Sunday, February 21, 2016

No Regrets !!

             या वर्षी मी एक संकल्प केला.  म्हणजे तसे सर्वच करतात आणि मोडतातही. असो. तर संकल्प असा की प्रत्येक वेळी मुलं जेव्हा मला म्हणतील ना,'आई हे बघ.' तेंव्हा मी बघेनच. आणि पुढे मी म्हणाले,' I dont want any regrets'. माझा म्हणण्याचा हेतू असा की मुलं लहान आहेत तोवरच आई-बाबा म्हणून मागे लागतील, हौसेन दाखवतील तर आपण पहिले पाहिजे. उद्या ते दाखवायचे बंद झाले तर तेव्हा मला पश्चाताप नकोय. आज काल फेसबुक, Whats app वर पण असे बरेच पोस्ट येतात, कसं आपण आलेला क्षण पूर्णपणे जगला पाहिजे, हवं ते केलं पाहिजे, तसंच मुलानाही वेळ दिला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, इ इ.त्यांच्याबद्दल पुढे बोलूच.
            परवा काय झालं आम्ही स्नो-स्कीईंग ला जायचं ठरवलं. ठरवलं कसलं मित्र म्हणाला जाऊ म्हणून हो म्हणालो. अमेरिकेत इतके वर्ष राहून हेच एक होतं जे करण्याचं धाडस मी अजून केलं नव्हतं. दोन पोरांना घेऊन कुठे जायचं म्हणालं की टेन्शनच असतं मला. कुठे पडलं, लागलं, सर्दीच झाली, खोकलाच झाला. पण म्हणलं जाऊन बघू. अगदी वेळेत आवरून, सर्वांना ३-४ कपड्यांच्या आत कोंबून निघालो. अगदी वेळेत पोचलोही. पण तिथे ते वेगळे शूज, स्कीज, मास्क, हे सर्व ४ लोकांचं लावेपर्यंत १२ वाजले होते. म्हणजे परत पोरांना खायला द्यायची वेळ आली होती. बरं आता इतके कपडे अंगावर होते की स्वत:चं पोरं सापडलं तरी नशीब. त्यांना हाताला येईल ते फळ खायला दिलं आणि स्नोवर आलो. एकदम थंडीने वाट लागली होती. (संजय लीला भन्साळीने बाजीराव पेशव्याच्या तोंडात 'वाट लावली' हा शब्दप्रयोग दिल्यापासून मीही बिनधास्त वापरत आहे तो. असो. )
              मित्राने सांगितलं या छोट्या शिकाऊ टेकडीवर जाऊ आधी. मग सरकत्या जिन्यावरून आम्ही त्या टेकडीच्या वरच्या टोकाला गेलो. तिथून आमच्या मित्राने मुलांना एकेकाला नेतो असे सांगून त्यांची जबाबदारी घेतली. मला आणि संदीपला बेसिक माहिती देऊन सुरु करायला सांगितले. संदीप पुढे निघाला पण माझी काही जागेवरून हलायची हिम्मत होत नव्हती. जवळ जवळ अर्धा तास मी त्या टेकडीवर दोन्ही हातात त्या काड्या(काय म्हणतात त्यांना विसरले) घेऊन उभी होते. मनात अनेक विचार येत होते. ते स्की घेऊन सरकले आणि थांबता आले नाही तर? आणि थांबायला स्की वाकडे करायला लागतात म्हणजे स्पीड कमी होऊन थांबता येते. सर्व बोलायला ठीक आहे हो ! तिथे आल्यावर कळलं असतं. बरं मला मोठी भीती कशाची तर पाय वाकडे करून थांबताना गुडघे वाकले तर? नडगीला, घोट्याला कुठे लागले, हाडच मोडले तर? आणि हो, मी इतकी पण भित्री नाहीये तरी मला हे सर्व विचार येऊन पुढे जात नव्हते. सर्वात मोठी भीती मला, 'पायाला काही झाले आणि पळता आले नाही तर?" याची होती. या वर्षीच्या १०किमी, हाफ मेरेथोन मध्ये मला पळायचं आहे. ते मी सोडू शकत नव्हते. असो.
              शेवटी नाईलाजाने मी पुढे सरकले आणि सर्ररर्र्र…… सरकायला लागल्यावर काय सुचेना. थांबायला म्हणून गुडघे वाकवले तर घसरून पडून गेले. पाय वाकडे ठेवता येईना म्हणून कसेतरी दोन्ही गुडघे एका बाजूला केले. पण तरी दुखतच होते. शेवटी कुणीतरी मला ते स्की काढायला मदत केली. ते निघाल्यावर मी ५ मिनिट तशीच बसून राहिले. बाकी आजूबाजूला जाणारे लोक अंगावर पडतील याची भीती होतीच. मग शेवटी घसरगुंडीवर कसे सरकतात न, तसे घसरत घसरत कशीतरी खाली पोचले. मधेच वाटत होते की हिम्मत करावी का? पण मधेच वाटलं का पण? काय गरज आहे. गप घरी बसायचं न टीव्ही बघत. काय पाप लागणार आहे का? त्यामुळे मला स्वत:ला उचलून हिरोगिरी करण्यात काहीही जोर नव्हता.
             वाटलं पोरांना तरी शिकवावं म्हणून मी आणि संदीपने त्यांना थोड्या अंतरावर घेऊन जायचं आणि त्याने वरून सोडलं की मी खाली पकडायचं असं थोडावेळ केलं. मस्त केलं हो पोरानी. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलंच. अगदी पडले तरी निवांत पडत होते स्नो वर. त्यांना बघून मी थोडी सावरले. म्हणलं बरं झालं त्यांना तरी मजा तेव्हढीच. २.३०-३ वाजता खाण्यासाठी ब्रेक घेतला आम्ही. खाल्ल्यावर मी म्हणाले मी पण प्रयत्न करते रे. स्वनिक कंटाळला होता. म्हटलं चल यांचा शेवटचा राउंड घेऊ आधी. त्याला संदीपने सोडला आणि तो घसरत खाली येउन जोरात पडला आणि रडू लागला. तो काही उठेना. म्हटलं झालं आता कुठे हाड-बीड मोडलं असेल तर काय? आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार आला, 'कशाला आलो?' (आधी दोन्ही पोरांना इमर्जन्सी मध्ये नेऊन, त्यांना प्लास्टर लाऊन आणलेले अनुभव गाठीशी असल्याने अजून एकदा जायची इच्छा नव्हती. ) नशिबाने तसं काही नव्हतं. थोडा रडून स्वनिक ठीक झाला. मला जरा हुश्श झालं.
            सर्वांना धडधाकट घरी घेऊन येताना, गाडीच्या उबेत बसून मी विचार करत होते,'खरंच मला काय झालंय? एकदम एव्हढी भित्री का झाली आहे ? आधी असे बाकी प्रयोग मी केले आहेत आणि घाबरले आहे पण इतकी नाही. अजून एकदा जाऊ आपण नीट शिकू, पोरानाही शिकवू.' पण हे स्वत:ला सांगताना दुसरीकडे माझ्या मनात विचार येत होता, 'का? कशासाठी?'
हे सगळे पोस्ट असतात ना, ' आयुष्य आजच जगलं पाहिजे, I dont want any regrets, जे हवंय ते मनसोक्त करा' वगेरे, ते सर्व खोटे आहेत.  पुढचा विचार न करता प्रत्येक गोष्ट करता येत नाही, आणि समजा नाही केली एखादी गोष्ट आणि करावा लागला पश्चाताप, तरी असू दे. सगळंच जमतं असं नाही. शेवटी, 'अरे हे करायला हवं होतं' असं वाटण्यासाठीही काहीतरी हवं ना?
त्यामुळे ज्यांनी कोणी ते सेंटी पोस्ट लिहिले आहे ना, गेले मेले सगळे ते खड्ड्यात. लई त्रास दिला आहे त्यांनी. त्यांना एकतर स्कीईंग येत असेल, किंवा पुढच्या रंनिन्ग्चे विचार ते करत नसतील किंवा ते लोक अजून आई झाले नसतील. नक्कीच हे लोकं आई झाले नसतील.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Friday, February 19, 2016

एक मैत्रीण

परवा आमचा फोन झाला खूप दिवसांनी
आणि बराच वेळ बोललोही.
बोललो म्हणजे तरी काय?
नुसतं गॉसिप, अगदी बॉलिवूडबद्दलही.

इतके की हसलो की
डोळे भरले थोडे हसतानाही.
तक्रारी होत्याच जरा
घरच्या, थोड्या बाहेरच्याही.

तिनं बिस्कीट दिलं मुलीला
चार क्षण सुखाने बोलण्यासाठी
आणि मीही बाथरूम शोधलं
निवांतपणे ऐकण्यासाठी.

आम्ही मग आमच्याच झालो फक्त
दोघी आणि दुसऱ्या बाजूला जग.
बोलता बोलता कळत नव्हतं
कोण कुणाला समजावत होतं.

वाटलं, असायला हवं होतं तिथे
हात हातात धरायला.
'असू दे गं, होतं सर्व ठीक.'
असं एकमेकींना समजावायला.

बोलून सर्व प्रश्न सुटत नाहीत
तरी फोन ठेवल्यावर हलकं वाटतं,
मनावरचं मणभर ओझं कमी होतं
सगळं कसं सोपं वाटतं.

एखादी असते हसवणारी,
एखादी फक्त शॉपिंगला येणारी,
पण एखादीच असते 
प्रत्येक महत्वाच्या क्षणी आठवणारी.

कितीही दूर असलं  तरी
अंतर कमीच पडतं अशी मैत्री थांबवायला
प्रत्येकाला असावी अशी एक मैत्रीण
'फोन झाला' की हलकं हलकं वाटायला.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, February 18, 2016

हाडाचा विद्यार्थी

           आमचे आबा म्हणजे आजोबा शिक्षक होते, अगदी हाडाचे शिक्षक. कोरेगावमध्ये ते इंग्रजी आणि संस्कृत शिकवायचे. त्यांचे कितीतरी विद्यार्थी कदाचित अजूनही त्यांची आठवण काढत असतील. मी तरी काढते. मला समजायला लागले तसे मी त्यांना शिकवण्या घेताना पाहिले. कधी मुलांना रागवायचे, कधी छडी द्यायचे तर कधी शाबासाकीपण. मी कधी शंका विचारली की म्हणणार, 'वर चढ, ती डिक्शनरी काढ'. मला कंटाळा यायचा. कशाला ना डिक्शनरी? सरळ त्या शब्दाचा अर्थ सांगा म्हणजे झाले. तसे कसे. मग ते मला तो शब्द शोधायला लावत. तिथे पोचले की त्या शब्दाचा मूळ शब्द कोणता होता, त्याचा अर्थ काय आणि त्याचे बाकीचे अर्थ आणि उपयोगही सांगत. खरंतर मला कधी कधी कंटाळा यायचा या गोष्टीचा पण या जगात बाहेर पडल्यावर कळलं कि मला त्यांनी काय दिलं होतं. मला त्यांनी शिकायला शिकवलं होतं.
           त्यांची आठवण काढायचं कारण म्हणजे त्यांना स्वत:ला शिकायची खूप ओढ होती. रोजच्या पेपरमध्ये एखादा शब्द अडला तर स्वत: शोधून काढत की त्याचा अर्थ काय आहे. मला गम्मत म्हणून संस्कृत सुभाषितांचे अर्थ सांगत. एकदा नववीच्या इंग्रजीचा अभ्यासक्रम बदलला होता. तर बाजारातून ते पुस्तक आणून रात्रभर वाचत बसले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांना शिकण्याची किती ती ओढ. गेल्या कित्येक दिवसात मी नवीन काही वाचले नाहीये. शिकले नाहीये. मध्ये पळणं सुरु झालं तेव्हा तो नाद होता, कधी वेगवेगळे जेवण शिकण्याची हौस असते. पण एखादी भाषा शिकावी, माझ्या क्षेत्रातले काही नवीन वाचावे शिकावे हे करून खूप दिवस झालेत. अर्थात नोकरी बदलल्यावर जे काही शिकणे अपरिहार्य होते ते केले पण स्वत:हून काही करणे आणि गरज म्हणून यात फरक आहेच.
              पण  एखाद्या गणितासाठी डोकं खाल्याला, एखादी गोष्ट मला का येत नाही म्हणून रात्रभर जागल्याला खूप वर्षं झालीत. मला वाटतं मी अल्पसंतुष्ट झालेय. सध्या चालू आहे ना, मग कशाला शिकायचे? चालू आहे न काम, मग काय गरज आहे उगाच कष्ट घ्यायची? काहीतरी शिकायला हवं. एखादी नवीन गोष्ट दिसली की उत्सुकता चाळवली पाहिजे, 'अरे हे कसे केले असेल?' असा प्रश्न पडला पाहिजे. मी विचार करतेय मी किती वर्षांची होईपर्यंत माझ्यामध्ये थोडी तरी नवीन काही शिकायची इच्छा, कुतूहल राहील? मी ७५ वर्षांची असतानाही नवीन काहीतरी शिकण्यासाठी झटेन का? ज्या दिवशी नवीन काही शिकायची इच्छा संपली त्यादिवशी पुढे काय असा प्रश्न पडेल तेव्हा काय? ७५ चे माहित नाही पण लवकरच काहीतरी शिकायलाच हवं. हाडाचा विद्यार्थी व्हायला हवं. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 16, 2016

Are you connected?

        आज ट्रेन मध्ये बसून लिहिलं . बराच वेळ मिळतो विचार करायला आणि  लोकांकडे पाहायला पण. इथे आल्यापासून रोजचा  ट्रेनचा प्रवास असतोच. आम्ही इथे आलो तेंव्हा पहिले साधारण एक दोन आठवडे आमच्याकडे फोन नव्हते.आजकालच्या दिवसात दोन आठवडे फोन नाही? संदिपचा ऑफिसचा नंबर मिळाला आणि मी घरी असे तेव्हा ठीक होतं . पण एकदा मलाही एका इंटरव्ह्यू ला जायचं होतं त्याच्या ऑफिसजवळ. माझे काम झाले आणि त्याला फोन करून मी सांगितले की स्टेशनवर भेटू. आता आम्ही दोघेही निघालेलो होतो आणि स्टेशन नवीन असल्याने कुठे भेटायचे हेही नक्की नव्हते. मी पोचले आणि मला अस्वस्थ वाटू लागलं कारण भेटायचं कसं हे कळत नव्हतं. मी स्टेशनच्या आत-बाहेर दोन फेऱ्या मारल्या आणि बाहेर थांबायचं ठरवलं. मी बाहेर आले आणि समोरच तो दिसला. खरंतर आम्ही काही या देशात नविन नाही त्यामुळे घरी वेगवेगळे गेलो तरी नीट पोचलो असतो पण त्यादिवशी आनंद झाला.  काहीही संवाद नसताना बरोबर भेटण्याचा आनंद बऱ्याच वर्षांनी  मिळाला. आमची चुकामूक होण्याच्या कितीतरी शक्यता होत्या पण तरीही भेटलो, मस्त वाटलं. 
            तर आजचा प्रश्न असा की 'Are you connected when you are not connected?'. आजकाल फोन असल्याने माणूस अगदी समोर  उभा राहीपर्यंत आपण विचारतो 'कुठे आहेस?'. मग हात उंचावतो, खूण सांगतो. पण त्यात मजा नाही जी  एका जागी उभं राहून अस्वस्थपणे वाट पाहून, शोधून भेटण्यात आहे. आम्ही कॉलेजमध्ये म्हणजे ११-१२ मध्ये असताना, गावाच्या दोन टोकाकडून ७ जणी यायचो. सकाळी कितीही घाईत निघाले तरी आठवड्यातून बरेच वेळा आम्ही  भेटलेले असायचो आणि मग गप्पा मारत पुढचा रस्ता संपायचा. आता Whats app वर दर सेकंदाला अपडेट असतो तरी वेळेत भेटत नाही. ;)
            होतं काय की यात आपल्या माणसाच्या सवयी, वेळा सगळं लक्षात ठेवतो आपण. त्यावेळेस वाट पाहतो, अस्वस्थ होतो. विमानातून बाहेर पडल्यावर, फोन नसताना, केवळ तो पलीकडे आला असेल अशी अपेक्षा करत ती आणि या बाजूला तो, 'ती कुठल्या दारातून बाहेर पडेल आणि केंव्हा' या काळजीत. किती प्रेम असतं त्या भेटण्यात? केवळ चुकामुक होऊ नये म्हणून जागा न सोडता उभं राहणं आणि सावलीत उभे राहून, 'पोचलास की फोन  कर' म्हणणं यात किती फरक आहे? अर्थात माझं म्हणणं नाही की कुणी उन्हात उभं रहावंच. पण समजा तिचा स्वभाव ओळखून, 'ती नक्कीच उन्हात उभी राहणार नाही' असा विचार करण्यातही मजा आहे की नाही? 
           नियमित फोन असल्याने कितीतरी गोष्टींचा आनंदाला आपण मुकतो असे वाटते. परवा मी नसताना संदीपने भाज्या आणल्या आणि त्यात मी न सांगितलेल्या भाज्याही होत्या ज्या त्याने आठवणीने आणल्या आणि बरोबर मी विचारलं,'लाल भोपळा आणलास का रे?'. त्याने आणला होता. छोटीशी गोष्टं पण छान वाटतं  ना असं झाल्यावर? गाडीत बसून बाहेर पडताना काहीतरी राहिलं म्हणून त्यानं आत जाऊन येताना, मी विचार करावा की दुध आत ठेवलं असेल का मी? आणि त्यानं ते ठेवून यावं.  म्हणजे काय तर मी तुला आणि तू मला ओळखावं. :) होतं का असं आजकाल तुमचं?
              आज फोन न घेता बायकोला शोघायला लागलं तर असेल का माहित कसं आणि कुठे पाहायचं ते? समजा वेळ आली तर सांगता येईल का मुलगा कुठे आहे न फोन करता? घरी जाताना वाटतं का दोघानाही आज तिच्यासाठी/त्याच्यासाठी काहीतरी न्यावं त्यांनी बरेच दिवसांपासून मागितलेलं? भेटेल का तो आज पार्किंगमध्ये न ठरवताही त्याच जागी न चुकता? किंवा कॅन्टीन मध्ये एकाच वेळेला? 'Are you connected when you are not connected?'

विद्या भुतकर.
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, February 15, 2016

मला तो सगळीकडे दिसतो

अजूनही मला तो सगळीकडे दिसतो
बोलतो एक आणि वेगळेच करतो.
घर दोघांचं असलं तरी दाराच्या पाटीवर
पहिला त्याचाच मान असतो. 

बायकोच्या मैत्रीणी आल्यावर
आत जाऊन बसतो
त्याचे आल्यावर मात्र
चहाची अपेक्षा करतो.

शाळेच्या रांगेत उभे राहून
अडमिशनला धडपडतो
पोर आजारी पडल्यावर
बायकोलाच  रजा घ्यायला सांगतो.

भाज्या, सामान  आणून देतो
घर लावतो आणि केरही काढतो. 
घराचे हफ्ते आठवणीने भरतो. 
भांडी घासायला मात्र अजूनही कचरतो.

सासू-सासऱ्याशी बोलायचे टाळतो
'अहो जावो' केल्यास ऐकून घेतो
 आईबाबांच्या आदराचा हट्ट करतो
गोतावळाही तिलाच सांभाळावा लागतो.

स्त्रीने कितीही बरोबरीने शिकले
आणि सारखेच झटले तरी
त्याच्या मनात एक पुरुष असतो
अजूनही मला तो सगळीकडे दिसतो. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, February 14, 2016

तुझ्या आठवणी

 तुझ्या आठवणींना मी रोज टाळते
अनोळखी रस्त्यावरून घराचा मार्ग काढते.

तुझ्या आठवणींना मी रोज उजाळते
एखादी विसरू नये म्हणून मोजते.

तुझ्या आठवणींचा मी रोज निरोप घेते
उद्या परत न यायची वाट बघते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

हौसेला वय थोडीच असतं?

लेकी बोले सुने लागे तसं, बाकी सर्वांसाठी लिहिताना तुझ्यासाठी पण :)
            हौसेला वय थोडीच असतं?

नुसतं प्रेम असून चालत नाही,
थोडं दाखवायलाही लागतं. 
किती मनाला सांगितलं तरी,
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

माहितेय असतो सगळा फार्स,
खऱ्या प्रेमापेक्षा रोमिओंचा त्रास,
चारपट दर असला तरी हवं असतं. 
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

एक असो की वर्षं साठ,
 कितीही वय झालं तरी,
वाढदिवसाला एक 'गिफ्ट' हवं असतं. 
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

लोकांच्या लग्नाच्या अजूनही नटून,
 नवऱ्याला दाखवायचं असतं.  
'नाव घेताना' अजूनही लाजायचं असतं. 
 १४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

मुलं मोठी झाल्यावरही, 
बायकोला मिठीत घेताना,
आजूबाजूला बघायचं असतं.
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

सरलं सारं कौतुक आणि
आलं नातवंड तरीही,
हौसेला वय थोडीच असतं?
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं. 

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Friday, February 12, 2016

बरं' का? छान चाललंय म्हणा ना..

                          बरं' का? छान चाललंय म्हणा ना..

विचारलंच कुणी 'कसा आहेस?'
तर म्हणे,"माझं तसं बरं चाललंय.
बायका-पोरं ठीक,
परवाच प्रमोशन पण झालंय.
पण तरीही एक पोकळी असते
कातरवेळ हळवी असते…"

अहो पण कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना.
ओढून आणलेलं दु:खं कशाला?
तुम्ही नसताना करते न काळजी बायको,
घरी आल्यावर बिलगते न मुलगी?
सुखी संसाराला काजळी कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना.

पोट तर  भरावंच  लागतं
त्यासाठी काम पडल्यावर रडा कशाला?
'मी खूप खूष आहे' असं म्हणा ना?
पहा बरं म्हणून, 'मी खूष आहे.'
कसं वाटलं ? छान?
मग थोडं हसा ना?
हसायचं तर जपून कशाला?

मनाला कसं मोकळं करावं
उडेल तिथे उडू द्यावं
वाटलं कुणाला 'खूष दिसतोयंस'
तर त्यालाही थोडं जळू द्यावं
दिसलाच कुणी दु:खी तर त्यालाही म्हणावं,
"अहो पण कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना. "

जो दिसेल तो उदास असतो,
रडक्या गाण्यांनाच जास्त भाव असतो
काळजी असावी आणि अपेक्षाही,
भरारी असावी आणि स्वप्नही,
पण त्याला दु:खाची झालर कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना. "

रडण्यापेक्षा हसण्याचं कारण शोधावं
फुलणाऱ्या फुलाला मनभरुन पाहावं.
उद्या कोणी पाहिलाय
आज मिळाला ना?
मग आजचं आज जगून घ्यायचं.
रोज एकदा 'मस्त गेला दिवस' म्हणायचं.
 'बरं' का? छानच चाललंय म्हणायचं.

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, February 10, 2016

फिनिश लाईन

            आज खूप दिवसांनी पळाले, म्हणजे रनिंग केलं. जवळ जवळ ३-४ महिन्यांनी. मस्त वाटलं.गेल्या वर्षी दोन हाफ मेरेथोन पळाले, एका पाठोपाठ एक. भारी वाटलं होतं. पुढचे १५ दिवस धड चालता येत नव्हतं ही गोष्ट वेगळी पण केलं याचं समाधान होतं. आज सांगायचं कारण म्हणजे, खूप दिवसांनी पळताना मी कसेतरी ४ कि.मी. पार पाडले, चाललेच जवळ जवळ. वाटलं १३ मैल /२१ कि.मी.  कसे पार केले असतील मी? 
         तर हे अंतर पार कसं पाडलं असेल? सर्वात मुख्य म्हणजे सराव होताच. तरीही पळण्याच्या दिवशी, पहिला मैल वेगाने धावल्यावर धाप लागली. मग पुढे ३ मैलपर्यंत  जाताना वाट लागली होती. 
वाटलं,' झक मारली आणि असले उद्योग केले. '. 
'कशाला काय कारण होतं? सुखासुखी घरात बसले असते ना?'
'अजून १० मैल? शक्यच नाही.'
'निदान थोडं कमी अंतर घ्यायचं होतं.'
'अजून एक हाफ मेरेथोन कशाला हवी होती?'
              असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारात होते मी. शेवटी मग गाणी ऐकायला सुरु केली. फास्ट गाण्यामुळे थोडा जोर चढला आणि मी पुढचे दोन मैल धावले. तोवर माझ्या डोक्यात गणित चालूच होतं. ५ मैल झालेत. अजून ८ जायचेत. तेव्हढ्यात माझा स्पीड स्थिरावलेला होता. आजू बाजूचे लोक काय करत आहेत ते पाहून मी एकाद्या जोडीच्या मागे रहायला लागले. त्या दोघी गप्पा मारत जात होत्या. 
               मी मनातल्या मनात,' इथे श्वास घेता येत नाहीये आणि या काल रात्रीच्या गप्पा काय मारत आहेत?'. त्यांच्या मागे मागे मी २ मैल गेले. तोवर माझ्या लक्षात आलं ७ मैल झालेत. मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केलंय. मग मला जोर चढला. ९ मैल पर्यंत पोचल्यावर मात्र दम लागला होता. १०-११ वा मैल मी सर्वात कमी स्पीडने गेले. डोक्यात अनेक विचार होते. आजूबाजूला लोकांच्या नावाचे बोर्ड पकडलेले लोक उभे होते. त्यांचे प्रोत्साहन होतेच. पण डोक्यात आपण या रेस नंतर काय करू याचाही विचार येऊ लागला. 
                सर्वात लांबचा पल्ला १२ आणि १३ मैलाचा होता. पाय थकले होते पण थांबत नव्हते. आणि जायचे म्हणले तरी जोरात जात नव्हते.  गेल्या काही दिवसांची मेहनत, मेडल मिळाल्यावर होणार आनंद ,  मुलांचे चेहरे हे सर्व आठवून केवळ मनोबळावर ते शेवटचे अंतर पार पाडले. आजूबाजूच्या लोकांचे आवाज, 'Almost there', 'Almost there'  कानात घुमत होते. जवळ जवळ ३ तासात मी १३. १ मैल पार केले होते. ते मेडल हातात घेतलं आणि डोळ्यात पाणी आलंच, कितीही नाही म्हटलं तरी. 
                 आता हे रामायण यासाठी कारण रेसच काय आपलं आयुष्यही असंच असतं ना? एक अंतर असलं पाहिजे पार पाडण्यासाठी. जे पाहून, 'छे जमणारच नाही' असं म्हणून बसायला नको किंवा हे इतके कमी करण्यात काय मजा असंही नको. पण ते इतकं दूर हवं की जे पार पाडल्यावर नंतरसुद्धा स्वत:चं आश्चर्य वाटलं पाहिजे, 'अरे हे आपण कसं केलं असेल?' एक उद्देश पाहिजे, त्यासाठी रोज सकाळी उठून सराव केला पाहिजे. एखाद्या पहाटे त्यासाठी झोप सोडून बाहेर पडलं पाहिजे. आणि रेस सुरु झाल्यावर कितीही अशक्य वाटलं तरी पुढे जात राहिलं पाहिजे. 
             सुरुवातीला वाटतंच अशक्य आहे. त्यासाठी थोडी गाणी लावायची. बाहेरचा आवाज बंद करून आतला ऐकायचा. लागला दम तर आजू बाजूच्या, पुढे जाणाऱ्या लोकांच्या सोबत जायचं. निम्मं अंतर पार केल्यावर इतके आलोय तर पुढेही जाऊच म्हणून जात रहायचं. सर्वात अवघड म्हणजे शेवटचे अंतर असते. आज पर्यंत केलेले सर्व कष्ट, आपले लोक, बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन, हे सगळं घेऊन जोव गोळा करून सर्व शक्तीनिशी पळत जायचं ती फिनिश लाईन येईपर्यंत. मेडल तर मिळतंच पण मागे वळून पाहताना आपण हे केलं याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 09, 2016

माझाच 'तो'

काचेच्या पलीकडे तो केविलवाण्या 'शूर' चेहऱ्याने
आणि अलीकडे मी 'उशीर झाल्याच्या' काळजीत
उसनं अवसान आणून हात हलवित.

दारातून तो खिडकीच्या काचेत येतो
दोन बोटं ओठावर ठेवून
अलगद हवेत सोडतो.

मीही मग दोनदा तसंच करते.
हळूहळू  तो खिडकीच्या कोपऱ्यात येतो
पुढे जाणाऱ्या मला पाहण्यासाठी.


मीही क्षणभर थांबते
त्याला मनभरुन पाहायला
आणि पटकन पाठ फिरवते.

मनातल्या मनात त्याला सांगत,
'बाबा येतील लवकर घ्यायला'.
आणि तशीच बाहेर पडते,
'स्त्रीस्वातंत्र्याच्या' तथाकथित अपेक्षा पार पाडायला.

-तुझीच आई.

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, February 08, 2016

अट्टाहास कशाला ना ?

                                            अट्टाहास कशाला ना ?

अट्टाहास कशाला ना
नेहमीच चांगलं दिसण्याचा?
दहा छान फोटो काढून
एकच फेसबुकवर टाकण्याचा?
दिसायचं कधीतरी आहोत तसेच
आणि लोकांनाही बघू द्यायचं.
                                          
अट्टाहास कशाला ना
सर्वांच्या बरोबरीने प्रमोशनचा?
बाकीचे थांबले म्हणून
आपणही उशिरापर्यंत थांबण्याचा?
जायचं निघून वेळ झाल्यावर
आणि बोलू द्यायचं बोलणाऱ्याना.

अट्टाहास कशाला ना
घर टापटीप ठेवण्याचा?
कोणी येईल म्हणून
दर थोड्या वेळाने केर काढण्याचा?
बसू द्यायचं येणाऱ्याना पसाऱ्यात
आणि रमून जायचं फक्त गप्पात.

अट्टाहास कशाला ना
नेहमीच हसत राहण्याचा?
कितीही आतून तुटले
तरी ताठ उभे राहायचा?
दिसू द्यायचं डोळ्याखालचं वलय,
घ्यायचा एखादा आधाराचा हातही.

अट्टाहास कशाला ना
सुगरण बनण्याचा?
पाहुणे येणार म्हणून
पहाटे उठून स्वयंपाक करण्याचा?
जळू द्यायची एखादी फोडणी,
करू द्यायची नवऱ्याला म्यागीही?

अट्टाहास कशाला ना
आदर्श मुलं वाढवायचा?
हे करू नये, ते होऊ नये
म्हणून सारखे जपण्याचा?
पडू  द्यायचं त्यानांही कधी, 
दयायचा उभं राहायला धीरही.

अट्टाहास कशाला ना
प्रत्येक नातं टिकवायचा?
स्वत:चं मी पण सोडून
सगळं देऊन टाकण्याचा?
सोडू लावायचं थोडं त्याला, 
मागून घ्यायचं त्याच्याकडूनही.

अट्टाहास कशाला ना
सतत सर्वांगीण बनायचा?
'कसं जमतं गं तुला?'
असं म्हणवून घ्यायचा?
असू द्यायचं एखादं व्यंगही,
जगायचं फक्त आपलं आपल्यासाठी
सोडून सर्व अट्टाहास !

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, February 07, 2016

मल्टीपर्पज स्कार्फ

          मी पहिल्यांदा पुण्याला आले आणि १२ वर्षानंतर या दोन्ही मध्ये एकच साम्य होते ते म्हणजे पोरींच्या तोंडावरचे स्कार्फ. २००१ मध्ये पुण्यात आले तेंव्हा 'मी त्यातली नाहीच' या आवेशात स्कार्फ बांधण्याचं नाकारलं होतं. पण लवकरच खराब होणाऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरच्या पुळ्यानी मला वास्तवता आणलं. त्यानंतर गेले २ वर्षे जेव्हा तिथे होते तेव्हा मला त्या स्कार्फचं सत्यदर्शन झालं. त्याचे जे जे उपयोग मी केले त्यानंतर पर्स सोबत नसेल तरी चालेल पण स्कार्फ हवा हे माझं ब्रीदवाक्य बनलं. 
           अर्थात १०-१२ वर्षात थोडे फार बदल झाले होते, ते म्हणजे स्कार्फ बांधण्याच्या पद्धतीमध्ये. कधी मुली पंजाबी बायकांसारखे पदर घेतात न तसे घ्यायच्या, कधी मुसक्या बांधतात तसे पूर्ण चेहरा घट्ट बांधून तर आज काल नवीन पद्धत म्हणजे, 'दाढीवाले बाबा' असतात न तसे पुढे मोठा तुकडा मोकळा सोडून बाकी सर्व बंद करायचे. ते कसे करायचे हे मला शिकता आले नाही. मी आपली जमेल तसं बांधायचे. पण हा स्कार्फ किती मल्टीपर्पज हे मला खूप दिवसांपासून लिहायचे होते. आज त्याचे सर्व उपयोग मी इथे लिहिल्याशिवाय सोडणार नाही. 

१. गाडीवरून जाताना चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी. उन्हात काळे पडू नये म्हणूनही. 
२. केस धुतले असल्यास तसेच अजून २ दिवस नीट राहण्यासाठी किंवा धुतले नसल्यास कुणाला न दिसण्यासाठी. 
३. चेहरा लोकांपासून लववून बॉयफ्रेंड सोबत फिरण्यासाठी. 
४. रिक्षातून जाताना ऑटोवाल्याला कोण मुलगी आहे आणि काय बोलत आहे हे कणभरही न कळता फोनवर बोलत जाण्यसाठी. 
५. पोरांना रिक्षा किंवा बसमधून नेताना थंडी वाजू नये म्हणून. 
६. रेल्वेमध्ये सीटवर झोपवण्यासाठी, खाली किंवा अंगावर, गरजेप्रमाणे. 
७. पाहुण्यांकडे गेल्यावर पांघरूण कमी पडत असेल तर आतून ओढण्यासाठी.
८. सर्दी झाल्यावर रुमाल नसेल किंवा पेपर न्यापकीन नसेल तर, किंवा माझ्या सारखे गळके नाक असेल तर जोरदार नाक शिंकरण्यासाठी. मुलांना सर्दी झाली असेल तरीही हा उपाय आहेच. 
९. घरी अचानक पाहुणे आल्यास ओढणी म्हणून अंगावर घेण्यासाठी. 
१०. मी स्विमिंग क्लास ला जायचे तेव्हा केस सुकविण्यासाठी. 
११. पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यास थोडं कमी भिजण्यासाठी. 
१२. पर्स, महत्वाचे पेपर किंवा तत्सम महत्वाच्या वस्तू सांभाळण्यासाठी, झाकण्यासाठी. 
१३. फळे, भाजी आणायला गेल्यावर पिशवी मिळणार नाही असे म्हटल्यावर भाजी ठेवून घरी आणण्यासाठी. 
१४. कुणाच्या घरी ओटी भरल्यास ती घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी. 

          माझे हे उपयोग वाचून कुणाला वाटेल बाईला नक्कीच रुमाल, एक पिशवी आणि पांघरुणाची गरज आहे. ते सर्व मलाही मान्य आहे. पण वेळ पडल्यावर तो स्कार्फच उपयोगी पडतो. त्यामुळे माझ्याकडे १ नाही तर ३-३ होते.
          पहाटे, सकाळ, संध्याकाळ, रात्र कधीही आपला स्कार्फ आणि टू-व्हीलर घेऊन मुलांना मागे बसवून फिरणाऱ्या मुली पहिल्या की एकदम भारी वाटते. कधी एखादी आई मुलाला त्याच स्कार्फने पोटाला बांधून चाललेली असते. तर कधी एखादी काकू आपली भली मोठी स्वयंपाकाची कढई घेऊन जेवण बनवायला चाललेली असते. एखादी तरुणी बिग बाजार मधून घराचं सर्व सामान सांभाळत गाडीवरून जात असते. कधी दोघी मैत्रिणी खीखी करत जगाची फिकीर न करता फिरत असतात, तर एखादी आठ महिन्याचं पोट घेऊन खड्डे सांभाळत जात असते. 
           खरंतर या स्कार्फ बद्दल अनेक जोकही येत असतात. गंमत वेगळी, पण मला वाटते तो स्कार्फ पुण्याचं प्रतिक आहे आणि पुण्याच्या मुलींचे, त्यांच्या स्वातंत्र्याच. मला खात्री आहे पुढे पुण्याला येईन तेव्हा परत एकदा पुण्याची होऊन राहीन स्कार्फ बांधून. 

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, February 05, 2016

लेट इट स्नो..


                आज बाहेर मस्त स्नो पडतोय मी आणि संदीप घरून काम करत आहे आणि सानूला शाळेला सुट्टी आहे. शिकागोला पहिल्यांदा मी स्नो पाहिला तेव्हा खूप हरकले होते आणि काकडलेही. कापसासारखा अलगद जमिनीवर येणारा स्नो बघण्याचा अनुभव वेगळाच. गेल्या १० वर्षात कित्येक वेळा तो असा पडणारा बर्फ पाहिलाय पण प्रत्येक वेळी नव्याने दिसतो. जसं प्रत्येक वर्षी पहिल्या पावसात होतं ना तसं. थोडा थोडा करत बर्फ जमा होतो आणि मग सर्व दृश्य पालटते. रस्ता शुभ्र होतो. वाळलेल्या झाडांच्या फांद्या बर्फ जमा करू लागतात आणि बर्फाची फुलंच जणू झाडाला आलीत असं वाटायला लागतं.
               आपल्या पावसासारखा तो बरसत नाही आणि आवाजही करत नाही. पडत राहतो शांतपणे आणि अगदी जोरात असला तरीही आवाज होत नाही जरासाही. दिवसभर घरात बसावं आणि त्याच्याकडे पाहावं खिडकीमधून. काहीतरी गरम गरम खावं आणि एखादं पुस्तकही वाचावं. असे बरेच साधर्म्य वाटतं पाऊस आणि बर्फात पण तेव्हढेच परकेपणही. कितीही छान वाटलं तरी बाहेर पडावसं वाटत नाही त्या सुंदर बर्फात. वाटत नाही की चिंब भिजावं आणि कुणालातरी आठवावं. मुलांना बर्फात खेळायला मजा येते, ते जातात दोघेही बर्फाच्या ढिगात खेळायला. मी मात्र घरातूनच पाहत राहते परक्यासारखं. 
आजचे हे थोडे फोटो.

शिकागो मध्ये असताना ही कविता केली होती गम्मत म्हणून. आज इथे पोस्ट करतेय.

सूर्य !!

चारीबाजूला बर्फच बर्फ
आणि मनावर त्याचा थंडपणा
एकटं असल्याची जाणीव करून देतात
या परदेशात..उगाचच...
पूर्ण बंद होऊन चाललेले लोक,
आपल्यातले असले तरी
ओळख देत नाहीत...

तू ही पहिल्यासारखा येत नाहीस
ऊब द्यायला,
माझ्या गालावर टिचकी देऊन उठवायला...
आणि आलास तरी थांबतोस कुठे
मी घरी येईपर्यंत?

वाटतं आज नाही आलास,
उद्या येशील,
थोडसं हसू,थोडी उब देऊन जाशील...
उद्याही नसलास की
सर्व थंड वाटतं... अजूनच...

मागच्या वर्षी सोबत घालवलेले क्षण
आठवत राहतात
त्यांचीच काय ती साथ आता
तू पुन्हा येईपर्यंत.....
कदाचित मार्च, कदाचित एप्रिलपर्य़ंत??

-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 



Thursday, February 04, 2016

एकला चलो रे …

      कधी एकट्याने प्रवास केल्याचा आनंद घेतलाय? मी स्वत:हून फिरायला म्हणून एकटी गेले नाही पण कामानिमित्त, कॉलेजसाठी प्रवास झाला आहे एकटीचा. आजकाल ऑफिसला जायला मला साधारण एक- दीड तास प्रवास करावा लागतो आणि मग माझी विचारधारा सुरु होते. बारावी पर्यंत एकदम छोटं जग होतं माझं. कधी कुठे जायचं तरी आई-दादांसोबत गेले होते. सांगलीला कॉलेजसाठी एकटं प्रवास करणं म्हणजे माझ्यासाठी मोठ्या हिमतीच काम होतं. कोरेगाव ते सांगली ट्रेन जायचे दर १५-२० दिवसांनी. त्यात मग कधी पहाटेच्या ट्रेन जायचं तर जरा भीती वाटायची कारण मला झोप अनावर व्हायची आणि चुकून माझे स्टेशन चुकले तर? कोरेगांव-सांगलीच्या दरम्यान पहाण्यासारख असं खास नव्हतं पण ती ४ वर्षं माझ्यासाठी खास होती. प्रत्येक स्टेशन पाठ झालं होतं अगदी पायवाट असल्या सारखं. 
            सर्वात सुंदर प्रवास म्हणजे पुणे ते सातारा तेही पावसाळ्यात बसने करायचा. हिरव्यागार धुक्याने भरलेल्या घाटातून जाणारी बस, डोंगरावरून पडणारे धबधबे, थंड हवा आणि मनात ओलावा. कविमनाला चालना देणारा प्रवास. मुंबई-कोरेगाव प्रवास मात्र शक्यतो रात्री केलेत. का तर ८ तासाचा तो वेळ जागे राहून घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. पुढे विमानप्रवासही केला. त्याबददल पुन्हा कधीतरी.
            काय असतं बरं एकट्याने प्रवास करण्यात? एकतर बाजूला बडबड करायला कोणी नसल्याने तो वेळ फक्त विचार करण्यात जातो. आपल्याला स्वत:साठी हा वेळ मिळतो. असेही घर येईपर्यंत कुठे जायची घाई नसते. धावपळीच्या दिवसात तेव्हढाच विश्रांतीचा क्षण. जसे मी पुण्यात ऑफिसला जाण्याचा वेळ पुस्तक वाचण्यात किंवा मैत्रिणीशी गप्पा मारण्यात घालवायचे. तेव्हा त्यांना बरोबर माहीत असायचं की ही आता घरी निघाली आहे. मग मी कधी जेवायला काय करायचं याचा विचार करायचे. भूक लागलेली असली ना की मग खूप काही बनवायला सुचतं. त्यात आजकाल फोन असतोच सोबतीला. लगेच रेसिपी बघायची, रस्त्यात रिक्षा थांबवून हव्या त्या भाज्या, वस्तू घ्यायच्या आणि घरी जायचं. अजूनही ट्रेनमधून घरी येताना माझ्या डोक्यात विचार चालू असतात की घरात काय काय भाज्या शिल्लक आहेत, जेवायला काय बनवता येईल इ. 
               कधी मनात खूप गोंधळ चाललेला असतो आणि एक कोपरा हवा असतो कुणीही नसलेला. आयुष्यात पुढे काय करायचं आहे?  जे करतोय ते योग्य आहे का? मला नक्की काय करायचं आहे? असे अनेक प्रश्न असतात एकेका प्रवासात. पण असा प्रवास एकट्यालाच करावा लागतो. आपलं आपल्यालाच सावरावं लागतं, निर्णय घ्यावे लागतात. तर कधी कुणाला भेटायची ओढही. तेव्हा तो प्रवास कितीतरी दूरचा वाटू लागतो. कितीही वेळा घड्याळ पाहिलं तरी एक मिनिट झालेला असतो. मग अनेक गोड आठवणी येत राहतात आणि मन त्यात बुडून जातं.
              एकटी प्रवास करताना कधी तोच वेळ लोकांना पहाण्यात घालवता येतो. शेजारच्या मुलीने काय कपडे घातले आहेत यावरून आपल्याकडे काय नाहीये आणि तसा ड्रेस घ्यायचं किती दिवस झाले राहिलंय, किंवा असे बूट घ्यायचेच असे विचार येतात. कधी एखादं प्रेमात बुडालेलं जोडपं असतं तरी कधी छोट्या बाळाला घेतलेली आई. त्याच्याकडे बघून घरी जायची अजून ओढ लागते. कधी शेजारच्या दोघांचं बोलणं ऐकायची मजा येते तर कधी शेजारच्याच्या पुस्तकात किंवा kindle मध्ये डोकावायचं. आजूबाजूला कशाच्या जाहिराती दिल्यात आणि त्यात दिसणारे लोक कसे आहेत किंवा मराठी व्याकरण कसं चुकलंय किंवा स्पेलिंग चुकलं याच्याकडे बघायचं. 
               फोनमुळे अनेक गोष्टी चांगल्या झाल्या त्यातली एक म्हणजे मनसोक्त गाणी ऐकता येतात. एका पाठोपाठ आवडती गाणी ऐकत बसायचं. कुणाचाही त्रास नाही, कुणी मध्ये थांबवायला नाही. पण त्याचसोबत अनेक तोटेही झाले आहेत. ट्रेन/बसमध्ये २० पैकी १८ लोक तरी मान खाली घालून फोन मध्ये बघत बसलेले दिसतात. बरेचवेळा मीही त्यातली एका असते. कधी वाटतं, या फोनमुळे एखादं पुस्तक वाचता वाचता राहिलं असेल, एखादं गोड बाळ आपल्याकडे पाहत असेल तर त्याच्याकडे बघायचं राहिलं असेल. शेजारी बसलेल्या सुंदर मुलीला मदत करून तिच्याशी गप्पा मारायचं राहिलं असेल. आणि उद्या बनणारी एखादी प्रेमकहाणी फोनमुळे सुरूच झाली नसेल.  त्यामुळे सध्या रोजचा प्रवास करताना काहीतरी वाचायचा विचार करतेय, काहीतरी लिहायचा विचार करतेय आणि फोन सोडून लोकांकडे पाहायचं म्हणतेय. असेही माझ्याकडे वर करून कुणी बघणार नाही. :)
विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, February 03, 2016

रेडिओ

             परवा संदीप ला म्हणाले, 'आपण ना मुलांना संगीताने उठवत नाही'. 'म्हणजे काय?' त्याचा प्रश्न. तर मला असं म्हणायचं होतं की आम्ही लहान असताना सकाळी ६.३० ला रेडिओ सुरु होत असे. पुढचे ३ तास मग सकाळचे आवरताना  शास्त्रीय संगीत, हिंदी/मराठी बातम्या, मराठी सुगम संगीत, भावगीते आणि नवीन हिंदी गाणी अशा कार्यक्रमात जायची. त्याच्या मध्ये आईची स्वयंपाकाची गडबड, आम्हाला,'आवर, आवर' म्हणणे आणि आजोबांच्या शिकवण्या या सर्व गोष्टी चालू असत. एका तेलगु मित्राकडे एम एस सुब्बुलक्ष्मी चे सुप्रभातम ऐकले आणि एकदम कोरेगावची सकाळ आठवली. तेव्हा येताना मी संदीप ला मी सांगत होते की घरी जसे आम्ही संगीताने उठायचो तसे आपण मुलांना उठवत नाही.
           आमची सकाळ त्यांना उठवून वेळेत शाळेत पोहोचवण्यात जाते. शनिवार-रविवारी सान्वी आमच्या आधीच उठून टी व्ही लावून बसलेली असते.  आणि असेही आज कालचे रेडीओ स्टेशन असे नाहीत की जे लावून दिवसाची सुरुवात करावी. एकदा दोनदा मी सकाळी गाणी लावण्याचा प्रयत्न केला होता. पण एकूणच मला सर्व गोंधळ वाटायला लागला आणि मी गाणी बंद केली. मला कळत नाही की आधी का असं व्हायचं नाही. आमच्या घरात कितीही गोंधळ असला तरी त्या गाण्यांचा, बातम्यांचा कधी त्रास झाला नाही. उलट अंथरुणातून न उठता किती वाजलेत हे कळण्याचा सर्वात सोपा उपाय होता तो. पुणे-सांगली रेडीओ स्टेशनवरचं, 'या बरोबरच पुणे केंद्रावरील बातम्या संपल्या.' हे वाक्य एकदम डोक्यात बसलेलं. त्यानंतर ऐकायला मिळणारी गाणी म्हणजे सकाळची 'ट्रिट' असायची. 
             नुसती सकाळच नाही तर रात्रही याच गाण्यांनी संपायची. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, मोहमद रफी, हेमंत कुमार आणि मुकेश यांच्या सोबत होमवर्क पूर्ण व्हायचं. कित्येक वेळा अभ्यास सोडून फक्त गाणं ऐकत बसायचं. 'आजा सनम मधुर चांदनी में हम….' 
          शाळेनंतर परत असा रेडिओ रोजचा राहिला नाही. पुण्यात आल्यावर एफ एम रेडिओ सुरु झाला होता नुकताच, पण त्याच्यामध्ये ती मजा राहिली नव्हती. त्यात मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि फालतू जोकमुळे तर अजूनच वैताग येऊ लागला. तरीही मुंबईत माझ्या रुममेट सोबत रात्रीची गाणी ऐकत गप्पा मारण्याची एक छान आठवण अजूनही मनात आहे. मुंबईच्या उकाड्याच्या रात्रीमध्ये मध्ये जाहीराती नसलेला जुन्या गाण्यांचा तेव्हढाच काय तो शांत वेळ. असो.
             शिकागोमध्ये मी रेडिओला खूप मिस केलं. त्याचं कारण म्हणजे एखादं आवडतं गाणं अचानक लागावं आणि अख्खा दिवस छान जावा यासारखी मजा गाणी डाउनलोड करण्यात नाही. गेल्या दोन-तीन वर्षात ऑनलाईन रेडिओ ऐकत आहे आणि कधीकधी काम सोडून आवडतं गाणं ऐकायचा आनंद त्यात मिळतो. बोस्टनला आल्यापासून गाडीतही हा रेडिओ लावतो आणि आपल्यासोबत मुलानाही ऐकवतो. एक-दोनदा 'गाणं संपेपर्यंत गाडी बंद करू नका बाबा' असं स्वनिकने सांगितले याचाही खूप आनंद झाला होता मला. कदाचित आमच्या सोबत ही गाणी ऐकण्याची त्यांची स्वत:ची आठवण बनेल जी थोड्या वर्षांनी तेही माझ्यासारखीच आठवतील आणि लिहीतीलही….

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज- https://www.facebook.com/VidyaBhutkar1/



Tuesday, February 02, 2016

राहून गेलं ..

आज सकाळी अलार्म चुकला,
आणि घाईघाईत उठताना, 
झोपलेल्या तुझ्याकडे प्रेमाने पहात 
'गुड मोर्निग' म्हणायचं राहून गेलं.. 

पोरांचे डबे बनवताना, 
'बाय' म्हणत तू निघताना, 
दारात येऊन तुझ्याकडे पहात 
'बाय' म्हणायचं राहून गेलं.. 

दुपारी ऑफिसमध्ये जेवताना 
तू ठेवलेलं सफरचंद खाऊन 
फोनवर बोलताना 
'थ्यांकू' म्हणायचं राहून गेलं.. 

संध्याकाळी कंटाळून आल्यावर 
वैतागून सोफ्यावर बसताना 
तू आवरलेलं घर पाहून 
'छान' म्हणायचं राहून गेलं.. 

व्हॉटस एप वर मैत्रिणीशी बोलताना, 
बाकीचे जोक वाचताना, 
शेजारी बसलेल्या तुझा 
हातात हात घ्यायचं राहून गेलं.. 

कधीतरी पिक्चर बघताना 
प्रेमाची मोठी स्वप्नं बघताना 
छोट्या छोट्या गोष्टीतून 
प्रेम दाखवायचं राहून गेलं .. 

विद्या भुतकर . 

Thursday, January 28, 2016

प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं

कविता:  प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं

प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं,
कणाकणात रुजलेलं, लहानपणी खेळलेलं,
आपल्यासोबत वाढलेलं
तर कधी स्वत:च्या हाताने वाढवलेलं.

कधी असतं बोरं चिंचानी लगडलेलं,
मित्रांसोबत चोरून तोडताना माळ्यानं पकडलेलं.
कैरीच्या रुपात कुणाची चाहूल देणारं,
कधी पानांनी नवीन घराचं तोरण बांधलेलं.

कधी असतं शाळेतलं पिंपळाचं,
मानगुटीवर भुतासारखं भीती बनून राहिलेलं.
तर कधी वडाचं, पारंब्याना लटकलेलं,
खाली पडून हात गळ्यात बांधून घेतलेलं.

असतं कधीतरी ते
माणसाच्या रूपातही, आईबाबा सारखं,
उन वारा स्वत:च्या अंगावर घेऊन
नेहमीच सावली देऊ पहाणारं.

असतं कधी भाऊ बहिणीचं
आपल्याला आतून बाहेरून ओळखणारं.
तर कधी मित्र-मैत्रिणीचं, कितीही वर्षांनी भेटलं
तरी जुन्या आठवणींनी हसवणारं.

असतं कधी आपलंच बीज ते,
पोटात वाढणारं, नंतर घरभर नाचणारं.
हाताचा पाळणा आणि
रात्रीचा दिवस करून वाढवलेलं,
गेल्यानंतरही आपल्या आठवणी काढणारं.

प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं,
दुखात आधार देणारं,सुखात आठवण येणारं.
कधी असतं ते तुझ्या-माझ्यासारखं
एकमेकांना धरून सोबत वाढणारं.

-विद्या भुतकर.



Tuesday, January 26, 2016

झाड वडाचं

            मागच्या आठवड्यात एका मराठी चित्रपटात मला वडाच झाड दिसलं आणि मी त्या हिरोला सोडून झाडाकडे बघत होते. कारण वडाचं झाड मला फार आवडतं. अगदी शाळेत असल्यापासून. लहानपणी जेव्हा मला कळलं न की त्याची मूळं झाडावर असतात, खूप आश्चर्य वाटलं होतं. कोरेगावात भरपूर वडाची झाडं पाहिली. आजही कोरेगावच्या वेशीतून आत जाताना दोन्ही बाजूनी पारम्ब्यांची कमान घेऊन ही आपल्या सावलीने स्वागत करतात.  गेल्या वर्षात खूप काही बदललं आहे गाव, पण ती माझ्या गावाची खूण आहे माझ्यासाठी न बदललेली. मला एक कळत नाही, त्यांच्या पारंब्या बरोबर अर्ध गोलाकार कशा राहतात रस्त्यावर? गाड्या टेकून त्यांना तसा आकार येतो की कुणी देतं? असो. 
          आम्ही खूप लटकायचो लहानपणी त्याच्या पारंब्यांना. मध्ये सानू आणि स्वनिकलाही एकदा तो खेळ दाखवला. पण माझ्या हाताची कातडी सोलली गेली आणि तेवढा जोर आता अंगात नाही असं नक्की वाटलं. पण पोरांना मजा आली. पुढे सांगली किंवा पुण्यात माझा इतका संबंध नाही आला त्याच्याशी. मुंबईत TCS चं एक ऑफिस होतं, बनियन पार्क. लहान असताना मजेशीर वाटायचं हे नाव, बनियन ट्री असं कुणा झाडाचं नाव असू शकतं का? त्या मुंबईतल्या ऑफिसचं नावंच फक्त बनियन पार्क होतं. झाडं कमीच. अमेरिकेत तर काही कुठे दिसलंच नाही. 
           काय विशेष आहे बरं या झाडाचं ? ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व. एखाद्या वृद्ध ऋषीसारखं तेही आपल्या जटा वाढवून बसलेलं, आपली सावली सर्वांना देण्यासाठी. त्याच्या पारंब्याची कल्पना मला एकदम भारी वाटते. मुळातून सर्वच रुजतात, वाढतात पण फांद्यानाही रुजू द्यावं, वाढू द्यावं आणि त्यांनी मूळ बनून अजून फांद्यांना वाढवावं. किती मस्त कल्पना आहे न. कित्येक शिक्षण संस्थांनी आपलं मानचिन्ह म्हणून या झाडाला यासाठीच निवडलं असावं. विद्यार्थ्यांना शिकवावं आणि त्यांनी पुढे जाऊन अजून ज्ञान वाढवावं, पसरावं. आणि त्या संस्थेने अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या झाडासारख ऋषी बनावं. तीच कथा सावित्रीच्या गोष्टीची. मी कधी वडाची पूजा केली नाही वटपौर्णिमेला. तरी मला वाटतं की माझ्या घराचा वंश असाच वाढावा, पसरावा हे दर्शविण्यासाठी या सारखं दुसरं झाड नाही. फक्त पूजेसाठी कुणी त्याच झाडाच्या फांद्या तोडू नयेत हिच विनंती. 
            गेल्या दोन वर्षात कोथरूड कडून खराडीकडे जाण्याच्या रस्त्यावर मी बरीच वडाची झाडं पाहिली. काही ठिकाणी झाड न तोडता रस्ता रुंद केलेलाही पाहिला. पण बऱ्याच ठिकाणी ही भली मोठी भव्य बुंध्याची झाडं अगदी छाटून टाकली होती. अशी बोडकी झाडं पाहायला फार कसंतरी वाटलं. किती तरी वर्षं पुढे त्यांनी सावली, हवा आणि वारा दिला असता. खूप वाईट वाटलं. पण साधारण २-३ महिन्यांनी पाहिलं तर त्या छाटलेल्या बुंध्याला कुठेतरी कोपऱ्यात पानं आली होती. एकाद्याची पारंबी अगदी जमिनीला टेकली होती. कितीही लुटलं, पडलं तरी पुन्हा जिद्दीने उभं राहणं याला म्हणावं. तेव्हापासून मी वडाची अजूनच मोठी fan झाले आहे. 
अशा एक ना अनेक कारणामुळे प्रिय असलेलं हे झाड, वडाचं.
-विद्या.

Sunday, January 24, 2016

संसार म्हणजे चालायचचं !!


घर कितीही आवरलं
तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की
दुध उतू जायचंच
संसार म्हणजे चालायचचं.

रविवारी एखाद्या खूष होऊन
हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र
चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचचं.

पोरांसाठी सगळं करतो म्हणलं
तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की
पांघरूण घालताना कुरवाळायचं
संसार म्हणजे चालायचचं.

बाहेर कितीही चेष्टा केली तरी
तू मला आणि मीच तुला ओळखयाच.
शॉपिंग ला गेल्यावर,
दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

धावपळ करून का होईना
चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून 
आई-बाबांनाच आठवायचं.
 संसार म्हणजे चालायचचं.

जरा एका जागी स्थिरावलं की
पुढे जायला बस्तान हलवायचं.
आधीचं सोडून चूक तर नाही न केली
हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

छोट्या छोट्या गोष्टींवरून
तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून
एकत्र  होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

-विद्या भुतकर.

Thursday, January 21, 2016

डोसा इडली आणि मी

           मला खायची खूप हौस आहे. :) आता यात वेगळं काय? प्रत्येकाला असते. असो. मला दोन दिवसापूर्वी झालेल्या पार्टीमध्ये खूप खाल्ल्यामुळे दोन गुलाबजाम कमी खावे लागले याचं दुख: होतं. तेही ऑफिसच्या कुठल्यातरी मीटिंग मधे. तर कधी फेसबुक वरच्या फोटो मध्ये बघून आजच ही डिश ट्राय करायचीच असं मी ट्रेनमध्ये बसून ठरवते. मग त्यासाठी सामान आणावं लागलं तरी चालेल. माझ्या या उत्स्फूर्त स्वयंपाकाला काट मारतात ते म्हणजे डोसा आणि इडली. यांनी मला खूप काही शिकवलं आहे. काहीही हं. खरंच. :) 
             मला वाटतं डोसा आणि इडली ची आवड आईकडून आली आहे. आई म्हणे आम्हाला घेऊन सांगली मध्ये एका ठिकाणी मोठा पेपर डोसा खायला न्यायची. प्रत्येकवेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीला गेल्यावर. :) तेवढाच काय तो आमचा लहानपणीचा संबंध. पण गरम गरम सोनेरी रंगाचा डोसा, चटणी खायला किती भारी वाटते. किंवा मस्त मऊ गरम गरम इडल्या, चटणी आणि तिखट सांबर. विचार करून पण पाणी सुटतं तोंडाला. तसे मला मेदू वडा, उत्तपम आणि आप्पे पण आवडतात, पण मी त्यांच्या नादाला लागत नाही. :) मला वयाच्या २५-२६ वर्षांपर्यंत माहीत नव्हते की केरळी, तमिळ, तेलगु आणि कन्नड असे ४ वेगळे प्रांत आहेत आणि त्यांच्या भाषा आणि जेवणही वेगळं असतं. माझ्यासाठी सर्व इडली डोसा होते. 
              कोरेगाव मध्ये मी कधी हॉटेल मध्ये खाल्ले नाही. का माहित नाही पण त्यामुळे डोसा आणि इडली खाणार कुठे हा प्रश्न होता. मी ७-८ वी मध्ये असताना आम्हाला ते कोरड्या पीठाचे पाकीट मिळते असे कळले. पण त्याला नॉनस्टिक तवा पण लागतो. आता तेव्हा निर्लेप नुकताच बाजारात येत होता. मग एकदा ते पाकीट आणि तो तवाही आला. पण डोसा कुणाला येत होता? मग मी आणि आईने एक गंमत केली. पीठ पातळ करून तव्यात टाकायचे आणि तवाच गोल फिरवायचा. पीठ परसले की गोल डोसा तयार. आणि ही माझी रेसिपी मी पुढचे १५ वर्षे वापरली. :) तरीही मनासारखा डोसा यायचा नाही. बरेच वेळा पीठ तव्यालाच लागून राहायचे. मला वाटायचे मला का नाही जमत मस्त घरी पीठ बनवून डोसा करायला? म्हणजे किती खाता येतील. :) इडलीचे मात्र बरे होते. कधीतरी आईने काटदरेंचे इडली पीठ आणले आणि बास, एकदम भारी इडल्या व्हायच्या. त्यात आपण ते घरी करू शकतो वगैरे विचार पण मनात आला नाही. कॉलेजमध्ये असताना टपरीवर खायचे तर पुण्या-मुंबईत उडपी हॉटेल मधे. 'वाडेश्वर' आणि 'पृथ्वी'ला खूप डोसे आणि इडल्या खाल्ल्या मी. वैशाली आणि रुपाली काही जास्त आवडले नाही. 
           शिकागोला आल्यावर मात्र माझी स्वत: इडली डोसा बनवायची इच्छा खूप वर येऊ लागली. डोसा पातळ पिठाचा आणि इडल्या MTR च्या. मला तर आधी हे पण माहित नव्हतं की रवा आणि तांदूळ अश्या दोन वेगळ्या प्रकारच्या इडल्या करू शकतो. मैत्रिणींच्या घरी बनवलेल्या मस्त इडल्या आणि डोसे बघून फार त्रास व्हायचा. मी एक दोन वेळा तयार घरगुती बनवलेले पीठ आणून पाहिले डोसा करायला. पहिले १-२ खराब यायचे नंतर मस्त झाले डोसे, पण खूपच थोडे व्हायचे. मग एकदा ठरवलेच की घरी करायचे सर्व. गुगल होतेच मदतीला. डाळ तांदूळ भिजवले आणि दुसऱ्या दिवशी बारीक करायला घेतले. तेव्हा कळले की दोष माझ्या अमेरिकन मिक्सर मध्ये आहे. त्यात नीट बारीकच व्हायचे नाही. मग मी नवीन मिक्सर आणला. तो बराच चांगला निघाला. पण त्यात ती मजा नव्हती. एकदा भारतात गेले असताना मग बजाज चा मिक्सर घेऊन आले. यात साधारण ३-४ वर्षं गेली असतील. सानू जिथे दिवसभर राहायची त्या सांभाळणाऱ्या बाई तेलगु. दर शुक्रवारी मी आणि संदीप तिथे गेलो की खाल्ल्याशिवाय निघायचोच नाही. बर स्पीड म्हणावा की काय? माझी इच्छा तीव्र आणि आत्मविश्वास कमी होत होता. 
          साधारण ७-८ वर्षात हळूहळू माझे डोसे सुधारले. इडली मात्र मला जमत नव्हती. मध्ये २ वर्षे भारतात होते तर नेहमी खालून तयार पीठ आणायचे, स्वयंपाक करणारी बाई इडल्या लावून सांबारची तयारी करून द्यायच्या. मला बराच आराम होता. गेल्या ८-९ महिन्यात मी परत विडा उचलला चांगल्या इडल्या बनवायच्याच. दाल-तांदळाचे माप थोडे बदलले पण त्याने काही फरक पडला नाही. २-४ वेळा घट्ट गोळा झालेल्या इडल्या मला स्वतालाच गेल्या नाहीत. शेवटी मागच्या महिन्यात भारतातून 'वेट ग्राईनडर' आणला. त्यात दोन दगडाच्या मधून पीठ बारीक होते, तासभर. मला जर अस्वस्थ होत होते की किती वेळ चालू ठेवायचे मशीन. पण परवा पीठ मस्त झाले एकदम आणि इडल्याही. शनिवारी सकाळी मनासारखी इडली, चटणी गरम गरम खाण्यासारखे सुख नाही. 
          पण त्यासाठी मला आधी ठरवून वेळेत डाळ तांदूळ भिजवावे लागतात, मेथ्यासहित. आठवणीने ते बारीक करावे लागतात आणि गरम जागेत ठेवावे लागते. हे सर्व झाले तर ते करायची वेळ पण जमली पाहिजे. शनिवार किंवा रविवार सकाळ. जास्त दिवस बाहेर राहूनही चालत नाही, नाहीतर पीठ आंबते. किती ते नाटक. तरीही ते सर्व करायची इच्छा मला दर १५ दिवसांनी होतेच. आता कळले आहे की डाळ तांदूळ कसे भिजवायचे, किती वेळ ठेवायचे. मेथ्या घालायच्याच. तवा गरम असेल तर पाणी शिंपडून घ्यायचे. चपाती-डोसा करायला एकच तवा वापरायचा नाही. तूप घातले की डोशाला जरा वेगळी चव येते. चटणी पावडर (साउथ इंडियन शब्द आणि चटणी) वरून घातली तर डोसा परतायचा नाही, नाहीतर चटणी जळून धूर होतो. आणि सर्वात शेवटचे म्हणजे, कितीही झाले तरी तुमचे डोसे श्रीदेवी इतके फास्ट आणि चांगले होणार नाहीत. त्यामुळे ती बोलली की लगेच खाऊन घ्यायचे, लाजायचे नाही.
         आज काल, खाण्यापेक्षा सर्व मस्त जमून आले आणि एकदम छान बनले याचाच आनंद जास्त होतो. शिवाय पोरांना पण हे आवडते याचा आनंद वेगळाच. मी आता पीठ बनवले की इडल्या करते. मग दुसऱ्या दिवशी त्याचाच डोसा. उरले तर पीठ फ्रीजमध्ये ठेवते आणि एकटी असताना मस्तपैकी करून खाते. :) जसे आज केले होते. आमच्या घरातली डोसा आणि इडली घरी बनवणारी पहिली मीच बरंका.  :) तर जसं मी म्हटलं या इडली डोसा ने मला खूप काही शिकवलं. कितीही वर्षे गेली तरी हवं ते मिळवायचा, शिकायचा प्रयत्न करत राहायचं, आणि आलं की त्याचा आनंद घ्यायचा. 
अरे हो, त्याच्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी, सांबर यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी. :) 

विद्या.

Wednesday, November 13, 2013

मी कुठली ?

       मोठ्या उत्साहाने पुण्यात  आले. तिथल्या अनेक आठवणी होत्याच पण स्वत:चं घरही होतं. पंधरा-वीस दिवस झाले आणि मला शिकागोची आठवण येऊ लागली. तिथल्या सगळ्याच गोष्टींची, घर, गाडी , ऑफिस, फ्रेंडस, हॉटेल्स, आवडत्या खायच्या गोष्टी, कपड्यांची दुकानं आणि पुणं आपलं वाटेनासं झालं. कारणं बरीच होती, संदीपला  यायला होणारा उशीर , मग एकट्याने संध्याकाळी केलेली धावपळ, इथे बरेच मित्र असले तरी गाडीअभावी शून्य झालेलं 'सोशल लाईफ'. 
         एकदा कुठेतरी वाचलं होतं की एखादी जागा, शहर आपलं वाटणं म्हणजे तरी काय? तिथे एखादं रुटीन असणं, एखादं ऑफिस जिथे एक दिवस नाही गेलं तर कुणी विचारेल 'सगळं ठीक?' , एखादं हॉटेल जिथे महिन्यातून एकदा का होईना जायचंच आणि गेल्यावर तिथे कुणी ना कुणी ओळखेल, एखादी भाजी, फळ जे तिथल्या ठराविक ऋतूमध्येच मिळतं आणि एखादा ऋतू जो सुरु होण्याची चाहूल लागताच त्या ऋतूच्या कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या होतील. हे सगळं मला आठवत होतं पण शिकागो मधलं.
        म्हटलं बघावं तरी पुण्यात सुरुवात करून. आता आठ वर्षं एका ठिकाणी राहिल्यावर असं होणारंच. इथेही प्रयत्न करून पाहायला हवा.  म्हणून शुक्रवारी घराजवळच्या डॉमिनोज मध्ये मुलांना घेऊन चालत गेले बरेचदा. पण तिथल्या थंड प्रतिसादाने परत जायची इच्छा होईना त्यात पावसाळा लागून गेला मग तेही राहीलं. एक दिवस मी ऑफिसमधून निघाले आणि कोपऱ्यावर एक रिक्षावाला म्हणाला 'मैडम वारजे ना?' . पुढे मग दोन तीन वेळा तोच आला.  मला वाटले अरे वा हे रुटीन चांगल आहे. पण नंतर नंतर मला कळले की त्याला तिकडे यायचेच नहिये. म्हटले जाऊ दे. आम्ही पूर्वी एका हॉटेल मध्ये जायचो म्हटले चल जाऊ तिकडे एकदा. तिथे गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण पहिल्याच भेटीमध्ये मला जाणवलं की तिथल्या खाण्यामध्ये किती रंग मिसळला होता ते. मुलीच्या ड्रेसवर सूप सांडलं तर त्याचा नारंगी डाग दिसू लागला. आणि  खाण्यावरून मन उडालं. 
      अशातच गणपती आले. मस्त वाटलं सणाला इथे राहायला, खूप दिवसांनी अनुभवायला. सोसायटी मध्ये अनेक कार्यक्रम झाले मुलांना मजा आली. आम्ही पण उत्साहाने फोटो काढण्याची जबाबदारी घेतली. पाच दिवसात फोटो संपले आणि सर्व पुन्हा आपल्या मार्गाला लागले. तिथल्या आपापसात होणाऱ्या गप्पांमध्ये आपण परके वाटतोय याची जाणीव असायची.  सहा महिने होऊन गेले तरी मला पुणं आपलंसं वाटत नव्हतं. अशातच शिकागोला महिनाभर जायचा प्लान ठरला आणि मला लक्षात आले की मी परत जायला जास्त उत्सुक होते. लगेच मैत्रीणीना फोन करून सांगितले कि मी येतेय त्यांनीही आनंद व्यक्त केला. काही लागलं तर सांग म्हणाल्या. मीही निर्धास्त होते. काही लागलेच तर निदान बाहेर जाऊन घेऊन यायला दुकाने तरी माहीत होती. मुलांच्या शाळेतूनही होकार आला एक महिना ठेऊन घ्यायला. तेही वाट बघत होते मुलांना भेटायला. 
       शिकागोला पोचल्यावर अजूनच भारी वाटलं अगदी घरी परत आल्यासारखं. कशाची काळजी नाही, एकटेपणा नाही की कंटाळा नाही. अगदी ऑफिसमधेही सर्वांनी उत्साहाने स्वागत केले. जेवणं ठरली, भेटायच्या वेळा ठरल्या, कार्यक्रमाची आमंत्रणं आली. गेले सहा महिने इथे नव्हतो असं वाटतच नव्हतं. अगदी रोजच्यासारखे रुटिन होते. पहिले दोन आठवडे तर नुसत्या भेटि घेण्यातच गेले. शॉपिंग, बाहेर खाणे, संध्याकाळी घरी लवकर परत येणे , मुलांना वेळ देणे, आणि सोशल लाईफ सर्व परत मिळालं होतं. मनात कणभरही शंका राहिली नाही की दोन वर्षांनी आपण परत इकडे यायचेच.
        तिसऱ्या आठवड्यात मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मात्र घराची आठवण झाली. वाटलं त्याला आजी-आजोबा, मामा-मावश्या पाहिजेत लाड करायला. थोडाफार साजरा करून तो दिवस असाच निघून गेला. तिथल्या Organized social gathering च्या मर्यादा जाणवल्या. एखाद्याने आपल्या रोजच्या रुटिन मधून बाहेर काही करणं किती दुर्मिळ आहे असं वाटलं. ऑफिसच्या दिवशीही २०-२५ किमी प्रवास करून भाच्यांना भेटायला येणाऱ्या मामा-मावशीची आठवण झाली. दोन दिवसात दिवाळीही आली. तेव्हा गणपतीला केलेल्या सोसायटीमधील कार्यक्रमाची आठवण झाली. लोकांचा उत्साह आठवला. शिकागोमध्ये करून करून  काय करणार तर  मुलांना तयार करून पूजा करणार, मंदिरात जाणार आणि पॉटलक करून लोकांना भेटणार. एखादा सण साजरा करण्यासाठी तिथे असलेली केवळ चार भिंतीची मर्यादा अजून एकदा जाणवली. वाटलं पुण्यात असायला हवं होतं. 
          अशातच तिथे थंडी अजून वाढली आणि दे-लाईट सेविंग मुळे वेळही बदलली. संध्याकाळी ५ वाजता बाहेर पडले आणि एकदम अंधार दिसला. रस्त्यावर लोकांचं दर्शन दुर्मिळ झालं. घरी येऊन मुलांना थंडीत बाहेर नेणंही जमत नव्हतं . तेव्हा मला माझ्या पुण्याच्या रुटीनची आठवण झाली. पाच वाजता बाहेर पडलं की रहदारी, लोकांचा, गाड्यांचा आवाज, घरी गेलं की नेहेमी दार उघडं असलेले शेजारी, मग संध्याकाळी मुलांना खाली खेळायला नेणं, हे सर्व आठवलं. पुण्यातल्या घराचीही आठवण येऊ लागली होति. शनिवार-रविवारी मिळणारा निवांतपणा, घरात येणारं ऊन, उजेड, वारा, त्यांच्या सोबतीला चहा. कामाला येणाऱ्या मावशींच्या मदतीने सुखकारक होणारा सुट्टीचा दिवस, शनिवारी भाज्या आणणं, त्याही ठराविक व्यक्तीकडूनच. मग त्यांनी मुलांना खायला हातात दिलेले  वाटाणे, यांची आठवण येत होती. शेवटचा आठवडा वाट पहाण्यात संपून गेला. 
           घरी परत आले आणि कसं मस्त वाटलं. मुलांना आजी-आबा, काका-काकू, मामा भेटले. त्यांच्याकडे पाहून कळत होते कि त्यांनाही सर्वांची आठवण येत होती. कामाला येणाऱ्या मावशीही अगदी वेळेत आल्या आम्ही आल्यावर. घर छान स्वच्छ करून दिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले तर तिथेही सर्वांनी चौकशी केली, आठवण काढली. बिल्डींगमध्ये सर्वांनी प्रेमाने विचारपूस केली. मुलांना 'मिस' केलं म्हणाले दिवाळीला. अगदी सोसायटीच्या दिवाळीच्या कार्यक्रमात फोटो काढायलाही आमची आठवण झाली म्हणे. :) पहिल्या दिवशी ऑफिसमधून परत येताना नवीन रोजचा रिक्षावाला उभा होता. मी आले कोपऱ्यावर की तो सीट झटकून रिक्षा सुरु करून थांबला. मला कुठे जायचंय हे सांगायची गरजही नव्हती. :) मी पुण्याची होतेय हे तिथून बाहेर गेल्यावर कळलं होतं. :)
 
विद्या. 

Friday, November 08, 2013

आय टी ची लॉटरी

      एक १५-१६ वर्षापूर्वी, मी आणि माझी आई स्वयंपाकघरात  बसलो होतो. तिचा स्वयंपाक आणि माझा गृहपाठ चालू होता. मध्येच आम्ही लॉटरीवरून गप्पा मारू लागलो. आपल्याला एका लाख रुपयाची लॉटरी लागली तर काय काय करता येईल, विकत घेता येईल  याचा विचार करत होतो. त्यात मग रंगीत टीव्ही, फोन, फ्रीज, इ गोष्टी होत्या. चार चाकी एखादी गाडी घ्यावी असं काही वाटलं नाही. ती आमच्या स्वप्नातही नव्हती. ती लॉटरी काही आम्हाला लागली नाही, पण थोड्या वर्षात एक वेगळीच लॉटरी लागली, ती म्हणजे I T ची. हो, त्याला लॉटरीच म्हणावी लागेल कारण बारावी नंतर केवळ डॉक्टर किंवा वकील नको व्हायला म्हणून मी इंजिनीयर झाले. मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोरेगावात एकही इंजिनीयर पाहीला नव्हता. त्यामुळे केवळ एका काल्पनिक पात्राकडे एक करियर म्हणून पाहणे आणि तो निर्णय योग्य ठरणे ही लॉटरीच नव्हे काय?
         तर मी इंजिनीयर होण्यामागे अजून एक हेतू होता, तो म्हणजे स्त्रियांसाठी हे क्षेत्र खूप चांगलं होतं म्हणे. एक तर लगेच नोकरी मिळत असल्याने गुंतवणुकीवर लगेच परतफेड मिळत होती आणि पुढे व्यवसायासाठी लागणारे भांडवल इ एका मुलीला कोण देणार होते? त्यापेक्षा करा नोकरी आयुष्यभर. त्यात कामही बैठे, म्हणजे शारिरीक त्रास कमी. १५-२० वर्षापूर्वी मी केवळ ठराविक क्षेत्रातच स्त्रिया पहिल्या होत्या. एक तर शाळेत मास्तर म्हणून, थोड्याफार वकिली करणाऱ्या होत्या पण त्यांची मिळकत किती असेल याची कल्पना नाही. मग त्यातल्या त्यात सुरक्षित नोकरी म्हणजे सरकारी, बँकेत किंवा टेलिफोन खात्यात, कुठे कचेरीत क्लार्क म्हणून. आणि खूपच पुढे गेलेल्या म्हणजे राजकारणात. आज काल मी बरेच स्त्रियांना पोलिसाच्या वेशात पाहिलंय, काही ट्राफिक पोलिस पाहिल्या, एक तर बसमध्ये कंडक्टर पण पाहिली. हे सर्व मी लहानपणी पाहिलं नाही हे नक्की. असो, एकूण माझा कॉम्पुटर इंजिनीयर व्हायचा निर्णय योग्य ठरला कारण माझ्यासोबत आपल्या देशालाही ही I T ची लॉटरी लागली होती.
           भारतात एक तर पहिल्यापासून गणित, शास्त्र आणि इंग्रजी या तीन विषयांवर शाळांमध्ये भर दिला जातो. त्यामुळे या तीन विषयांचे ज्ञान असलेला आणि बऱ्यापैकी कळेल असे इंग्रजी बोलणारा आणि स्वस्त असा मोठा कामगार वर्ग परकीयांना इथे मिळाला. अर्थात त्याच वेळी भारताची अर्थव्यवस्थाही जगाला नुकतीच खुली झाली होती आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक थोडी वाढतही होती. त्याचसोबत इथल्या कामगार वर्गाची ओळखही होत होती. अर्थात Outsourcing हे काही नवीन नव्हते, तोवर आपण वेगवेगळ्या manufacturing कपन्यांसाठी काम करतच होतो पण या पांढरपेशा व्यवसायात पाय ठेवणे नवीनच होते. त्यात वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या भारतीय कापन्यांची मदतही झालीच. TCS, WIPRO, INFOSYS सारख्या  कपन्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट भारतात कसे आणता येतील यासाठी बरीच मेहनत घेतली. त्याचसोबत त्यासाठी लागणारे योग्य लोकंही त्यांनी इंजिनियरींग कॉलेजमध्ये जाऊन शोधून आणले.
         साधारण २००० सालच्या दरम्यान एका वेगळ्याच प्रश्नामुळे या लोकांसाठीची मागणी अजून वाढली. तो म्हणजे Y२K चा प्रॉब्लेम. तोपर्यंत बऱ्याचशा वित्तीय संस्थांमध्ये जे काही प्रोग्रामिंग केले गेले होते त्यात तारीख लिहिताना वर्ष हे 'YY' या दोन अंकात लिहिले जात होते. त्यामुळे २००० साली त्या सर्व प्रोग्राम मध्ये दोन तारखांची वजाबाकी करताना ००-९९ अशी वजाबाकी झाली असती आणि सर्व गणित चुकले असते. तर या अशा प्रोग्राम मध्ये दुरुस्ती करण्यासाठी बऱ्याच कंपन्यांची धावपळ उडाली. कोणी संगणकात थोडे फार ज्ञान असलेला माणूसही 'रिसोर्स' म्हणून कामाला लावला गेला. त्यामुळे मागणी वाढली की त्यासाठी पैसाही जास्त मागितला गेला. २००१ मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे थोडी मंदी आली होती पण तोवर जगाला भारताची I T व्यावसायिकांचा देश म्हणून ओळख झाली होती त्यामुळे आर्थिक मंदी कमी झाल्यावर पुन्हा एकदा हा व्यवसाय वाढतच राहिला.
          लोक आपल्या मुलांना इंजिनीयर बनवत होते आणि भारतीय कंपन्या त्यांचे परदेशातील वास्तव्य आणि प्रस्त वाढवत होते. त्याच वेळी भारतीय सरकारलाही या क्षेत्राचे महत्व लक्षात आले होते आणि त्यांनी वेगवेगळे उपक्रम आणि सवलती सुरु केले. सर्वात पहिले म्हणजे Information Tehcnology साठी एक स्वतंत्र खाते बनवले गेले. (अर्थात त्यात फायदा त्यांचाच होता, तेव्हढाच एक नवीन मंत्री आणि तेव्हढेच त्याचे मान-पान.)  २००० साली, Information Technology Act २००० प्रस्थापित केला. इलेक्ट्रोनिक स्वरुपात दिलेल्या- पाठवलेल्या माहितीला कायद्याने मान्यता मिळाली. सायबर गुन्ह्यांसाठी वेग-वेगळे नियम लागू करण्यात आले. या खात्याची वेगळी वेबसाईट ही आहे, http://deity.gov.in/.
संगणकीय मालावारील आयात कर कमी करण्यात आला आणि परकीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवर सवलती देण्यात आल्या. त्याचबरोबर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सोफ्टवेअर टेक्नोलॉजि पार्क आणि स्पेशल इकोनॉमी झोन या योजना राबवण्यात आल्या (STPI  आणि SEZ ).STPI मधून होणारी निर्यात अनेक पटींनी वाढली. २००८-०९ मध्ये STPI मध्ये नोंदवलेल्या कंपन्यांची निर्यात एकूण भारतीय निर्यातीच्या ९०% होती. अर्थातच  सरकारने त्यासाठी २०११ पर्यंत या कंपन्यांना कर सुट्टीच(Tax Holiday) दिली होती. तसेच सोफ्टवेअरशी संबंधित आयातीवरील करातही सवलती देण्यात आल्या. २००५ मध्ये वित्तीय आणि दळणवळण खात्याने खास झोनची स्थापना केली, SEZ,  स्पेशल इकोनॉमी झोन. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पायाभूत घटक भारतातही असले पाहिजेत या मूळ कल्पनेतून हे झोन बनवले गेले. त्यातून ही निर्यात जास्तीत जास्त सुरळीत आणि सोपी झाली. STPI आणि SEZ मध्ये मूळ फरक म्हणजे करातील सवलत सेझ मध्ये कमी करण्यात आली. पहिले पाच वर्षं, १००%, पुढचे पाच ५०% आणि त्यानंतर चे ५०% नफा आरक्षित साठ्यामध्ये ठेवण्याच्या अटीवर. या सर्व योजना अवाढव्य वाढणाऱ्या उद्योगासाठी नक्कीच फायदेशीर होता.
      दुर्दैव म्हणजे, या सवलती दिल्यामुळे जो पैसा सरकारला मिळाला असता आणि त्यातून पुढे जे आधुनिकीकरण करता आले असते ते काही झाले नाही.  पैसा मिळतो म्हणून बाकी क्षेत्रातील बरेचसे हुशार लोक इथे/परदेशात याच क्षेत्रात अडकून गेले. शिवाय इतके लोक सर्व परकीय कंपन्यासाठी काम करत असल्याने, भारतीय कार्यक्रमाना चांगले लोक मिळणे अवघड झाले. कित्येक बँका, सरकारी खात्यांच्या वेबसाईट इतक्या फालतू आणि हळू असतात की त्यावर जाणेच नको वाटते, अगदी आपली रेल्वेची साईट, पासपोर्टची साईट सुद्धा. म्हणावे तसे बाकी खात्यांचे संगणकीकरणही झाले नाही, ज्यामुळे अनेक लोकांचे कष्ट, पैसा आणि वेळ वाचला असता.
       अनेक सवलती आणि योजनामुळे या व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. त्याचा फायदा माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना अधिक झाला. जिथे एका शिक्षकाला १० हजार रुपये मिळवण्यासाठी कित्येक वर्षे खर्च करावी लागत होती तिथे पहिल्याच महिन्यात त्याच्या मुलाला १०-१५ हजार सहज मिळू लागले.  त्यातूनच पुढे परदेशातही जाण्याची संधी मिळू लागली. जिथे मराठी माणूस कधी उत्साहाने फिरायला म्हणून जात नव्हता तिथे मुले घेऊन जाऊ लागली. लोकांनी आयुष्यभर पैसा जमवून घर उभं करावं तेच आता कर्ज घेऊन का होईना तरुणपणीच घेण्याची हिम्मत होऊ लागली. अर्थात हि हिम्मत करायलाही थोडा वेळ गेलाच. कारण सरकारी नोकरीतील स्थिरतेमधुन बाहेर पडून प्रायोजित कंपनीत नोकरी करायची हे पटायला वेळ लागलाच. त्याचसोबत धनसंचय न करता न तो स्वत:साठी खर्च करण्याची पाश्चात्य देशातील मानसिकताही हळूहळू तरुण पिढीत आली.
         आपल्या गुंतवणुकीवर परतफेड इतल्या लवकर होत आहे हे पाहून लोकांनी जसे मुलांना अभियांत्रिकी विद्यालयात घालण्यासाठी वाट्टेल ते पैसे देण्याची हिम्मत केली तसेच वेळोवेळी फी वाढवणारी आणि पैसा बळकावणारी विद्यालये सुरु होऊ लागली. काळा पैसा तर या अशा संस्थांमधून पांढरा होऊ लागला. मुलाला ५०% मार्क असले तरी कितीही फी देऊन त्याला इंजिनियरच करायचे हे मात्र नक्की. त्यात मग आधीच घोकंपट्टीला बढावा देणारी शिक्षणसंस्था अजूनच मजबूत झाली. नुसती महाविद्यालये कशाला? त्यासाठी सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमातून शिकवणाऱ्या शाळाही सुरु झाल्याच. International School म्हणून जिथे मुलाला घालतो ते खरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे का? हा विचार किती पालक करत असतील?
          या सगळ्या महागड्या शाळांमध्ये मुलांना घालण्यासाठी पालकही कष्ट करतच होते की. घरासाठी कर्ज, मुलासाठी कर्ज, हे सगळं फेडायचं म्हणजे कितीही त्रास झाला तरी नोकरी सोडता येत नाही ना. मग नवरा-बायको दोघांची नोकरी गरजेची. त्यासाठी आख्खं घर घड्याळाला टांगलेलं. नोकरीवर जायची घाई, यायची घाई, मुलांना शाळेत सोडायची घाई, आणायची घाई, अभ्यासाची, जेवायची आणि परत झोपयचीही घाईच. त्यात नोकरीतील तणावाचा नवरा बायको यांच्या संबंधांवर होणारा परिणाम आणि त्याचा मुलांवर होणार परिणाम हे वेगळेच. माझे बाबा शिक्षक होते. ते रोज ५.४५ पर्यंत घरी आले नाहीत की आम्ही सगळे दारात उभे अजून आले नाहीत का पाहायला. एखाद्या दिवशी ते गावाला गेले तर ते येईपर्यंत आम्ही गाडीवर पडून असलो तरी ते आल्यावरच झोप लागायची. त्यांच्यासोबत खेळणं, बोलणं इतकं होत नसेलही पण ते घरी होते न? अशा वेळी रात्री ८ वाजेपर्यंत आई-बाबांची वाट असणाऱ्या मुलांकडे पाहून खूप वाईट वाटतं.
         माझी आई तरी घरी होती. माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलींचे आयुष्य तर कायमचे बदलून गेले. स्त्री-पुरुषांना बरोबरीने वागणूक देणे मिळणे, सर्व मान्य. पण त्यासाठी मुलं -बाळ संसार सर्व टांगून ठेवायला लागू लागला. बर हे क्षेत्र सुरक्षित, चांगला पगार, स्थैर्य हे सर्व आहे म्हणून कित्येक मुली यात आल्या. मग हळू हळू BPO सुरु झाले, अमेरीका, इंग्लंड वेळेतील शिफ्ट सुरु झाल्या. त्यासाठी ने-आण करायला ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनी अजून सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला. तरीही समाजाची मानसिकता पूर्णपणे बदलत नाहीच ना? त्यामुळे लग्नासाठीही बघायला आलेले , 'मुलगी BPO , कॉल सेंटर मध्ये काम करते?  म्हणून  आधीच नाक मुरडू लागली आणि त्याहून त्यांचे आई-वडील. हे सर्व असले तरी आपणही स्वावलंबी होऊ शकतो हा विश्वास मुलींमध्ये हळूहळू येऊ लागला. मुलगीही मुलाइतकाच पगार मिळवू शकते, परदेशात जाऊ शकते, एकटी फिरू शकते याचा आई-वडिलानाही अभिमान वाटू लागला. बायकोसाठी नवराही थोडी घरची कामे करू लागला. तरीही ओढाताण होऊ लागली ती मुलं होताना. घराची जबाबदारी स्वीकारून, नोकरी आणि दमलेल शरीर हा सर्व मेळ घालणं अवघड होऊ लागलं. एक आई म्हणून मुलाला लोकांकडे सोडून  राहणं हे मानसिक ताण-तणावाचेच ना?
      सगळ्यासोबत अजून एक वेगळाच ग्रुप झाला तो म्हणजे अस्थायिक भारतीयांचा. त्यांच्याही मनाची अशीच परवड, फक्त भारतात राहायचे की परदेशात म्हणून. तिथल्या सोई-समृद्धी बघून तिथे स्थावर होणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्याचसोबत मुलांचे संगोपनाचे प्रश्नही. आता नको, थोड्या दिवसांनी जाऊ म्हणून कायम तिथे राहणारे आणि खरंच परत आले तरी इथे समाधान न मिळणारे असेही लोक त्यात आलेच. त्यांच्या सोबत त्यांच्या घराच्या लोकांचीही परवड. मुलाला भेटायला कधीतरीच तिकडे जायचे की तिथेच राहायचे? ज्या वयात मुलांनी-नातवांनी सोबत करावी त्यात एकटं राहणे हा वनवासच. आणि गेले तिकडे तरी आयुष्यभराचे नाते-गोटे सोडून तिकडे जायचे, तोही त्रासच.
       या क्षेत्राबाद्दला अजून म्हणजे लवकरच बाकीही देश स्पर्धेत येत आहेत. आपल्या सध्याच्या पिढीने थोडा जरी आळस केला तर चीन सारख्या कष्टाळू देशाने आपल्याला मागे टाकायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपली मानसिकता, शिक्षणसंस्था  बदलण्याची गरज आहेच. घरासोबत बाहेरही बरेच बदल झालेत. परकीय संस्कृतीची अजून जास्त ओळख पटत आहे. बाजारपेठेत नाव-नवीन वस्तू पाहायला आणि त्या घ्यायलाही जमत आहे. तिथे पाहून आलेली, आवडलेली, खाल्लेली एखादी पाककृती आता घरीही बनत आहे. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूही बाजारात सहजपणे मिळत आहेत.त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीपासून दूर तर जात नाहीये न हे ही पहिले पाहिजे. एकूण काय की या क्षेत्रामुळे भारत जगाच्या नकाशावर आला. खूप चांगल्या गोष्टीतर घडल्याच,  पण त्याची किंमतही आपल्याला द्यावी लागली आहे . शेतीप्रधान देशातील सर्व लोक शहरांकडे वळू लागले आहेत, त्यामुळे शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या रोडावत आहेच. पण उद्या IT ला मंदी आल्यावर लोक कुठे जातील आणि काय व्यवसाय करतील याची योजना वेळीच केली नाही तर काय होईल माहित नाही. लवकरच याला पर्याय शोधणे आवश्यक आहे, आपल्या आणि मुलांच्या भविष्यासाठीही.
  आय टी
-विद्या

Wednesday, September 11, 2013

एक संस्था

         DCH चं वेगळे ठोके असलेलं मुझिक सुरु होतं आणि त्यासोबत नावाच्या पाट्या पडायला लागतात. सिनेमा संपला म्हणून नाईलाजाने उठून कामाला सुरुवात  करावी लागते. पण डोक्यातून तो जात नाही. त्या रेंगाळणाऱ्या दुपारी किंवा संध्याकाळी, तो सोबतच राहतो. तसंच ' जिंदगी मिलेगी ना दोबारा' चंही. 'सुरजकी रांहोमे अब है ये जिंदगी' सुरु होतं , कत्रिना आणि ह्रितिक नाच करीत येतात तरी उगाचच उदास वाटत असतं. या दोन्ही सिनेमांची थीम एकच, जिवलग मित्र, त्याचं जुनं जग मग, झालेली भांडणे आणि मग पुन्हा एकदा भेटणं. या सगळ्यात एक अदृष्य व्यक्तिमत्व असतं जे दिसत नाही पण त्याचा प्रभाव  दिसतो. ती म्हणजे एक संस्था, एक शाळा किंवा कॉलेज जिथे हे लोक भेटलेले असतात, हसतात, रडतात, भांडतात . ती एक कॉमन गोष्ट या लोकांना एकत्रित आणते आणि ठेवतेही.
           परवा भावाच्या पदवीदान समारंभासाठी संदिपसोबत COEP ला गेले. खरंतर तासाभराची सुट्टी घेऊन गेलो होतो  आणि   उशीरही झाला होता त्यामुळे पळत पळतच जात होतो. तरीही जाताना त्या संस्थेचे ठसे मनावर उमटत होते. तिथल्या मुलांकडे पाहून  कॉलेजची आठवण येत होती. त्यांच्याकडे पाहून वाटत होते अरे खरंच आपण वयाने मोठे झालो. ती मिसरूड फुटलेली, खुरटी दाढी, पाठीला पिशवी नाहीतर हातात वह्या, मळकी जीन्स सगळं सारखंच. मुलींच्या कपड्यांमध्ये थोडा बदल होता पण तीच सडसडीत अंगकाठी, चेहऱ्यावरचे कोवळेपण, बोलण्यात उत्साह, चालण्याची लकब सर्व तसंच, कॉलेजच्या मुलींसारखं. त्यांच्यामधून धावत गेलो तर प्रवेशद्वाराजवळ गार्ड म्हणाला, 'पेरेंट?' मोठे दिसत असलो तरी 'पेरेंट म्हटल्यावर वाईट वाटलं. असो.पुढे संदीपने दाखवलं 'हे आमचं डिपार्टमेंट', 'ही लायब्ररी', ' हे कम्पुटर डिपार्टमेंट, आमचा कधी संबंध नाही आला', इ.  काही ठिकाणी ' अरे? हे असं केलंय? ', 'हे बदललंय ' अशी उद्गारचिन्हही ! त्याच्या बोलण्यातून त्याच्या त्या संस्थेचा अभिमान दिसत होता. त्याच्या जागी मी  कॉलेजमध्ये गेले असते तरी असंच काही तरी झालं असतं, 'तेच गणपती मंदिर, माझं डिपार्टमेंट, मी न फिरकलेल डिपार्टमेंट, हॉस्टेल, कॅन्टिन. तोंडात रुळलेले काही शब्द, काही ग्रुप. लोकलाईट, हॉस्टेलाईट, सातारचे, सोलापूर, कोल्हापूरचे. या सगळ्यांची वेगळी ओळख तर मैत्रीची सरमिसळ. सगळीकडे सारखंच.
           होतं काय, की हे सिनेमे बघताना हे सगळं अनुभवल्यासारखं वाटतं, त्यांच्या हसण्या-बोलण्यात आपणच दिसतो, त्यांच्यासोबत पुन्हा भेटण्याचं स्वप्नही बघतो. ते स्वप्नं सिनेमासोबत संपून जातं आणि वास्तवात आल्यावर उदास व्हायला होतं. कारण एखादं भांडण अजून मिटलेलं नसतं, एखादा मित्र अजून तुटलेलाच असतो आणि एखादी मैत्रीण एका गावात असूनही संसारात अडकून पडलेली असते. तर अशा या सगळ्या मनांमध्ये 'ती संस्था' मात्र अजूनही त्याच लोकांसोबत तिथल्या आठवणींसोबत तशीच असते आणि अशा सिनेमांमधून दिसत राहते. अजूनही कधी कुणी भेटलं की म्हटलं जातं , 'अरे तू वालचंदची का? मी पण.' :)

-विद्या. 

Wednesday, August 07, 2013

योगायोग

            आपण लोक पण ना इतके वेडे असतो. म्हणजे कशानेही खूष होतो, अगदी कुठल्याही छोट्या कारणाने. मित्राने डब्यात भेंडीची भाजी आणली, खूष ! ऑफिसला येताना पाऊस पडला नाही आणि ऑफिस मध्ये आल्यावर सुरु झाला , हो खूष. बसमध्ये बसायला जागा मिळाली, हो खूष.  दोघांनीही एकाच वेळेस एक वाक्य बोलले, हो खूष आणि मग पुढे हीहीही…खिखिख. आता काल रस्त्यावरून जाताना खूप छान पेरू दिसले. आम्ही दोघेही मग उतरलो आणि मुलांसाठी घेऊ लागलो. चांगले पेरू मिळाले म्हणून आम्ही खूष आणि एकदम एक किलो पेरू घेणारे गिऱ्हाईक मिळाले म्हणून मालक खूष.
             तीच कथा काळजीची. आम्ही पेरू घेत असताना तिथे एक माणूस पेरू घेत होता. म्हणाला एक कडक द्या आणि एका जर मऊ द्या. मग त्याने स्वत:च दोन निवडून घेतले आणि बाजूला झाडाखाली गेला. तिथे एक वयस्कर माणूस उभा होता. त्याच्या कानाजवळ वाकून म्हणाला,' हा घ्या. तुमच्यासाठी मऊ बघून आणलाय'. ५-१० रुपयाची कथा पण किती काळजी आणि प्रेम वाटत होतं त्यात. कुणी गावाला चाललंय? मग सोडायला जा, रात्री उशीर झाला तर आणायला जा. फोन लागत नाही म्हणून काळजी, फोन उचलत नाही म्हणून काळजी, त्याचा फोन येणार तर चार्जिंग संपत आलंय म्हणून काळजी. आज रागावून गेला, चहा न घेताच गेला, रात्री सर्दीने झोपच नाही, काही न काही असतंच.
              माझा आणि माझ्या भावाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो हे मी कित्येक लोकांना सांगितले आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षाही करते. तर हे असे योगायोग कुठे न कुठे घडतच असतात. पण ते सांगण्यात आणि प्रतिक्रिया देण्यातही किती आनंद आणि आश्चर्य?  मुलीची आणि एका मैत्रिणीच्या मुलाची जन्मतारीख एकच. तर ऑफिसमध्ये सर्वांना आम्ही लगेच सांगितलं. ते बिचारे काय करणार त्यात? आता एखादीला बाळ होण्यासाठी दिलेली तारीख समजली की त्यातही ती आपल्या, आपल्या नातेवाईकांच्या तारखेच्या किती जवळ आहे ते सांगत बसायचे. आता १० मार्च तारीख दिली असेल तर ते बाळ १९ मार्चपर्यंत कशाला थांबेल पोटात काकाच्या वाढदिवसाची वात बघत? काहीही !! कधी कधी तर जन्मतारीख आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस यांचाही धागा जोडायचा प्रयत्न करायचा. असो.
           कधी कधी आपण काही गोष्टी सोडूनही देतो. सासूने एखादा टोमणा मारला, जाऊ दे. ऑफिसमध्ये कुणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, जाऊ दे. कधी नवीन आणलेली छत्री, चप्पल पहिल्याच वापरात खराब झाली, जाऊ दे. रस्त्यावरून खड्डा चुकवला नाही असा एकही क्षण नाही, जाऊ दे. मुलाने पहिल्याच दिवशी नेलेली वस्तू हरवली, जाऊ दे. उठल्यापासून झोपेपर्यंत कित्येक गोष्टी अशाच सोडून देतो. पण कधी तेव्हढ्याच छोट्याशा गोष्टीवर भडकतो देखील. चालताना एखाद्याचा चुकून धक्का लागला, लगेच मागे वळून 'काय रे, दिसत नाही का म्हणतोच?' रिक्षावाल्याने १० रुपये जास्त मागितले की त्याला ऐकवतोच. धोब्याने कपड्याचा डाग नाही काढला , बाईने भांडं नीट नाही घासलं, आईने डब्यात सर्व दिलं पण चमचाच नाही दिला, बाबांना हजार वेळा सांगूनही रिक्षा न घेता बसच घेतली. चिडायला कुठलंही कारण पुरतं.
         वाटत किती क्षुद्र आयुष्य आहे नाही आपलं? कशानेही खूष होतो, कशानेही रडतो, हसतो, चिडतो. मोठ्या लोकांचं नसेल ना असं होत. म्हणजे एखाद्या अंबानीला भाजी स्वस्त झाली म्हणून थोडीच आनंद होणार आहे? की होणार आहे एखाद्या राजकारण्याला संताप रस्त्यात ट्राफिक लागलं म्हणून ? की  बसमधून उतरल्यावर लगेच रिक्षा मिळाली म्हणून कुणी शाहरुख आईला फोन करणार आहे? आपल्या या छोटेपणावर हसू येतं, पण त्यालाच जिवंत असणं म्हणत असावेत. सर्व भावनाच बोथट झाल्यावर आनंद कशाचा आणि दु:खं कशाचं ? असा विचार केल्यावर वाटतं बरं आहे छोटंच राहिलेलं. 

-विद्या.
 

Wednesday, July 17, 2013

झिम्मा- आठवणींचा गोफ

         आज रिक्षातून जाताना खूप रिकामं वाटत होतं. इतक्या दिवसांचा माझा आणि त्या पुस्तकाचा प्रवास संपला म्हणून. हे असं वाटणं म्हणजेच पुस्तक आवडलं बहुदा.   'झिम्मा' वाचायला घेतलं ते मुळात त्याबद्दलचे दोन रिव्ह्यू वाचल्यामुळे.
विजया मेहता यांनी त्यांच्या मराठी रंगभूमी, सिनेमा, टीव्ही अशा वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या कारकिर्दीचे त्यांच्या शब्दातील वर्णन. आत्मचरित्र म्हणता येईल पण त्यापेक्षा त्यांच्या रंगभूमीवरच्या अनुभवांची साठवण म्हणणं जास्त योग्य होईल. 
          सर्वात आधी सांगायचं म्हणजे माझी अजिबात लायकी नाही या पुस्तकाबद्दल, किंवा अशा मोठ्या व्यक्तीच्या एव्हढ्या मोठ्या कारकिर्दीबद्दल लिहिण्याची किंवा बोलण्याची. पण एक वाचक म्हणून काय वाटलं ते लिहिण्याचा प्रयत्न करतेय. तोही नीट जमत नाहीये, तर एव्हढं मोठं पुस्तक लिहिण्यात किती वेळ, विचार, उर्जा, लागली असेल याची कल्पनाच नको. गेल्या कित्येक वर्षातलं माझं वाचायाला घेतलेलं पहिलं मराठी पुस्तक. रोज दुपारी घरी जाताना रिक्षात २५ -३० मिनिटांचा वेळ तोच काय तो माझा. मग त्यात हे असं मोठं पुस्तक (४५०) वाचून होणार का अशी शंका आलीच मनात पण पुस्तकाने शेवटपर्यंत मला बांधून ठेवले. अर्थात त्यातले प्रसंग/वर्णनही एखादा सोडला तर उद्या वाचला तरी चालेल असा असल्याने ते फक्त रिक्षातच वाचलं गेलं. वेड्यासारखं वाचत सुटून संपवून टाकावं असं झालं नाही. (हे माझं मत. बाकी लोकांचं मत वेगळं असू शकतं असा डिस्क्लेमर आधीच दिलेला बरा.)
         तर  झिम्मा चार वेगवेगळ्या व्यक्तींच्या रुपात भेटतं. बेबी जयवंत, विजू जयवंत , विजया खोटे आणि विजया मेहेता.  सुरुवातीला ते लक्षात राहतं पण जसे जसे कामाचा आवाका आणि कारकीर्द वाढत जाते तसे या रेषा पुसट होत जातात. पहिल्या तिन्ही आयुष्यांबद्दल स्वत:ला तिसऱ्या ठिकाणी ठेवून स्वत:च्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोण मला थोडा खटकला. कदाचित वयाच्या सत्तरीनंतर तो दृष्टीकोण येतही असेल, मला तो उगाच परका वाटला. सुरुवातीची बेबी जयवंत वाचताना तो जास्त खटकला. त्याच सोबत बेबी जयवंत बद्दल पडलेला प्रश्न म्हणजे वयाच्या सत्तरीनंतर पाचव्या वर्षी काय केलं हे आठवू शकतं? की भासच ते? नंतर त्याच्या पलीकडे जाउन वाचायला सुरुवात केली. बेबीच्या आयुष्यातील दोन गोष्टी लक्षात राहिल्या.  त्या काळातील एकत्र कुटुंबामुळे बेबीच्या मावशीला जसे जयवंत कुटुंबाने जसे आपले केले तसे एखाद्या अनाथाला आजच्या चौकोनी घरात जागा मिळेल? हा प्रश्न. आणि त्यांनी केलेले कोकणातील त्या काळचे वर्णन. त्या काळातील समाजाची थोडीफार कल्पना ते वाचताना येते. त्याच्याशी एकदम विरोधी मुंबईतील वातावरण. तेव्हाही किती पुढारलेली होती मुंबई हे वाटल्याशिवाय राहत नाही.
         विजू जयवंत बद्दल वाचताना फार आश्चर्य वाटलं मला. ८०-९० च्या दशकात एका मुलगी म्हणून मलाही काही बंधनं पाळावी लागली. जरा जास्त कॉलेजच्या गप्पा आईला सांगितल्या की 'हेच करता का तिकडे?' असे टोमणेही ऐकायला लागले. तर मग ५० च्या दशकात नाटकांत भाग घेण्यासाठी परवानगी देणाऱ्या त्यांच्या भावाचे आणि आईचेही कौतुक वाटले. तेव्हा झालेल्या थोड्याफार विरोधाचे संदर्भ येतात अधे मध्ये, पण कडकडून निषेध, विरोध हे कुठे दिसले नाहीत. त्याचवेळेस, इतकी सवलत मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या वर्तुळात आत्मविश्वासाने वागणाऱ्या तरीही वाहवत न गेलेल्या विजू जयवंत चे जास्त कौतुक वाटले.
         हरीन खोटेशी ओळख, लग्न हे सर्व उत्सुकतेने वाचलं. लोकांच्या पर्सनल आयुष्यात पाहण्याची काय उत्सुकता असते काय माहीत? विजू खोटे होऊन जमशेदपूरला गेल्यावर मलाच टेन्शन. तिथे एक छोटासा का होईना नाटकाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न वाचून वाटले की खरंच इच्छा असेल तर माणूस काही ना काही करतोच. But she was not meant for it. पुढे बायकोच्या करियरसाठी दोघांनी थोडे दिवस का होईना जमवून घेणे, वेगळे राहणे, हे वाचून वाटले मग आज काल टीव्ही वर दिसतात ते लोक कुठल्या जगात वावरत असतात? आपण तेव्हा जर इतके पुढारलेले होतो तर आज नाहीये का? या सर्व व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टींबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे ते पुस्तक वाचताना एक स्त्री म्हणून माझी स्वत:शी, तेव्हाच्या-आताच्या समाजाची तुलना होत होती. हळूहळू त्यांच्या मराठी रंगभूमी वरच्या कार्याला वेग येऊ लागतो आणि ते वाचताना आपणही त्या नाटकाचा, नेपथ्याचा, त्यांच्या अभ्यासाचा एक भाग बनून जातो. 'रंगायन' सारखी इतका विचार करून बनवलेली संस्था,  त्याच्यामागचे विचारमंथन, लेखक, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, एक संस्था म्हणून कार्यरत झाल्यावर आलेल्या अडचणी, त्याना मदत करणारी मंडळी हे वाचून आपल्याला किती उत्कृष्ठ इतिहास लाभलाय याचा अभिमान वाटतो.            
        पुढे विजू खोटे, विजया मेहेता कशा झाल्या याचा एका ठिकाणी संदर्भ येतो.  तोवर पुस्तकात खऱ्या अर्थाने रंगभूमीवरच्या कार्याला वेग आलेला दिसतो. त्यांचे पूर्व जर्मनीतील नाटकांचे प्रयोग, त्या मध्ये भेटलेले वेगवेगळे लोक, त्यांनी युरोपमध्ये केलेला अभ्यास, हे सर्व स्वप्नवतच. एक मराठी स्त्री चांगली नायिका म्हणून चित्रपटात काम करू शकत असताना, दिग्दर्शनात तेही मराठी रंगभूमीवर कशी पडू शकते हे फक्त त्यांनाच माहीत. त्यासाठी लागणारी दृष्टी, एक पूर्ण संकल्पना उभी करण्याचे सामर्थ्य, लोकांशी/ लेखकांशी, संगीतकारांशी , नेपथ्यकारांशी  चर्चा हे सर्व कसे केले असेल?  हे सर्व फक्त प्रायोगिक नाही तर लोकमान्य रंगभूमीवरही ! एखादी व्यक्ती रोज त्याच उत्साहाने ५० वर्षे काम करू शकते?नाटकातून मराठी सिनेमाकडे जाताना त्यांना आलेले अनुभव, नाटकाचेच सिनेमात रुपांतर केल्यावर त्यात करावे लागलेले बदल, मराठीतून हिंदी सिरियल, शोर्ट फिल्म्स, तिथून पुढे हिंदी चित्रपट, त्यांना मिळालेले पुरस्कार हे वाचायलाही आवडलं. बंगाली, मल्याळी नाटकातून कलातून त्यांना मिळालेले संदर्भ, इंग्रजी नाटकांची भाषांतरित नाटकं, त्याचं भारतीयकरण करण्यासाठी केलेला विचार,एखादी कलाकृती किंवा भूमिका करताना त्यात एकजीव 
होण्यासाठी लागलेले प्रयत्न खूप वाचनीय. पुस्तक संपताना उगाच उदास वाटायला लागलं हे सर्व थांबलं आणि आपण त्यातलं एकही नाटक पाहिलंही नाही म्हणून.     
         आयुष्यात दोनच आत्मचरित्र वाचली, हे त्यातलं एक. शाळेत असताना क्रिकेटच खूप वेड  लागलं आणि मग जे दिसेल, मिळेल  ते वाचत सुटले. त्यात एक म्हणजे डॉन ब्रॅडमन यांच्या काराकीर्दीवरील मराठी पुस्तक. (ते शाळेच्या लायब्ररीत काय करत होतं हा मोठा प्रश्नच आहे.) ते वाचायला घेताना खूप उत्साह होता. हळूहळू मात्र त्यातील वाचण्याची मजा गेली आणि राहिले ते फक्त आकडे. त्यांनी कुठे किती रन काढल्या, त्यात कसे आउट झाले, इ.इ. (उद्या सचिनने पुस्तक काढलं तर ब्रॅडमन सारखं काढू नये हे नक्की.) तर झिम्मा बद्दलही असंच काहीसं झालंय. म्हणजे बेसिकली विजयाबाईंच्या इतक्या अवाढव्य कारकिर्दीची तुलना मग ब्रॅडमन किंवा सचिनच्या कार्कीर्दीशीच होतेय. पण तरीही हे सर्व प्रत्यक्षात पाहिलं असतं तर सचिनला पहिल्यासारखा आनंद वाटला असता. पण आता सध्या ब्रॅडमन वाचल्यासारखे थोडे थोडे वाटत आहे. मराठी रंगभूमीच्या एव्हढ्या मोठ्या इतिहासाला आपण मुकलो, तरी तो वाचायला चुकलो नाही याचा आनंद आहेच. 
 
-विद्या. 

Thursday, July 04, 2013

अस्वस्थ

          गेले कित्येक दिवस हात शिवशिवत आहेत काहीतरी लिहायला पण विचारांची इतकी सरमिसळ होती की एक असं ठाम पोस्ट लिहिता येत नव्हतं. अर्थात लिहायची इच्छा होण्याचं कारण म्हणजे पाऊस !अगदी जूनच्या तिसऱ्या दिवशीच टपकला आणि एकदम रडू दाटून आलं. शिकागोमध्ये पडणाऱ्या पावसात ती ओढ नव्हती. (कदाचित तिथल्या हिमवर्षावात असेल ? ) पण पाऊस पडला आणि लोकांची फेसबुक वर गर्दी झाली स्टेटस अपडेट करण्यासाठी. कुणीतरी लिहिलंही की 'इतकाही पाऊस नाही पडला जितके स्टेटस अपडेट झालेत.'
हळूहळू मग लिहिण्याचे विचारही मागे पडत गेले. पण रोज घरातून निघताना, घरी जाताना, कपडे वाळत घालताना, मुलांना खेळायला नेताना दिसतच होता पाऊस आणि प्रत्येकवेळी अस्वस्थ व्हायचं. कशामुळे माहित नाही. ते टाळायला काय करायला हवं हे ही  माहित नाही. 
         शाळेत, १० -१२ वी पर्यंत असंच व्हायचं मला मावळत्या सूर्याकडे पाहताना. त्यातले रंग इतके अदभूत, सुंदर असायचे की वाटायचं मला का नाही हे असं चित्र रंगवता येत? इतके सारे रंग इतक्या सहजतेने एकत्र कसे आणता येत असतील? म्हणजे गडद गुलाबी आणि निळा, हळूहळू एकमेकांत असे मिसळून जातात की  त्यांना जोडणारी रेघ कुठेच दिसत नाही. खूप वाईट वाटायचं मला की देवाने मला ही कला दिली नाही म्हणून.  चित्रकार असते तर किती छान झाले असते. भरभर उतरवले असते ते सर्व रंग कागदवर.१२ वी नंतर कोरेगांव सुटलं आणि ते रंगही. पण ते तसेच राहिले माझ्या मनात आणि अजूनही असे कधीतरी ते आठवतात, कोरेगावच्या रस्त्यावरून जातानाचे ते मावळतीचे रंग. 
         कॉलेजमध्ये गेल्यावर एक वेगळाच अस्वस्थपणा यायचा. तो म्हणजे शब्दांचा. ते वयच तसं होतं. प्रेमात पडण्याचं. आता वाटत ते कुणातरी व्यक्तीपेक्षा प्रेमात पडण्याच्या कल्पनेवरचं प्रेम असावं. उगाचच एका व्यक्तीचा ध्यास घ्यायचा आणि मग दिवसभर तिचाच विचार करत बसायचं. दिवास्वप्नं बघत, कॉलेजच्या व्हरांड्यात त्याला/तिला शोधत, तासाला लक्ष न देत मनाला विरंगुळा म्हणून त्याला आठवत बसायचं . तेव्हा पहिल्यांदा जगजीत आणि चित्राची एक कसेट हातात पडली होती. ती ऐकताना अस्वस्थ व्हायला होई. कुठून आणतात हे असे शब्द, त्यांचे अर्थ, आणि बरोबर कसे लागतात काळजात आपल्या? त्या शब्दांसमोर माझे साधे मराठी शब्द फार तोकडे वाटायचे, अजूनही वाटतात. का नाही माझ्याकडे ती प्रतिभा ते कविमन, ते शब्द, त्या कल्पना?
        अर्थात लिहिण्याबद्दल अजूनही एक गोष्ट जाणवते. प्रेम करण्याच्या काळात/ वयात सुचलेले थोडेफार जे शब्द होते तेही रोजच्या संसारात विसरून/विरून गेले. पण या कवी लोकांचं नाही होत असं? किती वर्षं गुलजार प्रेमावर कविता लिहू शकतात? 'आ निंद का सौदा करे, एक ख्वाब दे, एक ख्वाब दे'. त्यांच्या मनात कसं हे प्रेम अजून तग धरून बसलंय? त्यांना नाहीये का संसार, मुलं-बाळ? आणि समजा व्यवसाय म्हणूनच करायचा तरीही त्यात विविधता येण्यासाठी तरी कुठून आणतात ते सर्व शब्द, कल्पना ?   गाण्यांच्या बाबतीतही तसंच. अगदी लता-आशा ताईंचा आवाज असो रफी किंवा किशोर कुमार असो आणि अगदी परवाच ऐकलेल्या आशिकी-२ मधल्या अरजित सिंग चा असो. कधी कधी मनात ना मी खूप सही गाणं म्हणत असते. पण तोंड उघडलं की बिघडलं. मला नक्की माहित असतं की या गाण्यात या शब्दाला असं नाजूक वळण आहे, इथे आवाज असा चढतो, वगैरे. पण ओठ उघडले आणि आवाज ऐकला स्वत:चा की थिटेपणा जाणवतो. मग तसंच मनातल्या मनात गाणं म्हणायचं आणि गप्प बसायचं.
         तर हे असं अस्वस्थ होणं नेहमीचंच पण पाऊस असला की अजून त्रास. लोकांच्या अनेक ब्लॉग, पुस्तकं वाचतानाही जाणवतं की कितीतरी प्रकारे कितीतरी विषयांवर कितीतरी उत्तम लिहिलं जाऊ शकतं. त्यात माझे पावसावरचे पोस्ट साधेच असणार आणि असे वेगळे तरी काय असणार? म्हणजे वारजे पुलापर्यंत २ किमी चालत येताना मला लिहावंसं वाटत होतं माझ्या होणाऱ्या धावपळीबद्दल. एक तर छत्री नाही. त्यात भली मोठी पर्स घेऊन नवी कोरी काळी प्यांट घालून मी पाण्यातून चालले होते. मागून स्कुल बस जोरदार येत होत्या.  आवाज आला की पळा डावीकडे. शेवटी उजवीकडूनच चालत राहिले. समोरून कुणी जोरात येताना दिसला की आधीच हात करून हळू म्हणून सांगायचे. एकजण तरी गेलाच उडवत शिंतोडे. मग १ मिनिट त्याला शिव्या देण्यासाठी तोंड फिरवून, मान वळवून बोलण्यात गेला. माझा जोश पाहून मागचा आधीच स्लो झाला. :)  मध्येच उडी मारून एखादा खळगा चुकवून २०  मिनिटात कशी बशी बस स्टोप वर पोचले. रिक्षा मिळत नव्हतीच. शेवटी बसनेच जावं म्हटलं.
        तिथे बायका साड्या पकडून उडणाऱ्या शिंतोड्याची पर्वा न करता वाकून आपली बस येतेय का बघत होत्या. शाळेला जाणारी मुलं उभी होती. त्यात छोट्या बहिणीला सांभाळत चढवून बसवणारी एक मुलगीही. कसं ना लहानपणीच आई-पण येतं? तेव्हढ्यात एकजण बाइक वरून आला. त्याचा झोपाळलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि दिसेल ते घातलेले कपडे. त्याच्यामागून बायको उतरली त्याची. बायकोच असावी. तिच्यासाठी थांबला तो बारीक पडणाऱ्या पावसात भिजत. त्याच्या त्या असं सकाळी धडपडत झोपेतून उठून येण्यात, बस जाईपर्यंत वात पाहण्यात सॉलिड प्रेम वाटत होतं मला. ती एका बसमध्ये बसली आणि तो निघाला टांग मारून. मला शिवाजीनगर बस मिळाली. बसमध्येही झिम्मा वाचत बसले. डेक्कन कॉर्नर लाच उतरून रिक्षा केली. म्हटलं कुठे चालायचं परत. रिक्षामध्ये उग्र वास उदबत्तीचा. अर्थात असे रिक्षावाले मला सिगारेटच्या वासापेक्षा कधीही चांगले वाटतात. निदान धंद्याची पूजा तरी करतात असं वाटतं. 
         पावसात असा विविध साधनांनी प्रवास करायची गेल्या १० वर्षातली पहिलीच वेळ असेल. अमेरिकेत गाडी हे केवळ नाईलाज म्हणून घेतलेलं वाहन. पण त्यातून जाताना निसर्गापासून, रोजच्या या पळापळीपासून दूर गेलेय हे जाणवलंच नाही. म्हणजे पाऊस आहे तर ज्यादा कपडे, चप्पल घेऊन जा, पावसातून भिजून आलाय म्हणून गरम गरम चहा करून द्या, कधी वडापाव तर कधी भाजलेलं कणीस. वापरायला जुने कपडे, सुकत घातलेल्या कपड्यांवर सतत लक्ष की कधी पाऊस येईल. 'जरा थोड्या वेळाने निघ, पाऊस कमी झाल्यावर',' आता कुठे पावसा पाण्याची येतेस' अशी वाक्यं. सगळं विसरले होते मी गेल्या कित्येक वर्षांत ते गेल्या एका महिन्यात अनुभवलं. पण कुठं आणि कसं मांडावं हे कळत नव्हतं म्हणून हा अस्वस्थपणा. 
आता इतक्या वर्षात इतकं तरी कळलं की या त्रासातून सुटका नाही. पण त्या-त्या क्षणाला आपल्यातला कमीपणा जाणवून लोकांची प्रतिभा दिसण्याची बुद्धी तरी मिळाली हेही नसे थोडके. :)
 
-विद्या.