Thursday, April 21, 2016

थोडासा वेळ.....स्वत:साठी

           आजची पोस्ट थोडी वादळी होऊ शकते. यात कुणाच्या भावना दुखविण्याची इच्छा नाहीये, नक्कीच. उलट काही चांगले झाले तर आनंदच आहे. २४-२५ वर्षांपर्यंत मला असं वाटायचं की मी कितीही खाल्लं तरी माझं वजन वाढणार नाही. कॉलेज मध्ये असताना दिवस दिवस चालणं व्हायचं. नोकरी लागल्यावरही बैठं काम वाढलं तरी तगतग होतीच. पण अमेरीकेत आल्यावर माझ्या मेसमधल्या खाण्यापेक्षा जास्त जड, गोड खाणं सुरु झालं.आणि सहा महिन्यात माझं वजन पाच किलोने वाढलं. मला कळलं सुद्धा नाही कधी वाढलं. कारण कधी माहीतच नव्हतं वजन करून, शिवाय ते वाढणार नाही ही खात्री होतीच. पण इथे आल्यावर पहिल्या वर्षातच मला माझ्यात झालेले बदल दिसून येऊ लागले. बारीक होण्यासाठी खाण्यावर नियंत्रण आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींची गरज असते. त्या दोन्हीही कधी मी नियमित केल्या नव्हत्या. पण गेल्या दहा वर्षात आता अंदाज आला आहे काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे याचा.
         आजची पोस्ट त्या अनेक लोकांसाठी आहे जे माझ्यासारखा विचार करतात, ज्यांना वाटलेले असते की माझ्यात कधीच काहीच बदल होणार नाही. किंवा त्यांच्यासाठी ज्यांना कळतंय की बदल केला पाहिजे पण कसा ते कळत नाहीये. आणि हो, जरी यात काही संदर्भ केवळ स्त्रियांसाठी असले तरी ते सर्वाना लागू होतात. असो. माझी खरी सुरुवात मुलं झाल्यावर झाली. डिलिव्हरी नन्तर स्वत: मध्ये झालेले बदल हळूहळू जाणवत होते. आणि मुलं होऊन सहा महिने झाले तरी माझं खाणं मात्र प्रेग्नन्सीमध्ये असल्यासारखच होतं. आधी ते पूर्ववत आणलं. मग रनिन्ग्ला सुरुवात केली. बरं, प्रत्येकवेळी पळायला जमेलच असं नाही. भारतात असताना कधी पोहायचा क्लास लावला तर कधी योगाचा. कुणी म्हणायचं तुला बरं आहे गं, सर्व मदत आहे. संदीप सर्व करतो, किंवा ऑफिस लवकर सुटते किंवा मुलं तुझ्यासोबत घरी नसतात दिवसभर. मला या सर्व गोष्टी मला पटतातही. पण मला हे माहित आहे की एका घरात कुठलीही गोष्ट एकट्याने होतच नाही. जर दोघांनी मिळून काही करायचे ठरवले तर ते नक्की होते.
            नोकरीत खूप ताण आहे? तो कसा कमी करायचा बघा. सकाळी वेळ मिळत नाही? दुपारी काढा. कधी रात्री काढा. आपल्या शरीराला आपण का गृहीत धरतो? कधी असं होतं का की मुलांना डबा द्यायचा राहिलंय? देतो न आठवणीने? कधी घर आवरताना, सणाला असे म्हणतो का की राहू दे या वेळी? रात्री जागून का होईना सर्व करतोच ना? मग जेव्हा आपण स्वत: वेळेत जेवायची वेळ येते किंवा स्वत:साठी दिवसातून एक तास काढायचा असतो, तेव्हा ते का जमत नाही? कुणी कधी असेही म्हणते आमच्या घरी सर्वांना ताजेच लागते. त्यामुळे दोन वेळचे जेवण करण्यातच सर्व वेळा जातो, कुणी म्हणतं मुलं लहान आहेत, त्यांचं करण्यातच वेळ जातो. मुळात मला हे कळत नाही, जसे आपण रोजचे रोज जेवतोच तसे रोज किंवा आठवड्यातून चार दिवस थोडा व्यायाम का करू शकत नाही? आणि त्यासाठी लोकांचं छान चालू आहे असं म्हणून रडण्यात काय अर्थ आहे?
           कितीतरी माझ्या वयाचे लोक मी ऑफिसमध्ये बघते, ज्याचं पोट सुटलेलं असतं किंवा डायबेटीस चा त्रास सुरु होत असतो. पण तरीही रात्री १२ वाजता कामाची मेल टाकायला विसरत नाहीत. आपण ज्या शरीरामुळे नोकरी करू शकत आहोत त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो? त्यामुळे कामाचा ताण वगैरे ही कारणं मला पटत नाहीत. आता मुलांचं, लहान असली तर मुलानाही बाहेर घेऊन जायचं, त्यांच्यासोबत पळायचं. मी अनेकदा सानूला माझ्यासोबत सूर्यनमस्कार घालायला लावलेत. अर्थात ती चार नंतर पळून जाते. सध्या मी पळून झाले की ट्रेडमिलवर 'मीही पळते' म्हणून हट्ट करते. मुलांचे कारण देण्यापेक्षा, आपल्यासोबत त्यांनाही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. 
       मध्ये मी एक फोरवर्ड आर्टिकल वाचलं ज्यात लिहिलं होतं की मुलींना कसे सक्षम केले पाहिजे. त्यांना अभ्यासासोबत एखादा खेळही आला पाहीजे. आणि आपण तसे करतोही. मुलींना-मुलांना डान्स किंवा चित्रकला किंवा कराटेच्या क्लासला घालतो, तिथे घेऊ जातोही. पण स्वत: ते का करत नाही? उलट 'मुलांसाठी त्याग करणारी आई-बाबा अशी इमेज का कायम ठेवतो? अगदी जेवायलाही, सर्वांसोबत किंवा नंतर जेवायचा हट्ट का? उलट स्त्रियांची पचनसंस्था अतिशय मंद होते, वय वाढेल तशी. त्यामुळे होईल तितके संध्याकाळी ७-८ च्या वेळेत जेवण केलेच पाहिजे, अगदी बाकी कुणी करत नसेल तरी. आणि चुकीचं वाटत असेल तर सासूबाईनाही सोबत घेऊन जेवलं पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी.
           भारतात डायबेटीसचे प्रमाण वाढत आहे. आपणही त्यात एक होत नाहीये ना याचा विचार केला पाहिजे. मला पुण्यात पळताना, सकाळी अनेक लोक चालताना दिसायचे. त्यांना स्वत:हून कधी सांगितले नाही. पण त्यांनी आपली सकाळची झोप सोडून, चालण्यासाठी वेळ काढला याचे मला कौतुक वाटायचे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो आपण. चिप्स, तळलेले पदार्थ शक्यतो घरी ठेवूच नये. सणाला वगैरे ठीक आहे. नियमित सुका मेवा(ड्राय फ्रुट) ची एखादी डबी पर्समध्ये ठेवावी. किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवावी. घरातून निघताना, एखादे सफरचंद किंवा संत्रे पटकन उचलून पर्समध्ये घालावे. रात्रीच काकडी, टोमाटो किंवा काही सलाड कापून डब्यात ठेवावं म्हणजे घेऊन जाता येतं सकाळी. अशा एक न अनेक गोष्टी. मी पूर्वी कशी दिसायचे किंवा कसा दिसायचो हे आठवून काहीच उपयोग नाही. तसे पुन्हा होण्यसाठी काय केले पाहिजे हा विचार नक्की करा. आणि केवळ दिसणेच कशाला. आपण शारीरिक दृष्ट्या सशक्त आहोत ना हे जरी पाहिले तरी पुष्कळ आहे. वयाच्या ३५ वर्षानंतर जर पळायला लावले तर आपण सलग १५ मिनिट तरी पळू शकतो (जोरात नाही अगदी हळू वेगाने का होईना) का ते एकदा नक्की बघा.
           मध्ये एक पोस्ट वाचली होती, Its not about finding time, its about your priorities. आणि ते मला पटलेही. आपले आरोग्य ही आपल्या साठी सर्वात कमी महत्वाची गोष्ट का असावी? व्यायाम आणि योग्य आहार हे रोजच्या कार्यक्रमाचा भाग बनलेच पाहिजेत असा हट्ट ठेवा. पुन्हा एकदा, या लेखाने कुणाला दुखावण्याचा हेतू नक्कीच नाही. उलट काही फायदा झाला तर चांगलेच आहे. दिवसातून स्वत:साठी केवळ पाऊण ते एक तास काढून बघा, कसं वाटतंय ते. :)विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: