Tuesday, October 23, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १४

सपनीची सिरीयल चालू झाली होती, 'न कळले तुला, न कळले मला'. हातातला घास हातात धरुनच बघत होती ती. परीक्षा संपल्या, सुट्टी लागली होती. सुट्टीत सपनीचं रुप जरा खुलायचं. एकतर रोजची धावपळ नाही आणि घरी बसून खाऊ पिऊ घातलेलं अंगाला लागायचं. त्यात संत्याही परत तिला दिसला नव्हता. निदान तिच्यामागे तरी. बाकी गावात काहीतरी हालचाली चालूच होत्या. रोज कसली ना कसली बातमी असायचीच. छोट्या मोठ्या सुधारणाही दिसत होत्या तिला. पण त्यात तिला काहीच स्वारस्य नव्हतं. ती दुपारी वैशीकडे जाई, कधी घरच्या कुरडया-पापड तर कधी शेजारच्या काकीचे. दुपारी एखादं पुस्तक, एखादी सिरीयल. दिवस असा निघून जायचा. सरांचीही सुट्टीच होती. त्यामुळे रात्री शाळेपर्यंत चालत जायचं, येताना एखादी कुल्फी खायची गाड्यावर.

        सिरियलचा शेवट आला इतक्यात दारावरची बेल वाजली. सपनाची चिडचिड झाली. सर आत पेपर वाचत बसलेले आणि बाईनी तिच्याकडे पाहिलं. तिला नाईलाजाने जावंच लागलं दारात. दार उघडलं तर तिला संत्या दिसला. जोरात ओरडलीच ती, "आई" म्हणून. बाईही धावल्या तिचा आवाज ऐकून. सरही बाहेर आले पेपर हातात धरुनच. संत्याही घाबरला. त्याला कळेना काय बोलायचं. इतक्यात मागून बन्या समोर आला.
"नमस्कार सर", बन्या बोलला.
"या बन्याभाऊ काय म्हणताय?", सरांनी विचारलं.
"काय न्हाई काम होतं जरा. म्हटलं बसलं तर चाललं का?", बन्याने विचारलं.
"आर असं विचारताय काय? चला या आत.", सर आत जात बोलले.

सपना खरकटा हात घेऊन आत गेली. टिव्हीसमोरचं ताट तिने उचललं आणि मोरीकडे गेली. पण कान बाहेरच लागलेले.
"त्ये काय झालंय, तुम्ही तर बघतायच किती सुदारना चालल्यात गावात.", बन्या.
"होय होय, एकदम झकास काम चाललंय. परवाच कुंभारवाड्याकडं जाऊन आलो. रस्ता एक नंबर झालाय.", सर म्हणाले.
"होय, आपल्या संतोषरावांचंच काम बगा ते. लैच मनावर घेतलंय त्यांनी सध्या.", बन्या संत्याची पाठ थोपटत बोलला.
संत्या हलकंसं हसला. 
"चांगलं काम करताय. त्यात मी काय मदत करु?", सरांनी विचारलं. 
"त्येच इचारायला आलो हुतो. शाळेची बरीच कामं दिसली यादीत. हेडमास्तरांना भेटलो तर ते म्हनाले सरास्नी भेटा. ही यादी आनली हुती. एकदा बघता का?", बन्याने हातातली फाईल सरांकडे दिली. 

सर एकेक करुन त्यातले कागद वाचू लागले. वेळोवेळी शाळेत लागणाऱ्या छोट्या मोठ्या सुधारणांचे अर्ज होते ते. संत्या काहीच काम नसल्यानं हातांची चुळबूळ करत इकडे तिकडे बघत बसला. गोदरेजच्या टीव्हीच्या कपाटात बसलेला टीव्ही, त्याच्यावरच्या काळ्या केबलच्या डब्यावर धूळ बसली होती. त्याच्या वरच्या खणात शोकेसच्या नावाखाली जे काही ठेवलं होतं त्या प्रत्येक वस्तूची बारकाईने पाहणी करु लागला. काचेच्या दारात सपनीचा एक छोटा फोटो उभा करुन ठेवलेला होता. फोटोतली सपना पाहून तो कुठल्या वर्षाचा असेल हे त्यानं लगेचच ओळखलं होतं. त्याच्या मागे दोन लाकडी उंट उभे केलेलं होते. एक काचेचं मेणबत्तीचं स्टॅन्ड आणि त्यावर अर्धी जळलेली मेणबत्ती. शेजारी एक खोका. त्याच्यावरच्या चित्रावरुन आत काचेचे कप असणार असं वाटत होतं. खोक्याच्या वरही अजून बारीक सारीक वस्तू ठेवलेल्या होत्या. कुणाला त्या कपातून चहा द्यायलाही निदान तासभर मेहनत करावी लागली असती, फक्त तो खोका बाहेर काढून साफ करण्यासाठी. सपनीच्या फोटोवरुन आपली नजर हटवण्याचा प्रयत्न करत तो बसून राहिला. तिच्या घरात आज पहिल्यांदाच आला होता तो. तिने दरवाजा उघडला आणि ओरडली तेव्हा हार्ट अटॅकने तिथेच मरतो की काय असं त्याला झालं होतं. गेल्या दोन महिन्यांत त्याने तिचं तोंडही पाहिलं नव्हतं. आठ्वणीतल्याच चेहऱ्याला उजाळा देत असे कधी मधी. 

        सपना आतल्या खोलीत जाऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत बसून राहिली. आपण किती जोरात ओरडलो हे पुन्हा पुन्हा आठवत होती. तो इतक्या जवळ आहे या विचाराने तिला चैन पडेना. आपल्या घरात येण्याची त्याची हिम्मत बघून ती घाबरली होती. सर फाईल बघेपर्यंत जरा वेळ शांततेत गेला होता. त्यामुळे बाहेरचं काहीच ऐकू येईना तिला. ती हातात पुस्तक घेऊन बसून राहिली. 
   
"बन्याभाऊ यातले निम्मे अर्ज तर मीच भरले आहेत. काय करायचं आहे यांचं?", सरांनी विचारलं. 
"शाळा म्हंजे आपल्या गावाची शान हाय. आजवर इतकी हुशार पोरं दिली शाळंन. गावात बाकी सुधारना चालूच र्हातील पर या पोरांसाठी कायतरी केलं पायजे. संतोषनं त्याला आठवलं तशी अजून बी मोठी यादी दिली. मग म्हटलं नुसती यादी करुन काय उपेग? सुरुवात करायला पायजे. त्यात सुरवात कुटून करायची ह्ये कळंना. म्हनून तुमच्याकडं आलोय.",बन्या बोलला. 
"आबांनी सांगितलंय जे काय मदत लागंल ती करु, पैसा-मानूस सगळं.", संत्याच्या तोंडून पहिलं वाक्य बाह्येर पडलं. 
"सर, तुम्हाला चालत असंल तर रोज आपण बसून तयारी करु. तुम्ही फकस्त सांगा काय काय पायजे ते.", बन्या. 
सरांनी दोनेक मिनिटं विचार केला आणि म्हणाले उद्या हेडमास्तरांशी बोलून सांगतो. उद्या याच वेळेला या परत."
"हां चालंल", बन्या बोलला आणि उठला. क्षणात दोघं उठून चप्पल घालून निघालेही. 
"येतो मग आम्ही उद्या परत", म्हणत बन्या निघाला आणि सोबत संत्याही. 

सरांनी बसून पुन्हा एकदा ती फाईल वाचायला घेतली. सपना, बाई बाहेर आल्या आणि त्याही ते कागद वाचू लागल्या. सपनाला मात्र उद्या पुन्हा तो आपल्या घरात येणार या विचाराने चैन पडत नव्हती. तिची सुखासुखी चाललेली सुट्टी अशी विस्कटली होती. 

----------------------------

पोरांचे पेपर तपासणे सोडून बाकी काही काम नव्हतं. सगळे शिक्षक सकाळी थोडा वेळ शाळेत फेरी मारुन जात. त्यात निकालाचा दिवस जवळ येत होता त्यामुळे सर्वांची मार्कशीट तयार करणे चालू होतं. सरांनी फोन करुन हेडमास्तरांनाही शाळेत बोलवून घेतलं होतं. स्टाफरुममधून त्यांच्या केबिनच्या दारातून आत येत सरांनी विचारलं,"येऊ का आत सर?". 
कुलकर्णी सरांनी आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढत त्यांना हातानेच आत येण्याची खूण केली. सर येऊन समोर बसले आणि एकदम मुख्य मुद्द्याकडे वळले. 

"ते काल बन्या आणि आबांचा मुलगा आला होता माझ्याकडे.",सर. 
"हां मीच त्यांना पाठवलं होतं. म्हणलं आपल्या शाळेचे इतके वर्षांपासून काम करत आहात. शाळेसाठी कितीतरी सूचना तुम्ही दिल्यात पण खूप कमी अंमलात आल्या. आता कुणीतरी विचारत आहे तर हे तुमच्या सल्ल्यानेच होऊ दे. ", कुलकर्णी सर बोलले. 
"थँक्यू सर. मी काल पाहिली ती फाईल. हे बघा ही मुख्य कामांची यादी केलीय. म्हणलं तुमच्याशी बोलून कामं फायनल करावी. ", सरांनी कागद पुढे केला. 
"हे बरं केलंत. उद्या परत त्यांनी अर्धवट ठेवलं तर सगळंच राहून जाईल. या लोकांचा काय भरोसा? ", म्हणत कुलकर्णी सरांनी ती यादी चाळली. एक दोन मुद्यांना खालीवर करत त्यांनी कागदावर पेनाने दुरुस्ती केली. 
"हे घ्या" म्हणून परत सरांच्या हातात दिली. 
"मी काय म्हणत होतो सर, एक कल्पना आहे.", सरांनी पुढे होऊन सांगितलं. हेडमास्तरांनी चष्म्याच्या वरच्या रेषेतून त्यांच्याकडे पाहिले. 
"आता पोरांना सुट्ट्या आहेत पुढं. शाळेची बरीच कामं चार ज्यादा लोक आले तर होऊन जातील. मला वाटतं गावातल्या बाकी लोकांची पण मदत घ्यायला पायजे हे सर्व करायला. नुसते गवंडी, सामान आणून देऊन काय होईल ? त्यापेक्षा आपणच आपल्या शाळेच्या सुधारणा करायच्या. पैसे, माणूस आणि काही लागलं तर हे लोक आहेतच. ", सर बोलले. 
कुलकर्णींना कळेना काय बोलावं. 
"अहो पण कोण येईल बिनपैशाचं काम करायला? आणि सगळ्यांना सगळं जमतेच असं नाही ना?", ते बोलले. 
"अहो पण साधी गोष्ट, समजा मोडलेले बेंच दुरुस्त करायचे आहेत, निदान मोडके बेंच शोधून ते एकत्र आणू तरी शकतील ना लोक? बारीक सारीक खूप मदत होईल. हे ग्राऊंडच्या बाहेर कचरा असतो, ग्राऊंडचं लेव्हलिंग आहे. नुसत्या पाट्या जरी इकडे तिकडे गेल्या लोकांनी तरी किती पैसे वाचतील. खूप कामं होतील आपली. ", सर उत्साहात बोलले. 
कुलकर्णीनाही ते पटलं. 
"याचसाठी मी त्या पोरांना तुमच्याकडे पाठवलं. तुमच्या कल्पना आणि शाळेवरचं प्रेम यावर पूर्ण विश्वास आहे माझा. तुम्ही म्हणाल ती पूर्व.", ते बोलले. 
"थँक्यू सर. ही शाळाच तर आहे आपली, बाकी काय संपत्ती आपली?", सर भारावून बोलले. 
कुलकर्णी सर हसले. 
सर उठून हात जोडत "बरं येतो मी" म्हणून निघून गेले. 
त्यांना आता ही कल्पना केव्हा एकदा बन्या आणि संत्याला सांगतो असं झालं होतं. 

क्रमशः

-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: