Tuesday, April 16, 2013

पोटभरून प्रेम

          पोचले एकदाची, म्हणजे भारतात. गेल्या कित्येक महिन्याची तयारी, कामाचा ताण, सामानाची बांधाबांध सर्व करून, पोरांना घेऊन सुखरूप पोचलो. त्या गेल्या काही दिवसात आम्हीच नाही, इकडे बाकी लोकांची तयारीही चालूच होती. आईने लगेच तुला तुरीची डाळ, उडीद डाळ, गहू, तांदूळ वर्षाला किती लागते याची चौकशी सुरु केली. आता रोज लागेल तसे सामान आणून ठेवणाऱ्या आमच्यासारख्या कामगार वर्गाला काय माहित किती किलो भात लागतो वर्षाला ते? त्यात मग म्हणे अगं, हरभऱ्याची पण लागते जास्त, बेसन गिरणीत करून आणतो ना? किती हे किचकट प्रश्न.
          एक दिवस आईचा फोन,'अगं, मामीकडे गेले तेव्हा मेतकुट होतं तिथे छान. तुला आवडतं म्हणून मामीने आहे तेव्हढ तरी घेऊन जा म्हणून बांधून दिलं'.
माझ्या मामीला मी गेल्या कित्येक वर्षात, १-२ तासापेक्षा जास्त भेटले नसेन, पण तरी मी येणार म्हटल्यावर तिने दुकानात चौकशी केली, नाही मिळत तर आहे ते तरी घेऊन जा म्हणून सांगिलते. मला वाटलं,काय धागा असतो या लोकांच्या मनात प्रेमाचा? जो कितीही वर्षं झाली तरी तसाच टिकून असतो. अजिबात झिजत नाही कि तुटत नाही. मग पुढचा प्रश्न आला मनात. हे असं प्रेम नेहमी खाण्यातूनच कसं दिसतं? म्हणजे अगदी जगभरात सगळीकडेच.हे खाण्यातून, वाढण्यातून, पोट भरून खायला घालण्यातून दिसणारं प्रेम कसलं?
         आम्ही परत येणार म्हटल्यावर तिथे ऑफिसमधले लोकही म्हणाले,'We should go for lunch sometime'. वेगवेगळ्या लोकांच्या, कधी घरी, कधी बाहेर जेवण सुरु झाले. आता भेटायचेच तर नुसते चहा पाणी करूनही भेटता येतेच की. मग जेवणच का? त्यातही मग तुला जे आवडते तेच करते इ. ऑफिसमधले सगळेजण बाहेर जेवायला जातानाही मला जे आवडते तेच ठिकाण बघू इ. विषय. मला लाड करून घ्यायला काहीच प्रोब्लेम नाहीये. :) पण सांगायची गोष्ट म्हणजे, रित एकच, मग ते भारतीय असो, अमेरिकन किंवा व्हिएतनामि.  अगदी मी पुण्यातील कंपनीतून जाताना 'काका हलवाई चे पेढे' आणण्यातले आणि शिकागोतील आपल्या आईकडून खास माझ्यासाठी केक बनवून घेण्यातही तेच प्रेम.
         या झाल्या नेहमीच्या रिति. अगदी नवरा बायकोमधेही प्रेम हे असंच व्यक्त होतं ना. नवीन लग्न झाल्यावर काहीतरी वेगळं, आवडीचं करून वाढायची इच्छा, मग ते कसं झालंय हे पाहण्याची उत्सुकता आणि पोटभरून खाल्ल्यावर मिळणारा आनंद हे सर्वच कसं गोड. ते मग अगदी म्हातारे झाल्यावर पोळी मोडायला त्रास होतो म्हणून तूप लावून गुंडाळून झाकून ठेवण्यापर्यंत कायम चालूच राहतं. आता आजकाल पोरांच्या आवडी निवडीची त्यात भर पडली आहे. नुसत्या उकडलेल्या भाज्या आवडतात म्हणून त्या देण्यापासून पालक पनीर पर्यंत सर्व केलं मी. आणि त्यांनी पोटभर खाल्लं की आपलंच पोट भरल्याचा आनंद.
         माझं जाऊ दे, मुलांनाही इकडे आल्यापासून मिळाले नाही म्हणून, त्यांच्या मावशी, मामाने पास्ता आणून दिला, अंडी करून खायला घातली भेटल्यावर. आणि किती आवडीने खात आहेत हे पहात राहीले. :) काल आई परत आली भेटायला, तर येताना घरून थालीपिठ घेऊन आली. म्हटलं, 'अगं दही नाहीये सायीचं'. तर म्हणे, 'तेही घेऊन आलेय'. :) म्हणजे मुलं लहान असली काय आणि मोठी काय, हौस तीच.आता जरा मिळतेच आहे संधी तर लाड करूनच घेते थोडे दिवस तरी. आणि हे असं पोटभरून प्रेमही करवून घेते सर्वांकडून.  :) बाकी शिकागो ते पुणे प्रवासाबद्दल पुढच्या वेळी.
-विद्या.

Friday, March 01, 2013

एक पत्र

एक पत्र छान रंगवलेलं
अगदी सुंदर अक्षरात लिहिलेलं,
परवा रात्री कपाटात खालच्या कप्प्यात मिळालं. (सो ss टिपिकल)
तुझ्या जुन्या पिशवीत.

'कधी लिहिलेलं रे मी हे?' मी विचारलं.
तो नुसताच हसला. पण मला आठवू नये हे नवलंच, नाही?
'मी कित्ती पत्रं लिहिली याची गणतीच नाही', तो.
'हो, कारण तू लिहिलीच नाहीस', मी. हे बरं आठवलं?

बरं आठवलं कधी लिहिलंय ते.
पण प्रत्येक वाक्यात 'सोनू,सोनू'करणारी ती
आणि पोरं झोपलीत तोवर सफाई उरकून घेऊ
म्हणत घाई करणारी मी
सारखीच मात्र वाटली नाही.

अर्थात मळक्या बनियनमध्ये बसून
वायरी गुंडाळून नीट लावून ठेवणारा तू
आणि मला भेटायला आवरूनच येणारा तो
हे तरी कुठे सारखे होते? नाहीच.

होतं तरी काय त्या पत्रात?
एका वेड्या मुलीची वेडी स्वप्नं.
हेच, घर, संसार, पोरं, बाळं, सगळं.
वाचताना जाणवलं, बरं ती वेडी
पण देव तरी किती वेडा?
सगळं देऊन टाकलं?
द्यायचच होतं सर्व तर विसरायला का लावलं?
म्हटलं बरं झालं बाई
पत्रात टिपून तरी ठेवलेलं.

डोळ्यात दोन थेंब येउन बंद करून टाकलं.
त्याच्यासोबत पोरांचं एक खेळणंही बॉक्समध्ये टाकलं.
इतकं आवरून दमल्यावरही
पोरांना मायेनं कुरवाळताना त्याला पाहिलं,
वाटलं, हे क्षण डोळ्यात भरून ठेवण्यासाठीच बहुतेक
पूर्वीचं विसरायला लावलं.

-विद्या. 

Monday, January 21, 2013

शब्द

           काही दिवसांपूर्वी एक ओळखीची व्यक्ती भारतात जाणार होती लग्नाला. त्याने सानूला विचारले होते की 'काय आणू तुझ्यासाठी येताना?'. तिने तिची नेहमीची लिस्ट सांगितली. 'चोकलेट, गुलाबजाम, म&म(M & M ),इ.'. तो परत आल्यावर तिचा पहिला प्रश्न होता,' माझे M & M आणलेस?' आता तो बिचारा लग्नाच्या घाईत असणार. अजून ब्यागही उघडल्या नसाव्यात त्याने. असो, एकूण काय त्यादिवशी त्याने काही आणले नव्हते. मग पुढच्या वेळी भेटल्यावरही तोच प्रश्न. तेव्हाही तो असाच घाईत आला होता. आता अशावेळी तिला कसे समजवायचे म्हणून मग मी माझ्याकडे असलेल्या काही गोळ्या तिला दिल्या आणि सांगितले कि त्यांनी दिल्या आहेत. आता मुले म्हटली की असे छोटे मोठे किस्से होतच राहतात. म्हणजे सानू तर एकदम वसुली खाते आहे. एकदा तिने पहाटे विचारले की काल रात्री डाळिंब देणार होता ते दिले का नाही म्हणून. पण मला तिचा निरागसपणा पाहून वाईट वाटले आणि भीतीही. की अशा निरागस पोरांना बाहेरच्या जगात कसे सोडून देणार म्हणून. तिच्यासाठी एखाद्याने सहजपणे बोललेले वाक्यही 'काळ्या दगडावरची रेष' आहे. समोरचा जे  काही बोलत आहे तो तसाच वागणार याची खात्री, विश्वास.
           मग मी आठवायला लागले माझ्यासाठीही अशीच प्रत्येक वाक्य एक 'काळ्या दगडावरची रेष' असेल कधीतरी, मी लहान असताना. पण ती कधी पुसली गेली ते काही आठवेना. अगदी सहावी, सातवीपर्यंत आठवतंय की मी दादांना सातारला गेले की 'नवनीत व्यवसायमाला' आणायला सांगायचे.(अभ्यासासाठी कुणी असे मागे लागेल का? असो.) तर दोन-वेळा त्यांनी नाहीच आणली. ते त्यांच्या कामात असतील, त्यात माझे पुस्तक महत्वाचे नसेलही. पण ते 'आणतो' म्हणाल्यावर ते आणणार हे माझ्या मनात पक्कं असायचं. त्यांनी ते न आणल्यावर मी रडून घातलेला गोंधळही आठवतो. म्हणजे निदान तोवर तरी समोरच्या माणसाने दिलेला शब्द तो पळणार याची मला निरागस खात्री होती. मग ती कधी पुसली गेली?
         माझा तो विश्वास बहुदा शाळेतल्या अनुभवानंतर 'अपेक्षा' या गटात गेला असावा. कारण तोवर एखाद्याने शब्द दिला तरी तो/ती तो शब्द ठेवणार की नाही ते त्या व्यक्तीच्या स्वभावावरून, आधीच्या वागण्यावरून मला कळू लागलं होतं. पण मग तरीही त्या एका खास व्यक्तीने दिलेला शब्द तेव्हढाच महत्वाचा वाटायचा. 'त्याने का केला नसेल फोन? का नसेल पोचला वेळेवर इतक्या वेळा सांगूनही?' असे मोठे मोठे प्रश्न मला पडायचे. म्हणजे लोकांची पारख करणं,अनुकूल परिस्थिती नसेल हे सगळं समजण्याचं वय असूनही 'तो' एक शब्द माझ्यासाठी 'काळ्या दगडावरची रेष' असायचा. मग पुढे या नात्यातही अपेक्षा, अपेक्षाभंग,भांडणे, दु:ख हे सगळं आलंच. पण त्या सगळ्यांमधून जाताना प्रत्येकवेळी मी माझ्यातल्या त्या छोट्या निरागस मुलीला मागे टाकत होते का? हो बहुतेक.
          बर हे सगळं झालं माझ्यावर होणारा लोकांच्या वागण्याचा परिणाम. माझ्या वागण्याचं काय? दिवसातून आपण कितीवेळा असे शब्द बोलतो जे आपण पूर्ण करू शकणार नाही हे आपल्याला मनातून माहित असतं? साधी गोष्ट, सकाळी एक मेल येते क्लायंटची एखादं काम करण्यासाठी. जेव्हा ती येते तेव्हाच माहित असतं की इतकं काम आहे की आज शक्यच होणार नाही. पण तरी लिहितोच 'आज संध्याकाळ पर्यंत करून टाकेन काम'. म्यानेजरला एखादी गोष्ट करून घेण्यासाठी मागे लागतो, तो म्हणतोही करेन, पण तो प्रयत्नही करत नाही आणि आपण फक्त त्याने ते करावं म्हणून अपेक्षा करत राहतो. एखाद्या वाढदिवसाला जायचं असतं, जायचा कंटाळा आलेला असतो, पण ते सरळ न सांगता 'कळवते मी. सांगेन तुला तसं . इ. ' निरोप ठेवतो. एखाद्याकडून निघाल्यावर म्हणतोही, 'घरी पोचल्यावर फोन करते.' पण घरी आले की समोर जे दिसतंय ते काम करत राहतो आणि मग नंतर फोन केल्यावर कारणं सांगत बसतो. आणि मी या सगळ्या लिहिलेल्या गुन्ह्यामध्ये दोषी आहे. माझ्या शब्दाला माझ्या मते काहीच किंमत नाहीये का म्हणजे? केवळ बोलायचं म्हणून बोलते का मी? आणि जर माहित आहे की एखादी गोष्ट शक्य नाही होणार तर मग आधीच खरं का नाही सांगत? स्पष्ट बोलायला लोक जरा जास्तच टाळायला लागले आहेत असं वाटतं मला आजकाल. का नाही बोलायचं खरं? आणि बोललेलं का नाही करायचं खरं?
          कधी संदीप सानुला प्रोमिस करायला लागतो तेव्हा मी त्याला थांबवते कारण मला माहित असतं की ते शक्य नाही होणार तर मग उगाच तिला खोट्या आशा का दाखवायची म्हणून. तर हे पोस्ट लिहिता-लिहिता मला वाटलं की का नाही मी पण तसंच वागायचं रोजच्या आयुष्यात? तर आजपासून मीच माझ्या शब्दाला किंमंत द्यायचं ठरवलं आहे.

-विद्या.


Tuesday, January 15, 2013

खुसपूस, कुई-कुई आणि भोकाड

         जुन्या पोस्ट वाचताना लक्षात आले की माझ्या पोस्ट माझं त्या-त्या वेळचं आयुष्य रिफ्लेक्ट करतात. आणि ते योग्यच असाव कारण तोच तर या ब्लॉगचा हेतू आहे. आणि माझी सध्याची फेज ही मुलं सांभाळून नोकरी अशी आहे असं वाटतंय. कारण ही पोस्ट त्याबद्दलच आहे. रोज रात्री दहा वाजेपर्यत मुलांना झोपवून एक तासभर तरी टी व्ही पहायला मिळवणे हे एकच ध्येय असतं संध्याकाळी घरी आलं की. रात्री १० वाजेपर्यंत ते झोपले की अगदी जग जिंकल्याचा आनंद होतो. मग जरा फेसबुक, मेल, डील्स, टी व्ही या सगळ्या गोष्टींना निवांत पणा मिळतो. पण हा सर्व आनंद सकाळीही चेहऱ्यावर असेलच असं नाही.
         घड्याळ्यात बारा वाजल्याशिवाय डोळे मिटायचे नाहीत हा आमचा दोघांचा अलिखित नियम. डोळ्याच्या खाचा झाल्या तरी चालतील मग. तर आम्ही असे बारा वाजता जाऊन टेकतो आणि झोप काय लगेच लागतेच. निजेला  खरंच मला धोंडासुद्धा चालेल इतकी दमलेली असते मी. आणि लोक जे म्हणतात ना की आई झाल्यावर मुलाच्या आवाजाने जाग येतेच, कान हलके होतात, इ, इ हे सर्व एकतर खोटं आहे किंवा संदीप आमच्या मुलांची 'आई' आहे. तर साधारण साडेबारा-पाऊण च्या दरम्यान  स्वनिकची हालचाल सुरु होते. मी झोपलेलीच. संदिपच उठून दूध आणतो त्याला देतो आणि दोघेही झोपून जातात. ही झाली बेस्ट केस. त्याला स्टेप वन म्हणू.
          तर बेस्ट केस नसली तर मात्र, स्टेप वन मुळे थोडा वेळ हालचाल थांबते. पाच दहा मिनिटांनी खुस-खूस सुरु. अशा फालतू खुस-खुशीला कुणी लक्ष देत नाही. जो पर्यंत ही खुस-खूस बारीक रडण्यात आणि बारीक रडण्यावरून 'भोकाड' या टीपेला जात नाही तोवर कुणीही लक्ष देणार नसतं. हे ओळखून स्वनिकही लगेच वरची टीप धरतोच. अर्थात हे सर्व संदीपलाच ऐकू येत असतं. त्याचे रडगाणे जोरात सुरु झाल्यावर काहीतरी करणं मग भाग पडतंच. संदीप मग त्याच्या उशीजवळ पडलेला पॅसिफायर शोधायला लागतो. गादीवर गोल गोल फिरून तो स्वनिकाने कुठे टाकलेला असेल हे सांगता येत नाही. आणि अगदी स्वत:च्या डोक्याजवळ असलाच तरी तो लगेच मिळेल असं नाही. तर एकूण नशीब चांगले असेल तर पॅसिफायर लगेच मिळतो आणि स्वनिकला तोंडात तो देऊन सर्व परत बेक टू झोप. आता ही झाली सेकंड बेस्ट केस.
            दुध झाले, पॅसिफायर झाला. तरीही खुस-खूस संपत नाही. पाच दहा मिनिट शांतता आणि परत भोकाड चालूच. बराच वेळ झाला आवाज बंद का होत नाही म्हटल्यावर 'आई' म्हणणाऱ्या मला काहीतरी त्रास व्हायला लागतो कानाला. मी,'काय रे, काय झालं. अजून का झोपत नाहीये? ' . 'पोटात दुखत असेल का?' संदीपचा प्रश्न. मग त्याला ग्राईप वॉटर द्यायचे की इथे एक Infant Gas Relief औषध मिळते ते द्यायचे त्यावर निर्णय घ्यायला लागतो. दोन्ही पैकी काहीतरी एक देऊन त्याला झोपवायाचा प्रयत्न करतो आणि आम्हीही तसेच आडवे पडून जातो. यात माझा सहभाग फक्त स्वनिकला पकडणे इतकाच असतो. बाकी औषध आणणे, ते स्वनिकला देणे, तो रडत असताना तोंड पकडून तोंडात घालणे, इ. संदिपकडेच. नशिब चांगले असेल तर जे काही त्याला दिले आहे ते काम करते आणि आम्ही सर्व सकाळपर्यंत डाराडूर.
          पण कधी त्यानेही फरक पडत नाही. मग अजून तासाभराने खुसपूस, कुई-कुई आणि मग भोकाड या स्टेजेस येतात. आता मात्र मी वैतागते. आणि खरंच काहीतरी गडबड आहे असं म्हणून सूत्र माझ्या हातात घेते. एकतर रात्री थंडी असेल तर आम्ही मस्त गरम पांघरूण घेऊन झोपलेलो असतो आणि स्वनिक तसाच. त्यामुळे त्याला थंडी वाजत असेल का? किंवा उन्हाळ्यात गरम होता असेल का असे प्रश्न आम्ही एकमेकांना विचारतो. एक मात्र नक्की असतं. जे काही त्याला होत आहे याच्या एकदम उलट माझं तंत्र असतं. तर आम्ही त्याला काय होत असेल हे बोलत असताना रडण्याचा आवाज आता अशक्य मोठा झालेला असतो. त्यात मग शेजारच्या रुममध्ये झोपलेली सानू उठते की काय म्हणून अजून भीती.
आणि जसा आवाज वाढेल तसा संदीपला अस्वस्थ होऊन गरम व्हायला लागते. मग तो हळूहळू ती-शर्ट काढ, ए-सी लाव असे प्रकार सुरु करतो.
          कधी डायपर बदलून बघतो. तर कधी अजून एखादा कपडा घालतो थंडी वाजत असेल म्हणून. तर कधी खांद्यावर घेऊन झोपवतो, कधी मांडीवर घेऊन बसतो. जसा झोपेल तसा, ज्या कुशीवर असेल तसे. कधी मग ताप तर नाहीये ना रे? म्हणून थर्मामीटर आणून चेक करतो. तर कधी कान दुखत असेल का म्हणून त्याला दुध देऊन बघतो. (कान दुखत असेल तर मुलं काही प्यायला नको म्हणतात. कारण गिळताना कान दुखतो.) कधी त्याला अगदीच बरं वाटत नाहीये असं वाटलं तर मध्यरात्रीच उद्या सुट्टी कुणी घ्यायची ऑफिसमध्ये यावर बोलून घेतो. या सगळ्यात नक्की कशाने त्याला फरक पडला असेल हा विचार करायला सवड कुणाला असते? तो जर झोपलाच परत तर पटकन आम्हीही गुडूप होऊन जातो.
        सकाळी उठल्यावर हे महाशय एकदम ताजेतवाने आणि आमचे तारवटलेले डोळे. काल रात्री काय झालं होतं विचार करायालाही वेळ मिळत नाही की सकाळची धावपळ सुरु होते. मग पुन्हा तेच चक्र.  हे सर्व एकाच रात्रीत होते असे नाही किंवा रोजच असेही नाही. पण दोघंच असं मुलांना सांभाळणं म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या निर्णयापर्यत सर्वच करायचं म्हटलं की ही अशी रोजची कसरत सुरु असते. त्यात असे रात्री झोपलेल्या अवस्थेत योग्य निर्णय घेतोच असेही नाही. घरात कुणी मोठं माणूस असलं की किती फरक पडत असेल असं वाटतं कधी. घरी नंतर फोन करून किंवा इन्टरनेटवर असताना हे सर्व सांगितलं की घराचे सूचना द्यायला लागतात. आणि मग आमच्यासारखे 'शिकलेले' म्हणवणारे लोकही मग नेटवरून आईकडून पोरांची दृष्ट काढून घेतात. :)
-विद्या.

Saturday, January 12, 2013

फक्त पाच मिनिट

शनिवारची दुपार आहे मस्त. बाहेर जरा ढगाळ वातावरण आहे. संदीप, सानू आणि स्वनिक तिघेही झोपलेत. म्हटलं निवांत टिव्ही बघत बसावे, म्हणून रिसिव्हर सुरु केला तर रेडिओ सुरु झाला होता मघाशी लावलेला आणि त्यावर 'बिल्लू बार्बर' मधलं, 'चांद या सितारा कोई' लागलं होतं. सही वाटलं. म्हटलं कुठे लावायचा टीव्ही ऐकत बसावं गाणीच अशी शांततेत. मग हे असं वातावरण, गाणी आणि शांतता मिळाले की हात शिवशिवायला लागतात लिहायला. हे लिहितेय तोवर,'मेरे ब्रदर की दुल्हन' मधलं, 'इस्क रिस्क' लागलंय. म्हणजे नुसती एकावर एक आवडती गाणी लागताहेत आणि मी त्यांच्या मागे धावतेय असं वाटतंय. :) असो. तर हे असं गाणी ऐकण्यावरून आठवलं. शाळेत असताना ना सकाळी आकाशवाणी वर १० ते १०.३० पर्यंत जुनी हिंदी गाणी लागायची. तर कधी मराठी भावगीते. आणि मी अभ्यास करत बसलेली असायचे. पण मग असं एखादं गाणं लागायचं की वाटायचं 'या अभ्यासाच्या विचारातून फक्त फक्त पाच मिनिटे बाहेरपडू देत. मग परत पुस्तकात जाईन.' अर्थात कुणाचं बंधन नसायचं पण तरी त्या गाण्याला पूर्ण वाव देण्यासाठी स्वत;च असं स्वत:ला मोकळं सोडायचं. :)
तसंच परीक्षेच्या वेळी व्हायचं. आईने लायब्ररीमधून एखादं पुस्तक आणलेलं असायचं. पण त्याला वेळ द्यायला कुठे परमिशन असायची? समोर पुस्तक दिसतंय पण हातात भूगोलाचं पुस्तक. :( वाटायचं 'फक्त पाच मिनिट वाचते. मग परत येते तुझ्याकडे.' :) आता ४०० पानाच्या पुस्तकाला पाच मिनिट काय पुरणार? पण तरी मी आई येत नाहीये ना बघून पटकन हावरट सारखी ते पुस्तक हातात घ्यायचे. बर अजून एक पान अजून एक पान असं करत अधाशा सारखे वाचत सुटायचे. तेच परीक्षा संपल्यावर हक्काने ते पुस्तक परत वाचायला घ्यायचा काय तो आनंद असायचा. एकदा तर मी आईशी भांडले पण आहे. परीक्षा संपली म्हणून आनंदात आहे तर आईने आपलं पापड, कुरडया करायला काढलेलं आणि माझी पुस्तके परत बाजूला. मग काय? भांडले खूप. :)
पुढे कॉलेज आणि नोकरीत असताना 'त्याचे' विचार यायचे मनात. आता हातातलं काम तर सोडून बसता येत नाही ना? एक तर कॉलेज मध्ये अभ्यास शेवटच्या दिवशी, तसंच कामही अगदी घाईच. पण त्यात वाटायचं एक पाच मिनिट 'त्याचा' विचार करते. बस पाचच मिनिट. मग परत कामाला लागेन. मग हातातलं काम सोडून उगाच काल काय बोलणं झालं, मग नंतर कधी भेटायचं, पुढच्या ५-१० वर्षाची स्वप्नंही त्या पाच मिनिटात बघून घ्यायची. :) आणि मग पुढ्यातल काम उरकायचं.
आत्ताही बाहेर जायचं आहे, पण ही गाणी, जुन्या आठवणी, आणि त्यबद्दल लिहायचं सोडून जायची इच्छा होत नाहीये. ते पण काम पाच मिनिटात उरकून येता आलं असतं तर बरं झालं असतं. असो निघतेच आता. :(

-विद्या.

Thursday, January 10, 2013

विरोधाभास

गेले दोन दिवस, डोक्याचा पार भुगा झाला आहे. ऑफिसमध्ये दिवसभराची सलग मिटिंग म्हणजे किती त्रास असतो हे कळलं आहे. आता कामाबद्दल असं ब्लॉगवर माझं लिहिणं कधी झालं नाही किंवा तितकं ते महत्वाचंही वाटलं नाही. पण मागच्या माझ्या 'कस्टम-मेड' पोस्ट नंतर या मिटींगमध्ये गेल्यावर स्वत:वरच हसू आलं. म्हणजे माणसाची आवड आणि काम या दोन गोष्टी किती वेगळ्या असू शकतात याचं उदाहरण होतं ते. मागच्या पोस्ट मध्ये मला कसे इथे कपडे खरेदी करायला आवडत नाही आणि भारतात ड्रेस शिवून घेणं किती मस्त कार्यक्रम आहे यावर मी भरभरून लिहिलं होतं. त्यानंतर गेला महिना काही लिहिणं झालं नाही.
पण आज एकदम एक विचार मनात आला आणि लिहायची इच्छा झाली.
गेले काही दिवस एका प्रोजेक्टवर काम चालू आहे ज्यात प्रत्येक काम जास्त वेगाने आणि कमी लोक वापरून कसं करता येईल यावर बोलणं चालू आहे. अर्थात ते काही नवीन नाही. पण विषय आहे, 'इम्ब्रोयडरी'  सारखी कलाकुसर तुम्हाला ड्रेस वर करून हवी असेल तर ती मशीनने कशी करून घ्यायची. :) मग त्यात परत तेच विषय आले. कापड कुठल्या प्रकारच आहे? जर जाड असेल तर त्याला कुठल्या प्रकारची शिवण लागेल? जर कुणी बारीक मुलीने ड्रेस मागवला असेल तर तिचा साईझ आला, 'small'. मग त्यावर समजा तिचं नाव निघालं ३५ अक्षरी तर मग ते तिच्या बाही खालून जाऊन पाठीवर नाही का जाणार? त्यासाठी काय करायचं? एखादा हुशार म्हणाला मला माझं नाव माझ्या शर्टाच्या खिशावर लिहून हवंय, तर मग खिसा आधी शिवलेला असेल तर त्यावर शिवण कशी घालणार ना? त्यासाठी काय केलं पाहिजे? समजा एखाद्याने सांगितले की मला काळ्या शर्टावर काळ्याच रंगाने नाव लिहून हवंय तर? तर त्यावर उत्तर मिळालं,  'कॉमन सेन्स' वापरायचा ना माणसाने? :) मग शेवटी ठरलं फक्त नोट लिहायची 'फॉर्म' वर की बाबा तू जर गडद रंगाचा कपडा आणि गडद रंगाची इम्ब्रोयडरी सांगत असशील तर विचार करूनच 'कन्फर्म' कर. आता मग तो काय ठरवेल ती त्याची चूक.
एखाद्याने जर शर्ट आणि पॅंट दोन्ही मागवलं असेल तर ते घेऊन तर यायचे वेअर हाउस मधून एकत्र. पण मग ते इम्ब्रोयडरी साठी वेगळे होतील ना? मग ते एकत्र राहतील याची 'खात्री' कशी करायची? आणि समजा ते एकत्रच ठेवले इम्ब्रोयडरी करतानाही तर मग त्याच्यावर धागे, दोरे, धूळ नाही का बसणार? मग काय करायचं?
तर आता हे काम फास्ट व्हायला पाहिजे, कमी लोकही पाहिजेत आणि चांगले काम पण झाले पाहिजे. मग त्यासाठी खूप भारी मशिनरी मागवली. म्हणजे एकावेळी १२ वेगळे मशिन्स एकत्र चालतील असे. त्यामुळे माझ्यासोबत अजून अकरा लोकांचं कामही त्याच मशिनवर करता येईल. पण मग मला हवा तो रंग, फोन्ट वेगळा असेल बाकी ११ लोकांपेक्षा तर? तर मग त्यासाठी वेगळे सोफ्टवेअर ज्यात बाराही लोकांचे काम एकदम फीड करून ते एकाच मशीन वर केले  जाईल एकाच वेळेला. :)
आता डिसाईनर म्हणून ते सर्व मला करायला खूप मजा येतेय कारण माणसाचं काम मशीनमध्ये बसवायचं म्हटलं की नेहमीच गोंधळ असतो. :) त्या मेंदूत जी गणितं माणूस करतो ती सगळी मशीनमध्ये बसवायला. पण गेल्या पोस्ट मध्ये मी जे लिहिलं होतं माझ्या अनुभवाबद्दल त्याच्या एकदम विरुद्ध काम मी करतेय हे जाणवलं आणि हसू आलं. असो.

विद्या.

Friday, January 04, 2013

My 2 cents -English

         So now I am one of those people too, you know, the ones who have been writing about the recent rape incident. So there have been demos, discussions,Facebook posts and lot of imaginative options to punish the rapists. Even i shared all the information I got on facebook 'blindliy' just in case if it saved anyone's life. But its not something different than what all of us have done so far. Rather I have even skipped reading some of the news and people's views on their blogs about this news. But I always wondered who are these people? I mean what 'type' of people are they? I couldnt get an answer because we havent defined profiles of these criminals at all. Being a girl I never felt any difference in behaviour towards me in my life except for certain times. As a kid, I always thought my parents liked my brother more than me and just to have a boy we 3 daughters were born. But apart from that, in school never I felt any less while competing with my classmates for the highest ranks. Rather my grand-pa was upset about me getting less marks in Sanskrit. But never thought, what I am going to do anyways with good grades.

         Even later I went on studying and getting a job and had a good friend circle with many of them boys/men. Why didnt I ever meet one these animals there? Rather there have been friends who took care of me, gave me a lift home whenever it was late and made sure I was safe. There have been times when I competed with the same people for good ranks and good ratings in office and also had fights over right and wrong. But never did I an animal like this. Rather after the Delhi incident I saw many of the blogs written by men, none by a girl. I dont know why. But then the question is 'who are these people? These rapists?'For a minute I wanted to say to all my family and friends that I want to thank them for treating me equally so far. But then I realised, I dont have to thank them, its my right. But maybe I should respect them for their treatment towards to me. So again, 'who are these people?'. are they the poor,illiterate ones? Cause I am sure there must many rich ones in the list too. Rather even heard of the news where the father was killed while saving the girl from eve-teasing. So definitely not just 'poor' and 'illiterate'.Forget about rape, will these poor, illiterate people save money to terminate the girl fetus?
         So who are these people? I thought maybe I should start with asking my close ones about this. If they could have some insight and see if they have ever done a discrimination? Though a collegue/friend may have respected me as a team-mate and treated me equally, has he been the same way in personal life as well? During the marriage, have you asked or expected something from your in-laws directly/indirectly? You may not have asked but have your let your parents do that? Have there been different rule in household for a girl and boy? Have you stayed late out of the house while your sister had to be home by 7? Have you been a parent where you saved for your's son's education instead of your daughter's? Have you been protective of your friend to avoid her from eve-teasing but participated in it for others? Have you called a girl 'maal','chikni','cheez' or 'item' ever? Lets say you let your daughter get all the education she wanted, but still saved something for dowry for her marriage? Have you ever fought with your wife for she gave money to her parents? When you got all that education and got good job, you became part of the upper-middle class. Have you ever ignored the incidents that happened at your village just because you didnt want to get into it? Well, I have done that and believe me it feels terrible. I dont know if I had done something had I knows earlier. But not anymore. I wouldnt let something like this go by me and stay away from it.
So my question to all my friends and family is, if we have been part of any of the above things, havent we been one 'those' people as well? At least 5%,10% or 50%. But we have been. What do you say?

-Vidya.

My 2 cents

        चला आता बाकीच्या लोकांमध्ये माझी पण भर पडलीच. हेच, बलात्कार, स्त्री-मुक्ती, वगैरे लिहीनारया मध्ये. बाकी आपण करायचे तरी काय? तर निषेध झाले, आंदोलने झाली, नेत्यांवर टीका झाल्या, फेसबुक वर काल्पनिक शिक्षा पण झाल्या. मग जमेल ती माहिती 'शेयर' करून झाली. कुणाचे प्राण वाचलेच त्याने तर बरंच की. तर एकूण या सगळ्यात बाकी लोकांपेक्षा मीही काही वेगळं केलं नाहीये. म्हणजे अगदी एखादा मराठी ब्लॉग स्किप पण केला की  काय तेच तेच वाचायचे म्हणून. पण मनातला विचार थांबत नव्हता. की  हे असले रानटी लोक असतात तरी कोण? म्हणजे मुला-मुलींमध्ये भेदभाव, वेगळी वागणूक वगैरे कधी खूप जाणवलं नाही मला घरी तरी. कधी लहान भावाचे लाड फक्त को मुलगा आहे म्हणून होतात असं वाटायचं आणि मुलगाच हवा म्हणून आम्ही तीन मुली झालो त्याच्या आधी तेव्हढंच. पण शाळेत मुलांशी अभ्यासात स्पर्धा विशेष करून दहावी मध्ये. अगदी जीव तोडून अभ्यास केला. आणि करू नकोस असं कुणी म्हटलंच नाही. उलट संस्कृत मध्ये मार्क कमी पडले म्हणून आजोबा नाराजच झाले. पण मुलगी म्हणून काय करायचे आहे जास्त मार्कांचे असे कधी वाटले नाही.
          पुढे हट्टाने दुसऱ्या गावात शिकायला राहिले, नोकरीला राहिले, पण हे असले लोक मला दिसले कसे नाहीत? रानटी, हैवान? जे मित्र होते ते तर सर्व काळजीने साथ देणारे, उशीर झाला तर घरी सोडणारे, माझ्याशी स्पर्धा करून पुढे जाणारे आणि वेळ आल्यावर हिम्मत देणारे. मग मला कसे नाही दिसले त्यांच्यामध्ये हे हैवान? अगदी बरचसे ब्लॉगही मुलांनीच लिहिलेले. एकही मुलीचा नाहीच दिसला. मग जर या मुलांना, पुरुषाना आपल्या मुलींची, बहिणींची, बायको, आईची इतकी काळजी आहे तर मग हे असले लोक आले कुठून? गरीब, आडाणी असलेले? पण त्यांच्याकडे तर गरिबीतून वर यायलाच वेळ नसेल तर ते ही असली कामे कुठून करत असतील. बर समजा असतील फक्त गरीबच, अडाणी लोक असे वागणारे. मग ते मुलीची छेड काढल्यावर बाप उलटला म्हणून एका पोलिसाला मारले तोही असाच होता का कुणी गरीब, अडाणी? ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीत ते लोक भ्रूणहत्येसाठी करत हसतील का पैसे जमा कसेतरी?
         तर प्रश्न असा की हे लोक आहेत तरी कोण? आधी वाटले माझ्या घरच्यांना आणि माझ्या सर्व मित्रांना आभार मानावेत की मला तुम्ही आजपर्यंत माणूस म्हणून वागणूक दिलीत. पण त्यात आभार कसले? तो तर माझा हक्क होता. मग वाटले निदान अभिमान तरी वाटलाच की इतके चांगले लोक भेटले आयुष्यात म्हणून. मग म्हटले त्या सर्वांनाच एक पडताळा करून घ्यायला सांगावा अगदी मीही. म्हणजे असं की प्रत्येक पावलावर त्यांनी मला एक परकी स्त्री म्हणून आदराने वागणूक दिली असेल. पण त्यांनी स्वत:च्या आयुष्यातही तेच केले आहे का? त्या लोकांमध्ये हो पोस्त वाचणारे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकही येतात. तर प्रश्न हा विचारायचा की व्यक्तिगत आयुष्यात मी दुटप्पी पणाने वागलो आहे का?
         ऑफिसमध्ये टीम-मेट सोबत समानतेने वागले तरी लग्नाची वेळ आल्यावर मला सासऱ्याकडून अमुकच भेट हवी असा वाद आपण घातलाय का? बर नसेल घातला तरी आई-वडिलांना घालू दिलाय का? मुलगी कितीही हुशार असली तरी तिची फी न भरता मुलासाठी बचत केलीय का? अगदी साधं म्हणजे मुलीला सातच्या आत घरात आणि मुलाला १० असे वेगळे नियम ठेवले आहेत का आणि अशा नियमाचा फायदा घेत खरंच दहाला घरी आलाय का?  मैत्रिणीला चिडवू नये कुणी म्हणून गाडीवरून सोडलं असेल, पण स्वत: कुणा मुलीला 'आयटम','माल', 'चिकणी','चीज' म्हणून चिडवलं आहे का? अगदी शिकवलं मुलीला खूप पण लग्नाची वेळ आल्यावर हुंडा द्यायची तयारी ठेवलीच आहे का? बायको माहेरी पैसे देतेय म्हणून चिडलाय का? हे सगळे झाले छोटे प्रसंग. आपण शिकलो, मोठे झालो, बरेचसे लोक गरिबीतून वर आले चांगली नोकरी लागली, इ. पण तरीही गावाकडे कुणी नातेवाईक आहेच जो अजूनही जुन्याच रिती पाळत आहे. त्याने केला असा भेदभाव. तर त्याला कधी थांबवले आहे का? आपण कशाला पडायचे मध्ये म्हणून गप्प राहिलाय का? मी राहिलेय. आणि त्याची टोचणी जात नाहीये केव्हापासून. काय करायचं सुचत नाहीये. कदाचित आधी कळल असतं तर काही केलं असतं का मी? माहित नाही? आणि आता बोलूनही उपयोग नाही. कारण आता परत असं कधी गप्प राहणारच नाही.
          क्षणाक्षणाला जर आपण असे दुटप्पी निर्णय घेत असू तर आपणच नाहीये का ते पशु? म्हणजे १००% नसलो तरी ५%,१०%, ५०%? काहीतरी असूच ना? त्यामुळे सध्या मला हे असले लोक कोण असतील याच्यापेक्षा आपल्यातच आहे का? असा प्रश्न पडलाय. तुम्ही पण करा पडताळा जमेल तर.

-विद्या.

Wednesday, December 05, 2012

कस्टम-मेड

       परवा थॅंक्स गिविंग वीकेंडला शॉपिंग केली, खूप ! म्हणजे मागच्या वर्षीसारखी रात्री बारा वाजता नाही गेले दुकानात. पण दुसऱ्या दिवशी दिवसभर फिरत राहिलो. कपडे, शूज, घड्याळे, पर्स, स्वेटर, सगळं घेतलं. अगदी गिल्टी वाटेपर्यंत! मग दुसऱ्या दिवशी जाऊन जे नको होतं ते परत करूनही आले, तेव्हा जरा बरं वाटलं. आता जे हवंय ते सर्व घरात आल्यावर, माझी ट्रायल सुरु झाली, हा शर्ट, हा टॉप, ही जीन्स, कशी बसते, कसे दिसतेय. त्यात सानुचे ही ट्राय करून झाले. तिचा उत्साह बघून हसू येतं. म्हणजे 'शेवटी मुलगी कुणाची आहे?' असं  वाटून. एखादा कपडा किती चांगला बसला, कसा दिसला याने माणसाला किती फरक पडावा? :) मला तर खूपच. असो तर ट्रायल झाल्यावर सगळे कपडे, वस्तू घड्या करून ठेवून टाकल्या.
        आधी जो नवीन वस्तू आणल्यावर ती लगेच दुसऱ्या दिवशी जगाला दाखवलीच पाहिजे हा नियम जरा कमी केलाय. ( वय झालं बहुतेक, किंवा पोरांनी पेशन्स वाढवला आहे). आणि घातला तो ड्रेस तरी पहिल्यासारखी मजा नाही येत. (लग्न झाल्यावर कोण विचारतय म्हणूनही असेल म्हणा. :) ) पण  शर्ट, टॉप, जीन्स, पर्स, या सगळ्या गोष्टीना भारतात असताना घेतलेल्या ड्रेस ची सर नाहीच ना. म्हणजे उत्साह निम्मा होऊन इतकी खरेदी करतेय तर निम्माच राहिलेला बरा. तरीही तेव्हा जी मजा यायची ती येताच नाही इथे. मध्ये मैत्रिणीने मेल केली होती, आईकडे गेले होते, तिच्या दोन साड्यांचे ड्रेस शिवायला टाकले. त्यात मुलीचाही ड्रेस कसा बसला तेही. मला तिचा खूप हेवा वाटला. हजार दोन हजार डॉलर खर्च करूनही मला तिच्या त्या ड्रेसचा हेवा वाटत होता.
        तर हे ड्रेस शिवायला टाकणे हे प्रकरणच एकूण मजेशीर. एक सोहळाच तो. दिवाळी, लग्न, नवीन  नोकरी, वाढदिवस असा खास दिवसांसाठीची ही खरेदी. एकतर मित्र-मैत्रिणी सोबत केलेली किंवा घरच्यांसोबत. त्यामुळे कंपनीचा आनंद वेगळाच. तर एक हेतू मनात ठेवून असं नेहमीच्या ठरलेल्या 'रोडवर' जायचे. तिथे पहिली दोन-चार दुकाने नुसती बाहेरूनच बघायची. बरेच वेळा  दुकानात सारख्याच स्टाईलचे कपडे असतात. आपल्याला त्यातला नवीन स्टाईलचा तर हवा असतो पण तरीही वेगळा. थोड्या वेळाने एखाद्या दुकानाच्या बाहेर लावलेला ड्रेस आवडतो. हा ड्रेस म्हणजे पुतळ्याला गुंडाळलेले कापडच. तर ते आवडते म्हणून आत जाऊन विचारायचे, 'कितीला हो?' त्याची किंमत जर बजेटच्या बाहेर असेल तर मग प्रश्नच मिटला. लगेच पुढे जायची तयारी दाखवायची. आणि समजा तो असला आपल्याला हवा त्या रेंज मधला तरीही तो खाली घेतला आहे आणि लगेच पसंत करून पैसे देऊन घरी घेऊन आलोय असे कधी तरी झालेय का? ते ड्रेस मटेरियल आवडले तरी ते बाजूला ठेवून आणखी काही आहे का हे विचारणे आलेच. अजून थोडे पॅटर्न पाहिल्यावर मगआधीचाही चांगला वाटत नाही. आणि काहीच न घेता दुसऱ्या दुकानाकडे रवाना व्हायःचे.
          खरेतर मनात अजूनही तो पहिलाच ड्रेस असतो. बाकीचे कपडे पाहणे हे फक्त त्या आधीच्या ड्रेसला नक्की करण्यासाठी केलेले नाटकच. खूप कमी वेळा असे झाले असेल की मी पुढच्या दुकानात जाऊन ते इतके आवडले की मी परत मागे गेलेच नाही कधी. कधीतरी अगदीच नाही काही आवडले तर एखादा कपड्याचा तागाही पहिला आहे मी. मग त्यात कुर्त्यासाठी किती कापड लागेल तो हिशोब आलाच. त्याला मॅचिंग सलवार चे कापडही शोधायचे. त्यात पिवळा जास्त चांगला की नारंगी हा वाद. कधी दुकानाच्या बाहेर जाऊन उजेडात कापड बघावे म्हणून बाहेर घेऊनही गेले आहे मी. तर कधी एखादा ड्रेस आवडला पण त्याची ओढणी अगदीच काहीतरी होती म्हणून तो नाकारला असंही झालं आहे. अनेक चर्चा, विवाद, बजेट, रंग, दुकानदाराचा एटीट्यूड हे सगळे बरोबर जमले तर मग एक ड्रेस मटेरियल घेऊन त्या दुकानातून बाहेर पडायचे. तोवर जोरदार भूक लागलेली असते. मग रस्त्यात भेल, दाबेली सारखे भयंकर आवडणारे पदार्थ खायचे आणि पुढच्या लढाईला सज्ज व्हायचे.
           हो लढाईच ती, शिंप्याकडे जाण्याची. कुठल्यातरी कोपऱ्यातल्या दुकानात किंवा छोट्याशा घरात जायचे आपला हा 'भारी'चा ड्रेस घेऊन. मी तरी आजतागायत असं खूप मोठ्ठं दुकान आहे शिंप्याच किंवा मोठ्ठा बंगला आहे असं कधी पाहिलं नाहीये. तर त्या टेलर कडे आपले ड्रेस मटेरियल घेऊन जायचे. तिथे रांगेत असलेली बाई/मुलगी आपले मटेरियल कसे शिवायचे ते सांगत असते. तिने आणलेले मटेरियल दुकानात पाहिले होते आणि आपण नाही म्हटले होते यावरून मग खाणाखुणा. टेलर कडे एक बारका पोरगा असतोच नेहमी. तो कुठल्यातरी अजून एखाद्या मुलीचा ड्रेस घेऊन आणून देत असतो. तिचा तयार झालेला ड्रेस, त्याचा पॅटर्न हे चोरून बघून घ्यायचे. मग अगदीच कंटाळा आला तर समोर टांगलेले ड्रेस बघत राहायचे. तेव्हढ्यात मग टेलर दोन-चार पुस्तके आणून देतो. त्यात एक सर्व गळ्यांचे डिझाईन असलेले, एक अख्खा ड्रेस दाखवणारे, एक बाह्यांचे डिझाईन असलेले अशी सगळी पुस्तके चाळत बसायचे.
        शेवटी आपला नंबर येतो. मग त्याच्या समोर अभे राहायचे हात आडवे बाहेर काढून. तो मापे घेणार, मान, गळा (मागचा, पुढचा), दंड, हाताची लांबी, छाती, कंबर, हिप्स (मराठीत काय म्हणतात आठवत नाही), पोटऱ्या, पायाचा घेर, कमरेपासून पायापर्यंतची उंची, खांदा, अशी सगळी मापे घेतो तेही तुम्हाला अजिबात विचित्र न वाटू देता. त्यात मग त्याला सांगायचे, मागच्या वेळी हाताची उंची ६ घेतली होती खूप लांब झाले होते, यावेळी साडेपाच घ्या. मग ड्रेस चा कट कसा चुकीचा होता ते बोलायचे. सगळी मापे घेऊन आणि काढून झाल्यावर कुठल्या टाईप चा गळा (पंचकोनी, गोल, बोट, चौकोनी, की अजून काही), मग बाहीला घुंगरू की नुसती गाठ की गोट लावायचा, कट किती वरपर्यंत घ्यायचा, मागचा गळा किती आणि पुढचा किती ठेवायचा, सलवार कसली शिवायची, सर्वकाही ठरवायचं. शिंपीदादा त्याच्या कोड लिपीत हे सर्व टिपून घेतो. आणि अगदी आपल्याला हवी त्यानंतर १५-२० दिवस उशिराची तारीख सांगतो. मग सर्वांनी,'काय हे, दिवाळी झाल्यावर ड्रेस देणार का? वगैरे टोमणे मारायचे.मग तो आपल्याला हवा त्याच्या दोन दिवस आधीची तारीख देतो. ती ठरली की मग शिलाई किती जास्त म्हणून बोलायचे. तर एकूण सर्व काम होईपर्यंत थकून जायला होतं. आता तिथून बाहेर पडून फक्त एकच काम असतं. आपला ड्रेस कधी मिळणार याची वाट बघायचं.
        हे शिंपी लोक पण ना, चांगले मिळाले तर आपलं नशीब उजळलं म्हणायचं. घरी होते तोवर आईच कपडे शिवायची. तेंव्हा या बाहेर शिवलेल्या, तयार मिळणाऱ्या ड्रेसचं खूप आकर्षण वाटायचं. बारावी नंतर सांगलीला माझ्या मावस बहिणीचा एक टेलर होता. विश्रामबाग वरून सांगलीत येऊन त्याच्याकडे ड्रेस शिवायला टाकायचे. अर्थात तेव्हा फक्त वर्षातून एक दोनच ड्रेस मिळायचे. त्यामुळे ते म्हणजे मोठं काम असायचं. नंतर पुण्यात हाय फैशन च्या समोरच्या बिल्डींगमध्ये एकाकडे जायचे. आतेबहीणीने सांगितलेला. नंतर शर्मिलीच्या समोरच्या बिल्डींगमध्ये द्यायचे, बहिणींनी सांगितले म्हणून. पण माझा मी शोधलेला टेलर म्हणजे मुंबईचा. तो नुसता शिवायचा नाही तर त्यावर इम्ब्रोयडरी पण करून द्यायचा. आणि माझे त्याने शिवलेले जे ड्रेस होते तसे परत कुणाकडेच मिळाले नाहीत. बोरीवलीमध्ये छोट्याशा खोलीत घर आणि मशीन होतं त्याचं. माझं माप लिहूनच ठेवलेलं. एकदा तर मी अमेरिकेत असताना संदीपने ड्रेस मटेरियल आणून त्याच्याकडे शिवायला दिले होते. आणि त्याने तो इकडे आणल्यावर एकदम मस्त बसला होता ड्रेस तो. खूप आनंद झाला होता मला. तर असे हे टेलर-शिंपी जे म्हणाल ते.
        शेवटी ड्रेस घेऊन यायचा दिवस उजाडतो. तिथे जाऊन तर ट्राय करता येत नाही, रिमेम्बर छोटी खोली?  त्यामुळे जे जमेल ते तिथे चेक करायचे. पण हे सर्व तुमचे नशीब चांगले असेल तर. कधी कधी ड्रेस शिवून झालेलाच नसतो. किंवा झालाय पण हातशिलाई  राहिली आहे, बटन लावायचे राहिले आहे, इस्त्री राहिली आहे, थोड्या वेळात परत या देतो करून अशी सर्व नाटकं करून तो ड्रेस मिळतो एकदाचा. केंव्हा एकदा घरी येऊन घालून बघेन असं होतं मग. कधी तरी मी एव्हढं सांगूनही त्याने ऐकले नाही म्हणून चिडचिड होते. पण जेव्हा सर्व बरोबर असतं आणि तो ड्रेस मस्त बसतो तेंव्हाचा आनंद वेगळाच. मग तो ड्रेस कॉलेज, ऑफिसला, पार्टीला घालून मिरवणे याचा अजून वेगळा.
       आता या सर्व प्रकरणात माझे हे असे मॉल मध्ये स्वत:च जाऊन आणलेले जीन्स, टॉप कुठेतरी तुलना करू शकतील का? यावेळी गेले तेंव्हा शिवायला वेळ नाही म्हणून मी ही तयारच ड्रेस घेऊन आले. पण मॉल मध्ये मिळणारे ते 'मिक्स आणि मॅच' मला परकेच वाटले. परवा दिवाळी म्हणून ऑफिसमध्ये तो रेडीमेड ड्रेस घालून गेले. ज्युडी वेडीच झाली बघून.'म्हणे मला असे वर्क करून पाहिजे ड्रेस वर'. म्हटले अगं वेडे, हे तर काहीच नाही. इथे अख्खा ड्रेस डिझाईन करून घेतो आम्ही, पाहिजे तसा, एकदम कस्टम. त्याची या ड्रेसशी काय तुलना?' तर ती म्हणे,'मला का नाही मिळणार असे सर्व कस्टम. इथे आपले साच्यातलेच कपडे घ्यायचे'. म्हटले, 'बरोबर आहे गं, मलाही आता हे साच्यातलं आयुष्य कंटाळवाणं झालं आहे. काहीतरी कस्टम केलंच पाहिजे'.

-विद्या.   

बेमालूम मिश्रण

       झोपायला जाता जाता फेसबुक वर चिन्मयने टाकलेली कमेंट वाचली. माझ्यासाठीच होती ती. तो म्हणे,'विद्या, हम लोग खाना खाने जायेंगे, मुव्ही जायेंगे'. :) आता खरं तर त्या वाक्याचा रेफरन्स मला आठवतही नाहीये नीट. पण कधीतरी एकदा मुंबईत असताना उत्साहात बोललेलं वाक्य ते. ते हि माझ्या तेव्हाच्या नाकातून बोललेल्या मराठी हिंदीमध्ये. पण माझ्यापेक्षा लोकांनाच जास्त लक्षात ते. परवा एकदा असेच एकाने एका फोटोवर कमेंट टाकली,'अल्फरोजी रॉक्स'  म्हणून. मग तेव्हा आठवले अरे हो, मी तेव्हा पुणेरी स्टाईल मध्ये तोंडाला रुमाल बांधून फिरायचे त्रिवेंद्रम मध्ये म्हणून पडलेलं हे नाव. मी विसरलेच होते ते. पण बाकी लोकांना मात्र या गोष्टी कशा लक्षात राहिल्या? 
        फक्त हेच नाही जेव्हा केंव्हा रश्मी, आरती अगदी शुभांगीशी बोलते तेंव्हा माझा सांगलीत असणारा माझा तो टोन आपोआप तोंडात येतो. म्हणजे मला बोलताना विचारही करावा लागत नाही आणि माझा टोन आपोआप आलेला असतो. मग तीच बोलण्याची पद्धत, तसेच जोरजोरात हसणे, तेच जुने लोकांचे विषय आणि आपल्या लक्षात राहिलेल्या त्यांच्या आपल्या बद्दलच्या आठवणी. त्या आठवणी मधली मी आणि मुंबईच्या ग्रुपमधल्या लोकांच्या आठवणीतली मी किती वेगळ्या ना? मग वाटले एकदा ना पल्लवी आणि शगुफ्ता त्यांना भेटले पाहिजे पण बहुतेक त्यांच्याशी बोलताना माझा तो कोरेगाव मधला टोन येईल की नाही माहित नाही. आणि त्यांच्या आठवणीमधली मी कशी असेन काय माहित. 
        परवा पुण्यातल्या संदीपच्या एका मित्राने मेल मध्ये लिहिले होते की विद्या अजूनही 'च्या मारी' म्हणत असेल का? तर 'हो, मी अजूनही म्हणतेच' पण त्याच्या आठवणीतली विद्या म्हणजे 'च्या मारी'. कित्येक दिवसांनी ब्लॉग वर आले तेंव्हा मग जुन्या लोकांचे जे ब्लॉग वाचायचे तिथे गेले आणि मग माझ्या या ब्लॉग मध्ये येणारी 'विद्या' त्या लोकांच्या आठवणीतली असेल का? 
       बरं, जर माझ्या बद्दल असे वाटते, तर मी तरी काय असेन? म्हणजे मीही बाकीच्या लोकांच्या आठवणीनीनी बनलेली असेन का? म्हणजे कुणाच्या बोलण्याच्या पद्धती, त्याचं हसणं, वागणं या सगळ्यांचं एक वेगळच मिश्रण म्हणजे मी का? आणि वेगवेगळ्या वेळी मी ज्या ज्या लोकांना भेटले ती, त्या वेळेपर्यंत भेटलेल्या सर्व लोकांचं मिश्रण होय ना? इन्टरेस्टिग वाटला तो विचार मला. आणि मला ज्या वेळेला जे लोक भेटले तेही त्यांना तोवर भेटलेल्या लोकांचं मिश्रण, बरोबर? आणि मला भेटून ते पुढे बाकी लोकांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्यात मीही आहेच त्यांच्या नकळत. :) पण म्हणजे लोक जेंव्हा आपल्याला भेटल्यावर म्हणतात, 'अरे तू अजिबात बदलली नाहीयेस'. तर ते बरोबरही आणि चूकही. कारण आपण बदललेले तर असतो पण ती जुनी व्यक्ती समोर आल्यावर परत त्याच जुन्या मिश्रणात जातो बहुतेक. ह्म्म्म... :) तर असे आपण सगळेच एक बेमालूम मिश्रण आहोत आणि युनिकही, कारण दुसरं कुणीही आपल्यासारखं नसणारच. अगदी सख्खे बहिण भाऊही. :) असो, झोपावं आता. उगाचच मी सध्या कुठल्या लोकांचं मिश्रण असेन याचा विचार येतोय. म्हणजे नको असणाऱ्या शेजाऱ्यांचही का? :)

-विद्या.
 

Monday, December 03, 2012

कन्फेशन पुढे चालू..

        मागच्या पोस्ट नंतर म्हटलं बघावं तरी काय होतंय गाणी लावून. म्हणून आज सकाळी एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसला जाताना गाणी लावली जगजीत सिंग ची. थोडासा पाउसही पडत होता. एकदम पोषक वातावरण अशी गाणी ऐकण्यासाठी. पाहिलं गाणं सुरु झालं, 'होशवालो को खबर क्या?' आणि एकदम धस्स झालं. कित्त्ती वर्षांनी आवाज ऐकतेय असं वाटलं. पुढे मग 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो..'. ते ऐकताना वाटलं की असे शद्ब कानी पडूनच किती काळ लोटलाय.
        १५-२० मिनिटांचा रस्ता तो. रोजच्या रस्त्यावर ३०मैल ची स्पीड लिमिट असते आणि जवळच पोलीस स्टेशन आहे हे लक्षात ठेवूनच चालवत असते.पण पुढची एकेक गाणी ऐकण्यात इतकी गुंग झाले की जाग आली ती मागे येणाऱ्या पोलिसाच्या गाडीनेच आणि त्याच्या सायरन मुळे. सगळ्या कल्पना, इ मनातच ठेवून जागेवर आले, गाडी बाजूला घेतली. पोलीस येऊन लायसन घेऊन गेला. म्हटले 'अरे मला आयुष्यात कधी तिकीट नाही मिळालं. आता नाही चालवणार जोरात'. पण तो बाबा कुठला ऐकतोय. त्याने मला तिकीट दिलंच. १२० डॉलर चा बांबू. :( आणि ४ तासाचा क्लास घ्यावा लागणार तो निराळाच. मग सगळा मूड गेलाच. कशी बशी ऑफिसमध्ये पोचले तर हे भाराभर इश्यू.
          संध्याकाळ पर्यंत वेळच मिळाला नाही विचार करायला. घरी यायला निघाले तेंव्हा सकाळी राहिलेली गाणी पुन्हा सुरु केली. त्यात मग 'बात निकलेगी तो' आलं, 'हजारो ख्वाहिशे ऐसी' आलं, आणि 'कोई ये कैसे बताये' पण आलं. पण ना फक्त गाणं आणि आवाज याच गोष्टीकडे लक्ष होतं आज. आधी असायची तशी उदास संध्याकाळ नव्हती ती. त्या गाण्यांना मागचा पुढचा कसलाही संदर्भ नव्हता. फक्त गाणी आणि आवाज. स्वत:लाच आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. म्हणजे पूर्वी ना त्या गाण्यांमध्ये फक्त जगजीत नसायचा, मी पण असायचे, माझी गोष्ट पण त्यात असायची. पण त्या गाण्यातून, त्या गोष्टीतून, त्या काळातून, आणि त्या चक्रातून कधी बाहेर पडले कळलंच नाहीये. आणि मला त्यात काही वाईट वाटतही नाहीये बहुतेक. कारण त्याच्या त्या आवाजातला दर्द आणि शब्दातील खोच आता जाणवली पण टोचली नाही.
मग विचार आला मी जरा काळ बदलला की कशी त्या दुखा:तून बाहेर आले. म्हणजे चिंता, काळजी, त्रास वगैरे असतातच पण दु:खं नाही. पण जगजीतला कसा तो आवाज आयुष्यभर ठेवता आला? कुठलं दु:खं होतं जे त्याला आयुष्यभर पुरलं काय माहित. तेव्हा वाटलं,' बरं झाला बिचारा सुटला त्यातून !' Rest In Peace !

विद्या.

Saturday, December 01, 2012

कन्फेशन

बरेच दिवस झाले मनात एक गोष्ट आहे. ती निदान बाहेर तरी येऊ द्यावी म्हटलं. मी शिकागोला आले तेंव्हा वाटलं होतं इकडे जगजीत सिंगच्या कॉन्सर्त होतात म्हणे इकडे. कॉलेज मध्ये असताना गेले होते एकदा शेवटच्या वर्षी. ती रात्र अजूनही आठवते. शेजारी उगाचच प्रत्येक गाण्याला वाह-वाह करत स्वत:च्या तारस्वरात गाणारा एक ग्रुप बसला होता. इतकी चिडचिड झाली होती. पण हलकासा पाउस पडला होता त्यादिवशी. सांगलीत असं थंड वातावरण कमीच पण त्यादिवशी होतं. परत कसे आलो आठवत नाही. पण आकाशाकडे बघत जगजीतचा आवाज ऐकत बसले होते तेच आठवत होतं. तर त्यानंतर परत जायचं होतं. ते काही झालं नाही.
         पण गाणी तर असायचीच सोबत. त्यांनी कधीच साथ सोडली नव्हती. मध्येच एखाद्या संध्याकाळी चुकून ऐकून रडू यायचं. तर कधी 'मरासिम' मध्ये गुलजार जा आवाज ऐकत बसावंस वाटायचं. आमच्या गाडीत MP३ प्लेयर नाहीये त्यामुळे एका सीडी मध्ये १२च गाणी बसायची कशीबशी. त्यामुळे एकदा बसून २-३ सीडी पण बनवून घेतल्या होत्या. त्याच ऐकायचे. संदीप असायचाच शेजारी पण गाण्यात असेल याची शंकाच होती. सानू झाल्यानंतर हे असं सीडी बनवणं बंदच झालं. आणि त्यात् ऑफिस ५ मिनिटांवर. त्यामुळे गाडी सुरु करून गाण्याची सुरुवात होते न होते तोवर पोचून जायचो ऑफिसमध्ये. त्यामुळे गाडीत गाणी ऐकणं बंदच झालं गेले ३ वर्षं तरी. त्या जुन्या सीडी कुठे आहेत काय माहित. एकदा अशीच एक सीडी दिसली गाडीत म्हणून लावलीही होती. तर तेंव्हा माझा आणि संदीपचा विषय झाला की बघू सानू माझी मुलगी का त्याची.:) आणि अगदी त्याचं ऐकून एका गाण्यातच झोपूनही गेली ती. तर तेव्हढाच काय तो संदर्भ गेल्या ३ वर्षातला.
          मध्ये एकदा पिंकीने ती कॉनसर्ट जाऊन आल्याचे स्टेटस टाकले होते फेसबुक वर. तेव्हा हेवा वाटला होता. आणि ती बहुतेक त्याची शेवटची कॉनसर्ट होती. त्यानंतर फक्त बातमीच वाचली RIP म्हणून. आणि खरं सांगू का, ती बातमी कधी आली, काय झाले होते, काहीच वाचलं नाही. फक्त लोकांच्या स्टेटस वर 'लाईक' केले आणि मोकळी झाले. पण मधेच मनात विचार येतात मी इतकी कशी निरस झाले आहे? आय मीन, कुणी 'गेलं' आणि डोळ्यात एक अश्रूही नाही? बरं ते जाऊ दे, त्याच्या आठवणीत एखादं गाणं तरी ऐकावं? ते ही नाही. पाचेक वर्षापूर्वी, बातमी कळली की 'एव्हरी बडी लव्हज रेमंड' मधला त्याचा म्हातारा बाप जो होता तो गेला म्हणून. तर दिवसभर मला चैन पडली नव्हती. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा ती मालिका पहिली त्याची आठवण व्हायची. ज्या म्हाताऱ्याने इतकं हसवलं तो या जगात नाही म्हणून. आणि जगजीतसाठी एक गाणं नाही?
       कधी वाटतं अशी कोरडेपणाने जगत आहे म्हणून इतके दिवस घरापासून लांब राहू शकलेय. असेच राहात असतील का लोक आपल्या घरी परत न जाता, अनेक वर्षं आई-बाबांना न भेटता? कुठेही इमोशनल होऊच द्यायचं नाही स्वत:ला. जरा सेंटी पिक्चर आहे वाटलं की बदलून टाकायचा. पुस्तकं, गाणी असल्या कुठल्याही त्रास देणाऱ्या वस्तू मी गेले ३ वर्षं जवळ बाळगल्याच आठवत नाहीये. अर्थात पोरं हे सगळं करायला आणि विचार करायला क्षणभरही देत नाही हा भाग निराळा. आताही रात्री ३ वाजता बेबी मॉनीटर वर खुसपूस ऐकू येत आहे. असो. परवा बंडूला डेंग्यू झाल्याचं आई फोनवर बोलली आणि पोटात गोळा येतो म्हणजे काय हे जाणवलं. सगळं ढवळून आलं. म्हणजे काय करू काय नको इथे बसून हे कळेना. त्याचं सर्व ठीक होईपर्यंत काहीच सुचलं नाही. त्याचं सर्व नीट झाल्यावर असाच मनात विचार आला, मी निदान जिवंत असण्याचं चिन्हच आहे हे. फक्त परत असल्या परीक्षा नकोत.
         तर जगजीत बद्दल, आज संध्याकाळी परत विचार आला मनात ऐकावं का एखादं गाणं ? पटकन सीडी पण सापडली नाही. पण मनातून भीती वाटतेच. उगाच ऐकत बसायचे आणि अचानक आठवलं तो आता या जगात नाही म्हणून तर? आणि रडू आलं तर काय करायचं? नकोच ते. म्हणून राहून गेलंय. गिल्टी वाटत राहतं पण वाटतं पुन्हा कधीतरी. आज नको. बघू कधी येतंय ते रडू, अजून हिम्मत नाही झालीय. पण लिहून ते मान्य तरी करावं म्हटलं म्हणून हे कन्फेशन.

-विद्या.


Thursday, November 29, 2012

भाग बारावा (शेवटचा) : प्रियकर माझा


राहुल आईशेजारी सोफ्यावर बसून म्हणाला,"बोल काय झालं? आज एकदम अशी वैतागली का आहेस?".

त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं,"काही नाही रे, एकतर दिवसभर ती पोरगी घरात असते. संध्याकाळ पर्यंत कंटाळून जाते. आणि आम्हाला काय नातवंड आहे त्यामुळे त्याचं करायला काही वाटत नाही. पण शेवटी आई ती आईच ना? आणि तू सांग किती दिवस असं चालणार हे? तिकडे तुझे बाबा, भाऊही बाहेर खाऊन कंटाळले आहेत. मलाही घरी गेलंच पाहिजे ना?". 
          राहुलने एकेक मुद्दा समजून घेतला,"चल आधी आपण तुझ्याबद्दल बोलू. तू सांग तुला काय करायचं आहे? तिकडे बाबांसाठी जायचं आहे का इथे राधासाठी राहायचं आहे हा विचार करूच नकोस. तुला काय हवं आहे ते सांग. हे बघ तू आमच्यासाठी इतकं केलं आहेस आजतागायत. तू आम्हाला इतकं चांगलं वळण लावलंस, शिकवलंस. पण तुला काय हवं म्हणून कधी विचारलंच नाही. आता आम्ही मार्गी लागल्यावर तुझा छान ग्रुप जमला. कधी बाहेर फिरायला जाणं झालं हे सर्वही उत्तमच. तुला इथे कंटाळा येणंही हि साहजिकच आहे. त्यामुळे तू सांग तुला काय करायचं आहे?".
आई,"मला राधाबरोबर रहायला आवडतं रे. पण तिकडची खूप आठवण येते. इथे जास्त नाही राहू शकत. पण मग राधाचं काय?". 
राहुल,"हे बघ, बाकी कुणाचाही विचार करू नकोस. तुला जायचं आहे ना? मग ते तरी नक्की करू. कारण केवळ स्त्री म्हणून बाळाची जबाबदारी आईची,सासूची, असं मानूनच आम्ही तुला, तिच्या आईला इथे राहायला बोलावलं. पण तुमचंही तिकडे जग आहे हे विसरलो. तर पुढच्या आठवड्यात तुझं तिकीट काढू. चालेल?". 
आई,"अरे पण? राधा?"
राहुल,"अगं, बोलू ना पुढे."
त्यांनी मानेनंच होकार दिला.
          राहुल पुढे बोलू लागला,"नेहाबद्दल म्हणशील तर, तिने कधी नोकरी सोडावी हा विचार माझ्या मनातच आला नाही. कारण ती इतकी हुशार आहे. तिने घरी राहणे म्हणजे तिच्या कौशल्याचा अपमान करण्यासारखे आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही मुली बघत होतात तेव्हा शिकलेली, नोकरी करणारी, अगदी माझ्या बरोबरीची, अनुरूप मुलगीच तुम्ही बघत होता ना? तेव्हा आपण विचार केला का? की या शिकलेल्या मुलीने बाळ झालं की मात्र घरी राहून आई होण्याचं कर्तव्य पार पाडायचं ? नाही ना? आपण सगळेच अपेक्षा करतो की कमावणारी मुलगी पाहिजे. मग वेळ आल्यावर तिनेच त्या नोकरीवर पाणी सोडावं अशी अपेक्षा का ठेवायची? मी काही स्त्रियांच्या हक्कासाठी लढणे किंवा त्यांना बरोबरीचा दर्जा द्यावा म्हणून लढाई पुकारत नाहीये. पण नेहा जशी आहे तशीच मला आवडते आणि म्हणून तिने बदलावं अशी मी अजिबात अपेक्षा करत नाही.आणि एव्हढच वाटतं तर मी नोकरी सोडतो,चालेल?". 
त्याच्या आईने चमकून वर बघितलं.
         "आता राहिला प्रश्न राधाचा. तिच्यावर आपण सर्वच किती प्रेम करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. पण म्हणून तुम्हा लोकांना वेठीस नाही धरले पाहिजे. तुम्ही हौसेने करता, खेळता ते वेगळं. राधा ही जशी नेहाची जबाबदारी आहे, तशीच माझीही. आईचं प्रेम म्हणजे तरी काय गं? तुझ्याइतके बाबा आमच्या सोबत राहू शकले असते तर त्यांच्याही तितकेच जवळ राहिलो असतो जितके तुझ्या आहोत. मी राधाला काही कमी प्रेम देणार आहे का नेहापेक्षा? त्यामुळे फक्त तिनेच एकटीने घरी राहण्याचा निर्णय घेणं हे चुकीचं. हां, तिला आपल्या मुलीसोबतच राहायचं आहे, बाकी काहीच करायचं नाहीये असं म्हटलं तर तो तिचा निर्णय. पण म्हणून तिच्यावर तो निर्णय घेण्याचा भार सोडून, तिने आपल्याला हवा तसा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा मी करणार नाही. राधाला दिवसभर कसे सांभाळायचे याचा विचार केलाच पाहिजे आणि त्यासाठी अनेक पर्यायही आहेत. त्यातला एक कुठलातरी एकदम योग्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही. प्रत्येकाला चांगली-वाईट बाजू आहेच. पण त्यातला कुठला ऑप्शन ठरवायचा हे आम्हाला दोघांना बसून नक्की केलं पाहिजे. आणि आम्ही ते करूच. त्यामुळे तू तिची अजिबात चिंता नको करूस. सगळं ठीक होईल."  राहुलच्या त्या समंजस बोलण्याने त्याच्या आईला गहिवरून आलं.
          तो पुढे म्हणाला,"चल झोप बरं आता. राधा रात्री उठली की मलाच बघायला लागतं. तुम्ही दोघी बायका घोरत असता नुसत्या." 
        त्याच्या आईने खोट्या रागाने त्याला एक फटका मारला आणि झोपायला निघून गेली.
नेहा मात्र त्यांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती. राहुल रुममध्ये येत आहे म्हटल्यावर तिने तोंडावर पांघरून ओढून घेतलं. सगळेच प्रश्न असे पांघरून घेऊन सुटले असते तर किती बरं झालं असतं. राहुलही लगेच झोपून गेला.
        पण नेहाला झोप लागत नव्हती. त्याच्या चेहेऱ्याकडे बघत नेहा कितीतरी वेळ तशीच पडून राहिली. त्याच्या पहिल्या भेटीपासून ते पुनर्भेट, त्यांचं लग्न, सगळं आठवत होतं तिला. पण त्याला बघून आज जितकं भरून आलं तितकं कधीच वाटलं नव्हतं. आपल्या 'अहं' ला सांभाळूनच ती त्याच्यावर प्रेम करत होती जणू. आज मात्र त्याच्याकडे बघताना तिला इतकं प्रेम उफाळून आलं होतं की त्याच्यासाठी, तो म्हणेल ते करायला तयार झाली होती ती. बाईचं नेहमी हे असंच होतं. किती स्वत:ला सांभाळून द्यायचं ठरवा, वेळ आली की स्वत:ला विसरायला होतंच. त्याच्या आनंदासाठी, त्यांच्या मुलीसाठी वाट्टेल ते करायला ती आज तयार झाली होती. होताच तो तसा, तिचा साथीदार, तिचा प्रियकर. हो, आजपर्यंत फक्त तिचा मित्र असणारा तो आज तिचा प्रियकर झाला होता. आज जणू पहिल्यांदाच बघत होती ती त्याच्याकडे, नव्या अर्थाने. किती पाहिलं तरी मन भारत नाहीये असं वाटत होतं. शेवटी त्याचा हात अंगावर ओढून ती बघत राहिली. तो उठला की त्याला सांगायचंच की, "मला नाही करायची नोकरी. घरी राहीन मी थोडे दिवस राधासोबत". एकदा ठाम निश्चय झाल्यावर तिला कधीतरी झोप लागून गेली.
          प्रत्येक सकाळ नवीन काहीतरी घेऊन येत असते. एक नवा हेतू जगण्याचा, एक नवी आशा, एक नवा दृष्टीकोण बघण्याचा. राहुलची आईही आज शांत होती मनातून. तिला काय करायचं आहे हे तिला कळल होतं. तसंच नेहालाही. नेहाने उठल्यावर सांगितलच राहुलला, "अरे मी विचार करतेय, मी सांगते आज ऑफिसमध्ये नाही जमणार यायला अजून १-२ वर्षं तरी. दोन महिने नोटीस पिरीयड आहे म्हणा. पण आई थांबत असतील तर मी तेव्हढे दिवस जाऊन येईन. मग आहेच मी घरी. मलाही जरा ब्रेक तेव्हढाच. आणि माझी काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही घरी राहिल्यावर. राधा तर आहेच. पण तू माझ्या बरोबर असशील तर मला कधीच कशाचा त्रास होणार नाही याची खात्री आहे मला. "
         तिने असं प्रेमाने छातीवर डोकं ठेवल्यावर छान वाटलं राहुलला. आणि तिचा त्याच्यावरचा विश्वास बघून तर अजूनच. पण तरीही नेहाने घरी राहायला 'हो' म्हटलं तरी तो तयार नव्हता त्यासाठी.
"नेहा, मी काय इतका वाईट सांभाळतो का गं राधाला? मला वाटलं नव्हतं तू माझ्या स्कीलवर अशी शंका घेशील म्हणून. उलट मीच तुझ्यापेक्षा लवकर झोपवतो तिला. ", तो चेष्टेने म्हणाला.
पण नेहा त्या मूड मध्ये नव्हती. तिचा चेहेरा बघून राहुल पुढे बोलला,"हे बघ, उगाच काहीतरी घाईत निर्णय घ्यायचा नाहीये. आपण आहोत ना दोघेही सोबत? मग सगळा भार तूच का घ्यायचा? मलाही जरा करू दे की माझ्या लेकीचं. आपणच 'आई' आणि 'बाप' म्हणून दोन वेगळे लोक, वेगळे रूप बनवतो. हे इंग्रजीत म्हणतात तसं दोघेही 'पेरेंट' म्हणून राहू. हो की नाही? यापुढेही कितीतरी प्रसंग येतील. प्रत्येकवेळी सोडणार आहेस का नोकरी? माझ्यासाठी? राधासाठी? नोकरी करणे न करणे हा ऑप्शन का असतो दर वेळी? ती आपल्या आयुष्याचा एक भागच आहे हे नक्की करायचं आणि बाकीचे निर्णय त्या दृष्टीने घ्यायचे. हो की नाही?
आणि राधाला कुठे ठेवायचं हा विचार का करायचा? थोडे दिवस आपणच करू काहीतरी. मी सकाळी जात जाईन आणि तू दुपारी जा ऑफिसला. मधले दोनेक तास ठेवता येईल तिला डे-केयरला. तिलाही तेव्हढाच बदल. आपलीच थोडी चुकामूक होईल, पण कुणीतरी एकाने घरी राहण्यापेक्षा हे बरं ना? असेही तुला रात्रीच कॉल असतात. जमले तर थोडे दिवस घरून काम करता येतं का ते बघू. हे बघ, उपाय शोधायचे म्हणले की मिळतातच. ते दोघांनी मिळून अमलात आणले तरच त्यात मजा ना."
         नेहाला आज असंही त्याच्यासमोर काही दुसरं दिसत नव्हतं. आणि हे असं तिला इतकं सांभाळून घेऊन बोलल्यावर तिला एक शब्दही पुढे बोलायला झालं नाही. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून राधाकडे समाधानाने बघत राहिली फक्त. आता यापुढे कुठल्याही वळणावर ती एकटी नसणार याची खात्री तिला झाली होती.

समाप्त.
विद्या भुतकर.

Wednesday, November 28, 2012

भाग अकरावा : घर दोघांचं (तिघांचं ?)

        घर दोघांचं म्हटलं की जितकं नीट नेटकं, टापटीप तितकंच बेशिस्त. पाच दिवस ऑफिस मध्ये असल्यावर ते पसरवणार तरी कोण? सर्व कसं जिथल्या तिथे. पण तेच शनिवार-रविवार मनात आलं तेव्हा उठायचं, जेवायचं आणि परत झोपायचं, कधी मनात आलं सिनेमाला जायचं.  रात्री उतरवलेले कपडे परत घातले काय किंवा तिथेच पडले काय? काय फरक पडतो? बाथरूमचा दरवाजा बंद केला काय उघडा ठेवला काय? कोण विचारतंय? सगळाच निवांत कारभार. ऑफिसमध्ये काम आलं म्हणून रात्री उशिरा तिथेच थांबलं तरी कोणी विचारणार नव्हतं. अर्थात आपलं माणूस म्हणून काळजी असतेच, पण फोन करून खात्री करून घेतली की संपलं. त्याच्या आठवणीनं रडू आलंय असं तर होत नाही ना? कसं ना, लग्न कसल्याही प्रकारचं असू दे, अरेंज किंवा लव, पण संसार दोघांचा सारखाच. कंपॅटीबिलीटी असली म्हणजे झालं. आणि ती असणं म्हणजे तरी काय? तर प्रेडीक्टीबिलीटीच ना? समोरचा माणूस तुम्ही केलेल्या कुठल्याही गोष्टीवर जोपर्यंत तुमच्या वर्तुळातील अपेक्षेप्रमाणे उत्तर देतोय/ वागतोय म्हणजेच दोघांचं खूप छान जमतं म्हणायचं ना? समोरचा जेव्हा आपल्याला अनपेक्षित वागतो तेव्हा मात्र ते भांडायला कारण होऊन जातं. तर अशी कंपॅटीबिलीटी आणि प्रेडीक्टीबिलीटी असली की झालं, मग 'लव' काय आणि 'अरेंज' काय, ते मॅरेज सारखंच. बाकी सर्व फक्त, लोकांना 'आपण कसे भेटलो हे सांगायची गोष्ट' इतकाच काय तो त्याचा उपयोग.
        गेले दोन तीन वर्षं असंच रुटीन चालू होतं नेहा आणि राहुलचं. ते मोडलं एका सकाळच्या प्रेग्नंसी टेस्ट ने. कितीही प्लान करा पण त्या क्षणाला रिझल्ट पाहिल्यावर एक ठोका चुकतोच. 'आता काय?' हा विचार येतोच. अगदी म्हटलं सिनेमातल्यासारख बायकोला उचलून धरायचं, पण तो चुकलेला ठोका अजून चुकलेलाच असतो. एक धाकधूक असतेच. पुढे काय? याची. त्यांनी मग डॉक्टर ची भेट घेतली, सर्व चेक करून घेतलं, मनात हजारो प्रश्न होते. त्यांची उत्तरं ते शोधतच होते इंटरनेटवर. दिवसभर मग ते घरीच राहिले, विचार करत, मध्येच काहीतरी बोलत, परत विचार करत. घरी फोनही केले. एक दिवसाची ती एक्साईटमेंट हळूहळू कमी होत जातेच. पण त्या दोघांना जोडणारा एक धागा जन्माला येणार असतो. तोच त्यांना अजून जवळ आणत राहतो. मग बायकोचे हट्ट, डोहाळे, त्याचं ते असं काळजीतून प्रेम दाखवणं सगळ्यालाच नवीन अर्थ येतो.
       आपल्याला नेहमीच का आपल्या साथीदार सारखं बाळ हवं असतं? असं कुणी कधी म्हणत नाही मला अगदी माझ्यासारखं हुशार, देखणं बाळ हवं आहे? का आपल्यातले वाईट गुण फक्त आपल्यालाच माहित असतात आणि  नवऱ्याचे चांगले गुण जास्त प्रिय असतात म्हणून? सर्व काही ठीक होतं. पण ऑफिसला जाणं, येणं, कधी जास्त वेळ लागला तर दमायला होणं, हे स्वाभाविकच होतं. तिला मदतीला राहुल होताच. मध्ये मध्ये आई-सासू भेटायला येऊन गेले होते, कधी तिची हौस पुरवायला जास्त दिवस राहूनही गेले होते. सर्व सुविधा इथेच आहेत तर तिने बेंगलोर मधेच राहायचं ठरवलं होतं. आणि कितीही नाही म्हटलं ना, तरी दोघंच असं राहिलं न की दोघे इतके एकमेकांवर अवलंबून जातो की दोघांनाही कळत नाही. त्यामुळे राहुलच्या सोबत राहणं हे कारणही होतंच.
          नऊ महिने म्हणता म्हणता तो दिवसा उजाडलाही होता. मुलगा की मुलगी, त्याच्या सारखे की तिच्यासारखे, नाव काय ठेवायचं, ते आलं की कसं सांभाळायचं, कुठल्या गोष्टी शिकावयाच्या, कसं वळण लावायचं, कुणी दटावायच, कुणी लाड करायचे, सगळे सगळे प्रश्न विसरायला लावणारा दिवस. पहाटे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते ते. सकाळी ८.१४ ला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांचे आई-बाबाही होतेच मदतीला. पण त्या इतकुशा जीवाने सर्वांची धावपळ करून सोडली होती. बाळ-बाळंतीण घरी आले. त्याची आई परत जाऊन थोड्या दिवसांनी येणार होती. पहिले तीन महिने तिच्या आईनेच पाहिलं सर्व. एकदा आई झालं की असं असतं, मूल एक दिवसाचं असो नाहीतर २८ वर्षांचं, त्याचं सर्व करणं आलंच.
         नेहालाही ऑफिसला ६ महिने तरी सुट्टी होती. बारसंही झालं, तिचं नाव त्यांनी 'राधा' ठेवलं होतं. राधाचं करण्यात दिवसा कधी संपून जायचा कळायचंच नाही. रात्री दमलेल्या नेहाकडे पाहून राहुलला तिच्यावर अजूनच प्रेम यायचं. प्रेयसी, बायको या सर्वांपेक्षा आपल्या 'मुलांची आई' वर जास्त प्रेम येत असावं पुरुषांना. त्यांचं कुणीतरी इतका जीव ओतून करत आहे हे पाहायलाच किती सुंदर आहे. तोही मग रात्री उठून राधा रडायला लागली की तिला बघायचा, तिला  हातात घेऊन झोपवायचा. रात्री खुर्चीत दमून झोपलेल्या नवऱ्याला किंवा बायकोला, 'तू झोप मी बघतो तिला'  असं म्हणण्यात जो प्रेमभाव आहे तो त्यांच्या दुसऱ्या कुठल्याच नात्यात नसावा. नेहाची आई घरी परत गेली आणि राहुलची आई मदतीला आली होती. नातवाचं सुख त्यांनाही अनुभवायचं होतं .
          राधा आता सहा महिन्यांची झाली होती. रांगत, हसत,खेळत तिने सर्व घरात चैतन्यआणलं होतं. पण जसजसे नेहाचे नोकरीवर परत जाण्याचे दिवसा जवळ येऊ लागले तिला काळजीने झोप येईनाशी झाली. तिला वेळेवर दुध देणं , डायपर बदलणं, तिला झोपावंणं दुसऱ्या कुणाला कसं जमणार आहे हा विचारच तिला सहन होईनासा झाला. राहुलच्या आई अजून थोडे दिवस राहिल्याही असत्या. पण स्वत:चा संसार,नवरा, घर सोडून परप्रांतात किती दिवस राहणार होत्या त्या तरी? तिला हळूहळू राधाला वरचं दूध,भाज्या,डाळ-तांदूळाची पेज द्यायला लागणार होती. हे सर्व मायेने करून तिला कोण भरवणार होतं? कधी वाटायचं नोकरी सोडून घरी बसावं. पण मागे अशीच ती घरी राहिली आणि त्या एकटेपणाच्या आठवणी अजूनही अस्वस्थ करून टाकत तिला. आणि थोडे राहिली घरी तरी परत नोकरी मिळणंही सोपं नव्हतं. तिला आपल्यावरच्या या निर्णय घेण्याच्या ओझ्याने फार अस्वस्थ करून सोडलं होतं. पण तिने आणि राहुलने काहीच निर्णय घेतला नव्हता याबद्दल. किंवा त्यात निर्णय घेण्यासारखं काही नाहीच वाटलं बहुतेक राहुल ला.
         शेवटी सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर नेहा ऑफिसला जात होती. बऱ्याच दिवसांनी ती बाहेर पडणार होती. आता बाळाला घेऊन बाहेर जाणं तसंही कमीच व्हायचं. तिने दोन-चार ड्रेस घालून पहिले, सर्वच घट्ट झाले होते. 'शी,किती जाड झाले आहे मी',नेहा वैतागून बोलली. राधासाठी सर्व काही आवरून, हाताशी ठेवलं होतं तिने राहुलच्या आईसाठी. एक मदतीला मुलगीही ठेवून घेतली होती. कसातरी एक ड्रेस अंगात बसवून नेहा ऑफिसला निघाली. सकाळच्या ट्राफिकमध्ये दिडेक तास तरी गेला तिचा. बाप रे, किती लांब आहे हे ऑफिस  ! गेल्या ३-४ वर्षांत पहिल्यांदाच तिला आपण रोज इतके दूर कसे जायचो हा प्रश्न पडला होता. ऑफिसमध्ये पोचल्यावर सर्वात आधी तिने घरी फोन लावला, 'सर्व ठीक आहे ना आई?' तिने विचारले. त्यांनीही सांगितले,'ठीक आहे गं ,आताच दुध पिलं तिने,खेलतीय ती.' नेहाला जरा बरं वाटलं. मग ती आपल्या ऑफिसच्या मित्र-मैत्रिणीना राधाचे फोटो दाखवण्यात गुंग झाली. चारेक तासांनी मध्येच तिला राधाची इतकी आठवण आली की डोळे आधी भरून आले की छाती हे सांगता येणार नाही. दूध येऊन तिला आता दुखायला लागलं होतं. 'कसे काढणार मी असे दिवस तिच्याशिवाय?' नेहाला विचार आला मनात. कसातरी अर्धा दिवस थांबून नेहा घरी परत गेली होती. राधाला पाहिल्यावर रडू थांबेनाच तिचे.
         महिनाभर कसातरी संपून गेला. संध्याकाळी ५ ला निघाली नेहा तरी घरी सात वाजल्याशिवाय पोहचू शकायची नाही. मग २-३ तास कसेतरी मिळायचे राधा सोबत. राहुल तर फक्त रात्री झोपतानाच दिसायचा तिला. ती कधीतरी वैतागून जायची. मग राहुल तिला समजावयाचा,'होईल गं सगळं ठीक. नको काळजी करुस. आताशी लहान आहे ती. म्हणून काळजी वाटत आहे. अजून २-३ वर्षांत तीही मोठी होऊन जाईल. ती शाळेत गेल्यावर मग परत तू काय करणार घरी राहून? मी आहे ना मदतीला?' त्याचा फार आधार वाटायचा तिला.आता ऑफिसमध्ये कामही सुरु झालं नियमित तिचं. त्याची आईही समजून घेत होती तिला तसं. पण त्यादिवशी राधाची जरा जास्तच कुरकूर चालू होती. दिवस तसा पटकन जायचा निघून.पण संध्याकाळी दोघीच घरात म्हटलं की नको वाटायचं. राहुल येऊन गेला तरी अजून नेहाचा पत्ता नव्हता. तिने घरी फोन करून सांगितलं की उशीर होईल. पण रात्रीचे दहा? सकाळपासून मुलीला सोडून गेलेली ती. रात्री घरी आली तेव्हा सगळं आवरून झालेलं होतं. नेहाने अपराधी मनानेच पाय ठेवला घरात. त्याची आईही आज चिडलेली होती. 
आल्यावर नेहाच बोलली,"अरे, आज क्लाएंट चा कॉल होता. एक इश्श्यू आला होता."
राहुल म्हणाला,"ठीक आहे गं. मी आलो होतो सहा पर्यंत. मस्त खेळलो आम्ही. खाली पार्कमध्ये जाऊन आलो. नुकतीच झोपलीय ती."
        झोपलेल्या राधाला पाहून नेहाला गहिवरून आलं होतं. 
"सॉरी राधू. आई उद्या लवकर येईल हं?", तिच्या मऊशार गालांना हात लावत नेहा म्हणाली. 
       कसंतरी जेवण केलं नेहाने.पण आज वातावरण तंग आहे हे तिला कळतच होतं. 
शेवटी हात धुवून सोफ्यावर ती बसत असतानाच त्याची आई बोलली,"केलीच पाहिजे का नोकरी? म्हणजे आम्ही तरी किती दिवस बघणार ना राधाला?  आईचं प्रेमही पाहिजेच ना तिला?"

        त्यांचं हे बोलणं थोडं अनपेक्षित होतं तिला.त्यामुळे पटकन काय बोलावं नेहाला कळेना. तिने राहुलकडे पाहिलं.
तो तिला म्हणाला,"नेहा तू झोप जा. दमली आहेस. आपण बोलू याबद्दल उद्या. उगाच आता जागू नकोस."
राहुलच्या थोड्या चढलेल्या आवाजाने तिला 'नाही' म्हणायला जागा ठेवलीच नव्हती. ती उठून झोपायला निघून गेली. आणि राहुल आपल्या आईजवळ बोलायला बसला. नेहाला मात्र आज झोप लागणार नव्हती. आयुष्यात ज्या वळणावर ती आधी एकदा येऊन गेली होती. पुन्हा त्याच ठिकाणी ती उभी होती. घर की नोकरी. स्वत:साठी  की लोकांसाठी तेही आपल्याच ? पुन्हा तेच प्रश्न सुरु झाले होते.

-क्रमश:
विद्या भुतकर.

Tuesday, November 27, 2012

भाग दहावा: हॅपि एंडिंग ???

          खरंतर गोष्ट मागच्या भागातच संपणार होती. बरोबर आहे ना? दोघेही पुन्हा भेटले, झालं ना? म्हटलं कशाला त्रास घ्यायचा डोक्याला? त्यांचं लग्न झालं नाही झालं का विचार करायचा पुढे? कारण 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'. पण आपल्याला नेहमीच हॅपि एंडिंग हवा असतो. बरोबर ना? का? कशासाठी? आयुष्यात प्रत्येक क्षणाला जेव्हा निर्णय घेतो, तो हॅपि असेलच असं नाहीये ना? म्हणजे अगदी सकाळी थोडा वेळ जास्त झोपून रिक्षा करून जाऊ म्हणायलाही मन करवत नाही मग झक मारत उठून आवरून बसमधून कडमडत जातोच की. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते टक्कल असलेल्या मुलापेक्षा सावळा बरा म्हणून त्याच्याशी लग्न करायला 'हो' म्हणायची अडजस्टमेंट कुणी करतोच की. म्हणून निदान 'गोष्ट' तरी हॅपि एन्डिंगची पाहिजे अशी अपेक्षा असते का आपली? आणि कदाचित म्हणूनच मीही ती अर्धवट सोडून खरे खुरे प्रश्न टाळून दिले. कशाला उगाच ते समोर आणून अजून डिप्रेस व्हायचं आणि लोकांना करायचं म्हणून.
          पण आता बोलतेच आहे तर सांगतेच सर्व. का करावं नेहाने लग्न राहुलशी? केवळ आई-बाबा दुसरं लग्न करच म्हणून मागे लागलेत आणि अनोळखी पेक्षा ओळखीचा बरा म्हणून? बरं, राहुलने तरी का भांडाव तिच्यासाठी? प्रेम आहे म्हणून तो भांडेलही. पण ती असेल त्याच्या पाठीशी? एकदा घरच्यांशी लढून केलं तिने लग्न. आणि हे सगळं असं होऊन बसलं. अशा वेळी ती तरी कुठून आणणार बळ त्याच्या पाठीशी उभं राहायला?  
'म्हणाला तो हो 'चल' करूच लग्न तर येईल त्याचा तो लढून जगाशी. आहेच की मग मी इथे, मी कुठे जातेय?' असाच तिचा अटीटयूड असेल, तर होईल त्याची हिम्मत लढायची? बरं लढलाच तो त्याच्या प्रेमाखातर, तर जिंकल्यावर त्याच्यावर जीव ओवाळेल का ती? की चला, मला काय? करू आता लग्न म्हणून ती उभी राहील मांडवात?
          समजा झालंच सर्व ठीक, राहिलीही ती उभी मांडवात. आपण मग तो हॅपि एंड समजायचा की नाही? मला तरी नाही वाटणार तो हॅपि.  मग हॅपि म्हणजे तरी काय? त्या 'हॅपि' ची डेफिनिशन मला मिळाली नाही. म्हणून संपवूनच टाकली गोष्ट. पण विचार होतेच मनात. ते कुठे जातात? त्यांनाही हवाच आहे की 'हैप्पी द एंड'. मग अजून पुढे गेले विचार. आणि केलं लग्न. पुढे काय? नव्याचं नवपण मिळेल का त्याला अनुभवायला? हनिमून, पहिली दिवाळी, सासुरवाडी सगळं नवं, पुन्हा उभं करायचं, जोडायचं जमेल तिला? ते सगळं जाऊ दे, सुखाच्या त्या अत्तुच्य क्षणी, असेल का ती त्याच्याच सोबत? आणि असलीही आणि त्याच्याच मनात आली शंका तर? तो क्षण संपल्यावर झोपतील का ते मुटकूळं करून शरीरांचं? की पाठ फिरवून काय होऊन बसलं हे असा विचार करतील? हे आणि असेच विचार करून सोडून दिले मीही होपफुल एंड म्हणून.
               अशीच होत असतील का दुसरी लग्नं आपल्याकडे? की असतात प्रेमातही बुडून गेलेले? काळ आणि प्रेम खरंच भरून काढत असतील का सर्व जखमा? की आधीच्या कमी कराव्यात म्हणून नवीन नाती जोडायला जात असतील आणि कुणी माझ्या 'पास्ट' बद्दल विचारलं तर काय उत्तर देऊ या विचाराने घाबरून बोलत असतील? का तेही प्रत्येकाच्या स्वभावावर असेल? मुळातच आनंदी असणारी व्यक्ती कदाचित राहूच नाही शकणार कायम दु:खी. मुळातच प्रेमळ व्यक्ती राहूच नाही शकणार प्रेम दिल्याशिवाय? कुणाचं तरी झाल्याशिवाय?
             माझ्या या सर्व प्रश्नांना मागे टाकून राहुलने नेहाशी लग्न केलं होतं. राहूलच तो ! ध्येय समोर आहे म्हटल्यावर ते अचीव्ह केल्याशिवाय कसा राहील तो? तिला पटवून, घरच्यांना मनवून, तिच्या घरी बोलून, राहुलने सर्वांना लग्नाला तयार केलं होतं. आता हे असं लग्न म्हटल्यावर ते छोटं घरगुतीच झालं. लग्नानंतर दोघेही बेंगलोरला परत आले होते. त्याच्या घरी. त्यांच्या घरी. तिने मग सामान ठेऊन लगेच आपलं घर म्हणून वागायचं की नवी नवरी म्हणून अवघडून बसायचं? पण ती शेवटी नेहा होती, त्याची इतक्या वर्षांची जुनी मैत्रीण. आता लग्न समारंभ, पुढचे सगळे सोहळे तिने एक औपचारिकता म्हणून पार पाडलेले. पण इथे ते दोघेच तर होते. तिने सोफ्यावर झेप टाकून दिली. 'कंटाळा आला रे, नाही? शी इतक्या उन्हाळ्यात प्रवास म्हणजे नको वाटतं बघ. ' तोही मग पटकन जाऊन दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन आला. दोघेही निवांत मग टी व्ही बघत बसले.
            रात्र होत आली तसे ते दोघेही जरा नर्व्हस होते. पण ज्या क्षणाला ते जवळ आले तो कसा आला हेही त्यांना कळले नाही. कित्येक महिने उन्हांत तापलेल्या, रखरखीत जमिनीवर जसे पाण्याचे थेंब पडल्यावर ती प्रत्येक थेंब शोषत राहते बाहेर एकही थेंब राहू न देता, तसे दोघेही इतक्या दिवसांच्या वणव्यानंतर स्वर्शाचा प्रत्येक थेंब शोषून घेत होते. पण जुने रेफरंस नव्याने कसे वापरायचे कळत नाही. त्याच्या स्पर्शाला आपण उत्तर कसं द्यायचं हे आधीच ठरलेलं असतं ती सवयच झालेली असते, पण तो मुळातला स्पर्शच बदलल्यावर जु ने प्रत्युत्तर चालणार का? की नव्याने आपल्यालाच पुन्हा शोधत राहायचं? मग हळूहळू त्या नवीन प्रत्त्युत्तराचीही सवय होऊन जाते. तिलाही झालीच, त्याच्या आसपास असण्याची, त्याच्या हसण्याची, तिच्या केसांत दहाही बोटं घालून ते मागे घेऊन फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याची, त्याच्या परफ्युमची, सगळ्याचीच.
             मध्ये मध्ये नेहा तिच्या जुन्या गृहिणीच्या भूमिकेत घुसायची, राहुलला छान जेवण करून घालावं, त्याचं सर्व सामान त्याला हातात आणून द्यावं, त्याच्या ऑफिसमधल्या पार्टीजना जावं. पण राहुल त्यातून तिला बाहेर काढायचा. ती स्वयंपाक करायला लागली की बाहेर आणून बसवायचा, मी बघतो तू बैस म्हणायचा. तर कधी तिला जवळ ओढून एखादं कोडं सोडवत बसायचा. त्यांच्या जुन्या डेव्हलपर-टेस्टरच्या नात्यात जायचा आणि त्रास द्यायचा. नवा गडी नवं राज्य चालू झालं होतं. नेहाच्या आईलाही तिला बघून बरं वाटायचं. मुलीची स्थिरता तिच्या सुधारलेल्या तब्येतीत दिसते आईला. त्याच्या घरच्यांनीही तिला स्वीकारलं होतं सून म्हणून. सगळं कसं सुरळीत चाललं होतं पुढचे दोन-तीन वर्षं.....

क्रमश:
विद्या भुतकर.

Friday, November 23, 2012

भाग नववा: नवीन सुरुवात

       "खरं सांगू का राहुल, मला ना प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यायचा आता कंटाळा आला होता. आणि त्यात मुलीचा डिव्होर्स म्हणजे नक्की काय झालं असेल असा प्रश्न पडतोच ओळखीच्या लोकांना. त्यांना वाटतं, अरे ती तर इतकी चांगली मुलगी, तिचं असं का झालं? मुलात काही दोष होता का? नपुंसक वगैरे. की दारुडा होता, की मारहाण करायचा बायकोला? तर यातलं माझ्यासोबत काहीही झालं नाहीये. आणि बिलीव्ह मी, मी काही इथे विक्टिम वगेरे नाहीये. आमचा डिव्होर्स मिचुवल होता. 'irreconcilable differences' असं कारण टाकलं आहे पेपरवर. झालं काय की सुरुवातीला मीही ठीकच होते अमेरिकेत राहायला. खूप धडपड करून सिडने दुसरी नोकरी मिळवली. मग थोडे दिवस वेगळ्या ठिकाणीही राहिलो. बरीच स्वतंत्र झाले होते मी तेव्हा. अनेक गोष्टी एकटीने करायला शिकले होते. सिड्ची आठवण यायची पण त्यालाही तिथे राहायचं होतं. थोड्या दिवसांनी मीही त्याच्याकडे गेले नोकरी सोडून. नवराच तो माझा, त्याच्यासाठी ग्रेट बलिदान दिलं वैगेरे काही नाही. पण कुणीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे होते न एकत्र राहायचे. मी केले.
          सुरुवातीला फार कमीपणा वाटायचा लोकांना सांगायचा की मी 'house wife' आहे म्हणायचा. पण नंतर त्याचीही सवय झाली. आळस अंगात भिनून गेला. स्वत:चं आवरायचं, छान दिसायचं, कशासाठी, कुणासाठी? घरीच तर राहायचं आहे असं वाटायचं. सिड ओढून न्यायचा त्याच्या पार्टीजना. पण तिथे ना मी नोकरी करणाऱ्या बायकांमध्ये सूट व्हायचे न गृहिणींमध्ये. आपण कुठे फिट होतो हे मला काही कळत नव्हतं. सुरुवातीला मग उत्साहाने एक-दोन सर्टिफिकेट साठी अभ्यास पण केला. पण तो तरी करून काय करणार? नंतर तेही बंद झालं. ग्रीन कार्ड कधी मिळणार, नोकरी कधी करणार? काहीच भरवसा नाही. बरं सिड साठी हे सर्व करतेय म्हणावं तर तोही कामात गर्क. त्याला फोन केल्यावर तो मिटिंग मध्ये आहे म्हटल्यावर मी तरी किती बोलणार. मला माहीतच होतं की ऑफिसमध्ये,मिटिंग मध्ये कसं असतं ते.
           उन्हाळ्यात थोडे फार छंद तरी पुरवायचे, पण थंडींत कुठे जाणार? घरी राहायचं, खायचं, प्यायचं, टी व्ही  तरी किती बघणार. लहानपणापासून अभ्यास तर केला होता फक्त त्यामुळे एखादी कला येते त्यात मन गुंतवावं असंही नाही. हळूहळू मला तिथे नकोसं वाटू लागलं. त्यात भर म्हणून सिडचा प्रोजेक्ट बदलला. त्याला दुसऱ्या गावी जावं लागायला लागलं. म्हणजे त्याच्यासाठी सर्व सोडून मी घरी राहिले आणि तो घरं सोडून बाहेर. चार दिवस हॉटेलवर राहायचा आणि तीन दिवस घरी. मग प्रवासाचा कंटाळा येतो म्हणून सुट्टीच्या दिवशीही घरीच. मी दिवसेंदिवस एकलकोंडी होत चालले होते. माझं डिप्रेशन वाढतच होतं. सिड आणि माझी परत जाण्यावरून भांडणं वाढली. नंतर तर मी भांडत सुध्दा नव्हते. माझा सर्वच गोष्टीतला रस निघून गेला. वाटलं आईकडे जाऊन यावं बरं वाटेल, म्हणून दोन महिने घरी आले. पण तरी ठीक वाटेना. आणि लोकांना काय सांगणार रे? मला तिकडे सर्व सुखसोयी मिळत आहेत आणि ते सुख टोचत आहे मला? इथे लोक किती हालाखीचे दिवस काढत कागत असतात आणि मला आत्महत्या करायचे विचार मनात येऊ लागले होते.
           दोन महिने मी आईकडे राहिले तेव्हा आईने माझी ही स्थिती पहिली. आई म्हणाली 'मी येते तुझ्यासोबत. बोलू आपण सिद्धार्थशी होईल सर्व ठीक. ' आईसोबत मी परत गेले तेव्हा परत आम्ही प्रयत्न करून पहिला सिड ला समजवायचा. पण त्याचं म्हणणं हेच की त्याला नोकरी कराविच लागणार आहे तर इथे का नको?  तिकडे जाऊन दिवस रात्र मेहनत करून हलाखीत का जगायचं? इथे पैसा,आराम सर्व आहे.मला एकटं वाटतंय तर बाळ होऊदे एखादं. पण मी इतकी डिप्रेस्ड होते की मला बाळ झालं तरी ते सांभाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तेही शक्य नव्हतं. खूप विचार करून सिद्धार्थ आणि माझ्या आई-बाबांनीच निर्णय घेतला मला परत भारतात ठेवायचा. आईकडे राहिल्यावर सहा महिन्यात मला माणसांत आल्यासारखं वाटू लागलं होतं. थोडी थोडी मी लोकांमध्ये मिसळू लागले होते.
         सुरुवातीचे कित्येक दिवस तर मला सिडची आठवण पण यायची नाही. एकटेपणाने माझ्यावर पूर्णपणे कब्जा केला होता. हळूहळू मी आईला विचारू लागले की कुठे आहे तो? कधी येणार? मग मला कळले की तो परत येणार नाहीये, हां, मला न्यायला आला असता. पण इतकं सगळं झाल्यावर पुन्हा त्या घरात जायची माझी हिम्मतच नव्हती. २-४ वेळा फोनवर बोलले मी सिड शी. पण मग पुन्हा तीच भांडणं. शेवटी आम्ही निर्णय घेतला की वेगळं व्हायचं. तो थोडे दिवस इकडे येऊन सर्व कोर्टाची कामं पूर्ण करून गेला. मी अजूनही घरीच होते. बाबांनीच मग आपल्या प्रोजेक्टचे 'मनोज शर्मा होते ना त्यांना फोन लावला आणि माझा रिझ्युम पाठवून दिला. ते एकदा घरी येऊन माझ्याशी बोलताना मला आठवलं अरे आपण कित्येक दिवसात टेक्नॉलॉजी कशाशी खातात हेही पाहिलं नाहीये. त्यांनीच मला अभ्यास करायला प्रोत्साहन दिलं. आधीचा अनुभव होताच त्यामुळे नोकरीही मिळून गेली. पण मला पुण्याचं ऑफिस नको होतं म्हणून इथे आले. आणि बघ, तुझी गाठ पडली.
        मला ना हे सर्व सांगायला काही वाटत नाही पण लोकांचे त्यावरून निघणारे तर्क कोण थांबवणार? डिप्रेस्ड म्हणजे वेडी का? की मुल होत नव्हतं? की अजून काही? म्हणजे आजच्या काळातली ही नवीन दुख:च आहेत. ती लोकांना समजतीलच असं नाही. त्यात डिव्होर्स हे अजूनही नाजूक प्रकरणच आहे आपल्याकडे. त्यामुळे मी जुन्या सर्वच लोकांशी संपर्क तोडले होते.आता इथे येऊन हि सहा महिने होऊन गेलेत. आई बाबा मध्ये मध्ये काळजीने येऊन जातात. पण  मी आता ठीक आहे. पुन्हा एकदा आयुष्य जगावंस वाटत आहे. रोज सकाळी उठल्यावर आरश्यात स्वत:कडे बघावसं वाटत आहे. या सर्व अनुभवातून मला एक नक्की कळलंय, आपल्या इंडस्ट्रीत न लोकांना सर्वच हवं असतं, पैसा, प्रमोशन, चांगलं काम, मग घराचं सुख, पोरांना द्यायला वेळ. सर्वच. आणि मग ओढाताण सुरु होते. एकतर स्वत:ची, घरच्यांची नाहीतर मग कामाची. मी आता ठरवलंय जास्त सर्वच गोष्टींच्या मागे लागायचं नाही. काम करून आनंद मिळतोय न तो घ्यायचा, मित्र जोडायचे, एखादी कला शिकायची, आणि स्वत:ला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. लोकांशी बोलणं, न बोलणं, काम करणं, न करणं कुणाला इतकं प्रभावित का करत?". नेहा कितीतरी वेळ बोलत होती.
          हे सगळं होत असताना आपण काय करत होतो याचा विचार राहुल करत होता.नेहाच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली आणि आपण यात कुठेच नव्हतो? एव्हढा कसला राग होता तिच्यावर? निदान तिच्याशी बोलत असतो तर हे सर्व कळलं तरी असतं. जमेल तशी मदत तरी केली असती. आपण आपल्याच दु:खात आणि आयुष्यात किती बुडून गेलो होतो. राहुलला खूप राग आला होता स्वत:चा. ती बोलत असताना ते सहन न होऊन डोळ्यातून घळाघळा आसवं बाहेर पडत होती. नेहा त्या सर्वातून बाहेर पडत होती पण ते सर्व तो आज अनुभवत होता. ऐकत होता. त्याला शेवटी राहवेना म्हणून त्याने तिला आपल्या छातीशी धरलं. जणू ती खरंच सोडून गेली असतं तर आपलं काय झालं असतं हा विचारच सहन होत नव्हता त्याला. एकदा निदान एकदा तिच्या घरी तरी विचारायला हवं होतं मी. इतका कसा स्वार्थी आहे मी? तिला काही झालं असतं तर...? कितीतरी वेळ तिला सोडून द्यायला तयार होत नव्हतं त्याचं मन.
          बोलता बोलता पहाट झाली. जणू सगळं दु:खं रात्रीच्या अंधारात पुरून गेलं होतं आणि नवीन एक पहाट त्यांच्यासमोर नवा दिवस घेऊन येणार होती. नेहाने मग कॉफी बनवली दोघांसाठी आणि पुन्हा एकदा ते गप्पा मारत बसले. कित्येक वर्षांनी भेटले होते, मळभ सर्व दूर झालं होतं. 
तिने मग त्याला विचारले,"तू नाही केलंस लग्न अजून?" 
तो म्हणाला,"आई-बाबा मागे लागले आहेत आता. पण आताशी तर MBA झालं. अजून त्याचं लोनही फिटलं नाहीये. लगेच कुठे नवीन घेऊ? बाय द वे, कॉफी छान झालीय हं."
नेहाने विचारलं, "रोहनचं काय झालं रे? काहीही म्हण त्याला सर्वच गोष्टींची घाई होती. रेटिंग नाही मिळाले, लगेच कंपनी बदलली त्याने. कुठे असतो आज काल?"
राहुल,"आता चौथ्या कंपनीत आहे. त्याचंहि काहीतरी चालूच असतं. कुठे नोकरी बदल, कुठे घर बदल, कधी गाडी तर कधी मोबाईल. नवीन नंबर आला की स्वत:च कॉल करतो. मग मी जुना नंबर रिप्लेस करून टाकतो. अजिंत मात्र मोठा मेनेजर झालाय आता. माझ्या आधीच त्याचं MBA पूर्ण झालं होतं. मागच्या वर्षी लग्नही झालं. लग्नाला गेलो होतो त्याच्या. तुझी आठवण काढली होती तेव्हा."
            याचं काय, त्याचं काय करत त्यांना कधी झोप लागून गेली कळलच नाही. राहुलने नेहाला तिच्या घरी सोडलं. आणि अजूनही तिच्याच विचारात तो कामावर गेला. त्याला सारखं वाटत होतं की मी का नाही तिची चौकशी केली? मी का लक्ष दिले नाही तिच्या फोन न करण्यावर? त्याला खूपच अपराधी वाटत होतं. पुढचे चार दिवस मग तो सारखा नेहाला फोन करून विचारायचा काय 'करते आहेस? जेवलीस? घरी फोन केलास?' जणू हरवलेल्या काळाची भरपाई करू पाहत होता तो. 
नेहा त्याला एकदा म्हणालीही,"अरे राहुल, मी ठीक आहे आता. तुला हे आता कळतंय म्हणून जास्त काळजी वाटतेय तुला. मी ठीक आहे आता.नको करुस माझी काळजी."
             तिला भेटल्यावरही तिचे सर्व हावभाव तो बारकाईने टिपत राहायचा. कशी बदलली आहे ती, कशी मध्येच इंग्रजी शब्द बोलत राहते, जेवण किती छान बनवते. पूर्वीची नेहा मिळतेय ना हे शोधत राहायचा. नेहालाही बरं वाटत होतं त्याच्यासोबत. कधीतरी पुन्हा एकदा राहुलच्या मनात जुने विचार यायचे. विचारवं का नेहाला लग्नाबद्दल? काय म्हणेल ती? रागावेल का? माझ्याशी बोलायचं बंद करून टाकेल का? म्हणेल बहुतेक हो यावेळी. मागच्या वेळी 'नाही' म्हणायला विचारलं कुठे होतं आपण तिला. तेव्हा एकदा चूक केली तिला जाऊ देऊन पुन्हा नाही असं कुणाकडे जाऊन देणार पुन्हा त्रास होण्यासाठी. बरं, ती म्हणाली 'हो' तर आई-बाबा हो म्हणतील? तसे ते अगदीच जुन्या विचाराचे नाहीत. पण डिव्होर्स झाला हे सांगायचं? आणि नाही म्हणाले मग तर? त्यांच्या परवानगी शिवाय लग्न करायचं?  असे एक न अनेक विचार यायचे त्याच्या मनात. नेहाने विचारलं कधी की असा काय बघतोस म्हणून तर नुसती मान झटकून सोडून द्यायचा.
           बरोबरच होतं म्हणा त्याचंही. त्याला आधी गेल्या कित्येक वर्षांची मैत्री निभावायची होती. ते कर्ज तरी आधी उतरावयाच होतं डोक्यावरून मग पुन्हा एकदा प्रेमाला नवीन सुरुवात करायची होती.

क्रमश:

विद्या भुतकर.



भाग आठवा: पुन्हा एकदा

          अभ्यासात, परीक्षेत, पुन्हा एकदा कॉलेज लाईफ अनुभवण्यात राहुलची २ वर्षं कशी संपली कळलंही नाही त्याला. नवीन जागी गेलं की आपणही नवीन होऊन जातो. आपल्यातले जुने आपण थोडे मागे सोडून नवीन 'स्वत:ला' शोधायला. इथे आलेले लोक वेगवेगळ्या प्रांतातून, देशातून आलेले. कुणी नोकरी सोडून शिकायला आलेले तर कुणी कॉलेज नंतर लगेच. पुण्यातला राहुल केव्हाच मागे राहिला होता. नव्या जोमाने नवीन रस्ता निवडला होता त्याने. यावेळीही त्याला चांगल्या कंपनीतून ऑफर मिळाल्या होत्या. आता तर त्याच्याकडे ४ वर्षाचा अनुभव होता, एक नवीन डिग्री होती. पण त्याने यावेळी ठरवलं होतं की केवळ ट्रेंड बघायचा नाही, आपल्याला कुठे काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, आपली आवड काय हे सर्व बघून कंपनी निवडली होती. एका मोठ्या कार कंपनीच्या इंजिनीयरिंग सेक्शन मध्ये रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी मिळाली होती त्याला. पगार, गाडी इ सर्व तर मिळणारच होते. पण त्याहीपेक्षा आवडतं काम करायला मिळणार याचा आनंद त्याला जास्त होता.
           लवकरच तो बेंगलोरला शिफ्ट झाला. तिथल्या मेट्रो पब्लिकमध्ये मिसळून घ्यायला त्याला जरा वेळ लागला पण आता तो मोठा माणूस झाला होता. हे सर्व त्याला शिकायलाच लागणार होतं. नवीन प्रोजेक्टमध्ये ट्रेनी म्हणून आलेल्या मुलांना बघून त्याला आपले पुण्यातले दिवस आठवायचे. नेहाचीही आठवण यायची. गेल्या दोन-तीन वर्षांत तिचा काहीच पत्ता नव्हता. रोहन, अजित ला विचारले तर त्यांच्याशीही बोलणं नाही झालं तिचं म्हणे.आधी तिचा फोन यायचा अधून मधून. पण राहुल अभ्यासात इतका बिझी होऊन गेला होता की स्वत: त्याने तिला कधी फोन केला नव्हता. नोकरी सुरु झाल्यापासून मात्र त्याला तिची आठवण नियमित यायची. त्याने तिचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही.कसं असतं ना जवळच्या मित्रांचं. आधी इतके फोन केलेले असतात की नंबर लिहून घ्यायची वेळच येत नाही. आणि वेळ येते तेव्हा ते आठवत नाहीत.
           एका शनिवारी रात्री एक पिक्चर बघून मेट्रो मधून परत येताना एक जीन्स घातलेली, छोटे केस असलेली मुलगी त्याला दिसली. आधी नेहा वाटली, पण त्याने ती शक्यता धुडकावून लावली. 'छे छे, ती तर असेल अमेरिकेत तिच्या नवऱ्यासोबत'. बरं, जास्त वेळ मुलीकडे पाहिलेलं तरी चांगलं वाटतं का?  पण तिच्यावरून त्याची नजर हटेना. शेवटी जरा जवळ जाऊन त्याने पहिलेच. नेहाच होती ती !!! तो उडालाच. इतकी बदललेली होती ती. तिच्यातलं पुणेरीपण गेलं होतं.
 'नेहा?????' त्याने तिला आश्चर्याने विचारले.
नेहालाही मग इतका आनंद झाला त्याला पाहून. दोघांनी एकमेकांना आधी मिठी मारून घेतली. अगदी शेजारच्या लोकांना धक्का मारून, त्यांच्या वाकड्या तोंडाकडे दुर्लक्ष करून. राहुलने नकळत तिच्या गळ्याकडे पहिले. लोकांना ना, गळ्यात मंगळसूत्र बघायची फार घाई असते. आजकाल तर मुली घालतही नाहीत तरी लक्ष जातंच. त्याने सिद्धार्थ बद्दल विचारले, पण नेहाने त्यावर 'नन्तर बोलू' म्हणून टाळून दिलं.
त्याने तिला विचारलं, "कुठे चालली आहेस? चल मेट्रोतून उतर माझ्यासोबत. स्टेशनवर गाडी आहे माझी, मी सोडतो तुला." 
तिलाही इच्छा नव्हती त्याला 'नाही' म्हणायची. मग दोघे बराच वेळ बोलत राहिले. मेट्रोतून उतरले, गाडीत बसल्यावर नेहा बोलली, "सहीये रे, मोठ्ठा माणूस झालास तू !".
राहुल तिला म्हणाला,"मी कुठला मोठा माणूस. तुम्ही तिकडे अमेरिकेत याहूनही मोठ्या आणि भारी गाड्या पहिल्या असतील."
नेहाला ते काही आवडलं नाही. 
तो पुढे म्हणाला,"बरं इकडे कशी काय?"
तिने सांगितले, "आपल्या जुन्या कंपनीतच आहे. आता सिनियर डेव्हलपर झाले आहे."
राहुलला जरा आश्चर्य वाटले. 
तरी तो म्हणाला,"चांगले आहे की? तू अजून टिकून आहेस. मला वाटले तिकडे जाऊन बदलली असशील कंपनी."
      नेहाने मग आपल्या घराजवळ त्याला सोडायला सांगितले. त्याने तिला एका बिल्डींगच्या खाली सोडले. अर्थात ती त्याला 'ये' म्हणाली नाही आणि त्यानेही तिला 'येऊ का?' म्हणून विचारले नाही. दोघांनी आपले फोन नंबर एकमेकांना दिले आणि 'बाय' म्हणून राहुल परत घरी यायला निघाला. बेंगलोरच्या रिकाम्या रस्त्यांवर थंडीतून रात्री गाडी चालवत राहुल घरी पोचला तेव्हा खूपच खुशीत होता. जुन्या मित्रांना भेटून त्याच्यासोबतच्या 'आपली' ही आठवण ताजी होते. आपण किती बावळट होतो ना? किंवा किती कामसू होतो ना? किंवा किती निरागस होतो? अशा आठवणी येत राहतात. राहुलला तेव्हाची त्याची साधी रूम आठवली. नुसत्या दोन गादया आणि बॅगा इतकेच काय ते सामान असायचे. ना कधी फर्निचर घेतले, ना टी व्ही, ना कुणा मुलीला रूमवर बोलावले. आज आपल्या फर्निश्ड घराकडे बघून राहुलला ते दिवस आठवले. त्याची ती रात्र मग आठवणीतच गेली.
         त्यानंतर राहुलला दोन-तीन वेळा इच्छा झाली नेहाला फोन करायची. पण ती उचलेल की नाही, काय बोलेल, सिद्धार्थ काय म्हणेल, हे सर्व विचार करून त्याने फोन केलाच नाही. 
शुक्रवारी रात्री नेहाचाच फोन आला त्याला. "काय रे, मला वाटले ५-६ वर्षांनी भेटलास म्हणजे निदान फोन तरी करशील. तेही नाही?"
राहुलला काय उत्तर द्यावे कळेना. नेहा पुढे बोलली,"बर ते जाऊ दे, तू मुव्हीला येणार आहेस का सांग?"
राहुल,'हो' म्हणाला. मग तिनेच त्याला कुठे भेटायचं, किती वाजता हे सर्व सांगितलं. 'टिपिकल नेहा', राहुल मनात बोलला. पण त्याला खूप बरं वाटत होतं मनातून की तिला परत भेटणार. अर्थात सिद्धार्थ तिथे असेल तर काय बोलायचं हे सर्व प्रश्न होतेच. पण ते सर्व दुय्यम होतं. कितीतरी दिवसांनी आपल्या माणसासोबत जाणार होता तो.
          किती बदलली होती नेहा. तिच्या बोलण्यात बदल होता थोडा. केस, कपडे तर बदललेच होते. सुंदर तर ती आधीपासूनच वाटायची पण आता त्यातही एक परफेक्शन दिसलं त्याला. बाकी घाई घाईने बोलण्यात, आवडीने खाण्यात, त्याने जोक केला की रुसण्यात काहीच बदल झाला नव्हता. 
ती त्याला म्हणाली,"तू मात्र काहीच बदलला नाहीस हं." तो थोडा बुजला. आपल्याला पक्कं ओळखणाऱ्या माणसासोबत असलं ना की किती बरं असतं. मनात येईल ते बोलता येतं, वाटेल तसं वागता येतं आणि समोरचा काय विचार करेल मी काही केल्यावर याचा अजिबात विचार करावा लागत नाही. तो कम्फर्ट त्याला आज जाणवत होता तिच्यासोबत. खूप वेळ गप्पा मारल्या दोघांनी. जेवण झाल्यावर आईसक्रीम खाऊन आता निघायला लागणार होतं. मध्ये मध्ये राहुल घड्याळ्या कडे बघत होता. 'नेहाने इतका वेळ बाहेर थांबलेलं चालणार आहे का?' हा प्रश्न त्याला पडला होता.        
शेवटी नेहा त्याला बोललीच,"चल आपण तुझ्या रूमवर जाऊन बोलू. तू असा स्वस्थ राहणार नाहीस."
            ते दोघे मग राहुलच्या घरी गेले. त्याचं घर पाहून नेहाही इम्प्रेस झाली. तो पहिल्यापासून नीट नेटका राहायचाच. पण हे घर खूपच सुंदर होतं. किती टापटीप, किती स्वच्छ, जिथल्या तिथे. तिने घराचं कौतुक केलं त्याच्या. मग तिने त्याला विचारलं तुझ्याकडे, "आपले जुने फोटो आहेत का रे?" 
        राहुलने त्यांच्या एका ट्रीप चा अल्बम आणला. तो बघून दोघेही हसत बसले बराच वेळ. दोघांनाही माहित होतं की प्रश्न तर आहेतच, पण सुरुवात कुणी करायची आणि कशी? 
शेवटी राहुल बोलला,"काय बोलायचं आहे म्हणत होतीस? माझ्यापासून काहीही लपवायची तुला गरज नाहीये. आणि हे तुलाही माहित आहे. त्यामुळे निष्काळजी होऊन बोल."
नेहाही मग जरा सिरीयस झाली,"मला माहित आहे रे तू कसा आहेस ते. म्हणून तर तुला परत फोन केला मी. नाहीतर आपल्या जुन्या कुठल्याच लोकांशी बोलले नाहीये मी. कुणाशीच संपर्क नाही ठेवलाय मी. राहुल, दोन वर्षापूर्वी माझा डिव्होर्स झाला आहे."
राहुल सुन्न होऊन तिच्यासमोर बसला होता.

-क्रमश:
विद्या भुतकर.

भाग सातवा: त्याची बायको

#हॅपीएंडींग? भाग ७ : त्याची बायको
        ऑन साईट, ऑन साईट जे काय लोक म्हणतात ती हौस पूर्ण झाली नेहाची एकदाची. तिच्या काही अपेक्षांना तडा गेला होता तर काही नवीन अनुभवही मिळाले होते. आजपर्यंत कधीच एकटी न राहिलेली नेहा आज परदेशात एकटी राहत होती. अर्थात सिद्धार्थ होताच तिच्या सोबतीला. तिच्या एकेक वेगवेगळ्या रूपांना बघून अजूनच प्रेमात पडला होता तो. तोही मग तिला शक्य होतील ते सर्व दाखवण्याच्या, शिकवण्याचा प्रयत्न करत होता. गाडी घेतली, गाडी चालवायला शिकवली, फॉल कलर्स दाखवले, नायगारा दाखवला. कधी ती हौसेने एखादा पदार्थ करून त्याला खाऊ घालायची तर कधी तो तिला आपली पाककला दाखवून चकित करून टाकायचा. वर्षं होतं आलं त्यांना इकडे आणि सिद्धार्थला घरी लग्नाला नाही म्हणणं अवघड जाऊ लागलं. बर आधीच ते इतके सनातनी, लग्नाला कसे तयार होतील ते, हा एक प्रश्नच होता. त्याला कधी वाटायचं त्यांना इकडे आणून दाखवावं की जग किती पुढे गेलं आहे. जिथे एखादा भारतीय भेटला, एखादी आपली गोष्ट खायला मिळाली, जिथे एखादं मंदिर दिसलं तर हात जोडावे,  अशा देशात आणून दाखवावं त्यांना, असं राहून राहून वाटायचं सिद्धार्थला.
          शेवटी त्याने पुढाकार घेऊन घरच्यांना सांगितलंच की मी नेहाशी लग्न करणार आहे. नेहाने पण घरी सांगून टाकलं. बरेच वाद-विवाद, भांडण, रडगाणं झालं. जेव्हा सिद्धार्थ म्हणाला की तुम्ही नाही म्हणालात तर मी इथेच लग्न करून इथेच राहीन, तेव्हा त्यांनी माघार घेतली. लग्न ठरलं. ३ आठवड्यांची सुट्टी घेऊन दोघे भारत्तात आले. एकमेकांच्या घरी जाऊन ओळखी करून घेतल्या. सर्व काही रीतीनुसार केलं आणि दोघेही लग्न करून अमेरिकेत परत आले. हनिमूनला मायामी ला जायचं ठरवलं  होतं त्यांनी. पण आता सुट्ट्या संपून गेल्यामुळे तो रहितच झाला थोड्या दिवसांसाठी. अर्थात तिथे काय असाही दोघांना हवा तसा एकांत होता. दिवस कसे सोन्यासारखे वाटत होते. सिद्धार्थालाही एखाद्या मुलीवर असं उधळून प्रेम करायला कधी मिळालंच नव्हतं. एकमेकांच्या छोट्या छोट्या  सर्व इच्छा पुरवणं, एकमेकांना न कळवता प्लान बनवून सरप्राईज देणं, भांडण झालं की जगबुडी झाल्यासारखा चेहरा करून दिवस काढणं, सर्वच कसं स्वप्नवत. कधी कधी रात्री भारतातून ऑफिस मधून येणाऱ्या फोनचा, साईट वरच्या तणावाचा त्रास व्हायचा, पण ते शुल्लक होतं. 
          दोन वर्षं कशी गेली कळलंच नाही दोघांना. काही महिन्यात त्यांचे परत जायचे ठरू लागले तेव्हा सिद्धार्थ अस्वस्थ झाला. त्याला अजून राहायचं होतं इथे. आताशी तर कुठे संसार जमतोय. आता अजून थोडे पैसे कमवायचे होते. भारतात एखादं घर घ्यायचं होतं. अजून २-४ तरी वर्षं राहायचं होतं त्याला. त्याने खूप प्रयत्न केले प्रोजेक्ट मध्येच राहायचे. पण वरच्या पोस्ट  साठी एक तर जागा पण कमी असायच्या, आणि काम जास्त. शेवटी त्याने धीर करून कंपनी सोडायचा निर्णय घेतला. इथेच नोकरी शोधायची. इथेच राहायचं. महिन्याभरात त्याला नोकरी मिळालीही. पण ती त्याच गावात नव्हती. ते गाव विमानाने २ तासावर होतं. नेहाला राहायचं होतं इथे पण एकटीला असं वेगळं राहायचं नव्हतं. पण पर्याय नव्हता. दोन महिन्यात नोकरी सोडून सिद्धार्थ दुसऱ्या गावी गेला. सुरवातीला खूप अवघड गेलं त्यांना असं वेगळं राहणं. नंतर त्याचीही सवय होऊन गेली. गुरुवारी सिद्धार्थ परत यायचा, विकेंड दोघे बरोबर असायचे. रविवारी ती त्याच्यासाठी जास्त स्वयंपाक करून ठेवायची. आणि सोमवारी पहाटे तो निघून जायचा. 
         सवय काय सर्वच गोष्टींची होऊन जाते. पण ती करून घेताना आतून आपण कणकण बदलत राहतो हे आपल्याला कळत नाही. दिवसभर सोबत असणारे ते दोघे असे चार चार दिवस न भेटता राहू लागले. अशावेळी आपण काय म्हणून हा निर्णय घेतला होता याची आठवण काढून पहिली पाहिजे. कधी कधी नेहाला खूप एकटं वाटायचं. शेजारच्या एका मराठी बाईकडे जायची ती चक्कर मारायला. पण तेही औपचारिक. मनात आलं म्हणून कुणाचं दार वाजवावं अशी रीत नव्हती इथे. उन्हाळ्यात तरी ठीक, पण थंडीच्या त्या लांब, काळोख्या रात्री कधी संपतात असं होऊन जायचं. मधेच तिला घरच्यांची, राहुल,रोहन सर्वांची आठवण यायची. त्यांच्याशी फोनवर बोलणं व्हायचं पण तेही आपल्या कामात गुंतलेले असायचे. सिद्धार्थ असताना सुरक्षित वाटायचं, तो सोबत असेल तर किती बरं होईल  वाटायचं. 
         अजून एखादं वर्षं असंच गेलं असेल आणि तिलाही मग प्रोजेक्ट संपला म्हणून परत जायला सांगितलं गेलं. आता इतके दिवस तिच्याकडे नोकरी तरी होती. एक रोजचं रुटीन होतं. तिकडे जायचं म्हटलं तर सिद्धार्थला नवीन नोकरी शोधायला लागणार. बरं, मिळेलही, पण त्याने तिकडे यायला तयार झालं पाहिजे ना? तो अजूनही तयार नव्हता परत जायला. नेहा विचार करून करून दमली. इथे राहायचं, इथे नोकरी करायची तरी रिसेशन आलेलं. किती प्रयत्न केले पण काही होईना. सिद्धार्थचा H१-B विसा होता. तिने त्याच्यावर 'dependent' म्हणून राहायचं तर तिला नोकरी करता येणार नव्हती. त्याच्या कंपनीने त्याचे ग्रीन कार्ड प्रोसेसिंग सुरूही केले होते. ते आले की तिलाही नोकरी करता आली असती. पण ग्रीन कार्ड कधी येनार आणि नोकरी कधी करायला मिळेल हे काही सांगता येत नव्हतं. तिला जड मनाने घरी राहायचा निर्णय घ्यावा लागला.  अर्थात घरी राहण्यामध्ये एक गोष्टं तरी चांगली होणार होती. ते दोघेही परत एकदा एका घरात तरी राहणार होते. शेवटी तिने मनातून नोकरीचा विषय काढून टाकला आणि थोडे दिवस गृहिणी व्हायचं ठरवलं. 
           आज पर्यंत नेहाला नाही म्हटलं तरी प्रोजेक्ट मध्ये असणारे ओळखीचे लोक होते. बरेच भारतीय होते. त्यामुळे वेगळा असा ग्रुप काही नव्हताच. ऑफिसमधल्या लोकांसोबतच बोलणं, भेटणं, फिरणं व्हायचं. आता नवीन गावात तिला नवीन ओळखी करून घ्यायला लागणार होत्या, नवीन नाती जोडायला लागणारी होती, आपल्या सवयी थोड्या का होईना बदलाव्या लागणार होत्या. गृहिणी म्हटलं की तिने सकाळी उठून नवऱ्याला चहा बनवून दिला पाहिजेच का? सिद्धार्थचं असं काही म्हणणं नव्हतच. पण तरीही पहिले थोडे दिवस तिने ते सर्व केलंही. उठून चहा करून देणे, त्याची तयारी करायला मदत करणे, दुपारी जेवायला आला की जेवण तयार ठेवणे. रात्रीचा स्वयंपाक दुपारीच करून ठेवणे. हळूहळू त्याचाही कंटाळा आला तिला. रोज आवरून छान तयार होऊन ऑफिसला जाणारी नेहा, घरीच तर आहे म्हणून आळसात राहू लागली. त्याच्या कंपनीच्या लोकांशीही तिच्या आता ओळखी झाल्या होत्या. पण तेही सर्व फॉर्मल. त्यांना भेटताना तिला एकच गोष्ट खुपायची, ती म्हणजे तिची ओळख आता फक्त 'त्याची बायको' इतकीच राहिली होती. आणि पुढची किती वर्षं हीच 'ओळख' राहणार हे तिलाही माहित नव्हतं. 
          
-क्रमश:
विद्या भुतकर.  


Thursday, November 22, 2012

भाग सहावा: शोध स्वत:चाच

         आता हे नेहमीचच झालं होतं, संध्याकाळी कॉल संपला की नेहा सिद्धार्थची वाट पाहत थांबत असे. सुरुवातीला  खोटं कारण सांगून थांबायची आता कारणही सांगायचं बंद केलं होतं तिने. ती नसताना, ती दुसऱ्या कोणासोबत आहे म्हणून वाईट वाटतंय की आपली चांगली मैत्रीण सोबत नाही याचं दु:ख होतंय हे राहुलला काळात नव्हतं.  पण एकूणच त्याला सर्व गोष्टींचा कंटाळा आला होता इथे. रोहनही कंपनी सोडून गेला. अजितने रात्रीची शिफ्ट घेऊन दुपारी MBA ला अडमिशन घेतली होती. आपण मात्र इथेच आहोत अडकलेले. इथे येऊन आता त्यांना तीन वर्षं होऊन गेली होती. राहुल २ आठवड्यांची सुट्टी घेऊन घरी जाऊन आला. जरा घरी राहिल्यावर बरं वाटलं पण ऑफिसमध्ये आलं की पुन्हा तेच लोक, तेच काम, तीच ट्राफिकमधली संध्याकाळ आणि त्याच एकट्या रात्री.
          आज कधी नव्हे ती नेहा सकाळी ऑफिसला आली होती. सिद्धार्थ सोबत राहायचे म्हणून तिने तिची शिफ्टही दुपारची घेतली होती. 
ती त्याच्याकडे येऊन म्हणाली, "चल कॅन्टीन मध्ये जाऊ".
राहुल तिचा उत्साह बघून काहीच बोलला नाही. ते दोघे कॅन्टीन मध्ये जाऊन चहाचे कप घेऊन बसले. तिने टेबलावर जरा पुढे वाकून त्याला हळूच आवाजात सांगितले,"माझे ऑन साईट जायचे फायनल होत आहे."
राहुलला हे जरा अनपेक्षित होते. नेहा उत्साहात बोलली,"अरे, सिद्धार्थने सांगितले की साईटवर रिक्वायरमेंट आहे डेव्हलपरची आणि माझ्या कामाने तिकडे सर्व इम्प्रेस पण झालेत. आता पुढच्या दोन महिन्यात विसा झाला तर मग दोन वर्षं तरी तिकडेच असेन. सिद्धार्थला ही मेनेजरच्या रिक्वायरमेंटसाठी बोलावताहेत."
राहुलने काय बोलावं कळेना. तो तिला म्हणाला,"कॉंग्रट्स, कधी आहे विसा इंटरव्ह्यू? गुड, सहीच."
           कसं असतं ना? जवळचे मित्र जे 'अरे नवीन मोबाईला घेतला? सही, मला सांगितलं नाहीस? ' म्हणून रुसणारे, कधी रात्री बारा वाजता मेसेज का होईना  करून, ताई चं लग्न ठरत आहे असं सांगणारे, आज  इतके दूर? इतक्या उलाढाली झाल्या तरी ना आधी सांगण्याचा उत्साह, ना दुसऱ्याच चांगलं झालं याचा दिलखुलास आनंद. आणि सर्वात जवळच्या मित्रांसोबतच असं का होतं काय माहित? बहुदा आपण घेतलेले निर्णय त्याला चुकीचे वाटून, आपलं खरं मत ते स्पष्टपणे सांगतील याची भीती असते? की त्याला ते असं वाटतंय हे माहित असतं म्हणून समोरचाही खऱ्या भावना जवळच ठेवून बोलतो? असो. लवकरच मग नेहाचा विसा झाला. आणि सिद्धार्थचा तर होताच. दोघेही मग खरेदी, तिकडे जायची तयारी यात अडकून गेले. ती जायच्या आदल्या दिवशी राहुलला स्वत:च बोलून जेवायला घेऊन गेली. "अरे रोहन आणि अजित विचारत होते पार्टी कधी देत्येयस म्हणून ऑन साईटची", नेहा बोलली. 
        त्याचदिवशी त्याने तिला एक अलार्म क्लॉक गिफ्ट दिले. तेव्हाच त्याने तिला 'बाय' करून टाकलं. तिला सोडायला मुंबईला काही तो गेला नाही. तो त्याचा विकेंड सुना-सुना गेला एकदम. रोज भेटत नसले तरी ती या देशातच नाही ही कल्पनाच फार एकटी वाटणारी होती. सोमवारी जड मनानेच तो ऑफिसला गेला. तिथे तरी काय आहे आपलं असं त्याला वाटलं? खिडकीतून खाली दिसणारी वर्दळ बघत तो नुसता बसून राहिला. संध्याकाळी परत निघायच्या आत नेहाच, 'सुखरूप पोचले' असा मेल तेव्हढा आला होता. चला आता दोन वर्षं भेट नाही, असा विचार करून तो रूमवर निघून गेला. परत तीच ट्राफिक, गरम होऊन घामेजले करणारी बस, तेच बेचव जेवण. कधी कधी आयुष्य एकदम थिजून जातं, कितीही प्रयत्न करा पुढे ढकलायचा ते हलत नाही. पुढच्या दोन-तीन महिन्यात त्याला नेहाने मेल, फोटो पाठवले होते वेगवेगळ्या ठिकाणी ती  फिरायला गेली तेव्हा. फोटो पाहिल्यावर त्याला तिची आठवण यायची पण कधी तिला उत्तर द्यायची हिम्मत त्याला झाली नाही.
          आज काल लोक जरा मनाविरुद्ध झाले की त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मग ते प्रयत्न सफल नाही झाले की अजून अस्वस्थता. लग्नासाठी घराचे मागे लागतात, मग जा ऑन साईट. काम चांगले नाहीये, प्रोजेक्ट बदला, ते नाही झाले कंपनी बदला. आणि प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या कुणाच्या मेहेरबानी वर हे सर्व अवलंबून म्हणून अजून त्रास. नेहाशी बोलायला लागायला नको म्हणून राहुलने प्रोजेक्ट बदलून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती मनोज शर्माकडे, पण शर्माने प्रोजेक्टमध्ये सध्या नवीन कुणी येईपर्यंत तुला निघता येणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले होते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी या मोठ्या लोकांच्या मागे लागावं लागतं, तेही लोक आपल्या  असहाय पणाचा फायदा घेतात असं राहुलला वाटत होतं.
          खरंतर नेहा हेच काही एक कारण नव्हतं हे असं डिप्रेस व्हायचं. त्यांचं तर प्रेम, प्रेम म्हणताही येणार नाही असं होतं. ना त्याला माहित होतं की हे प्रेमच होतं की आकर्षण. ना त्याने तिला सांगितलं त्याचं प्रेम आहे म्हणून ना तिने त्याला नकार दिला होता. त्याच्या आयुष्यात एक पोकळी मात्र निर्माण झाली होती. आजपर्यंत त्याच्यासमोर नेहमी एका ध्येय असायचं. ते प्राप्त करण्यासाठी मग धडपड करत राहणे आणि ते मिळाल्यावर पुढच्या ध्येयाकडे वळणे, हेच त्याने केलं होतं. गेल्या दोन वर्षांत कंपनीतल्या त्याच्या ग्रुपमुळे त्याला त्या नसलेल्या ध्येयाची कधी आठवणच झाली नव्हती. पण आता त्याची तीव्रता त्याला जाणवत होती. बरं, करायचं पुढे म्हणजे तरी काय? प्रोजेक्ट बदलणे, कंपनी बदलून दुसरीकडे जाणे, किंवा मग पुढच्या शिक्षणासाठी अभ्यास करणे? त्याने मग त्याला जे माहित होते तेच केले. अभ्यास करणे. MBA साठी त्याने मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली.
          एकदा का तो अभ्यासात शिरला तेव्हा त्याला मग स्वत:लाच पुन्हा एकदा गवसल्यासारखं वाटलं. रात्री जागून अभ्यास करणे, एखादी गोष्ट समजत का नाहीये वाटून ती समजेपर्यंत झपाटल्यासारखे उत्तर शोधत राहणे. हे सर्व चालू असताना त्याचा प्रोजेक्ट चालूच होता. पण आता बाकीच्या लोकांमुळे त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला त्याचं ध्येय मिळालं होतं. आपले ध्येय आपणच ठरवले की मग मनोज शर्मा सारख्या  लोकांनी त्याचं काम केलं नाही केलं यानेही त्याला काही फरक पडत नव्हता. मध्ये मध्ये नेहाशी बोलणं व्हायचं, ती नेहमी प्रमाणे मोकळ्या मनाने  बोलायची. तिथे कसं असतं सर्व, तिने गाडी घेतली, रुममेट कशी आहे, जेवण बनवायला कशी शिकली, सर्व काही. एकदा तिने तिच्या पहिल्या 'स्नो फॉल च्या अनुभवाबद्दल त्याला सांगितलं. ते ऐकून त्याला क्षणभर वाटलेही की आपण सुद्धा राहावे का याच प्रोजेक्टमध्ये? आपल्यालाही मिळेल हे सर्व अनुभवायला. पण आता माघार घेऊन चालणार नव्हतं त्याचे ध्येय एकच होते, सर्वात चांगल्या इंस्टीटयूटमध्ये MBA ला अडमिशन मिळवणे.
         त्याच्या प्रयत्नाचं फळ मिळालं. हैदराबादला त्याला अडमिशन मिळाली होती. पुण्यातून निघायच्या आधी त्याने नेहाच्या घरी भेट दिली होती एकदा. त्यांचेही चांगले संबंध जुळलेच होते की. ते का तोडायचे? तिथे गेल्यावर त्याला कळले की सिद्धार्थचे आणि नेहाचे लग्न ठरले आहे. आधी दोघांच्या घरून नकार होताच. पण तिच्या घरच्यांनी सिद्धार्थला पहिले होते. एक आदर्श जावई म्हटला तर त्याच्यात काहीच कमी नव्हते. दोघेही अजून दोन-तीन वर्षं तरी तिकडे राहतील. मग लग्न करून तिकडे राहिलेले बरे ना? तिच्या आईचं म्हणणंही बरोबरच होतं. त्यांचा निरोप घेऊन राहुल निघाला. त्याला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की हे नेहाने स्वत: का ना सांगितलं. असो. पुण्यातलं सर्व मागे टाकून नवीन सुरुवात करायचं ठरवलं होतं त्याने, पुन्हा एकदा.

-क्रमश:
विद्या भुतकर.