Tuesday, October 30, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १९

      सपना गाडीत बसल्यावर स्थिरावली. त्याने तिला पाण्याची बाटली दिली. तिने घटाघटा पाणी पिलं आणि तिला जाणवलं खरंच किती तहान लागली होती. त्याची नजर रस्त्यावर होती. इतक्या अरुंद रस्त्यावरुन गाडी न्यायची म्हणजे कसरतच असायची. त्याने घातलेल्या खादी कुर्त्याच्या बाह्या वर दंडापर्यंत दुमडल्या होत्या. त्याच्यावर दिवसभर असलेलं जाकीट काढून टाकलेलं होतं. केस, डोळे, चेहरा पाहून किती दमलेला वाटत होता. त्याच्यी दिवसभराची धावपळ तिला आठवली. 
"काही खाल्लंय का?", त्याने विचारले. 
"आता घरी जाऊन जेवणारच आहे.",सपना बोलली. 
त्याने आपल्या उजव्या बाजूने हात घालून दाराच्या कप्प्यातून केळं काढून तिला दिलं. तिनेही मुकाट्याने ते खायला सुरुवात केली होती.  
"आज इतका उशीर कसा झाला ते?", त्याने पुन्हा एकदा विचारले. एकेकाळी तिच्या क्षणा-क्षणाची माहिती ठेवणारा तो. तिच्याबद्दल आपल्याल्या काहीच माहित नसतं याचं त्याला वाईट वाटलं. 
" काम होतं थोडं. आणि आज कार्यक्रम पण होता ना  …" ती पुढे बोलता बोलता ती थांबली. 
आपल्या कार्यक्रमामुळे तिला उशीर झाल्याचं त्याला वाईट वाटलं. 
"चांगला झाला आजचा कार्यक्रम", तिने काहीतरी बोलायचं म्हणून सांगितलं.
"तुम्ही होता का? मला दिसला न्हाई ते?", त्याने सरळ थाप मारली. 
"हो होते ना. चांगलं बोलता तुम्ही भाषणात", ती. 
तो तसा लाजला. गाडीने आता जोर पकडला होता.…. 
मागे आशिकी २ ची गाणी लागली होती. 'सून रहा है  ना तू... '. तिने पुढे होऊन आवाज वाढवला थोडासा. त्याला तिच्या आठवणीत रिपीट वर लावलेलं हेच गाणं आठवलं. 
त्याने एकदा मागे बघून घेतलं. पोरं दमली होती. एकमेकांच्या खांद्यावर माना टाकून झोपली होती. 
तो तिच्याकडे बघत बोलला, "एक सांगायचं होतं तुम्हाला", त्याने बोलू का नको विचार करत बोलून टाकलं. 
तिला वाटलं,'झालं आता'. त्याच्या नजरेशी भिडलेली नजर तिचं हृदय कापत गेली. 
"मी लई मूर्खपणा केलाय ह्याच्या आधी. तुम्हाला लई त्रास दिला ना?",त्याने स्पष्ट सांगितलं.
त्याचं हे वाक्य तिला अनपेक्षित होतं. तो आजवर कितीही तिच्या मागे असला तरी असं स्पष्टं कधी बोलला नव्हता. त्यामुळे तिला काय उत्तर द्यावं कळेना. 
"जाऊ दे, मी नाही लक्ष देत आता अशा गोष्टीकडे", ती काहीतरी बोलावं म्हणून बोलली. 
"तो तुमचा मोठेपणा झाला ओ. पण चुकलं माझं. आता कामाला लागल्यावर कळलं आयुष्यात काय काय असतं ते. आता माझं तेव्हाचं वागनं म्हंजे माकडखेळच." , संत्या बोलला. 
ती गप्प  बसली. 
"पण तुम्ही चांगल्या हाय. कधी उलट बोलला नाही. आपलं काम, अभ्यास करत राहिलात. असंच करत राव्हा.", संत्या बोलला. ती थोडंसं हसली फक्त. 
थोडं अंतर गेल्यावर ती म्हणाली,"तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरंका?"
"अरे ?? तुम्हाला कसं कळलं?", त्याने आश्चर्याने विचारले. 
"ते काय गुपित आहे का? बिलबोर्डवर दिसलं होतं मध्ये. ", ती हसून बोलली. 
त्याला आपला हाताची घडी घातलेला बोर्डवरचा फोटो आठवला आणि त्याच्या खाली लिहिलेली ढीगभर नावंही. तीही आपल्याला तिथे पाहते हा विचार करून तो लाजला. 
"त्ये होय. करावं लागतं पार्टीसाठी. बाकी काही नाही." , तो. 
 तिलाही मग त्याचा 'गोरा' फोटो आठवून हसू आलं. 
"अभ्यास कसा चाल्लाय?", त्याने विचारलं.
"हां, चालू आहे. आता लेक्चरर म्हणून जाते ना? तुम्ही कॉलेजला नाहीच जात का आता? ", ती म्हणाली. 
"माझं काय ओ अभ्यास आपला नावाला. उगाच हट्ट म्हणून सातारला यायचो.", संत्या बोलताना ओशाळला. 
"आमचं जाऊ द्या. तुम्ही अजून काय करनार हाय पुढं?",त्याने विचारलं.
"प्रोफेसर व्हायचं आहे मला. पीएचडी करायची आहे. सरांशी बोलणं चालूय. बघू किती जमतं." ती बोलली. 
"शिका, शिका. आपल्या गावच्या पोरांना पन शिकवा. लवकरच गावात १२वी च्या पुढं कॉलेज पायजे असा आग्रह करणार हाय आम्ही. तुमच्यासारख्या हुशार लोकांना मग बाहेर जायची गरज नाय पडणार.", संत्या. 
      सपनाला त्याचा हा विचार ऐकून एकदम छान वाटलं. कधी विचारच केला नाही आपण या गोष्टीचा. पुढं शिकायचं तर बाहेर जावं लागणार इतकंच तिला माहीत होतं. त्याच्या बदललेल्या रुपाकडे ती जणू पहातच राहिली. 
"आपल्या गावातून सातारला जाणाऱ्या-येणारया बस पण वाढवून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. बघू काय काय जमतं ते.पन प्रयत्न नक्की करणार. तुम्ही पण या की आमच्या हॉपीसमध्ये एकदा", त्याने तिला सांगितलं. 
"तुमच्या सारखे शिकलेले लोक हवेत गावाचा सुधार करायला. पार्टीच्या कामांसाठी तुमच्या सूचना लै उपेगी पडतील. आमी काय अडानीच लोकं. ", संत्या बोलत राहिला. 

       तिने मान डोलावली. जरा वेळ गेला आणि त्याने अजून एकदा तिची माफी मागितली. "सून रहा है ना तू" रिपीट वर चालू होतं. तोही सोबत गुणगुणत गाडी चालवत होता. सपना आपल्याशेजारी गाडीत बसली आहे याच्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. गावात पोचायला अजून पाऊणेक तास तरी होता इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने 'पप्पा' बघून कट केला. 
परत चार वेळ वाजल्यावर त्याने फोन तिच्याकडे देऊन सांगितलं, "स्पीकरवर ठेवून देता का मला?".  
तिने फोन उचलून स्पीकरवर ठेवला आणि त्याच्यासमोर धरला. 
"संत्या !!!! मी तुला म्हनलं होतं ना? ते एसटीचा अर्ज भरु नगंस म्हनून? आज तरी तू तो कलेक्टरला दिऊन आलास? आता दादासाहेबांचा फोन आला हुता.", पाटलांचा आवाज जोरजोरात येत होता. त्यांचा तो आवाज ऐकून त्याने सपनाकडे पाहिलं. गाडी बाजूला घेतली आणि गाडीतून उतरला. मागून सपनाही उतरली.
"पप्पा अवो, लोकांची किती तारांबळ हुती. फकस्त चार बस येतात दिवसाला. असं कसं चालंल?", संत्या कळकळीनं बोलत होता. 
"आपला ट्रॅक्सचा बिजनेस हाय ते इसरलाच का?", रात्रीच्या शांततेत पलीकडचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. 
"म्हनून काय लोकांची आबाळ करायची का? आपल्याला अजून बाकीची पण कामं हायत की.", संत्या बोलला. 
"हे बगा मला हे असलं काय चालनार न्हाई. मुकाट्यानं उद्या जाऊन एसटीचा अर्ज आन त्या टपऱ्यां पाडायचं अर्ज सगळं मागारी घ्यायचं.", पाटीलांनी निर्णय दिला. 
"मी तुमच्याशी घरी यीवून बोल्तो.", संत्या हळूच बोलला.
"तुम्ही घरी या नायतर जावा, मी सांगतोय ते काम झालं पायजे. कळलं का?", त्यांनी निर्णायक स्वरात विचारलं.
संत्या गप्प बसला. त्याने फोन ठेवला.
मागे उभी असलेली सपना कुत्सित हसली.
त्याने तिच्याकडे वळून बघत विचारलं, "काय झालं?". 
"मला वाटलंच होतं हे समाजकार्य म्हणजे सगळं देखावा आहे.", सपना बोलली. 
हे ऐकलं अन क्षणात संत्याचा पारा चढला. 
"दिखावा? कसला दिखावा? हे करतोय ते सगळं दिखावा वाटतंय का तुम्हांला? ", तो रागानं बोलला. 
"अच्छा? मग आजवर बाकी सगळी कामंकेलीत. त्याला परवानगी मिळत गेली बरोबर. आता त्येच घरच्या धंद्यांवर आलं तर तुमचं धाबा दणाणलं, नाही का?", तिने विचारलं. 
"काय बोलतीयस तू सपने? उलट मी भांडतोय पप्पांशी. तुला कळत न्हाईये का?", त्याने जीव तोडून विचारलं. 
"तेच! तोही दिखावाच असणार. मला दाखवायला, की मी किती सुधारलोय.", ती रागानं बोलली. 
आता मात्र त्याचं डोकं सटकलं होतं. 
"तुला दाखवायला म्हंजे? तुला काय वाटतं? सगळं जग तुझ्याभवतीच फिरतं का? सपने कधी बाहेर पडून बघ तुझ्या जगाच्या. तू मुस्काटात दिलीस त्यादिवशी जाग्याव आलो. तुझ्याभवतीच फिरत होतं आयुष्य माझं. त्यातून बाहेर पडलो. किती कष्ट पडले त्यासाठी? म्हायतेय का? आता कळतंय तूही माझ्यासारखीच. आपल्याच जगात ऱ्हानारी. भायेर पड, आजूबाजूला बघ काय चाललंय. ", संत्या जोरजोरात बोलत होता.  
"कसलं कष्ट?", तिने विचारलं. 
"तुला सांगू? तू नव्हतीस कधीच सोबत. या पोरांनी साथ दिली आजवर. त्यांना म्हायतेय कसलं कष्ट ते. म्हनून त्यांच्यासाठी करायला बगतोय. त्यांना कायतर उद्योग धंद्याला लावावं म्हनून धडपतोय. त्यात काय दिखावा करनार?", त्याने रागाने तिचे खांदे धरले. तिनेही तितक्याच रागानं ते झटकले. 
"तू,  तो मनोज, सगळे एकसारखेच. नाटक, दिखावा नुसता. ", सपना. 
"आन तू काय गं? मला भायेर जायचं. तू बाकी कुनाची पर्वा केलीस आजवर? आपलंच बघायचं. तुझ्यासारखी स्वार्थी लोकं नकोच या गावात. आज बरं डोळं उघडलं माझं. ", संत्याचा आवाज वरच्या पट्टीला पोचला होता. 
तो आपल्यावर असं उघड्यावर इतक्या जोरात ओरडतोय बघून सपनाला त्रास होऊ लागला, रडूचयेऊ लागलं. 
"चांगलंच झालं. तुझं पण हे रुप परत बघायला मिळालं.", सपना बोलली.
"तुला जे पायजे ना तेच बघतीस तू. तुझ्यापायी जीव जरी दिला ना? तरी म्हनशील, माझ्या दारात का दिलास?", संत्या आता सुटला होता. 
तिकडं 'गाडी का थांबली' म्हणून पोरं जागी झाली होती. त्यात यांच्या भांडणाचा आवाज. अम्यानं येऊन गाडीचा हॉर्न वाजवला आणि संत्या शुद्धीवर आला. संत्या गाडीत जाऊन बसला आणि सपना तिच्या जागेवर. गाडी जोरात धावली. तिचं घर आलं. ती खाली उतरली आणि तो निघाला. ती दार उघडून घरात गेली का नाही ते पाहायलाही नेहमीसारखा तो मागे थांबला नाही.  

क्रमशः 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: