Tuesday, October 16, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण १०

सपना आज मनोजला भेटणार होती. संध्याकाळी थांबायला जमणार नव्हतं त्यामुळे दुपारीच भेटून जाणार होती. लिट्ल चॅम्प्सचा निकाल लागला होता. दोघेही त्याच हॉटेलात परत गेले, आधी बसले त्याच बाकड्यावर बसले आणि पुन्हा तीच ऑर्डर दिली. 
मनोजने ऑर्डर दिल्या दिल्या सपना म्हणाली,"बघा मी म्हणलेलं ना तीच जिंकणार म्हणून?". 
मनोज हसला आणि म्हणाला,"पण आमच्या पोरानं पण चांगली फाईट दिली. किती कमी फरक होता दोघांच्यात. मी तर लै नाराज झालो होतो.". 
"ते काय का असेना? पैज तर मीच जिंकले ना?", सपनाने विचारलं. 
"जिंकल्याचा इतका आनंद? बरं, आजची पार्टी माझ्याकडनं.", म्हणत मनोज परत हसला. 
दोघेही मग बराच वेळ बोलत बसले होते. 
निघायच्या आधी सपनाला मनोजने अभ्यासाचं विचारलं तर ती म्हणाली,"हां चालूय. आता हे झालं की चार महिन्यांत पुण्याला. "
मनोजने विचारलं,"पुण्याला का?". 
"का म्हणजे? एकदा कॉलेज संपलं की पीएचडी ची तयारी करायची आहे. त्यासाठी इथे राहून काय करणार? पुण्याला NCC नावाची मोठी संस्था आहे. तिथं करणार पीएचडी.", सपनाने सांगितलं. 
मनोज थोडा नाराज झाल्यासारखा वाटला पण काही बोलला नाही. 
तिने विषय बदलला. खाऊन झाल्यावर त्याने पैसे दिले. 
"चला मी तुम्हांला कॉलेजवर सोडतो", मनोज बोलला. 
"नाही मी जाते ना?", सपना. 
"असू दे हो. आता हे तर शहर आहे. गाव नाही ना? चला बसा.", म्हणत मनोजने गाडी सुरु केली. 
एका बाजूला पाय ठेवून, मागच्या दांड्याला घट्ट पकडून सपना बसून राहिली. कॉलेज जवळच होतं. तिला सोडून तो निघून गेला. 

संध्याकाळी बसमधून येताना सपना कसला तरी विचार करत होती. वैशूनं विचारलं तिला,"काय गं? इतका काय विचार करतीयस?". 
"काही नाही, खडा टाकून बघितला होता.", सपना म्हणाली. 
"खडा?", वैशूला काही समजत नव्हतं. 
"हां, खडा टाकलेला बरोबर बसला. आज मनोजला म्हटलं मी की पुढं शिकायला जायचंय पुण्याला म्हणून. ", सपनाने सांगितलं. 
"उगाच कशाला त्रास देतीस? पुढचं पुढं बघू की.", वैशू. 
"कशाला म्हणजे? हा माणूस मोठ्या बाता करतो एकदम मॉडर्न असल्याच्या. मग बघायला नको? बोलायला सगळ्यांनाच जमतं. करण्याची वेळ आली की असं तोंड पडतं, जसं त्याचं पडलं होतं.",सपना बोलली. 
तिच्या उत्तरावर वैशू गप्प बसली. 
आज घरी गेल्यावर रात्रीही त्याचा काहीच मेसेज आलेला नव्हता. तिनेही मग काही मेसेज केला नाही. 

-------------

       अम्या संत्याचा खास दोस्त, जिगरी का काय ते म्हणतात ना तसला. शाळेत खोटी हजेरी लावण्यापासून दांडी मारल्यावर त्याला गृहपाठ देण्यापासून आजपर्यंत त्याची अनेक कामं केलेली. आता यात संत्याचा पैसा हे कारण म्हटलं तर अम्याच्या वडलांचं स्वतःचं दुकान होतं, खत, बी-बियाण्यांचं, शेतीही होतीच ४-५ एकर. त्यामुळं अम्याला कमी काही नव्हतं. अभ्यासातही तसा बराच होता. ६०-७० टक्के पडून जायचे. त्याच्या वडलांनी अनेकवेळा अम्याला झापला होता नुसत्या टवाळक्या करण्यावरुन. शाळेपासून आजपर्यंत अनेकवेळा त्यांनी त्याला ताकीद दिली होती संत्यापासून दूर राहण्याची. पण संत्या अम्याचा खरंच चांगला मित्र होता. अनेकदा संत्याच्या चांगल्या स्वभावाचा अनुभव त्याने घेतला होता. समोर दिसणाऱ्या टवाळ मुलाच्या आत असलेलं कोवळं काळीज त्याने आपल्यासमोर उलघडतांना पाहिलं होतं. केवळ मागे फिरणं वेगळं आणि तिच्या प्रेमात वेडं होणं वेगळं. सपना या प्रकरणातही शाळेपासून आजपर्यंत लागेल तशी मदत त्याने त्याला केली होती, ती यामुळेचत्यानं लिहिलेल्या कविता वाचून अम्याला त्याचा अजूनच कळवळा यायचा. या पोराला ती सोडून गेली तर काय होईल याची कल्पनाही करता येणार नव्हती. 

       घरात सकाळ सकाळी त्याच्या वडलांनी परत सुनावलं होतं. चांगला शिकलेला मुलगा दुकानात बसला, जरा काम केलं तर त्यांचं कितीतरी काम सोपं झालं असतं. अम्याने पुन्हा एकदा ऐकून घेतलं. त्याच्या वडलांनी त्याला दुकानासाठी सामान आणायला सातारला पाठवला. इतकं ऐकल्यामुळे त्यानेही विक्या, संत्याला मेसेज केला फक्त आणि सातारला गाडी घेऊन निघाला. दुपारी दुकानातून सामान घेऊन निघत असताना त्याला ती दिसली होती, मनोजसोबत. त्याच्या गाडीवर मागे बसून ती कॉलेजला गेली. अम्यानं सामान घेतलं आणि परतीच्या रस्त्याला लागला. कितीतरी वेळ त्याला काय करावं सुचत नव्हतं.  ती संत्यापेक्षा सरस होती तेही त्याला ठाऊक होतं. संत्याला सांगितलं की त्याच ठिकाणी बेकार काहीतरी घडणार हे नक्की होतं. तिने कुठल्या दुसऱ्या मुलासोबत दिसूही नये? तिने काय करायचं, कसं वागायचं हे बाकी लोक कसं ठरवणार? या सगळ्यात पडायलाच नको. सांगू की नको असा हजारवेळा विचार करत अम्या गावात परत पोचला होता. 

---------


        जवळच्या किराणा दुकानातून काहीतरी सामान आणायला सपना निघालेली. रात्री आठ साडेआठची वेळ होती. तिला असं बारीक सारीक काही आणायला नको वाटायचं. जमलं तर सरच आणायचे. पण त्यांना काम होतं. बाईंनी सांगितल्यावर ती नाईलाजानं टिव्ही सोडून उठली होती. चालत दुकानाकडे जाताना 'एकंबे नवयुवक सेने'चं पार्टी ऑफिस तिला दिसलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ती हा तमाशा पहात होती. जसे जसे दिवस जातील, त्याच्याबाहेरच्या पोरांची गर्दी वाढतंच होती. आज तर जोरांत गाण्यांचा आवाज ऐकू येत होता. बाहेर काही टाळकी घोळका करुन उभी होती. संत्याने पुढे होऊन कधी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं तिथे यायचं, तरीही गुळाला मुंगळा चिकटावा तशी ऑफिसच्या बाहेरच्या पोरांची गर्दी वाढतंच होती. 
         तिने तिकडे दुर्लक्ष करत पटापट पावलं टाकायला सुरुवात केली. दुकानातून परत येत असताना तिला संत्या, अम्याही बाहेर दिसला. तिच्याकडे बघून ते दोघे एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसले. मनोमन आईवर चिडून तिने आपला वेग अजून वाढवला. पाच दहा मिनिटांचं अंतरही तिला खूप दूर वाटू लागलं. तिला आज उगाचच भीती वाटत होती. आजवर कधी तिला असं वाटलं नव्हतं. पण तिला मागून कुणीतरी चालत आल्याची चाहूल लागली होती. त्या अंधाऱ्या गल्ल्यातून आता बाहेर पडणारच इतक्यात तिला हाक ऐकू आली,"सपना". 
तिने मागे वळून पाहिलं आणि पळायला सुरुवात केली. तसे संत्यानं तिच्या मागे पळत जाऊन तिला गाठलंच आणि पुढे जाऊन तिचा हात धरला. 
सपनाला कळलं होतं आता आपणच धीर धरुन हे निस्तरलं पाहिजे. 
ती जोरात ओरडली,"संत्या हात सोड माझा.". 
तसा संत्याही जोरात बोलला,"न्हाई सोडणार, मी जरा कामात लागलो की तू दुसऱ्या पोरांबर फिरायला लागलीस?". 
सपना,"मी कुणावर फिरायचं हा माजा प्रश्न आहे. तू कोण बोलणारा?". 
"मी कोण?" असं विचारत संत्या तिच्या अजूनच जवळ गेला. तसा तिला त्याच्या तोंडाला दारुचा वास आला. तिने त्याला दोन्ही हातांनी ढकलला. 
"एका श्रीमंत बापाचा माजलेला पोरगा आहेस तू, ज्याला काय काम नाहीये. ", सपनाने उत्तर दिलं. 
"तुला म्हायतेय ना मला आवडतीस तू?", तो आवाज जरा नरम करुन बोलला. 
"मग मी काय करु? काय लायकी हाये का तुझी कुणी आवडायला? नुसतं गावाच्या पोरांबर दिवसभर चकाट्या पिटत असतोस.", तिने उलट उत्तर दिलं.
"हे बग मला अजिबात आवडलं न्हाई तू कुना दुसऱ्या पोराबर फिरलेली.", संत्या तावातावाने बोलला. 
"मी कुणाबरबर फिरायचं ते तू मला सांगू नकोस. आन नुसता फिरत न्हायीये तो. लग्नासाठी विचारलंय त्यानं मला.",सपनाची भीती जरा चेपली होती. आजवर त्याला समोरासमोर असं बोलण्याची संधी तिला मिळाली नव्हती. अशी मिळालीय तर ती सोडायची नाही, तिने ठरवलं. 
"लग्न?", संत्याने तिचे खांदे पकडले होते,"माझ्याशिवाय कुणाशी लग्न केलंस तर याद राख!". 
सपनाने त्याला अजून जोरात ढकलला आणि जोरात एक कानाखाली लावली आणि म्हणाली,"आधी माझ्यासमोर उभं रहायच्या लायकीचा तरी हो मग लग्नाचं बोल. ". 

       तिचा हात कानावर पडला आणि संत्या एकदम स्तब्ध झाला. हे सगळं इतक्या पुढं गेलंय हे त्या क्षणात त्याला कळलं होतं. तो काही बोलणार त्याच्या आधीच ती ताडताड निघूनही गेली. घरी परतली तेव्हा अजूनही थरथरत होती ती.आणलेलं सामान बाईंना देऊन ती पटकन आतल्या खोलीत निघून गेली. झाला तो प्रसंग कुणीही पाहिला नव्हता. ती काही बोलली तर अख्ख्या गावभर त्याच्यावर चर्चा झाली असती. सगळं आपल्या जवळ ठेवण्यातच शहाणपण आहे असा विचार करुन तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. 


- क्रमशः



विद्या भुतकर. 

No comments: