Tuesday, October 09, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ७

       एकदा कोरेगांव सोडून एकंब्याच्या रस्ता लागला की रस्त्यावरच्या डांबराची रुंदी कमी कमीच व्हायची. कोरेगांवच्या नव्या वस्त्या पसरत हळूहळू त्या रस्त्याला गोळेवाडीपर्यंत आलेल्या. कितीही नवीन घरं आली तरी ती दोन्ही बाजूच्या शेतांच्या अधूनमधूनच सिमेंटची एकमजली अगदी विरळ वस्ती. गाडीतून जाताना पावसाळ्यात आजूबाजूला निस्ती हिरवळ. वरुन पाहिलं तर त्याच हिरवळीचे वाकडे-तिकडे त्रिकोणी, चौकोनी जमिनीचे तुकडे, कॅनालच्या बाजूबाजूने दिसतील. मधेच कुठं एखादं पठार आलं तर त्यावर उंच झाडं तर कुठे बारक्या बोरीचं बन. गोळेवाडी लागली की पुन्हा जरा दहा घरं लागून दिसायची. तिथून मोजून ४-५ किलोमीटरचा रस्ता. पण पावसाळ्यात, हिवाळ्यात त्या बसमध्ये बसून जायचं नको वाटावं इतकं थंड आणि खड्डे तर विचारायलाच नकोत. अन उन्हाळा लागला की रात्री थंड हवेच्या झोतासोबत जरंडेश्वरच्या साखरखान्याच्या मळीचा वास अख्खा गावभर पसरत जायचा. 

          गावाच्या सुरुवातीलाच एक महादेवाचं सुंदर दगडी मंदिर. गावाच्या फाट्यावर ओळीनं चार गाळे टाकून चार दुकानं थाटलेली. बसस्टॉपच्या जरा पुढं जाऊन, ट्रॅक्स थांबायच्या तिथं चौकात मोठे-मोठे दोन-चार बोर्ड लावलेले असायचे नेहमी. फाट्यावरुन आत जाईल तसं काही चव्हाणांची घरं लागायची, काही जरा त्यातल्या त्यात नवी, सिमेंटची. काही नुसता रंग दिलेली तर काही सिमेंट, खत, अवजारांच्या जाहिरातींची. बरीचशी जुनी दगडाची, विटांची, कौलारु एकेकटी घर, बारक्या गल्ल्या आणि गावाच्या मध्यात शाळा. गावाच्या बाजूने जाणारा ओढा म्हणजे कपडे धुण्याचं आणि वापरण्याच्या पाण्याचं साधन. प्यायचं पाणी विहिरीचंच. इतकंच काय ते गाव. पण जागोजागी दिसणारी वडाची झाडं गावाच्या आयुष्याची साक्ष द्यायची. गावातून अनेक मुलं सैन्यांत भरतीसाठी गेलेली. ते सोडलं तर मुख्य काम शेती! ऊस, भुईमूग, घेवडा, भाजीपाला दर आठवड्याला सातारला जायचा. त्याच्यासाठी मात्र पाटाचं पाणी असायचं. 

        एरवी शांत असणाऱ्या एकंब्याच्या रस्त्यांनी आज रुप बदललं होतं. सकाळपासून कसलीतरी गडबड, धावपळ चालू होती. बन्याला परवाच नवीन फ्लेक्सची बंडलं मिळाली होती. पाटलांनी संत्याला कामालाच लावला होता. त्याचे फोटो आले की लगेचच कोरेगावांतून एकाकडनं मजकूर लिहून घेतला होता, चांगले फोटो त्यावर चिकटवून घेतले होते. परत सातारला जाऊन ते फोटोंचे मोठाले फ्लेक्स बनवून गावात आणायला लागले होते. संत्याला जीव नकोसा झाला होता. रोज सकाळी घरातनं निघालं की रात्रीच परत. दिवस कसा संपायचा कळतंच नव्हतं. एक-दोनदा टाळायचा प्रयत्न केला तर पाटील भडकले होते. त्यामुळे पंधरा दिवस सपनीला न बघता राहायचं म्हणजे त्याच्यासाठी जीवघेणं काम होतं. पहिले एक दोन वेळा त्यानं विक्या-अम्याला विचारलं होतं. पण आता त्याला रोजच्या कामात त्यांचीही मदत लागत होती. त्यामुळे तेही त्याच्यासोबतच होते आणि केवळ संत्याला चिडवण्यावरच काम भागवत होते.

एका फ्लेक्सवरचा फोटो बघून विक्या त्याला म्हणाला,"संत्या चिकना झालास रं. ते फेरन लवली च्या फोटोत असतो ना तसा चार फोटो फरक पडला आसल तुज्यात."


"व्हय, मी इचार करतोय, मी पन तिकडंच फोटो काडून येतो लग्नाचं. पोरी व्हय तरी म्हनतील", अम्या हसून बोलला. 

"होय, याचं काम तरी झालंय, आता वयनी बरोबर एकदम जोड शोबून दिसल.", विक्यानं अम्याला टाळी दिली. 

"गप काम करा की, पप्पा आलं तर उगाच वर्डतील", संत्या रागानं बोलला. 

      खरं सांगायचं तर मनातून त्यालाही त्याचे फोटो आवडलंच होते. त्याला क्षणभर सपनीची आठवण झाली. फ्लेक्स कुठला कुठं लावायचा यावर बन्याशी पाटलांनी बोलणी केली होती. आज पहाटे चारला जाऊन सगळे बोर्ड लावायचे होते. त्यामुळं विक्या, अम्या रात्री त्याच्याकडंच झोपायला आले होते. गप्पा मारता मारता तीन वाजले तरी झोप येईना म्हटल्यावर संत्यानं पांघरुन काढून अंगात कपडे घातले. 
त्या दोघांना पण "चला, उठा, उठा" म्हणून उठवलं. 

"आर चारला जायचंय ना? ", विक्यानं विचारलं. 
"चारला काय म्हूर्त हाय का?", संत्या. 
"न्हाई, पन ...", अम्या काही बोलणार इतक्यात संत्यानं पायात चप्पल घातली. 
"आई-पप्पा झोपल्यात, जरा हळू बोला", म्हणत एकेक गुंडाळी हातात घेतली. 
      शेडमधनं गाडी बाहेर काढली. अम्या त्याच्या भावाची रिक्षा घेऊन आला होता. विक्याला त्या गुंडाळ्या घेऊन मागं बसवलं आणि अम्याची रिक्षा फटफटली. तशी सगळा गाव जागा होईल म्हणून संत्याला चिडचिड झाली. त्यानं गाडी सुरु करायच्या आधी बन्याला फोन लावला होता. बन्याला झोपमोड झाली म्हणून चिडचिड झाली. पण बोर्ड लावणारी माणसं त्याच्याकडे होती. तो उठून, झक मारत त्यांना गाडीवरुन घेऊन आला. ठिकठिकाणी फ्लेक्स लावून सगळेजण सकाळी सातच्या आत घरी आले होते. संत्यानं घरी येऊन पाटलांना सविस्तर माहिती दिली आणि 'झोपतो आता म्हणत' खाटेवर पाठ टेकली. रात्रीच्या जागरणानं डोळे लाल झाले होते. 

'पोरगं किती काम करतंय' म्हणत काकींनी दोन्ही हातांची बोटं कडाकडा मोडली. 

-------

सपना सकाळी वैशीसोबत घरातून निघाली आणि मेन रोडला पोचली तोवरच तिला मोठाले बोर्ड लावलेले दिसले. 
"एकंबे नवयुवक सेना"! एका फलकावर पाटलांचा फोटो मागच्या बाजूला ठेवून  मोठ्या अक्षरांत लिहिलेलं होतं. 

"सळसळतं रक्तं आन नवा नेता हवा, 
देशसेवेचा वसा आता नव्या पिढीने घ्यावा" 

पुढच्या एका बोर्डावर लिहिलं होतं, "एकंब्याच्या नव्या पिढीच्या नेतृत्वाची धुरा आता सांभाळणार, संतोषराव पाटील!". 

त्यावर संत्याचा सफेद कुर्ता घातलेला, वर खादीचं जॅकेट असलेला हात जोडून उभा राहिलेला फोटो होता. 
अजून एका बोर्डवर, "गावचा छावा, असा हवा !" म्हणून संत्याचा अजून एक फोटो आणि पुढे त्याच्या मित्रांची नावं लिहिली होती. 
सपनीला तर प्रत्येक बोर्ड बघून जास्तच हसू फुटत होतं.
वैशू म्हणाली, "हेच बघायचं राह्यलं होतं गावात." 
सपना बोलली,"आधीच माकड आणि त्यात हातात कोलीत. "
बसमध्ये दोघीही बराच वेळ त्याच्या फोटोवर बोलत बसल्या होत्या.
---------

कॉलेजमध्ये मधल्या सुट्टीत डबा खाताना आज पुन्हा 'सपना मॅडम?" असा आवाज ऐकू आला. 
आज मनोज परत तिथे आलेला होता. आता मात्र हद्दच झाली. तिला काही कळेना काय बोलावं. 
"ते काल तुम्ही मिस्ड कॉल देणार होतात. तुमचा फोन आला नाही म्हणून भेटायला आलो.", त्याच्या या बोलण्यावर ती काय बोलणार?
"अभ्यास चालूय ना? त्यामुळे न्हाई जमलं.", तिने उत्तर दिलं.
"मॅडम, खरं सांगू का तुम्हांला? तुम्ही म्हणाल तुमच्या मागावर का आहे मी? माझी खरंच इच्छा आहे की त्या जुन्या पद्धती, रिवाज मोडून नव्या रीतीने लोकांनी भेटलं पाहिजे. आता मी ज्युनियर कॉलेजला शिकवतो. एक सामान्य शिक्षक. माझ्या आयुष्यात काय ते सिनेमासारखं प्रेम-बीम असणार नाहीये. पण हे असं ओळख होऊन, एकमेकांना समजून घेतल्याशिवाय लग्न करण्यात तरी काय अर्थ? उद्या आपले आई-बाप मुहूर्त बघून लग्न ठरवतील मग त्यानंतर भेटून काय उपयोग? म्हणून आज परत आलो. सॉरी तुम्हांला राग आला असेल तर. तुम्हाला तुमच्या पुढच्या शिकण्याची काळजी आहे असं ऐकलं तेव्हाच वाटलं की कुणीतरी आपल्यासारखं आधुनिक विचाराचं दिसतंय, म्हणून आलो.", मनोजने अगदी बरोबर मुद्दे मांडले.

तिने नाईलाजाने नंबर दिला. तरी पुढे बोलली ती, "मला हे असं घरी न सांगता नाही भेटता येणार. आज घरी सांगते मग भेटू. " 
तिच्यातला हा बदल बघून वैशूही दचकली होती. मनोजच्या मुद्द्यांसमोर सपना निशब्द झाली होती. सुरुवातीला राग आला तरी आज त्याच्या बोलण्याने ती थोडी नरमली होती. आजतागायत तिच्याशी कुणी असं सभ्यपणे आणि तरीही स्पष्टपणे बोललेलं नव्हतंच. तिच्या स्वप्नातलं प्रेम कदाचित नसेल प्रत्यक्षात येणार पण म्हणून जे मिळेल ते नाकारण्यात काही अर्थ नव्हता.

मनोज नंबर घेऊन निघाला. "फोनवर बोलून ठरवू कधी भेटायचं ते." असं बोलून परतला. 

सपना फक्त त्याच्याकडे बघत बसली. 

- क्रमशः 

विद्या भुतकर. 

No comments: