Thursday, October 25, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १६

        अम्या, विक्या संत्याच्या ऑफिसमध्ये बसले होते. गुरुवार होता. संत्या काहीतरी काम करत होता.

"संत्या अक्षयचा पिक्चर लागलाय चल की." , विक्या बोलला.
"काम सोडून पिक्चरला कुठं जायचं?", संत्या मन वर करुन बोलला.
अम्या असंच काहीतरी फोनवर बघत बसला होता. आजूबाजूला काय चाललंय याची त्याला काही पडली नव्हती. "अम्या" म्हणजे काय? त्याचा स्वभाव काय? त्याचे गुण-अवगुण काय? आपल्याला सपनी आवडते, याला कुणी आवडते का? विक्याचं काय? तो दिवसभर आपल्या सोबत नसतो तेव्हा काय करतो? त्याला आयुष्यात काही ध्येय आहे की नाही? असे अनेक प्रश्न संत्याला पडायला लागले, उगाचच. त्या दोघांकडे पाहून त्याला जाणवलं, आपण तरी काय वेगळे होतो? आहोत?
"चल की", अम्या बोलला आणि संत्याची तंद्री भंगली.
"नको तुम्हीच चला माझ्याबर, कॅफेमध्ये. त्याच्याकडं जनरेटर हाय, लाईट गेली तरी काम होईल.", संत्या बोलला आणि ताडकन उठलाच.

        दोन-चार दिवसांत संत्याकडे बरीच माहिती गोळा झाली होती. कॉन्ट्रॅक्टर कोण वगैरे ठरवायला पाटलांनी मदत केली होती. तेही खूष होते लेकावर. संत्याचं सरांच्या घरी येणं जाणं आता नियमित झालं तरीही तो तिच्याशी कधीच बोलला नाही पुढे होऊन. फक्त आपलं काम करत राहिला. ज्या पोरांवर तक्ते बनवायचं काम दिलं होतं त्यांनी चार वेळा सांगूनही पूर्ण केलं नव्हतं. त्यामुळे अम्याला त्यानं त्या पोरांना बोलवायला धाडलं आणि स्वतः विक्याबरोबर कॅफेमध्ये गेला. सपनीने तक्त्यांसाठी लागणारी यादी दिली होती. पण यातलं त्याला काहीच येत नव्हतं. कधी अभ्यास केला असेल तर ना? त्या कामचुकार पोरांनीही ते काम केलं नव्हतं. शेवटी नाईलाजाने संत्या स्वतःच नेटवर थोडी थोडी माहिती शोधू लागला. तिकडे विक्या अजून दोन पोरं जमवून आचरट काहीतरी बघत बसला होता. खरंतर एरवी संत्याही तिथेच दिसला असता पण आता त्याला पॉर्नपेक्षाही काहीतरी उत्तेजित करणारं मिळालं होतं. त्याने विक्याला झापलं आणि तो सांगेल ते उतरवून घ्यायला लावलं. सगळी माहिती त्या धरुन आणलेल्या पोरांच्या हातात दिली आणि संत्या अम्याला घेऊन फ्लेक्सची माहिती काढायला सातारला जायला निघाला.

           संध्याकाळी बन्या सरांकडे पोचला तरी संत्या अजून आला नव्हता. बन्याने दिवसाचा वृत्तांत दिला, इतक्यात दारावरची बेल वाजली. सपनानं दार उघडलं तर तारवठलेल्या डोळ्यांनी, उभे राहिलेल्या मळकट केसांनी, हातात सामान घेऊन उभा राहिलेला संत्या तिला दिसला. तिच्या बसच्या मागे गाडीवरुन येतानाही असाच काहीतरी अवतार असायचा त्याचा.

"हे घ्या", म्हणून त्याने तिच्या हातात सामान दिलं आणि घरात शिरला.
त्याच्या तसं हक्काने हातात देण्यानही तिच्या आत काहीतरी हललं. सर्व घेऊन ती आत आली.
"हे काम झालं सर",म्हणून संत्या बन्याशेजारी जाऊन बसला.
त्यांनी एकेक तक्ता उघडून पाहिला. इतकं छान चित्रण, वर्णन आणि समजेल अशी भाषा. दिवसभरात सतत मागे लागून ते सर्व करुन घेतलं होतं त्याने. एका ठिकाणी त्याला अचानक काहीतरी दिसलं,"इतकं बघून पण चूक राहिलीच.".
शुध्द्लेखनाची चूक होती ती. त्याने सपनाकडे खोडरबर मागितलं. तिनेही ते आणून दिलं. मग त्याने दुसरीची पहिली वेलांटी करुन घेतली. सगळे त्याचं काय चाललंय हेच बघत बसले होते.
एकदम मान वर करुन तो बोलला,"सातारला जाऊन आलो. फ्लेक्स चं काम झालंय. परवापर्यंत येतील बोर्ड. "
"अरे जेवलास का न्हाई मग?", बन्याने त्याला विचारलं.
"हां आता जातो आपलं झालं की घरीच.", संत्या हळूच आवाजात बोलला.
"किती उशिर झाला. अजून जेवला नाहीयेस?", सर रागावून बोलले.
"खाल्लं होतं सांच्याला", तो शरमून बोलला.
"काय नाही, चल आताच खाऊन घे जरा. सपना ताट कर गं. ", सर म्हणाले.
"न्हाई अवो सर ऱ्हाऊ दे.", संत्या.
"अरे एक भाकरी टाकायला किती उशीर लागतोय?", म्हणत बाईही उठल्याच.
सपनाही मग उठली. भाकरी होईपर्यंत तो मोरीत हात-तोंड धुवून आला. केसांवरुन त्याने ओला हात फिरवला तसे त्याचे उभे राहिलेले केस उलटे मागे झाले. क्षणभर त्याच्याकडे बघत सपनाने त्याच्या हातात रुमाल दिला. तोंड पुसून तो पाटावर बसला. बाई म्हणाल्या तसं दहा मिनिटांत भाकरी झाल्या होत्या. तोवर सपनानं ताटात लोणचं, चटणी, मीठ, एक हिरवी मिरची वाढून दिली. त्याला जेवताना बघून तिच्या पोटात कालवलं. दिवसभर किती दगदग केली होती काय माहित? 
         नेहमीसारखंच बोलून घरी परतायला उशीर झालाच. त्याचे डोळे आज थकलेले दिसत होते.
"जा झोप आता. किती दमलेला दिसतोस.", सर संत्याला बोलले.
"नाय सर, आता कुटं जागा झालोय.", म्हणत संत्या हलकंच हसला. तो गेल्यावर कितीतरी वेळ सपना त्याला आठवत बसली, उगाचच.

---------------------------

फ्लेक्स लागले आणि गावात चर्चा सुरु झाली. दिसेल तिथे तीच चर्चा चालू होती. इतकंस गाव ते, त्यात कुठे खुट्ट झालं तरी चौघांना कळायचं. इथे तर मोठा कार्यक्रमच होता. लोकं येऊन संत्याला, आबांना, सरांना, बन्याला प्रश्न विचारत होते. काय मदत पाहिजे? कसं काम आहे? किती वेळ थांबावं लागेल? बारक्या पोराला घेऊन आलं तर चालेल का? त्याचं जेवण मिळेल का? अनेक प्रश्न. त्या प्रश्नांतून उत्तरं देत, प्रश्न पडल्यावर उत्तरं शोधत आजचा दिवस आला होता. सगळं सामान शाळेत येऊन पडलं होतं. संत्यानं पोरांना कामं सांगून ठेवली होती. त्यात हयगय झाली तर त्याचा ओरडा खावा लागणार हे त्यांनाही कळलं होतं. त्यामुळे तेही मुकाट्याने आपली दिलेली कामं करत होते.
        पाण्याच्या टाकीचं आणि शौचालयाचं काम सुरु झालं होतं. पहाटेच काँट्रॅक्टरनं आपल्या माणसांना बोलावून आणलं होतं. पहाटेच सर, बाई, सपना, अम्या, विक्या, पाटील, बन्या सगळी शाळेवर पोचली होती. सगळ्या शिक्षकांनाही मदतीला बोलावलं होतं. नऊ वाजायला आले तशी बरीच मंडळी जमली. सरांनी एकेका शिक्षकांना आपापल्या वर्गाचं काम दिलं होतं. तिथले बेंच शोधून दुरुस्तीला द्यायचे, तक्ते लावून घ्यायचे. खिडक्या दुरुस्त करुन घ्यायच्या. पंखे, लाईट काय लागेल ते बघायचं आणि वायरमनला सांगून बसवून घ्यायचं. प्रत्येक सरांकडे ८-१० माणसं लावून दिली होती. त्यानुसार सगळ्यांचं काम सुरु झालं. चार रंगारीही आलेले होते. त्यांनी ज्यादा रंग, बादल्या, ब्रश आणलेले होते. काही लोकांना बाहेरच्या भिंती रंगवायचं काम दिलं गेलं. थोडी माणसं मातीच्या पाट्या एका जागेवरून ग्राउंडवर नेऊन टाकू लागली. नंतर एकसारखं लेव्हलिंग करुन घ्यायचं होतं.
      एरवी टापटीप असलेली सपनाची ओढणी आज कमरेला खोचलेली होती. तिकडे संत्याचं काम बांधकामाजवळ जोमात चालू होतं तर प्रत्येक वर्गात जाऊन काय काय लागतंय ते बघायचं सपनीचं होतं. एका वर्गातले बेंच तपासत ती मागच्या बाजूला आली. तिचा आठवीचा वर्ग होता तो. एका बेंचवर तिला त्याची ती नेहमीची खूण दिसली. 'SS' लिहिलेली. तिचं मन थोडा वेळ का होईना मागे गेलं. सरांनी त्याला कोपऱ्यात उभं केलं होतं ते तिला आठवलं आणि ती हसली. वर्गात फळ्यावर मराठी व्याकरणाचं काहीतरी लिहिलेलं होतं. कित्येक दिवसांत कुणी फिरकलं नसल्याने पुसट झालेलं. तितक्यात संत्या अम्या सोबत आत येताना तिला दिसला. दोघेही बोलता बोलता थांबले तिला बघून.
"चार बेंच हलतायत, त्यांच्यावर खुणा करुन ठेवल्यात मी.", सपना बोलली.
अम्याही झटक्यात,"मी मिस्त्रीला बोलावून आणतो", म्हणून पळून गेला.
"शार्दूलविक्रीडित", संत्या बोलला.
"हां?", सपनाला काही कळेना.
"ते वृत्त", फळ्याकडे बोट दाखवत तो बोलला.
"अच्छा हो, मला काही त्यातलं लक्षात राहायचं नाही. ",सपनाने कबूल केलं.

"म्हातारी उडता न येच तिजला माता मदीया तसी ।
कांता काय वदो नवप्रसव ते सातां दिसांची असी ॥
त्राता त्या उभयांस मी मज विधी घातास योजीतसे ।
हातामाजि नृपाचिया गवसलो आता करावे कसे! ॥
..
.. "
संत्या सुरात म्हणू लागला.

सपना काहीच न आठवल्यानं त्याच्याकडे बघत बसली. 

"नळदमयंती मध्ये होतं ना?", त्याने तिला आठवण करुन दिली.
तिनेही नुसतीच हो हो म्हणून मान हलवली. तिला काहीही आठवत नव्हतं. मराठीपासून ती केव्हाच दूर गेली होती.
"नळराज्याच्या तावडीत सापडलेला हंस सांगतोय राजाला की मला जाऊ द्या, माझी म्हातारी आई, माझी बायको नवजात मुलांची आई आहे. त्यांना काय वाटेल? असं तो म्हनतोय.", संत्याने अजून समजावलं. ती फक्त त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती.

"काय अजून आसलं तर सांगा, मिस्त्री येतोयच.", म्हणून संत्या तिथून निघून गेला.

आणि सपना तिथेच उभी राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिली. त्याच्या पायातल्या मातकट स्पोर्ट्स शूजकडे, त्याच्या झरझर चालण्याकडे, त्याच्या अंगातल्या त्या नेहमीच्या टी-शर्ट, जीन्सकडे. त्याचं हे चालणं, कपडे सर्व आधीचंच होतं, तिच्या परिचयाचं. पण त्या सगळ्या तुकड्यातून नवीन दिसणारा संत्या वेगळा काढू पाहात होती. पण ती रेषा आता धूसर होत होती. अम्या तिथे आला आणि ती पुन्हा कामाला लागली.

-------------------------

        दिवस सरला होता. पाटील सकाळी आणि संध्याकाळी पाहणी करायला येऊन गेले होते फक्त. बरीचशी लोकं पांगली. दिवस कधी संपला, काय काय काम झालं याचा हिशोब करेपर्यंत रात्र झाली. शाळेत असं रात्रीपर्यंत कधी थांबायची वेळच आली नव्हती. रात्रीच्या दिव्यात काहीतरी वेगळीच दिसत होती शाळा सर्वाना. त्यात तिचं असं पालटलेलं रुप. थोड्या बांधकामाला अजून २-४ दिवस लागणार होते. पण वरवरची बरीच कामं पूर्ण झाली होती. लॉकरमध्ये नवीन आणलेल्या वस्तू, साहित्य ठेवलं गेलं होतं. सर बाईना गाडीवर घेऊन जाणार होते आणि संत्या सपनीला. त्याला पर्याय नव्हताच. सर पुढे निघाले आणि त्यांच्यामागे त्याची गाडी. सपनाने तिचं नेहमीचं मळकं हुडी घातलं. ओढणी कानामागून पुढे घेतं चेहऱ्यावर घट्ट बांधली आणि त्याच्या गाडीवर मागे बसली. ती बसताना बाईकला हिसका बसला, त्याने तो त्याच्या दोन्ही पायांनी सावरला. त्याने 'झालं?' विचारलं आणि ती 'हं' म्हणाली. गाडी जोरात निघाली. त्याच्या अंगाचा घामाचा वास मागे तिच्याकडे येत होता. ओळखीचा वाटू लागला होता तो तिला. त्याची मान, हात उन्हानं काळवंडले होते. त्याच्या गाडीचा नंबर दुरुनही ओळखायची ती. आणि  त्याच्या दिसण्याचाही तितकाच तिरस्कारही करणारी ती आज त्याच्या गाडीवर बसली होती. सकाळपासून गेलेला दिवस आठवण्याची संधी मिळायच्या आधीच घर आलं होतं. तिला घराजवळ उतरवून तो फक्त 'येतो' म्हणाला आणि तिने उत्तर देण्याच्या आधी निघूनही गेला होता. 

क्रमशः

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: