चिकटून राहिली नाहीत. आजकाल आम्ही कुठे गेल्यावर सान्वी लहान मुलांना आनंदाने खेळवते. मागच्या पार्टीत डेकोरेशन करताना स्वनिकने येऊन विचारले की 'मी काही मदत करू का?' आणि मग एकेक करून तो आम्हाला वस्तू देत राहिला. हे सगळं त्यांना करताना पाहून आता खूप आनंद होतो. 
         आता ही पोस्ट केवळ मुलांचे कौतुक करण्यासाठी लिहीत नाहीये, आणि समजा केलं कौतुक आपल्या मुलाचं कधीतरी तर काय हरकत आहे नाही का? :) असो. तर मुद्दा असा, ही पोस्ट म्हणजे माझे विचार एकसलग मांडण्याचा प्रयत्न आहे. अनेकवेळा अजूनही आम्हाला छोटे मोठे निर्णय घेताना आपण चूक करत आहोत की नाही अशा शंका येतात. कधी वाटतं शॉर्टकट मारावा, घेऊ द्यावा मुलांना फोन कार्यक्रम चालू असताना आणि आपणही निवांत गप्पा मैत्रिणीशी माराव्यात. पण ही पोस्ट लिहिताना जाणवत गेलं की अशा अनेकवेळी घेतलेले ते छोटे निर्णय तेव्हा त्रासदायक वाटले तरी नंतर कधीतरी त्यातून आनंद मिळाला आहे. 
        तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर नक्की सांगा. या पोस्टमध्ये काही गोष्टीबाबत सूचना असतील तर त्याही सांगा. आई-वडील म्हणून त्या आम्हाला उपयुक्तच असतील. :) 

विद्या भुतकर.
       

Thursday, March 02, 2017

आनेवाला पल जानेवाला है.....

        गेल्या वर्षभरापासून रात्री उशिरा घरी परतताना हमखास जुनी गाणी ऑनलाईन रेडिओवर लावून ड्राइव्ह करत घरी येतो. त्यात दोन गोष्टी होतात, मुलं हमखास झोपून जातात आणि आमचे मनोरंजनही होते. रेडिओवरची ही जुनी गाणी म्हणजे वर्तमान कमी आणि भूतकाळात जास्त घेऊन जाणारी. अभ्यास करत, सांगली, पुणे स्टेशन आणि मग विविधभारती ऐकत रात्रीचे ११.२० व्हायचे. लगेचच मग यावरून झोपायचो. असेच लहानपणी एक महत्वाचा शोध मला लहानपणी विविधभारतीवर गाणी ऐकताना झालेला. मी आईला म्हटले,'किती बोअर आहे, सारखे बाईचा नाहीतर माणसाचा आवाज असतो त्या गाण्यांत?'. आई म्हणाली,"मग कुणाचा असणार?".. मग मी मनातल्या मनात सर्व लोकांचे 'बाई' आणि 'माणूस' असे वर्गीकरण करून पहिले आणि ते बरोबर झाले. तेंव्हापासून डोक्यातुन तो शोध गेला नाही. 
      मग पुढे त्याच 'बाई' आणि 'माणूस' आवाजात फरक समजायला लागला. हळूहळू 'मुकेश','हेमंत कुमार','मन्ना डे','रफी' हे आवाज जाणवू लागले. आईचं आवडतं गाणं कुठलं, दादांचं कुठलं हे कळायला लागलं. 'सुहानी शाम ढल चुकी...' आवडायला लागलं. बाईंमध्ये मात्र 'लता' किंवा 'आशा' असे दोनच ऑप्शन असायचे. मग एखाद्याचा आवाज ओळखायची सवय लागली. पुढे शब्द आले. त्यांनी मात्र जे मनाला घेरलं ते अजूनही सुटत नाहीये. विचार केला तर मी एका छोट्या मराठी गावात वाढले. तिथे हिंदी शिकले ते ३ वर्ष फक्त, ८ वी नंतर संस्कृत. चित्रपट दूरदर्शनवर पाहिले आठवड्यातून एक फारतर दीड(लाईट असेल, अभ्यास झाला असेल, शिकवणी नसेल आणि आई-दादा हो म्हणाले तर). अशावेळी त्या हिंदी गाण्यांचे शब्द, अर्थ समजणे हे मोठं आश्चर्यच वाटतं मला. 
       त्याचं श्रेय त्या काळच्या हिंदी गाण्यांतील समजणाऱ्या शब्दांना आहे असं वाटतं. किती साधे शब्द पण अर्थपूर्ण. 'जिंदगी की यही रीत है.... हार के बाद ही जीत है'. परवाच मी संदीपला असेच गाणी ऐकताना म्हटलं, या गाण्यातील जे त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहेत ना ती एकदा लिहून ठेवली पाहिजेत. म्हणजे कितीही काळ बदलला तरी ते सत्य बदलणार नाही. उदा:'आनेवाला पल जानेवाला है....','कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है केहना', 'इक दिन बिक जायेगा माटी के मोल', अशी अनेक वाक्यं. ती गाणी ऐकली की वाटतं हे तर आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे. 
        मग काही गाणी ज्यांनी प्रेमाच्या प्रेमात पाडलं.. जेव्हा आयुष्यात अभ्यास, शाळा, घर इतकेच होते, तेव्हाही प्रेम म्हणजे काय असेल असा विचार करायला लावणारी गाणी. 'जब दीप जले आना...', 'जानेमन, जानेमन तेरे दो नयन..','है अगर दुष्मन..दुष्मन जमाना गम नहीं.. ','कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है..','अखियों के झरोको से मैने देखा जो सावरे..'. अशी अनेक गाणी. रेडिओवर या गाण्यांना ऐकण्याचा जणू छंदच जडला. त्यातले शब्द, प्रेम, गंमत हे अगदी सहजपणे कळत गेलं. त्यात कुठेही धावपळ नाही, घाई नाही आणि बाकी सर्वांसोबत गोड आवाजही. अजून काय हवं होतं? मला वाटतं माझ्या कवितांमध्येही त्यांचाच प्रभाव असणार आहे. कारण काव्य अवघडच असलं पाहिजे असा अट्टाहास या गाण्यांत कुठेही नव्हता. अगदी सहजपणे बोलता यावं, सांगता यावं असं काव्य ऐकलं आणि तसंच लिहिलं गेलं.मग पुढे गुलजार ऐकला, जगजीत अनुभवला आणि त्या गाण्यांवरचं प्रेम अजून गहिरं होत गेलं. तेही कधी कवितेत उतरलं. 
        बरेच दिवस झाले याबद्दल लिहायची इच्छा होती पण राहून जात होते. आजही जी हिंदी गाणी लागतात ती मला आवडतात, काही कानठळ्या बसवणारी असतात काही अगदीच निरर्थक, जसे आजकाल 'तम्मा तम्मा लोगे' चालू आहे. ती ऐकून सोडून दिली जातात . पण एके काळी मला ही जुनी गाणी ऐकायची संधी मिळाली, अनुभवली, आणि आयुष्यभर ती सोबत राहतील हा एक मोठा खजिना आहे माझ्यासाठी. आणि हे मी कधीही विसरणार नाही. 

विद्या भुतकर. 

Wednesday, March 01, 2017

बटाट्याच्या काचऱ्या

       गेले काही दिवस झाले मुलगी म्हणत होती की मला बटाट्याची सुकी भाजी खायचीय, आजी करते तशी. दोनेक वर्षांपूर्वी कधीतरी खाल्ली असेल तिने आईच्या हातची भाजी तिला त्याची आठवण येत होती. आता मी ती का करत नसेन नियमित याला काही कारण असं नाहीये पण होत नाही. मग आज शेवटी सकाळी डब्याला देण्यासाठी बनवली आणि एकदम बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. सकाळी आवरायची, शाळेची गडबड, त्यात भाजीचा फोडणीचा वास, पोळ्या हे सगळं एकदम ओळखीचं वाटू लागलं. कुणी याला नुसती बटाट्याची भाजी म्हणत असेल, कुणी बटाट्याचे काप, आम्ही याला बटाटयाच्या काचऱ्या म्हणतो. :) 
       तर कोरेगांवमध्ये आठवड्यातून एकदाच बाजार भरायचा पूर्वी, दर सोमवारी. आई, आम्ही शाळेत गेलेले असताना, बाजारात जाऊन वायरच्या बास्केटमधून भाज्या, फळे, पालेभाज्या इ त्या त्या ऋतूप्रमाणे घेऊन यायची. आम्ही शाळेतून येईपर्यंत तिचे बरेचसे निवडून झालेलं असायचं. मग त्यात आम्हाला निवडलेली चवळी, सोललेल्या मटारमध्ये बारीक, गोड लागणारे वेगळे काढलेले मटार, पेरू, देशी केळी, तोतापुरी आंबा अशा अनेक गोष्टी मिळायच्या. मला त्या देशी केळांचं शिकरण मला खूप आवडायचं. आठवड्यातून ३-४ वेळा माझं मी एका पेल्यात बनवून घ्यायचे. असो. 
       तर तेंव्हा आमच्याकडे फ्रिज नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा पालेभाज्या, ओल्या भाज्या इ. पहिल्या ३-४ दिवसांत संपून जायचं. त्यातलं चाकवताचं गरगट बरेचदा सोमवारीच व्हायचं. मेथी, पालक, पोकळा वगैरे कधी डब्याला असायचे. अख्खा आठवडा ७ लोकांचं दोन वेळचं जेवण, डबे करेपर्यंत सर्व भाज्या संपून जायच्या. आणि त्या भाजीच्या टोपल्यात कांदा, थोडा लसूण आणि थोडे बटाटे उरलेले असायचे. बरेचदा रविवारी रात्री ऑम्लेट नसेल तर बटाट्याचा रस्सा नक्कीच असायचा. आणि ते नाही झालं तर सोमवारी सकाळी या बटाट्याच्या काचऱ्या हमखास असणारच. तर अशा अनेक सोमवारी सकाळी डब्यांत या काचऱ्या घेऊन गेल्याच्या आठवणी आज एकदम ताज्या झाल्या. 
       बरेचदा घाई असल्याने कांदा थोडा जास्तच भाजला जायचा. पण डब्यांत त्या एकदम मस्त लागायच्या, त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. माझ्या आईच्या जरा मोठया असतात, फोटोत मी केलेल्या छोट्याच आहेत.  शाळेतच असे नाही कधी एखाद्या प्रवासाला जायचे असेल, सहलीला वगैरे तर खराब न होणारी भाजी म्हणजे हीच.  अनेकदा दादांनाही प्रवासाला जाताना बनवून ठेवलेली असली की आमच्या डब्यातही तीच भाजी असायची. 
      आज सान्वी दोन पैकी दीड पोळी संपवून आली त्यामुळे यापुढे त्या नियमित द्यायला हरकत नाही असे वाटू लागले आहे. कदाचित माझ्यासारख्याच तिलाही त्या नंतर कधी आठवण करून देतील,तिच्या शाळेची, या दिवसांची. :)
आता यात विशेष काही रेसिपी अशी नाहीये पण तरीही इथे देत आहे. मुलांना डब्यात देताना चपातीला थोडे लोणच्याचा खार आणि दुसऱ्याला केचप लावून त्यात भाजी घालून रोल बनवून दिले.
मी वरण, चपाती आणि भाजी घेऊन गेले. :) मस्त जेवण झाले. :)

साहित्य: तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांडा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर. 

कृती: कांदा आणि बटाटा चिरून घ्यावेत. यात बटाटा कापण्याचा पद्धतीने मात्र नक्कीच फरक पडतो. शेवटच्या फोटोत दिसत आहेत तसे पातळ, बारीक काप करून घ्यावेत. 
तेल थोडे नेहमीपेक्षा जास्त. नॉनस्टिक पॅनमध्ये जास्त नीट होतात. 
तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. लगेच कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी. 
एकदा परतून त्यात बटाटा घालावा.
मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे. 
साधारण १५ मिनिटांत भाजी होते. 

या १५ मिनिटांत मी मात्र आमचं आख्खा गाव, घर, बाजार, शाळा सर्व फिरून आले. :) 

विद्या भुतकर.



अपेक्षा


Tuesday, February 28, 2017

प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....

डिस्क्लेमर: खालील प्रसंगातील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा माझ्याशी कणभरही संबंध नाहीये. तसे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि असलाच कुणाशी संबंध तर तो तुमच्याशी असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे पोस्ट वाचून झाल्यावर एकदा स्वतःला आरशात जरूर पाहून घ्या. 

वेळ: अमेरिकेतील रविवार सकाळ , भारतातील रविवार संध्याकाळ
कल्पनाने कॉन्फरन्स कॉल सुरु केला. कॉल सुरू होतानाच पुन्हा एकदा तिने ऐकले, 'प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....'
सगळं जग त्या म्यूटवरच चालू होतं....

कल्पना: 'हाय, धिस इज कल्पना. एनिवन देअर?'
कुणाचंही उत्तर आलं नाही तसे तिने स्पीकर चालू करून म्यूटचे बटण दाबले.
'अरे तिला भूक लागली असेल तो फॉर्म्युला मिक्स करून देना तेव्हढा?' तिने नवऱ्याला सांगितलं.
'किती घालायचं पाणी?' त्याने ओरडून विचारलं.
'बघ ना तूच त्यावर सूचना दिल्या आहेत.' ती आतल्या खोलीतून ओरडली.
'हाय' फोनवर आवाज आला तसे तिने अनम्यूट करून,'हाय धिस इज कल्पना व्हूज देअर?' विचारलं.
'हाय कल्पना धिस इज कृष्णा. हाऊ आर यू?', कृष्णाने विचारले.
'आय एम गुड. हाऊ आर यू?' तीन विचारले.
'गुड ...गुड.....', कृष्णा.
'गुड...' कल्पना.
इतके गुडगुड होईपर्यंत तिकडे कल्पनाच्या पोरीने भोकाड पसरलं होतं. कल्पनाने रूमचा दरवाजा लावून घेतला.
'सो व्हॉट इज द स्टेट्स ऑफ द प्रोग्रॅम नाऊ?' तिने विचारले.
'या इट इज टेस्टेड. नीड यूर इनपुट. आय सेंट यू अन ईमेल. कॅन यु चेक?', कृष्णा.
ती मेल चेक करेपर्यंत त्याने म्यूट केले होते.त्याचा बायकोने त्याला हाक मारली होती.
'डिनर इज रेडी....', बायको.
त्याने फोन चालू असल्याने हातानेच सांगितले आणि भूक लागल्याची खूण केली. ती राईस सांबार आणायला किचनमध्ये गेली.
'कृष्णा, ये इसमे कुछ टेस्ट केसेस मिसिंग लग रहे है?', कल्पनाने दार उघडून आत आलेल्या पोरीला तोंडावर बोट ठेवून 'शूSS' करून अनम्यूट केले होते.
मग कृष्णाने अनम्यूट केले. तोवर स्वयंपाकघरात दोन तीन वाट्या प्लेट पडल्याचा आवाज आला. त्याने हातात लॅपटॉप घेऊन जाऊन बायकोला रागाने हातवारे करूनच विचारले, 'काय झाले?'.
तिच्या हातात विसळलेली अजून २-४ भांडी होती.
'सॉरी अबाऊट द्याट.' कृष्णा.
'इट्स ओके. तो वो टेस्ट केसेक का...',कल्पना.
'येस, आय विल ऍड मैनाक हियर. कॅन यु होल्ड?',कृष्णा.
'येस प्लिज..',कल्पनाने असे म्हणत पुन्हा फोन म्यूट केला आणि मघापासून समोर उभ्या असलेल्या मुलीला मांडीवर घेतलं आणि बाटली हातात घेऊन दूध पाजू लागली. मागून आलेल्या नवऱ्याकडे तिने रागाने पाहिलंच.
दोनेक मिनिटांनी...
'हाय धिस इज मैनाक. येस कल्पना. व्हॉट इज मिसिंग?', मैनाक.
कल्पनाने अनम्यूट करून बोलायला सुरुवात केली. दूध बऱ्यापैकी पिऊन झाल्यामुळे मुलगी मांडीवरून पळून गेली होती. हातातली बॉटल खाली ठेवून ती बोलली,'मैनाक, I had told you to add exception scenarios and negative test cases too.'.
 'Yes Kalpana, sorry, but I didn't get a chance to work on that today.', मैनाक बोलला. रविवारी दिवसभर काम करून त्याला आधीच चिडचिड होत होती. अजूनही तो ऑफिसमध्येच होता.
त्यांचे बोलणे होईपर्यंत कृष्णाने म्यूट करून सांभार राईस हातात घेतला होता. सांबार भुर्रकन ओढताना त्याला जोरजोरात ठसका लागला.
तो पाणी घ्यायला जाणार इतक्यात कल्पना म्हणाली,'So you should have checked with Krishna for someone to help you.' कृष्णा आपले नाव घेतल्यावर तिथेच थांबला. बायकोला 'पाणी आणशील का?' विचारायचे तर ती तिची सिरीयल सुरु करून बसली होती.
त्याने उबळ तशीच दाबली आणि बोलला,'येस कल्पना, पर अभी सब बिझी है. कोई और इसमें लेकर आना मुश्किल है.' कसंबसं ते वाक्य पूर्ण करून त्याने फोन म्यूट केला आणि जोरजोरात खोकत किचनमध्ये गेला. त्याच्या बायकोने,'होपेलेस आहेस' टाईप्स लुक दिला आणि पुन्हा टीव्हीत डोकं घातलं.
तिकडे मैनाकच्या मैनेने संध्याकाळपासून एका पाठोपाठ फोनचा सपाटा सुरु केला होता. त्यानेही फोन म्यूट करून तिचा फोन घेतला.
'अरे बाबा I am in a meeting.' त्याने वैतागून सांगितले.
'I knew it,  you didnt even want to go out with me.' मैना.
'I do dear. But give me 10 mins, I'll be there.', त्याने गयावया केली.
'ok, I'll wait for another 10. Not more.', मैना.
'थँक्स डिअर', मैनाक.
हे चालू असताना, कृष्णाने प्रोजेक्ट प्लॅन ओपन केला आणि प्रत्येकाचे काम काय आहे हे सांगायला सुरुवात केली.
'कॅन यु सी माय स्क्रीन?',कृष्णा.
'येस, येस....' कल्पना म्हणाली. पण तोवर तिच्या नेटवर्कला काही प्रॉब्लेम आला आणि आता ती कितीही बोंबलली तरी तिचा आवाज पलीकडे जात नव्हता. तिने कॉल बंद करून पुन्हा सुरु केला. तेव्ह्ढ्यातही तिने किचनमध्ये भाजी गॅसवरून उतरून कट्ट्यावर ठेवली, पोळ्यांची कणिक भांड्यात घेतली.
कॉल सुरू केल्यावर सर्वांचे पुन्हा एकदा 'हाय हाय' झाले.
'नाऊ कॅन यु हिअर मी?' तिने सर्वाना विचारले.
'येस' म्हणून कृष्णाने पुन्हा स्क्रीन शेअर केली. तो स्क्रीनवर काहीतरी दाखवत बोलत आहे तोवर त्याच्या स्क्रीनवर एका मित्राचा मेसेज दिसला,'नेक्स्ट विकेंड पार्टी पक्का ना?'.
त्याने घाई घाईने मेसेज बंद केला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. पण मित्राला काही चैन नव्हती.
'इस बार, वेट बार चाहिये पार्टी में. मैं तो मंडे छुट्टी लेनेवाला हूं...तू भी ले लेना...', मित्राचे एकामागे एक मेसेज येतच होते आणि कृष्णा धडाधड ते बंद करत होता.
शेवटी त्याने 'Do not disturb' स्टेट्स लावून बोलायला सुरुवात केली.
'कल्पना, See, कोई और रिसोर्स नहीं है अभी.'.
'But the client needs it done this week.', ती वैतागली. शिवाय मागे नवरा पोरीला सोडून स्वतःचे आवरायला गेला होता. पोरीने हिच्या लॅपटॉपचा चार्जर काढून घेतला होता. लॅपटॉप मरायला टेकला होता.
तिकडे म्यूटवर मैनाक, घडयाळाच्या काट्याकडे बघत बसला होता. त्याच्या मित्राने त्याला कॅन्टीन मधून पोहे आणून दिले. 'थँक्स यार' म्हणत पोह्याचे दोन घास खाल्ले. रात्रीची जेवायची वेळ झाली तरी अजून सुट्टी झाली नव्हती. पोटात कावळे जोरजोरात कोकलत होते.
'Yaar, she is waiting for me for an hour, can you hold this for a minute? Let me freshen up and come? If they call me, just dont say anything.' म्हणत मैनाकने हेडफोन मित्राच्या कानाला लावला आणि अजून दोन घास तोंडात घालत बाथरुमकडे पळाला.
मागे कल्पना आणि कृष्णा आणखी कुणाला काम लावता येईल त्याचा हिशेब करत होते.
'I think Reena would be good fit, she has worked on this project.',कल्पना.
'वो शादी के लिये जा रही है नेक्स्ट वीक', कृष्णा .
'ओह...फिर तो मैनाक कोही ये काम खतम करना पडेगा. मैनाक... मैनाक.... कॅन यु हिअर मी?',कृष्णाने विचारले.
आता मित्राला फोनवर काही बोलताही येईना. समोरून मैनाक पळत येताना दिसला. तोवर...कल्पनाच्या पोरीने भाजीचं भांडं कट्ट्यावरून खाली ओढलं होतं. नवरा कुठे दिसत नव्हताच.
'ओके असाईन इट टू मैनाक. I need to go now....' म्हणत कल्पनाने फोन बंद केला.
मैनाकने फोन अनम्यूट केला तेंव्हा कृष्णा त्याला म्हणाला,'मैनाक I need you to finish this work as soon as possible. I'll send you the details in an hour.'
इतका वेळ जागेवर नसल्याने त्याला काही बोलताही येईना. तिकडे मैनेचा फोन येतंच होता.
त्याने 'ओके' म्हणून फोन ठेवून टाकला आणि मैनेचा फोन घाईने उचलला.
कृष्णाने अजून दोन वडे सांबार मध्ये घेतले आणि टीव्ही बघत खात बसला. कल्पना पोरीला आणि किचन साफ करत बसली.
तिच्या नवऱ्याने, कृष्णाच्या बायकोने आणि मैनेने,'संपला एकदाचा कॉल' म्हणून दीर्घ श्वास घेतला.


विद्या भुतकर.  

Monday, February 27, 2017

Friday, February 24, 2017

स्वप्नाळू : भाग ४ (अंतिम )

        पुढचे अनेक दिवस असेच सरले. कुणीच कुणाचा रुसवा काढायला आलं नाही की गेलं नाही. मुक्ताने एक दोनदा मेसेज केले होते केदार आणि नितिनलाही पण त्याच्यावर कुणाचंच उत्तर आलं नव्हतं. ज्याला त्याला विचार करायला वेळ दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे हे मुक्ताला कळत होतंच. ऑफिस तर चालूच होतं. 
असेच एक दिवस जेवताना पूनमने तिला विचारलं,"काय गं किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? काही सांगत पण नाहीस. "
ती बोलत असतानाच मुक्ताने आपल्या डब्यातली भाजी पूनमला वाढली. ते पाहून पूनम पुढे म्हणाली,"हे बघ मला नुसतं असं खायला घालून मी शांत होणार नाहीये. तुझं काय चाललंय ते सांगशील का?" 
शेवटी मुक्ता बोलायला लागली,"अगं खरं सांगायचं तर भांडण असं कुणाचंच कुणाशीच झालं नाहीये पण प्रत्येकाला माहितेय काय घडलं आहे ते. मला कळलंच नाही कधी त्याच्यात जीव अडकला. नसते उद्योग. कुठे एकदाचं माझं काम मार्गी लागत होतं तर मधेच दुसरंच काहीतरी उद्भवलं. "
पूनम,"मग तुला केदारशी लग्न करायचं नाहीये का? तसं त्याला क्लिअर सांगून टाक ना? आता त्याच्याशी संबंध ठेवायचेच नाहीत तर मग हॉटेलच्या कर्जाचंही बघ बाई. आणि असंही तुम्ही एकत्र काम कसं करू शकणार आहे हे सर्व झाल्यावर?"
मुक्ता वैतागली,"पूनम अगं केवळ, लग्न आणि हॉटेल हाच मुद्दा नाहीये. आमची इतक्या वर्षाची मैत्री आहे ती अशीच तोडायची का? सगळा गोंधळ आहे नुसता. " तिने डबा बंद केला आणि पूनमच्या जेवणाची वाट बघत बसली. 
"नितीनशी तरी बोललीस का? तो काय म्हणतोय?"पूनमने विचारलं. 
"तो काय बोलणार? आमचं त्या दिवसानंतर काहीच बोलणं नाहीये. मुळात असेही आम्ही बोलत कुठे होतो जास्त?" तिने उपहासाने वाक्य टाकलं.
"जाऊ दे उगाच त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ठीक आता." म्हणत मुक्ता उठलीच. पूणमलाही मग तिच्या सोबत निघावं लागलं. 
        मुक्ताचं मन आजकाल स्वयंपाकात रमत नव्हतं. त्यामुळे काहीतरी बनवून टाकायची ती आणि बाकी बराचसा वेळ विचार करण्यात. पण जित्याची खोड कशी जाणार? मन रमवण्यासाठी तिने मसाले बनवायला सुरुवात केली. धणे-जिऱ्याची पूड, गोडा मसाला, भरल्या वांग्यासाठी मिक्स ओला मसाला हे तिचं चालू झालं. मधेच तिने भाजणीसाठी डाळी, तांदूळ, ज्वारी सगळं धुवून भाजून घेतलं. धान्य भाजता भाजता ती केदारच्या प्रपोजलचा विचार करत होती आणि तिला एकदम काही आठवलं.
तिने केदारला फोन केला त्याने उचलला नाहीच.
मग मेसेज केला,"एकदा तरी बोलायला संधी देणार आहेस की नाही?"
यावर मात्र उत्तर आलं होतं,"बोल". 
तिने मग त्याला परत कॉल लावला. यावेळी त्याने उचलला.
"मला तुला भेटायचं आहे. " तिने अधिकाराने सांगितलं. 
"पण..." तो. 
"पण-बीण काही नको. आपण काही लहान मुलं नाहीयेत हे असं कट्टी करून बसायला. तू येणार आहेस की नाही सांग? तुझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवते." 
त्याने नाराजीनेच 'हो' म्हणून सांगितलं. 
तिने अधीरतेने त्याच्यासाठी पनीर मसाला आणि पुलाव बनवायला घेतला. तिच्या वागण्यात जरा चंचलता आली होती. तो आल्या आल्या तिने हसून दार उघडलं. त्याचा चेहरा अजून रुसलेलाच. 
ती," काय रे काही लागलंय का?" त्याने नकाराने मान हलवली. 
"मग इतका चेहरा पाडून का बसला आहेस? हास की?" तिने त्याला चिअर अप केलं. 
"हे बघ केदार, तू ना मला कन्फ्युज केलंस. आणि हो, एक चूकही केली आहेस त्या दिवशी प्रपोज करताना.", ती बोलली.
त्याने वर पाहिलं. 
"हे बघ तू मला आधी लग्नाचं विचारलंस आणि मग बिझनेस बद्दल. बरं, हे दोन्ही एकत्र तर केलंच शिवाय हेही म्हणालास की तुम्ही मुली फार सेंटी असता, उगाच इमोशनल होऊन बिझनेस करता. आणि आता तू काय करत आहेस? तुला सांगते, आपण हे बिझनेस आणि लग्नाचं एकत्र काढायलाच नको होतं."
"आणि नितीनसोबत चालेल?" त्याने कुत्सितपणे विचारलं. 
"अरे थांब ना! मला बोलू दे. हे हॉटेल माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे, होय ना?" तिने विचारलं.
"हम्म..", तो.
 "आणि माझ्या लक्षात आलं की आपण ते 'झालं तर दोन्ही नाहीतर काहीच नाही' असा विचार करून काहीच बोलत नाहीये. बरोबर ना?"
"ह्म्म्म" तो हुंकारला. 
"म्हणजे बघ, जर फक्त लग्नाचा विषय असता तर आपण तेव्हाच बोलून मोकळे झालो असतो ना? पण तू तरी माझ्याशी भांडून, संबंध तोडलेस का? नाही ना? आणि बिझनेस असता केवळ तर जरा समजून-समजावून पुन्हा बोलून आपलं स्वप्नं पूर्ण केलं असतं. बरोबर की नाही? मला वाटतं, आपण सध्या लग्न हा विषय थोडा बाजूला ठेऊ, तुला काय वाटतं?"
"असा कसा बाजूला ठेवू मुक्ता?" त्याने चिडून विचारले. 
"कसा म्हणजे? लग्न झालंय का आपलं? बोलू ना त्या विषयावर परत. पण आता ही भेळमिसळ नको असं मला वाटतं. मी जर अशी इमोशनल झाले असते तर तू म्हणाला असतंस की नाही मला? उगाच इमोशनल होऊ नको म्हणून? हे बघ थोडा विचार कर. माझ्याइतकंच तुझंही ते स्वप्न आहे. आपण आपली स्वप्नं अशी पूर्ण करायच्या वयात हे काय भांडण घेऊन बसलोय? दोन मुलं बिझनेस करतात तेंव्हा काही वाद झाले तर ते सोडवून पुन्हा एकत्र येतातच ना? आपणही असेच मित्र आहोत आधी आणि मग बाकी सर्व. हे बघ मी तुला उगाच काहीतरी सांगत नाहीये. लग्नाचा विषय नसता तर आपण बाकी कुठलंही भांडण सोडवलंच असतं ना? मग हेही तसंच समज. तू विचार कर, हवा तेव्हढा वेळ घे. आपण पुन्हा बोलू, पण हे असं उगाच न बोलता सोडून देणं मला काही पटत नाही. "
ती ताटं घेत असताना त्याने तिला थांबवलं, म्हणाला,"मी निघतो. नंतर जेऊ कधी एकत्र." 
तिने 'बरं' म्हणून पटापट डबे काढले आणि त्याला सर्व नीट पॅक करून दिलं. तो तिचं इतकं नीटनेटकं पॅकिंग बघून हसला. तीही त्याला उमजून हसली आणि 'बाय' म्हणाली. 

          तो गेल्यावर तिच्यावर मोठ्ठ काम होतं. तिने गाडी बुक केली आणि नितीनच्या शेतावर जायला निघाली. दोन तासाचा प्रवास होता, कधी एकदा तिथे पोचतो असं तिला झालं होतं. तो तिथे असेल-नसेल माहित नाही, पण त्याला भेटणं गरजेचं होतं. शेतावर पोचल्यावर तिने तो कुठे आहे म्हणून एका पोराला विचारलं, त्याने सांगितलं तशी ती चालत राहिली. त्याने बोलवूनही आपण कधीच इथे आलो नव्हतो यावर तिला स्वतःचाच राग येत होता. कुठेतरी दूर तिला त्याची आकृती दिसली. इतक्या दिवसांनी त्याला पाहून उगाच भरून येईल म्हणून तिने दोन क्षण दूरच थांबून घेतलं. 
         त्याच्याजवळ आल्यावर तिने त्याला मोठ्ठ स्माईल दिलं, त्यानेही नाईलाजाने. आपले विचार, भावना आतमध्ये दाबून कशा ठेवायच्या हे त्याला चांगलंच माहित होतं. तिने त्याला 'कुठेतरी बसूया का?' विचारलं. तो तिला घेऊन बांधावरच्या उंबराच्या झाडाखाली आला. दोघेही थोडी मोकळी जागा पाहून बसले.
तिने त्याच्याकडे डोळेभरून पाहिलं आणि म्हणाली,"अख्खं आयुष्य संपलं ना तरी एक शब्द बोलला नसतास तू, ना माझ्याशी ना माझ्याबद्दल. बरोबर ना?"
तो मान खाली घालूनच बसलेला. 
"त्यादिवशी तू पहिल्यांदा माझ्या हातचं जेवलास आणि मन तृप्त झालं. कुणीतरी असं माणूस आपलं असावं असं वाटलं. पुढे तुझं तुझ्या शेतांवरलं प्रेम, त्यासाठी घेतलेले कष्ट हे सर्व आवडत होतंच. त्यादिवशी तू भाज्या घेऊन आलास आणि जणू तुझ्यासोबतचं आख्खं आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. पण तू निघून गेलास, केदारही चिडून गेला आणि वाटलं, किती ते नुकसान?" 
"एक स्त्री म्हणून आपल्या माणसानं आपल्या हातचं जेवण पोटभरून खावं यासारखं सुख नाही. ते मला तुझ्यात दिसलं. पण मग केदारही माझा मित्र आहेच. त्यानेही मला खूप काही दिलंय, शिकवलंय. या एका सुखासाठी ते सर्व तोडायचं नव्हतं मला. आणि सर्वात महत्वाचं सांगू का? तू, मी, केदार आपण सगळे स्वप्नाळू लोक आहोत. तू तुझ्या शेतावर जितकं प्रेम करतोस तितकंच माझं माझ्या प्रत्येक पदार्थावर आहे आणि तितकंच केदारचं त्याच्या बिझनेसवर. मी विचार केला, आपल्या भावनांमध्ये आपल्या स्वप्नांना का आपण चिरडायचं? इतकी लहान थोडीच आहेत ती? वर्षानुवर्षे मनात जपलीत, त्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेत. मग ते इतक्या सहज का सोडून द्यायचं? तुला तुझा हा शेतीचा व्यवसाय वाढवायचा आहे तसेच आम्हालाही हॉटेलचा. उगाच तीन पार्टनरमध्ये एक मुलगी आहे म्हणून सगळे घोळ का? आपल्याला इतके परफेक्ट पार्टनर कुठेच मिळणार नाहीत. मग ते सोडून, आपलं इतकं मोठं नुकसान का करून घ्यायचं? आणि जेवायचंच म्हणशील तर एकदा हॉटेल सुरु झाले की तू एकदा काय रोज येऊन जेवलास तरी चालेल. होय ना?"
त्याने वर पाहिलं, तिच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठांवरच हसू दोन वेगळ्या गोष्टी करत होतं. ती बोलतच राहिली,"नितीन, मला सध्या या कुठल्याच भावनांमध्ये अडकायचं नाहीये. मी माझं स्वप्न इतक्या सहज हातचं नाही जाऊ देणार. तुला खरंच योग्य वाटलं तर अजूनही आपण तसेच पार्टनर राहू जसं आधी ठरलं होतं. पुढच्या आठवड्यात हॉटेलच्या राहिलेल्या कामांसाठी वेगाने सुरुवात करणार आहे मी. तू आलास तर खूप आनंद वाटेल मला. तुझ्या या शेताने, मैत्रीने खूप आनंद दिलाय मला, तो असाच मिळू दे... येते मी. " 

ती उठली आणि पुन्हा म्हणाली,"येऊ मी?". तसा नितीनही उठला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि 'हो' म्हणाला. बांधावरून काठाला येईपर्यंत दोघेही न बोलता चालत राहिले. तिची कॅब तिथेच होती अजून. ती निघाली आणि तोही वळला. दूरवर पसरलेल्या आपल्या हिरव्यागार शेताकडे पाहात राहिला आणि ती वळून त्याच्याकडे.... पण तिच्या लक्षात आलं होतं तिच्यासाठी तिचं स्वप्न बाकी सर्वांपेक्षा मोठं होतं. ती केवळ एक वेळ होती, स्वप्नांपासून भरकटल्याची. आयुष्य अजून खूप मोठं आहे, आपली स्वप्नं अशीच सोडून देण्यासाठी.

ती डोळे पुसून पुन्हा स्थित झाली. तिला आता घाई झाली होती आपलं स्वप्न पूर्ण करण्याची. 

समाप्त.

विद्या भुतकर. 


Thursday, February 23, 2017

स्वप्नाळू : भाग ३

       ती रात्र वगळता मुक्ता पुन्हा तिच्या विश्वात रमली होती. एके दिवशी सकाळ सकाळी फोन चेक करताना मुक्ताला एक मेसेज दिसला, नितीनचा. तिने उघडून पहिले तर त्यात फोटो होता वालाच्या शेंगाचा त्याच्या रोपट्यासहित. धुक्यातल्या त्या सकाळच्या फोटोमध्ये शेंगांवरचं दव खुलून दिसत होतं. त्या वाफ्यात भरभरून आलेल्या शेंगा पाहून तिला आनंद झाला. तिने हसून त्याच्या मेसेजला 'गुड मॉर्निंग' असं उत्तर पाठवलं. दिवस सरताना तिने अजून एक मेसेज त्याला केला, एक फोटो. ती आठवणीने वालाच्या शेंगा बाजारातून घेऊन आली होती. तिने त्याची वाफवून भाजी केली, कारळ्याची चटणी, बाजरीची तीळ पेरून भाकरी केली.  त्याचा एक छान फोटो काढून तो तिने पाठवला होता. त्यानेही मग त्यावर स्मितहास्य असलेला स्मायली पाठवला आणि 'गुड नाईट' ही लिहिलं होतं. 
       केदार आणि तिची बाकी कामे चालूच होती. एका जुन्याच हॉटेलला विकत घेऊन दुरुस्ती आणि नवीन रूप द्यायचं ठरलं होतं. मुक्ताची उत्सुकता शिगेला लागली होती. कधी होणार हे सगळं आणि कधी एकदा आपलं स्वप्न पूर्ण होणार असं तिला राहून राहून वाटत होतं. केदारनेही सर्व प्रोजेक्टचे बजेट काढले. प्लॅनिंग मध्ये काय काय कधी झाले पाहिजे हे पाहिले. रोज प्लॅन्स बनवून आणायचें आणि त्यावर चर्चा करायची. कामांसाठी किती लोक लागतील, काऊंटरवर कोण असणार, टायमिंग काय ठेवायचे, इ. तो तिला विचारत असायचा.
एकदा तो म्हणालाही,"तुला माहितेय ना? जेवण बनवणे हा हॉटेलचा फक्त एक भाग आहे?"
तिने नुसती मान हलवली.
"People management लागतं खूप त्याला. खूप प्रॉब्लेम्स असतात त्यात. मदतीला लोक लागतात, त्यांना आपण आपल्याला लागणारे काम शिकवण्यात वेळ जातो मग तेच शिक्षण घेऊन ते सोडून जातात. मी बरंच रिसर्च केला आहे."
"तू केलंयस ना? मग मला काय टेन्शन आहे?" ती म्हणाली.
"अगं आपल्याला अगदी प्रत्येक प्लेटसाठी किती खर्च येतो, किती ओव्हरहेड आहे आणि किती फायदा होईल हे सर्व पहायला लागेल. "
"बघू ना मग? तू का चिंता करतोस?" तिने विचारलं.
"असं नाही मुक्ता, पण तू इतके लाईट घेऊन नकोस हे सर्व. तुझं स्वप्न हे हॉटेल आहे तसंच माझंही आहे 'एक यशस्वी व्यवसाय' म्हणून. " तो काळजीने म्हणाला.
तिने मग त्याला समजावलं,"मला माहीत आहे रे. तू अभ्यासही किती मन लावून करायचास. म्हणून तर आपण इतके परफेक्ट पार्टनर आहोत. बरं, आय प्रॉमिस, मी माझ्याकडून सर्व लागेल ती माहिती देते मी तुला. चालेल?"
त्याने हसून मान हलवली.
         एका जाहिरात कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याने. रोज वेगवेगळ्या आयडिया घेऊन तो मुक्ताकडे यायचा. तिने सांगितलं तसे काम करायला सुरुवात केली. एकेक पदार्थ बनवून त्यांचे प्रमाण मोजून पाहायची, दोन लोकांना किती लागते, ४ जणांची ऑर्डर आली तर काय? केटरिंग साठी कुणी विचारले तर दर काय? असे अनेक विचार तिच्या डोक्यात असायचे. कधी नितीनला भाज्यांचे दर विचारायची. कुठली भाजी किती दिवस टिकते, हेही विचारायची. हळूहळू ती तिच्याकडून जमेल तशी माहिती केदारला देत होती. 
     इकडे, मुक्ता आणि नितीनचा हळूहळू रोजचा नियमच झाला. रोज सकाळी मेसेजचा आणि संध्याकाळीही. सकाळ सकाळी शेतातून येणाऱ्या ताज्या फोटोंमध्ये कधी त्याचा हात फक्त दिसायचा. त्याचे ते हात तिच्या साठी 'कष्टाची' एक ओळख बनले होते. तो मात्र क्वचितच दिसायचा. दिसला तरी ते फोटोसाठीचं हसू त्यात नसायचं. तिच्या फोटोंमध्येही केवळ एकाहून एक सरस पदार्थ दिसायचे. जणू त्यांच्या भाज्यातून, जेवणातून ते एकमेकांचं हसू पाहत होते. बाकी मग शब्दांची गरज कुणाला होती? केवळ 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' पुरेसे होते. आता केदारलाही काही अंधारात ठेवलेलं नव्हतंच कुणी. काही विषय निघाला की त्यावर तिघांचं बोलणं व्हायचंच. पण या दोघांची भाषा मात्र त्याला कळली नव्हती.निदान त्यांना तरी असंच वाटलं होतं. 
      असेच एक दिवस संध्याकाळी मुक्ता टीव्ही बघत बसलेली असताना दारावरची बेल वाजली. दार उघडले तर नितीन उभा होता. हातात एक जाड कापडाची पिशवी भरगच्च भरली होती. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.
तो आत येता येता म्हणाला,"सॉरी ना सांगता आलो पण फोन बंद पडला होता आणि रात्रीच परत जायचं आहे. पण या भाज्या इतक्या ताज्या होत्या की..... ".
        तिला स्वष्टीकरणाची गरज नव्हतीच. तिने पिशवीतले हरभऱ्यांचे डहाळे, वाटाण्याच्या शेंगा, गाजरे सगळं एका भांड्यात काढलं होतं. तिने चहा ठेवला. त्याने हात धुवून, डहाळे विसळून घेतले आणि हरभरे सोलायला सुरुवात केली. तिनेही भाकरी थापल्या, भात लावला, उडिदाच्या डाळीची आमटी केली. त्याने सोललेले हरभरे खलबत्यात भरडून घेतले. तिने भाजीला फोडणी टाकली, उकळलेल्या भाजीवर मस्त तवंग आला. मसाल्याच्या वासाने त्याला थोडा ठसका लागलाच आणि फोडणी चांगली बसली हे पाहून ती हसली. 
ती काकडी, गाजर चिरून घेईपर्यंत त्याने ताटे, वाट्या घेतले. ती त्याला म्हणाली,"तू बैस मी नंतर बसते." 
त्याने विचारलं, "का?" परत काही विचार करून म्हणाला,"केदारसाठी का?" 
       तिने नुसतीच मान हलवली आणि त्याला ताट बनवून दिले. गरम गरम भाकरी, हरभऱ्याची भाजी, आमटी त्याने भरपेट जेवण केलं. ती केवळ लागेल तसं वाढत राहिली. आणि तो जेवत राहिला. त्याच्या मन लावून जेवण्याकडे ती मन लावून पहात होती. मधेच तिने,"कसं झालंय?" विचारलं. त्याने एकदाच मान वर करून डोळ्यात डोळे घालून सांगितलं,"चांगलं झालंय की" आणि पुन्हा तो जेवणात गुंगला. जेवण होतं आलं इतक्यात बेल वाजली आणि दोघांची तंद्री भंग पावली. ती पटकन उठून गेली आणि दार उघडलं. केदारच होता. 
तो आत आला आणि नितीनला पाहून म्हणाला,"अरे तू कधी आलास? मला फोन नाही केलास?"
तीच बोलली मधे,"हां, मी पण हेच म्हणलं तर म्हणाला फोन बंद पडलाय.". 
"आणि तुझा?" केदारने तिला विचारल्यावर मात्र काही उत्तर तिच्याकडे नव्हतं. 
ती घाईने म्हणाली,"बस, जेवायला थांबलीय मी." 
नितीनच्या चेहऱ्याने मात्र वेगळंच उत्तर दिलं होतं. तिने दोघांचं ताट वाढून घेतलं. 
पहिला घास घेतला आणि तिने केदारला विचारलंही,"कसं झालंय?". 
त्यानेही नेहमीसारखंच उत्तर दिलं होतं,"नेहमीसारखंच ...छान". तिला ओल्या हरभऱ्याची भाजी किती आवडते हे त्याला चांगलंच माहित होतं. 
ती पुढे बोलत राहिली,"हे बघ, नितीन गाजरं, वाटाणा सगळं घेऊन आलाय. उद्या पुलाव करू लग्नात असतो ना तसला?"
त्याने मान हलवली आणि न बोलता जेवत राहिला. नितीनचं जेवण झाल्यावर तो हात तसेच धरून दोघांची वाट बघत बसून राहिला. 
जेवण झाल्यावर मुक्ता आवरत असतानाच नितीन म्हणाला,"चला मी येतो परत उशीर होईल सकाळी पाणी द्यायचंय. पालक, मेथी द्यायची आहे एका हॉटेलला." 
"बरं" म्हणून ताटं उचलून केदारने सिंकमध्ये घेतली आणि सवयीप्रमाणे धुवायला सुरुवात केली. 
नितीनने रिकामी पिशवी घडी घालून हातात घेतली आणि दारात आला. तशी मुक्ताही बाहेर आली. 
दाराच्या चौकटीत उभे राहून तिने त्याला 'बाय' म्हटलं. 
तो तिच्याकडे पहात क्षणभर थांबला आणि "धन्यवाद" म्हणून निघून गेला. 
          ती आत आली आणि मुकाट्याने आवरू लागली. थोड्या वेळाने केदार निघून गेला. आज एक वेगळीच निशब्द रात्र होती. 
         दुसरा दिवस तसा उदासच उजाडला. कितीतरी वेळ मुक्ता आपल्या फोनकडे पाहत राहिली. आज गुड मॉर्निंग मेसेज आलाच नव्हता. आपण केदारच्या सोडून त्याच्या मेसेजची वाट पाहतोय हा विचार करून तिला स्वतःचीच लाज वाटली क्षणभर. पण तरीही नितीनचा विचार येतच राहिला. त्याचं ते शांत असणं, आपण केलेला स्वयंपाक पॉट भरून जेवणं तिला सुखावत होतं. कुठलेही शब्द न बोलता त्याने भाजी आणली आणि आपण त्याच्यासोबत वाहवत गेलो असं तिला वाटलं. पूनमच्या फोनने तिची विचारांची चक्रं थांबली.
"काय गं अजून आली नाहीस ऑफिसला?", पूनमने विचारलं. 
"हा जरा उशीर झाला रात्री आवरायला. निघतेच आहे."
परत विचार करून ती म्हणाली,"मी आज जरा सुट्टीच घेते. बरं वाटत नाहीये." 
"काय गं एकदम काय झालं? सगळं ठीक आहे ना? केदार थांबला होता वाटतं रात्री?" पूनमने लाडाने विचारलं. 
"तू पण ना? गप बरं. दमलेय जरा सारखी धावपळ पण चालू आहे ना हॉटेलसाठी." मुक्ता म्हणाली. 
        फोन बंद करून ती बराच वेळ पडून राहिली. काही सुचेनासं झालं म्हणून उठली किचनमध्ये जाऊन आधी चहा ठेवला. कॅलेंडर पाहिलं तर आज चतुर्थी होती. तिने साबुदाणा शोधून भिजवला, बटाटे मोजून ठेवले. तिथेच असलेलं रताळे चिरून त्यांना तुपात परतायला सुरुवात केली. थोडा गूळ चिरून त्यांना लालसर परतले. चहा झाला तशी तो घेऊन कॅलेंडर हातात घेऊन बाल्कनीत बसून राहिली. हॉटेलचं वेळापत्रक तिने कॅलेंडरवरच लिहिलेलं होतं. आज मेनूकार्डच्या प्रिंटिंगच्या आधी त्याचे डिझाईन चेक करायला जायचं होतं. चहा घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. विचार करून तिने केदारला फोन लावला. केदारने फोन उचलला नव्हताच. तिने त्याला मेसेज केला,"डिझाईन अपॉइंटमेंट ३pm". थोडा वेळ फोन हातात धरून उत्तराची वाट बघत राहिली. पण काही उत्तर आले नव्हते. टाईमपास म्हणून तिने नितीनने पाठवलेले फोटो चाळायला सुरुवात केली. एकेका फोटोकडे पाहून तिला काहीतरी आठवत होतं आणि थोडंसं का होईना हसू येत होतं. 
       दिवस असाच आळसात गेला. रताळ्यांवरच तीच दुपारचं जेवण झालं. कुणाचाही फोन, मेसेज नाहीच. ३ वाजताची अपॉइंटमेंट तिने फोन करून कॅन्सल केली. आपण हे करत आहोत या विचाराने तिला स्वतःवरच चीड आली. थोडं बरं वाटावं म्हणून ती बाहेर पडली, मिरच्या, कढीपत्ता, उपवासाची भाजणी घेऊन घरी आली. भिजलेल्या शाबुदाण्यात तिने हिरवी मिरची आणि जिऱ्याचे वाटण घातले, मीठ, कूट, साखर, उकडलेला बटाटा,कोथिंबीर  घातलं. सर्व एकजीव करून त्याचे वडे तळून घेतले आपल्यापुरतेच. सोनेरी रंगाचे ते एकसारखे वडे पाहून ती स्वतःवरच खूष झाली. 'वडे बाकी हजार हॉटेल्स मध्ये मिळत असले तरी लोकांनी माझ्या हातचे वडे खायला यातला हवं' असा विचार करून उगाचच हसली. जेवण करताना फोन चाळताना केदारचं उत्तर आलंच नव्हतं हे पाहून पुन्हा ती निराश झाली. 
"आपल्याला खरंच काय हवंय आणि काय नको हे विचार केलेच पाहिजेत आणि तेही लवकरच" हे तिला कळून चुकलं होतं.

क्रमशः

विद्या भुतकर.

स्वप्नाळू : भाग २

        आदल्या रात्री गप्पा मारण्यात बराच उशीर झाला त्यामुळे मुक्ताला उठायलाही उशीर झालाच होता. तिने पटापट आवरायला सुरुवात केली. डोक्यात केदारचे, लग्नाचे विचार होतेच. पण शाळेच्या पहिल्या दिवशी असावी तशी उत्सुकता तिला आपल्या हॉटेलबद्दल वाटत होती. उशीर झाल्यावर 'फोडणीची खिचडी' हे तिचं नेहमीच ठरलेलं. तिने सगळ्या डाळी, खास खिचडीसाठी ठेवलेला तुकडा तांदूळ भिजवले. लाल सुक्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे सर्व काढून ठेवले. मधेच तिला वाटलं,'ही खिचडी तर आपल्या मेनूवर पहिल्या नंबरवर असली पाहिजे'. फोडणीत खरपूस लसणाचा वास आला आणि ती खूष झाली. तिने डब्यात खिचडी नेली की बाकी मित्र मैत्रिणीही मागून घेत त्यामुळे जरा जास्तच बनवली होती. घरातून निघताना लिंबाचं गोड लोणचं, भाजलेले पापड आणि शेंगदाण्याची चटणी आठवणीने डब्यात घेतली. आजचा दिवस एकदम मस्त सुरु झाला होता.
        ऑफिसमध्ये जाताना केदारला कॉल करायला ती विसरली नव्हती. पोचल्यावर तिने लगेचच मॅनेजरसोबत मिटिंग ठरवून टाकली होती. उगाच परत उशीर नको म्हणून. जरा मेल चेक करून झाल्यावर तिने मैत्रिणीला,पूनमला, 'चल कॉफी घेऊ' म्हणून हलवलं. तिलाही काहीतरी स्पेशल दिसत होतं. दोघी कॉफी घेऊन शेजारच्याच टेबलजवळ बसल्या. पूनमने भुवया उंचावल्या तशी ती बोलू लागली.
"काय केदारने प्रपोज केलं."
"काSSSSSSS य?", पूनम ओरडली तशी तिने तिला हात दाखवून शांत बसवलं. आणि अचानक आपण लाजतोय याची तिला जाणीव झाली. तिचा तो लाजरा हसणारा चेहरा पाहून पूनमने तिला मिठी मारली आणि पार्टीही मागितली.
"तुला ना? नुसत्या पार्ट्या पाहिजेत" मुक्ता बोलली.
"पार्टी तो बनती है यार. इतकी मोठी न्यूज अशीच सांगतेस?",पूनम एकदम हायपर झालेली.
"त्याने अजून एक गोष्ट सांगितली आहे" मुक्त पुढे बोलली.
"काय अजून गुड न्यूज?", पूनमला एकेक धक्के बसत होते. मुक्ताने तिला मग हॉटेलबद्दलही सांगितले.
"बस यार पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच", पूनम म्हणाली.
"ओके जाऊ विकेंडला नक्की.आज आधी काम तरी करू.आणि हो तुझी आवडती खिचडी आणली आहे. " म्हणून मुक्ताने तिला उठवले.
"हां आता नुसत्या खिचडीवर भागणार नाहीये हा." पूनम बोलतच होती.
       दोघी जागेवर आल्या तर मिटिंग होती एक. तिथे गेल्यावर त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या लोकांसाठी केक आणला होता. एकूण काय आनंदच आनंद. असेही काम करायची इच्छा कुणाला होती म्हणा. पण या असल्या मीटिंगमध्ये उगाच पुढे होऊन काम करायला नको वाटायचं तिला. दरवेळी आपणच पुढे होऊन का केक वाढायचा सर्वाना? "मुलगी म्हणून मी इथेही हे वाढण्याचे काम का करावे?" असं ती नेहमी पूनमला म्हणत असे. पण आज तो विचार सोडून ती केक घेऊन जागेवर गेली आणि पुन्हा एकदा आपल्या विचारांच्या कोशात निघून गेली. काल जितके आपण प्रॅक्टिकल बोलत होतो त्यापेक्षाही जास्त जवळीक केदारबद्दल जाणवत आहे हे पाहून तिला कसलं तरी समाधान वाटलं होतं.
        दुपारच्या मस्त जेवणानंतर ती मॅनेजरकडे गेली. तिला स्वतःला तर बिझनेसची माहिती होतीच पण त्याच्याकडूनही कर्जाबाबत लागेल ते तिने विचारून घेतले.  पुढच्या सहा महिन्यांत हॉटेलचं सर्व काही पक्कं करायचं तिने ठरवलंच होतं. मॅनेजरशी बोलल्यावर पुन्हा एकदा तिने केदारला फोन केला. तिच्या बोलण्यात थोडा फरक तिला जाणवत होताच. 'केदारचा विचार करून आपण लाजतोय का उगाचच?' म्हणून ती स्वतःवरच रुसलीही. हळूहळू तिला आता केदार 'आपला' असण्याचीही सवय झाली होती.
        एकदा सुरुवात झालीये म्हटल्यावर दोघेही कामाला लागले होते. पुढचे काही दिवस मग हॉटेलसाठी जागा शोधण्यात, इंटेरियर डिझाईनरशी बोलण्यात आणि मेनू ठरवण्यात गेले. दोघे बसून सविस्तर चर्चा करत, जाहिरातींसाठी वेगवेगळ्या कल्पना मांडत. तर कधी कॉलेजमध्ये शिकलेल्या एखाद्या विषयावरून वाद घालत. हॉटेल हे आता केवळ एक स्वप्न न राहता ध्येय बनलं होतं.

असेच एक दिवस संध्याकाळी तिला केदारचा फोन आला,"घरी आहेस ना? मी एका मित्राला घेऊन येतोय. जेवायलाच असेल तो."
तिने काही विचारण्याआधी त्याने फोन ठेवला होता. आता नेहमीप्रमाणेच काहीतरी खास 'साधी' डिश करावी असं तिच्या मनात आलं होतं पण, 'मित्रासाठी हे असं रोजचं जेवण बनवतेस का?' म्हणून केदार चिडेल की काय असा विचार केला आणि तिने, पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि वरण भात असा बेत आखला. इतक्यात पुन्हा त्याचा मेसेज आला,"पिठलं भाकरी करशील का?"
ती जरा दचकली. आजपर्यंत कधीही केदारने तिच्याकडे स्वतःहून पिठल्याची मागणी केली नव्हती. पण आता विचारलंच आहे तर मग काय? तिने हिरव्या मिरच्या, लसूण ठेचले, तेलात जिरे, मिरच्या लसूण परतला. कांदा हलकासा भाजला. भरडलेले दाणे त्यात घातले. जोरजोरात ते पिठलं तिने घोटलं. बाजूला भाकरी थापल्या. मऊ भात केला. भरलेल्या मिरच्या तळल्या. स्वयंपाक करणे हे जणू तिच्यासाठी ध्यानधारणाच होती एक प्रकारची.  'असा कोण मित्र आहे ज्यासाठी त्याने पिठलं मागितलं असावं' हा विचार मात्र तिच्या डोक्यात राहून राहून येत होता.

       केदार आणि त्याचा मित्र लवकरच घरी पोचले. तिने पाहिलं तर समोर एक माध्यम बांध्याचा, मळकट टी-शर्ट- जीन्स घातलेला आणि अगदी 'उन्हाने रापलेला' म्हणावा तसा रंग असलेला तरुण उभा होता. आत आल्यावर त्याने ओळख करून दिली,"हा नितीन, माझा शाळेतला मित्र. आणि ही मुक्ता."
'हाय' म्हणून दोघेही सोफयावर बसले. तिने आल्याचा चहा ठेवला. केदार तिला सांगत होता,"नितीन आणि मी दहावी पर्यंत सोबत होतो. शाळेनंतर याने कृषी कॉलेजमधून पदवी घेतली आणि जवळच्याच एका गावाकडे जमीन विकत घेतली. पहिले काही वर्ष नुकसान झालं त्याचं बरंच कर्जही होतं पण पठ्ठ्या काम करत राहिला आणि आता हळूहळू ऑरगॅनिक भाज्याचे पीक घेत आहे. हुशार आहे हा आपला मित्र. त्याच्या शेतांवर घेऊन जाईन तुला एकदा. "
तो कौतुक करताना नितीन मात्र शांत बसून होता. त्याच्या वागण्यातून त्याचं शांत व्यक्तिमत्व दिसत होतं.
पुढे केदारच बोलला, "आपल्याला हॉटेलसाठी असाच माणूस पाहिजे. खात्रीशीर, माहितीतला आणि जवळचा. देणार ना रे आम्हाला भाज्या?"
तो पुन्हा हसला आणि मान होकारार्थी हलवली.
पुढे मग मुक्ता बोलली,"मला वर्षभरात येणाऱ्या सर्व भाज्यांचे वेळापत्रक हवंय. म्हणजे कुठल्या महिन्यात काय पीक येतं आणि त्यानुसार मेनू बनवायचा आहे. बाकी वर्षभर ठेवायचे पदार्थ असतीलच. पण मला शेंगसोला, हुरडा, वालाची,पातीची भाजी, भरीत, पिठलं, नाचणीची भाकरी, ओल्या हरभऱ्याची भाजी, अंबाड्याची भाजी असे अनेक पदार्थ हवे आहेत. सोबत उसाचा रस, कैरीचं पन्हं हे सर्वही हवं आहे. " त्याने पुन्हा मान हलवली.
तिच्याकडून त्याने मग एक पेन आणि पेपर मागितला. दर महिन्याचा रकाना बनवून एकेक पिकाची यादी तो करू लागला. बाकी नेहमी येणाऱ्या भाज्या, फळे यांची वेगळी यादी केली आणि तिच्या हातात दिली. त्याच्या यादीतल्या गोष्टी पाहून ती खुश झाली.
"आम्ही भाज्या रोज पहाटे आणून देऊ. त्याज्या. या यादीनुसार तुम्ही मेनू बनवा. आणि काय पायजे तसं फोनवर कळवत जा म्हणजे तयारी ठेवता येईल." तो एकदम हळू स्थिर आवाजात बोलला.
त्याने पिकांसाठी करत असलेल्या प्लॅनिंग त्यांना समजावलं. कीटकांचा बंदोबस्त, खतपाणी कसं लागतं सर्व सांगितलं. बराच वेळ गप्पा मारण्यात गेला. तिने ताटं घेतली.
तिने बनवलेलं गरम गरम पिठलं, भाकरी, नाचणीचा पापड, कैरीचं लोणचं, गरम भात सर्व अगदी मन लावून तो खात होता. मधेच तिने त्याला विचारलंच,"कसं झालंय?" तो 'चांगलं आहे' म्हणून पुन्हा खाण्यात गुंगला. त्याने अजून भाकरी मागून घेतली. ती देताना तिला त्याचे चिरा गेलेले हातही दिसले. मग हळूहळू कष्टाच्या खुणा ती त्याच्या शरीरावर पाहून लागली. पायाला पडलेल्या भेगा, बाह्यांच्या बाजूला काळ्या पडलेल्या रंगाची रेष, मातकटलेले केस, आत गेलेत म्हणावं इतके सुकलेले गाल आणि त्यात त्याचं ते मन लावून जेवणं. तिच्या मनात ते चित्र पक्कं बसलं. जेवण झाल्यावर तो निघाला. दोघांचे नंबर त्याने घेतले. त्यांना व्हाट्स अँप वर ऍड केलं.
      निघताना तो एकदम तिच्याकडे बघून बोलला,"जेवण छान झालं. अगदी आईची आठवण झाली. आमची आई गावाकडची. ती गेली ७ वर्षं झाली. आज तिच्या हातचं जेवण आठवलं. धन्यवाद. " त्याचे पाणावलेले डोळे तिला दिसले आणि कसंतरी झालं. केदार त्याला सोडायला खाली गेला आणि ती बराच वेळ नितीनचा विचार करत बसली. कुणाला तरी आपल्या हातचं जेवण इतकं सुख देऊ शकतं या विचाराने तिला समाधान वाटलं.
क्रमश:
विद्या भुतकर.

Tuesday, February 21, 2017

स्वप्नाळू : भाग १

मुक्ताने केदारला फोन केला,"अरे मी काय म्हणत होते? आपण बाहेर जायलाच पाहिजे का?"
केदार वैतागला पण आज तिचा वाढदिवस होता. त्यामुळे तिला जे हवं तेच करणं योग्य होतं.   
खरंतर त्याला माहित होतं तिचं पुढचं वाक्य पण तरीही त्याने शांतपणे विचारलं,""मग काय हवं आहे तुला? ". 
        मुक्ता आणि केदार हे दोघे MBA चे मित्र. पुण्यात त्यांच्या बॅचमधले ते दोघेच होते त्यामुळे नियमित भेटीगाठी वाढल्या आणि मैत्री सवय कधी बनली त्यांना कळलंच नाही. आजही तिच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे ते दोघेच होते. बाहेर जेवायला जाणे हा नेहमी वादाचा मुद्दा असायचा. सगळ्या जगाच्या एकदम उलट यांचा न्याय होता. केदारला बाहेर जाणं आवडायचं तर मुक्ताला त्याच्या उलट. बँकेची नोकरी चालू असली तरी जेवण बनवणे, लोकांना खाऊ घालणे, वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकणे हे तिचे आवडते उद्योग. त्यामुळे आजही तिने बाहेर जाण्यापेक्षा काहीतरी घरीच बनवावं असा विचार केला होता. 
ती बोलली,"अरे मस्त कांद्याची पात मिळाली येताना आणि हिरव्या मिरच्या पण. तू ये ना, भाकरी, कांद्याची पात, ठेचा करू. भारी होईल जेवण ना?"       
आता पुण्यात अशी मुलगी भेटणे हे निव्वळ अशक्य आहे. पण केदार तिला रोज स्वतः भेटत असल्याने अशी व्यक्ती अस्तित्वात आहे हे शेवटी मान्य केलं होतं. त्याने तासाभरात पोचतो म्हणून फोन ठेवला. इकडे मुक्ताने मोठ्या उत्साहात जेवण बनवायला सुरुवात केली. ताजी पात, मिरच्या पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटत होतं. पातीला लसूण आणि काळ्या मसाल्याची फोडणी तिने दिली, वरून भाजलेल्या दाण्याचा भरडलेला कूट पेरला. दुसऱ्या भांड्यात तिने तेलात जिरे, लसूण परतला, वरून हिरव्याकंच मिरच्या टाकल्या आणि परतायला सुरुवात केली. घर हळूहळू मिरचीच्या खाटाने भरून गेलं. पण ती तिच्या नादातच. भाकरी थापता थापता ती विचार करत होती तिच्या सो कॉल्ड हॉटेलचा. मनातल्या मनात तिने अनेकदा मेनूची उजळणी केली असेल. 
मुक्ताला एक शुद्ध मराठी जेवण असलेलं हॉटेल सुरु करायचं होतं. रोजच्या नोकरीतून केवळ चांगले पैसे साठवणे आणि पुढे व्यवसायात जोडणे हा एकच हेतू होता तिचा. जेवण बनवताना तिचा तोही हिशोब लावून झालाच. किती पैसे जमा झाले, अजून किती दिवस नोकरी करायची, हॉटेलला जागा कुठे बघायची सगळे विचार चालूच होते इतक्यात बेल वाजली. केदारच होता. तिने दार उघडलं आणि त्याचा चेहरा थोडा उतरला. जेवण बनवण्यात तिचा पार अवतार झाला होता. 
"निदान आज तरी जरा चांगले कपडे घालायचेस ना?" त्याने वैतागून विचारले. 
"आधी आत तर ये." ती हसून म्हणाली. 
आल्या आल्याच त्याला मिरच्यांच्या वासाने जोरात ठसका लागला. तिने पळत जाऊन पाणी आणलं. 
ती म्हणाली,"बघ कशा तिखट मिरच्या आहेत. छान ठेचा होतो याचा.बैस पाच मिनिटं झालंच आहे जेवण आता." 
 त्याला बाहेर बसवून ती किचनमध्ये आली. मिरच्या भाजल्या होत्या. त्यात कोथिंबीर, लिंबू पिळून तिने सर्व मिश्रण खलबत्त्यात घेतलं. केदार मागून आला आणि हसला. तिने वळून पाहिलं. 
"कुठल्या जमान्यात राहतेस तू ना?" तो हसत बोलला. 
"अरे तुला नाही कळणार, ठेचलेला ठेचाच भारी लागतो. तू गप्प बैस ना? मी करतेय ना?", ती. 
बराच वेळ ठेचा कुटून तिने तो वाटीत काढून घेतला. 
ताटात पातीचा बारीक कांदा, ठेचा, भाकरी आणि पातीची भाजी ठेवली आणि ते पाहून खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतच राहिला होता तो. दोघेही जेवायला बसले तसे तिनं विचारलं,"कसं झालंय?". 
तो,"नेहमीप्रमाणेच, छान झालंय.". 
तिनेही मग जेवायला सुरुवात केली. 
विचार करून तो पुढे बोलला,"पण खरं सांगू का तुला, मला कधी कधी वाटतं तू काहीतरी वेगळं ट्राय कर."
ती,"म्हणजे?"
तो,"म्हणजे तुझं हे मराठी जेवण छानच असतं गं. पण आज काल कॉन्टिनेन्टल लागतं लोकांना इथे. मग हे असं जेवण म्हणजे 'थाळी सिस्टीम' मध्ये अजून एक भर असं होऊन जाईल. तुला काय वाटतं."
तिने असा विचार कधी केलाच नव्हता, तिच्यासाठी तर स्वतः बनवलेली प्रत्येक भाजी आणि भाकरी स्पेशलच होती 
ती गप्प बसली. त्याला मग उगाच आपण बोललो असं वाटलं. 
जेवण झाल्यावर तिने गव्हाची गरम गरम खीर खायला आणली आणि जगात दुसरे काहीही नाहीये असा चेहरा करून मन लावून ती खात बसली. तिच्या या 'फूड कोमाची' त्याला चांगलीच माहिती होती. त्याने बराच वेळाने तिला हाक मारली,"मुक्ता..." तिने दचकून मान वर केली."... तुझ्यासाठी आज २ प्रपोजल आहेत." ती बावरली आणि तिने हातातली वाटी बाजूला ठेवली, तसा तोही पुढे झाला. तिच्यासमोर गुढग्यावर बसला. तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला,"माझ्याशी लग्न करशील?". 
तिला या प्रश्नाची अपेक्षा होतीच पण तो असा अचानक आल्यावर थोडी घाबरली. 
"गेल्या कित्येक वर्षाची आपली मैत्री अशी एकाच टप्प्यावर किती दिवस ठेवणार आहे?", तो. 
"हो रे बरोबर आहे. पण कधीकधी वाटतं आपण पर्याय नाही म्हणून सोबत आहोत की काय?", तिने स्पष्ट विचारलं. 
"असं काय बोलतेस? आपण काही छोटया गावात राहात नाही जिथे पर्याय नसतील. ते शोधायचे असते तर मिळालेही असतेच की.", तो. 
"हां तेही आहेच. तुला खरंच असं वाटतं आपण लग्न करावं?" तिने विचारलं. 
"मला वाटतं, का नाही? आपले घरचे असेही विचारत आहेतच लग्नाचं. आणि मला तरी आपण दोघे एकमेकांना अनुरूप वाटतो सगळ्याच बाबतीत. तुला काय वाटतं?", तो. 
लग्नाबद्दल इतकं प्रॅक्टिकल बोलतोय हे दोघांनाही जाणवत होतं पण 'ते असंही घरच्यांनी केलंच असतं, मग आपण का नाही?' असा विचार करून तीही बोलत राहिली. 
"हो अनुरूप तर आहेच रे. शिवाय इतके वर्षांची ओळख आहे आपली. एकमेकांना सहन करू शकलोय इतके दिवस हे काय कमी आहे?" ती हसून बोलली. 
"बस मग ठरलं तर, आपण घरी बोलू आणि सर्व पक्कं करून टाकू." तो फायनल बोलला आणि तिनेही मान हलवली. 
"बरं अरे ते दुसरं प्रपोजल काय ते सांगितलं नाहीस?" तिने विचारलं. 
"अरे हां विसरलोच. या पहिल्याच्या टेन्शनमध्ये होतो. पण तू एकदम कूल होतीस हा. आवडलं आपल्याला." तो पुढे बोलला,"अगं मी तुझ्यासाठी एक बिझनेस प्रपोजल पण आणलंय."
बिझनेस म्हटल्यावर ती सावरून बसली. 
तो," तू पैसे साठवत आहेस माहितेय मला. पण मीही तुझ्या हॉटेलमध्ये गुंतवणूक करायची म्हणत आहे. आपल्या MBA चा तरी कधी फायदा होणार? मी ५०% तरी पैसे देईन यात."
ती हे ऐकून एकदम खूष झाली. ते बघून तो म्हणाला," अरे हो, इतकी तर तू लग्नाच्या प्रपोजललाही एक्ससाईट नाही झालीस." 
"गप रे तू बोल पुढे." ती रागावली. 
"मी गुंतवणूक करेन आणि बिझनेस म्हणून फायद्यासाठी योग्य ते निर्णय घेतानाही सहभाग घेईन."
ती एकदम घाबरली तसा तो म्हणाला,"डोन्ट वरी, मेनू सोडून बाकी निर्णय. मुक्ता मला माहित आहे, हे तुझं स्वप्न आहे. त्यामुळे तू त्यात रमशील आणि तुझा तो हक्कही आहे. मी फक्त तुझ्या स्वप्नाला माझा हातभार लावतोय इतकंच."
ती हसली, त्याच्यासोबत राहण्याच्या तिच्या निर्णयाचा तिला पुन्हा एकदा आनंद झाला. 
"पण खरं सांगू का? तुम्ही मुली ना फार स्वप्नाळू असता. आता तुला हे लोकांना जेवण करून देण्यात आनंद होतो वगैरे ठीक आहे पण त्यात फायदा तोटा बघावं लागतंच. आणि हॉटेल सुरु झालं की त्यात बरेचदा यांत्रिकपणाही येतो. तेव्हा मात्र माघार घेऊ नकोस हा." त्याने तिला बजावलं. 
पण ती तिच्या स्वप्नांतच रेंगाळत होती. 
"मी बरीच माहिती काढलीय. जागा शोधू आपण, बाकी गोष्टी पण फायनल केल्या पाहिजेत. मी तर भाज्यांसाठी सुध्दा माणूस बघून ठेवलाय." तो तिच्याकडे बघत बोलला. हे ऐकून मात्र मुक्ता जाम खुश झाली होती. पटकन उठून ती त्याच्या शेजारी बसली, त्याच्या हातात हात घेऊन तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्यानेही तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला,"हैप्पी बर्थडे डिअर". 

क्रमशः 

विद्या भुतकर.